टेरेस गार्डन फुलवूया

 प्रा. आनंद बोरा
रविवार, 16 जून 2019

टेरेस गार्डन मनाला उभारी देते, प्रसन्न करते. हिरवीगार झाडे चैतन्य आणि उत्साह जागवतात. रंगीबेरंगी, सुगंधी फुले टवटवीतपणा आणतात. तेथे फुललेली औषधी वनस्पती, भाजीपाला, फळे कृतकृत्य झाल्याचा आनंद देतात. प्रत्येकाला टेरेस गार्डन करायची असते, पण प्रश्‍न असतो, कसं काय जमेल ते. अगदी सोप्पं आहे, चला कामाला लागूया!

टेरेस गार्डन मनाला उभारी देते, प्रसन्न करते. हिरवीगार झाडे चैतन्य आणि उत्साह जागवतात. रंगीबेरंगी, सुगंधी फुले टवटवीतपणा आणतात. तेथे फुललेली औषधी वनस्पती, भाजीपाला, फळे कृतकृत्य झाल्याचा आनंद देतात. प्रत्येकाला टेरेस गार्डन करायची असते, पण प्रश्‍न असतो, कसं काय जमेल ते. अगदी सोप्पं आहे, चला कामाला लागूया!

पावसाचे वातावरण झालंय. वातावरणात गारवा आलाय. निसर्गप्रेमींचा मोठा उत्सवच सुरू झालाय. प्रत्येकाला घरीदेखील हिरवाई फुलवावीशी वाटते आहे. टुमदार बंगला किंवा चाळी, वाड्यासमोर परसबाग फुलायची. गेल्या काही वर्षांत वाडे, चाळींच्या जागी गृह प्रकल्प साकारलेत. तेथील फ्लॅटमध्येही निसर्गाशी नाते जोडता येते. गच्ची किंवा गॅलरीतल्या छोट्या जागेतही बाग फुलवू शकतो. चला, टेरेस गार्डन फुलवूया! 

ज्या घरात राहता, त्याला बाल्कनी किंवा टेरेस असतो. त्याचा उपयोग टेरेस गार्डनसाठी कसा करावा, हे समजून घेऊया. टेरेसवर बाग फुलवताना प्रथम टेरेस जलरोधक (वॉटरप्रूफ) बनवा. जेणेकरून लिकेज होणार नाही, तसेच उतार देऊन पाणी वाहण्याची सोय करा. जागेची आखणी करून नेमके काय हवे ते ठरवावे. हे ठरवतांना फुलझाडे, औषधी वनस्पती, फळझाडे आणि भाजीपाला यांची वर्गवारी करा. टेरेसमध्ये सूर्यप्रकाश किती येतो, यावर कोणती रोपे लावावी, हे ठरवावे. टेरेसमध्ये गादीवाफा करावा की, कुंडीत रोपे लावावीत, हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग. त्यामुळे योग्य नियोजन करून पहिले कागदावर कच्चे स्केच बनवा. टेरेस गार्डनसाठी कमीत कमी दहा बाय दहाची जागा असेल, तरीही बाग फुलवू शकता. बागेसाठी पाणी  देण्याचे नियोजन आवश्‍यक आहे. ड्रिप करू शकता, ते जमत नसेल, तर झारी किंवा नळीच्या साह्याने पाणी देता येते.

अशा निवडा कुंड्या
रोपे लावताना शक्‍यतो मातीच्या कुंड्यांना प्राधान्य द्या. यामध्ये रोपे छान वाढतात. देशी गायीच्या शेणापासून न विरघळणाऱ्या शेणाच्या कुंड्यादेखील बाजारात मिळताहेत. शेण आणि झाडांच्या सालीपासून कुंड्या बनवतात. योग्य प्रकारे हाताळल्यास कुंडी पाच वर्षांवर टिकते. प्लॅस्टिक आणि सिमेंटच्या कुंड्यांना हा उत्तम पर्याय. आता इकोफ्रेन्डली प्लॅस्टिकच्या कुंड्याही मिळतात. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये लावलेल्या रोपाला आठ दिवसांतून एकदा पाणी द्यावे लागते. त्यासाठी कुंडीवर वॉटर इंडिकेटर असतो. त्यातील पाण्याची उंची घटली की, मग पाणी घालायचे. अशी कुंडी (इनडोअर प्लांटसहित) घरात कुठेही ठेवू शकता. आंब्याच्या पेटीला आतून शेडनेट लावून त्याचा झाडे लावण्यासाठी उपयोग होतो. पॉट भरायला अगदी तळाशी गवताचा उपयोग होतो. रिकामे पिंप, सिमेंट गोणी, टब, बादली यांचादेखील उपयोग कुंडीसारखा करतात.

कुंडीत रोपे लावताना
रोपे लावताना फुलझाडे असतील, तर त्यांना सूर्यप्रकाश आवश्‍यक असतो, शोभिवंत इनडोअर प्लान्टसाठी कमी सूर्यप्रकाश लागतो. यासाठी गार्डनमध्ये शेडनेटचा गरजेप्रमाणे वापरा. कुंडी बनवताना किंवा भरताना वातावरण थंड असेल, अशा वेळी रोप लावावे. सकाळी किंवा सायंकाळी रोपे लावल्यास उत्तम. मातीच्या कुंडीत रोप लावताना कुंडीला तळाशी छिद्र आवश्‍यक आहे. पाण्याच्या निचऱ्यामुळे मुळ्या सडत नाहीत. छिद्राच्या जागेवर खापर किंवा विटाचे तुकडे ठेवावेत. यानंतर पोयटा, तांबडी माती किंवा कोकोपीटने कुंडी भरावी. रासायनिक खते वापरू नयेत. रापलेले शेणखत, गांडूळखत, लेंडी खत, निंबोळी खत वापरावे. रोप लावताना रोपाची मुळे पूर्ण मोकळी करू नयेत. अलगद पिशवी काढून रोप कुंडीत लावावे, नंतर झारीने पाणी द्यावे.

पाणी व्यवस्थापन 
झाडांना आवश्‍यकतेपेक्षा जास्त पाणी घातल्यास ते दगावण्याची शक्‍यता असते. पानांची, फुलांची वाढ आणि टवटवीतपणा व्यवस्थित राखण्यासाठी पाणी सकाळी किंवा सायंकाळी गरजेप्रमाणे द्यावे. दररोजऐवजी दिवसाआड किंवा गरजेप्रमाणे पाणी द्यावे.

आजीबाईचा बटवा असावा घरी
गार्डनमध्ये औषधी वनस्पतीला अवश्‍य स्थान द्यावे. यासाठी डायबेटीज रुग्णांसाठी स्टिव्हिया, थायरॉईड, वजन कमी करणारी अश्वगंधा, बुद्धिवर्धक ब्राह्मी, डास नियंत्रणासाठी जेरेनियम (कपड्यामध्ये याची पाने ठेवा, त्याचा नैसर्गिक वास लागेल, डास येणार नाहीत), बासमती तांदळासारखा सुगंध देणारी अन्नपूर्णा (भातात पाने टाकायची, बासमतीचा सुगंध येतो), कापूर तुळस, राम तुळस, कृष्ण तुळस, सब्जा तुळस, लेमन तुळस, रान तुळस एवढे प्रकार बागेत लावू शकतो. अर्धशिशी, मायग्रेनसह ११८ आजारांवर उपयुक्त कोरफड सर्वांत उपयोगी. प्रतिकार शक्ती वाढवणारा गुळवेलही लावता येतो.

भाजीपाला लावताना
रोपांची कमी जागेत अधिकाधिक लागवड करण्यासाठी कुंड्यांमध्ये तीन पायरी पद्धत फायदेशीर ठरते. गाजर, मुळा, रताळी, बीट इत्यादी मूळवर्गीय भाज्यांची लागवड यामध्ये करता येते. कुंड्यांच्या वरच्या भागात कमी उंचीच्या पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू यांची लागवड करावी. कुंडीच्या मध्यभागी फुलझाडांची किंवा फळभाज्यांची लागवड करता येते. कुंडीतील पाण्याचे बाष्पीभवनही कमी होते. फळझाडांची लागवड करताना कुंडी दीड-दोन फूट खोल आणि तेवढ्याच व्यासाचा पृष्ठभाग असावा. फळवर्गीय झाडांमध्ये बोर, ॲपल बोर, चेरी, केळी, लिंबू, अंजीर लावू शकतो. ही झाडे वर्षभरात फळे देतात. कलमी आंबा, चिक्कू, सीताफळ यांच्या फळांसाठी तीन वर्षे वाट पाहावी लागते. तोपर्यंत वेळोवेळी छाटणी करावी. दरम्यान, त्यातील मातीत पालेभाज्या घेऊ शकतो.

   झाडांची निगा
 उन्हाळ्यात कुंड्यांना दोनदा पाणी द्यावे.
 कुंड्यांना आवश्‍यकतेनुसार उकरी देऊन माती भुसभुशीत करा, मुळांजवळची हवा खेळती ठेवा.
 रोगट, वाळलेल्या फांद्या वेळोवेळी काढून झाडे सुदृढ ठेवा.
 कडक उन्हापासून संरक्षणासाठी गच्चीवर हिरव्या किंवा काळ्या शेडनेटची सावली करा, झाडे टवटवीत राहतील. ही शेडनेट जाळी २५, ५० आणि ७५ टक्के सावलीच्या उपलब्धतेप्रमाणे मिळते. 

  काय लावावे
 फुलझाडे - गुलाब, मोगरा, जाईजुई, जास्वंद, लिली, सोनटक्का, चाफा, जरबेरा, अनंत, पारिजातक, निशिगंध, अबोली, बोगनवेली, रातराणी, सूर्यफूल.
  हवा शुद्ध करणारी रोपे - ड्रेसिना, ऑर्किड, कोरफड, स्पाईडर, ख्रिसमस ट्री, रबर, बांबू, फर्न, एरिका पाम, तुळस, जेट.
 सावलीत वाढणारी झाडे - अरेका पाम, ड्रेसिना, क्रोटन, बालसम, डेफेनबेकीय, मरांटा, कोलीयस, अस्प्रा ग्रास, बिगोनिया.

  घरगुती प्रयोग
 ताक पातळ बनवा. त्यात तांब्याचा तुकडा टाका किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवा. ४-५ दिवसांनंतर ताक किंचित निळसर झाल्यावर त्यात दुप्पट पाणी मिसळून ते झाडावर दिवसाआड फवारा. पाने मुडण्याचा त्रास बराच कमी होतो.
 पॉट भरायला अगदी तळाशी गवत वापरा.
 बाऊन लीफ (पालापाचोळा) खतासाठी वापरा.
 कीड आल्यास गोमूत्र फवारा.
 बाहेरगावी जाताना पॉट ड्रीपर वापरा.
 सोलरवरील गार्डन फाउंटन वापरा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anand bora article about terrace garden