esakal | आव्हाने अनंत; जागवू सामाजिक संवेदना
sakal

बोलून बातमी शोधा

Challenge

आव्हाने अनंत; जागवू सामाजिक संवेदना

sakal_logo
By
आनंद देशपांडे saptrang@esakal.com

मागच्या वर्षी कोरोना साथीची पहिली लाट आली, त्यादरम्यान लघुउद्योजकांवर, त्यांच्या व्यवसायाच्या आर्थिक गणितांवर विपरीत परिणाम झाला. त्या परिस्थितीत निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांचा सामना करणारे लघुउद्योजक आत्ता कुठे सावरायला लागले होते, तेवढ्यात मार्च महिन्याच्या शेवटी कोरोना साथीची दुसरी लाट आली. त्यातून निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे उद्योजकांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आणि भविष्याविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू झाले. या निर्बंधांच्या निर्णयाचा दीर्घकालीन परिणाम केटरर्स, फोटोग्राफर्स, सलून- ब्युटी पार्लर, फॅशन क्षेत्रातील व्यावसायिक, या आणि अशा उद्योजकांवर होणार आहे. महाराष्ट्रात १७ लाखाहून जास्त लघुउद्योजक ९० लाखांपेक्षा जास्त लोकांसाठी रोजगार निर्माण करतात. एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या उद्योजकांच्या समोर आज रोजगार टिकवून ठेवण्याचा गंभीर प्रश्न उभा आहे.

निर्बंध लागू केलेल्या या कालावधीत लहान उद्योजकांना कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे हे समजण्यासाठी ‘दे आसरा’ फाउंडेशन आणि ‘ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सार्वजनिक धोरण आणि लोकशाही शासन व्यवहार केंद्र ’ यांनी संयुक्तपणे एक तातडीचं सर्वेक्षण केलं. छोट्या उद्योजकांसमोरील आव्हाने लक्षात घेऊन या अडचणीच्या काळातही हे व्यवसाय टिकून राहावे यासाठी त्यांना आवश्यक ती मदत करावी जेणेकरून भविष्यातही ते रोजगाराच्या संधी निर्माण करत राहतील या उद्देशाने हे सर्वेक्षण केले गेले.

खेळत्या भांडवलाची कमतरता, डिजिटल मार्केटिंगविषयक कौशल्यांचा अभाव, बाजारपेठेशी नसलेला थेट संपर्क ही छोट्या उद्योगांसमोरची तीन प्रमुख आव्हाने आहेत. याचबरोबर कर्जाचे हप्ते भरण्याची क्षमता नाही, कुशल कामगारांचा अभाव, ग्राहकांकडून उशीरा मिळणारे पैसे, स्वतःची वैयक्तिक बचत संपत आलेली आहे आणि त्याचबरोबर पर्यटन, इव्हेंट मॅनेजमेंट यासारख्या सेवांना पुरेशी मागणी नाही, अशा इतर अडचणी आहेत.

मागील सहा वर्षे लघुउद्योजकांच्यासाठी काम करताना ‘दे आसरा’ फाउंडेशनने अनुभवले आहे की लहान व्यावसायिक ग्राहक मिळवण्यासाठी, भांडवलाची जुळवाजुळव करण्यासाठी खूप धडपड करत असतात आणि सातत्याने त्यांना नवीन कौशल्य मिळवायला लागतात. उत्पादन प्रक्रियेतला खर्च कमीत कमी कसा होईल यासाठी तारेवरची कसरतही करावी लागते. या सगळ्यात नव्याने भर पडली आहे ती या कोरोना विषाणू आणि त्यातून उद्भवलेल्या साथीच्या रोगाची !. आज बघायला गेलं तर असंख्य लघुउद्योजकांना त्यांच्या भविष्याबद्दल असुरक्षितता निर्माण झाली आहे.

बऱ्याच लहान उद्योगांचे भविष्य अस्थिर झाले आहे आणि वाढत राहणाऱ्या कर्जामुळे त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या अडचणीच्या काळात कॅश फ्लोचे व्यवस्थापन करणे ही त्यांची सगळ्यात मोठी अडचण आहे. निर्बंधांमुळे हे उद्योजक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे त्यांची समस्या आणखी वाढली आहे. ग्राहक ऑनलाइन बाजारपेठेचे पर्याय शोधत आहेत त्यामुळे लघुउद्योजकांची परिस्थिती अजूनच बिकट होते आहे. सरकार आणि वित्त संस्थांनी देऊ केलेली आर्थिक मदत पुरेशी नाही. माहितीच्या आणि कागदपत्रांच्या अभावामुळे बरेच उद्योजक या योजनांसाठी पात्रच होत नाहीत. या लघुउद्योजकांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत शक्य त्या सर्व मार्गाने या उद्योजकांना मदत मिळणे आवश्यक आहे. नव्याने समोर आलेल्या आव्हानांवर मात करताना या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

या परिस्थितीवर आपण खालील उपाययोजना करू शकतो.

  • स्थानिक उद्योजकांकडून खरेदी : आपल्या जवळपासच्या स्थानिक उद्योजकांकडूनच वस्तू आणि उत्पादनांची खरेदी करूया आणि त्याबद्दल इतरांनाही सांगूया.

  • उद्योजकांचे पैसे वेळच्यावेळी देऊया : अनेक मोठ्या कंपन्यांना हे लहान उद्योजक व्यावसायिक कच्चामाल, इतर प्रक्रियांसाठी लागणाऱ्या वस्तू व सेवा पुरवत असतात. तेव्हा सर्व मोठ्या उद्योग कंपन्यांनी या लहान व्यवसायिकांची जी देणी असतील ती लवकरात लवकर चुकती करावी म्हणजे त्यांचा कॅश फ्लो सुधारण्यास मदत होईल.

  • छोट्या उद्योजकांसाठी अनुदान किंवा कर्ज योजना: बऱ्याचदा क्रेडिट स्कोअर चांगला नसल्यामुळे, तारण देऊ शकत नसल्यामुळे आणि कागदपत्रांच्या अभावामुळे या उद्योजकांना कर्ज मिळणे कठीण होते. दानशूर व्यक्ती आणि कंपन्यांनी या क्षेत्रात गुंतवणूक केली तर उद्योग जगताला त्याचा लाभ होऊ शकेल. योग्य वित्त संस्थांना हाताशी धरून हे पैसे योग्य उद्योजकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ‘दे आसरा’ ने यासंबंधी काही योजना राबवल्या. या योजनांच्या माध्यमातून पाच कोटी रुपये ६५० पेक्षा जास्त उद्योजकांमध्ये कर्जाच्या स्वरुपात करण्यात आले.

  • डिजिटल मार्केटिंगसाठी अनुदान : ज्यांना डिजिटल मार्केटिंग मधील मदत करता येणार आहे त्यांनी त्या कौशल्यांचे प्रशिक्षण आपल्या जवळपासच्या व्यावसायिकांना द्यावे, तंत्रज्ञानाच्या वापरातून बाजारपेठेपर्यंत पोचवण्यासाठी मदत करावी. डिजिटल माध्यम वापरण्यासाठीसुद्धा अनुदानाची आवश्यकता आहे. या कौशल्यांमुळे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा एक पर्याय या उद्योजकांना उपलब्ध होईल.

  • छोट्या उद्योजकांचा बाजारपेठेशी संपर्क प्रस्थापित करून देणे: विविध माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘दे आसरा’ फाउंडेशन ने deAzzle च्या माध्यमातून ई स्टोअर उपलब्ध करून दिले आहे. याच बरोबर ‘गूगल माय बिझनेस’ वर या व्यवसायांना आणून त्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत केली जाते.

‘दे आसरा’ फाउंडेशन विषयी

‘दे आसरा’ फाउंडेशन ही एक ना-नफा तत्वावर चालणारी संस्था उद्योजकांना त्यांच्या व्यावसायिक प्रवासात मदत करण्याच्या हेतूने सुरु झाली. छोटे उद्योजकच रोजगार निर्मिती करून भारतातली बेरोजगारी संपुष्टात आणू शकतात या विश्वासातून व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी ही संस्था सहाय्य करते. आजपर्यंत अनेक उद्योजकांनी वेगवेगळ्या माध्यमातून ‘दे आसरा’ चा लाभ घेतला आहे.

सध्याचा आव्हानात्मक काळ बघता महाराष्ट्रातील लघु आणि सूक्ष्म उद्योगांच्या आत्ताच्या स्थितीचा एक सर्वंकष असा आढावा घ्यायला हवा आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी योग्य ती रणनीती आखायला हवी. आम्ही ‘दे आसरा’ तर्फे एक कृती आराखडा तयार करणार आहोत ज्यातून उद्योजकतापूरक उपक्रमांच्या मदतीने लघुउद्योजकांसमोरील अडचणी सोडविण्यास मदत होईल.

(लेखक पर्सिस्टंट सिस्टिम्सचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व ‘दे आसरा’ फाउंडेशनचे संस्थापक आहेत)