समृद्ध कार्याच्या सांगतेनंतर... (आनंद घैसास)

समृद्ध कार्याच्या सांगतेनंतर... (आनंद घैसास)

शनीचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा’नं पाठविलेल्या ‘कॅसिनी’ या अवकाशयानाची आपण दोन आठवड्यांपूर्वी माहिती घेतली. या माहितीचा हा उत्तरार्ध. गेल्या आठ वर्षांत कॅसिनीनं केलेला शनीचा ‘फेरा’ अनेक नवी माहिती देऊन गेला आहे. शनीच्या कड्याबाबतच्या उलगड्यापासून त्याच्या रासायनिक प्रमाणापर्यंत किती तरी गोष्टी ‘कॅसिनी’मुळं समजल्या आहेत. ११ सप्टेंबरला त्याचा शनीच्या वातावरणात अंत झाला असला, तरी त्यानं आतापर्यंत पाठविलेली माहिती किती तरी नवे आयाम देऊन गेली आहे. एकूणच हा ‘फेरा’ समृद्ध करणाराच होता...

गेल्या लेखात आपण कॅसिनी मोहिमेबद्दल थोडी माहिती घेतली. कॅसिनीचं प्रक्षेपण झाल्यापासून शनीपर्यंतचा प्रवास आणि आयोजित कार्यकालातली कामं यासंबंधी माहिती पाहिली. कालावधी चार वर्षांचा होता. यात ‘हायगेन्स’ हा अवतरक टायटन या शनीच्या चंद्रावर उतरवणं, शनीच्या चंद्रांच्या जवळून त्यांची निरीक्षणं घेणं, शनीची निरीक्षणं आणि त्याभोवतीच्या कड्यांचं निरीक्षण अशी एकूण चार मुख्य कामं यात ठरवण्यात आली होती. कॅसिनीचा कार्यकाल ३१ मे २००८ला संपुष्टात आला होता.
कोणत्याही अवकाशमोहिमेचा कार्यकाल ठरवताना तीन बाबी लक्षात घ्याव्या लागतात. एक म्हणजे यानाचं स्वास्थ्य; अवकाशात यान किती काळ चांगलं राहील, यानातली सर्व उपकरणं किती काळ काम व्यवस्थित देऊ शकतील, या उपकरणांना वापरण्यासाठी लागणारा पुरेसा वीजपुरवठा सौरफलकांमधून तयार होणं, तो साठवून हवा तेव्हा वापरण्यासाठी पुन:प्रभारित होणारे विद्युतघट सक्षम असणं. दुसरी बाब म्हणजे यानाचा मार्ग किंवा कक्षा योग्य राखण्याची व्यवस्था; ज्यात यानाला मार्गबदल करायचा झाल्यास, अग्निबाणांसाठी लागणारं पुरेसं इंधन शिल्लक असणं आणि यानाचा पृथ्वीशी संपर्क साधणारी उपकरणं सक्षम असणं, ज्यांमधून यानाला पाठवलेल्या सूचनांप्रमाणं योग्य वेळी योग्य काळासाठी हे अग्निबाण कार्यान्वित करण्याची यंत्रणा हवी तेव्हा पृथ्वीवरून नियंत्रण करून चालू किंवा बंद करणं हा प्रमुख भाग असतो. तिसरी बाब म्हणजे यानाशी सतत संपर्क ठेवणारी पृथ्वीवरची यंत्रणा; ज्यात यानाकडं कायम रोखलेल्या स्थितीत राहणारी रडार यंत्रणा, यानानं पाठवलेले संदेश ग्रहण करून ते साठवण्याची संगणकीय यंत्रणा, यानाच्या कक्षेकडं लक्ष देणारी एक आणि विज्ञानविषयक काम करणारी दुसरी यंत्रणा असे भाग असतात. यान तयार करताना नेहमीच त्याला आवश्‍यक असणाऱ्या गोष्टींपेक्षा थोडी राखीव, जादा ‘शिदोरी’ बरोबर ठेवण्याचा विचार केलेला असतोच. तसंच ‘संपर्क केंद्र’ पृथ्वीच्या एका ठिकाणी असणं पुरेसं नसतं. कॅसिनीचा विचार करता, एक उपग्रह संपर्क केंद्र अमेरिकेत कॅलिफोर्नियात, दुसरं युरोपात, तर तिसरं ऑस्ट्रेलियात उभारण्यात आलं होतं. म्हणजे २४ तासांत पृथ्वी स्वत:भोवती फिरली, तरी शनीच्या दिशेनं- पर्यायानं त्याच्याभोवती फिरणाऱ्या कॅसिनीकडं तीनपैकी कोणती तरी एक रडार अँटेना रोखलेलीच राहील. यानाकडून येणाऱ्या किंवा त्याच्याकडं पाठवायच्या सूचनांच्या ओघात जराही खंड पडता कामा नये हा विचार यात असतो. तसंच येणाऱ्या माहितीचा सतत येणारा ओघ साठवण्याची व्यवस्था करणारे संगणक सतत कार्यरत राहणंही महत्त्वाचं असतं आणि त्यांची माहिती साठवण्याची क्षमताही प्रचंड ठेवावी लागते. या साऱ्यांसाठी काम करणारी संशोधकांची आणि त्यासोबत तंत्रज्ञांची संख्याही खूप लागते. या साऱ्यासाठी लागणारी एकूण आर्थिक तरतूद हाही विषय या एकूण प्रकल्पाच्या कालावधीसाठी महत्त्वाचा ठरतो. असो.

कॅसिनीच्या बाबतीत नियोजित कालावधी संपुष्टात आला असला तरी यान सुस्थितीत होतं. यान फारच मौलिक आणि नवी माहिती पाठवत होतं. त्यामुळं मोहीम चालूच ठेवली गेली. त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी जमवाजमव सुरू झाली. यातून मोहिमेला दोन वर्षं मुदतवाढ मिळाली. कॅसिनीनं या काळात १३ ऑगस्ट आणि ८ ऑक्‍टोबरच्या त्याच्या एन्सेलॅड्‌सजवळून जाताना घेतलेल्या निरीक्षणांबाबत आपण गेल्या लेखात पाहिलंच आहे. त्यानंतर लगेचच १४ ऑक्‍टोबरच्या त्यावेळी ठरवलेल्या एन्सेलॅड्‌सच्या शेवटच्या भेटीत, एन्सेलॅड्‌सचा दक्षिण भाग जवळून पाहता आला. यात भूकवचाची हालचाल तर होत आहे, पण यात भूपट्ट निरनिराळ्या दिशांना जात नसून, सगळे एकाच दिशेनं, एखाद्या चक्रपट्ट्याप्रमाणं जात आहेत, असं समजून आलं. भूकवचाखालून वर येणाऱ्या द्रव्यामुळं हे होत आहे; तसंच या ठिकाणाहून उद्रेकातून वर उडणारं द्रव्य वातावरणाबाहेरही फेकलं जातं; तसंच या वातावरणाबाहेर फेकल्या गेलेल्या द्रव्याचा शनीच्या चुंबकीय क्षेत्रावर बराच कालावधीपर्यंत परिणाम होत राहतो, हेही समजून आलं.

शनीच्या कड्यांबाबत उलगडा
२ मार्च २००९ला शनीच्या ‘जी’ कड्यात सर्वांत लहान आकाराचा (जेमतेम तीनशे मीटर व्यासाचा) एक नवा उपग्रह सापडला. या नव्या ‘एजिओन’ उपग्रहातून बाहेर पडणाऱ्या द्रव्यांतूनच या ‘जी’ कड्याची निर्मिती झालेली आहे, हे समजून आलं. शिवाय शनीची कडी ही निरनिराळ्या उपग्रहातून अशा बाहेर पडणाऱ्या द्रव्यातूनच तयार झालेली आहेत, असं सिद्ध व्हायला मदत झाली. २३ जून २००८च्या शनीच्या सर्वांत बाहेरच्या कड्याचे रासायनिक घटक शोधताना या बर्फाळ कणांमध्ये मिठाचं बरंच प्रमाण सापडलं. ‘एन्सेलॅड्‌सच्या पृष्ठभागाखाली एक मोठा पाण्याचा समुद्र असावा, त्यात खारं पाणी असावं आणि त्या पाण्याच्या उद्रेकातून, कारंज्यांमधून फेकल्या गेलेल्या द्रव्यातून ही कडी तयार झाली असावीत, त्यामुळं हा मिठाचा अंश त्यात आला असावा, त्यामुळं हे गुणधर्म त्या कड्यांमधे दिसत आहेत,’ असं अनुमान त्यातून निघालं. त्यानंतर २१ जुलै २००९च्या एन्सेलॅड्‌सच्या कारंज्यातल्या पदार्थांच्या कणांच्या प्रत्यक्ष विश्‍लेषणातून त्यात फक्त मीठच नाही तर अमोनियाही आहे हे समजून आलं.
१० ऑगस्ट २००९ला शनीची ‘संपात’ स्थिती होती. संपात स्थितीत शनीचा तिरपा अक्ष सूर्याला समांतर स्थितीत येतो. त्यामुळं पृथ्वीवरून शनीकडं संपात स्थितीत पाहताना, विषुववृत्ताच्या रेषेत असणारी कडी एका रेषेत आणि समान प्रकाशित झाल्यानं दिसेनाशीच होतात. याच वेळी सूर्यप्रकाश कड्यांवर आडव्या दिशेनं असल्यानं, शिवाय कॅसिनीही त्यांच्या दक्षिणेस थोड्या तिरप्या दिशेनं असल्यानं, या कड्यांमधली उंच-सखलता चांगली दिसली. कड्यांमधल्या बर्फाळ कणांचं वितरण समान नसून, त्यात अनेक ठिकाणी गाठींसारख्या रचना आहेत, छोट्या मोठ्या पर्वतरांगांसारख्या रचना आहेत, असं दिसलं. १३ सप्टेंबर २००९ला ‘डिऑन’ उपग्रहाचं जवळून निरीक्षण करता आलं, त्यावेळीही त्यासोबतचे कडे हे डिओनमधून बाहेर पडलेल्या द्रव्यातूनच तयार झालेले आहेत, हे समजलं.

२ फेब्रुवारी २०१०ला एक फार मोठी गोष्ट झाली. कॅसिनीच्या क्षमता चाचणीनंतर या अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या प्रकल्पाला २०१७पर्यंत, म्हणजे एकूण सात वर्षांची मुदतवाढ दिली गेली. शनीच्या सूर्याभोवतीच्या एका फेरीच्या सुमारे निम्म्या कालावधीपर्यंत आता निरीक्षण करता येणार होतं, त्यामुळं शनीवर ऋतूंमुळं काय परिणाम होतो हे समजणार होतं. १२ फेब्रुवारी २०१०ला बर्फाळ ‘मिमास’ उपग्रहाचं जवळून निरीक्षण करून त्याच्या तापमानाचा ‘उष्मा-नकाशा’ नव्यानं तयार करण्यात आला. गंमत म्हणजे या दिशेनं केलेला हा नकाशा संगणकीय खेळातला ‘पॅक-मॅन’ एका गोळ्याला पकडतोय, असा काहीसा दिसायला लागला. मिमासवर जी विवरं होती, त्यांच्या तळाशी काळाकुट्ट पदार्थ, तर विवराच्या कडा मात्र बऱ्याच उजळ, पांढऱ्या असल्याचं दिसून आलं. वीस जूनला कॅसिनी टायटनच्या अगदी जवळून, त्याच्या ‘आयनोस्फिअर’मधून जात होतं. यावेळी इथल्या भारित कणांनी शनीच्या चुंबकीय क्षेत्राला जणू पांघरूण घातल्यासारखं, अडवून धरल्यासारखं झालं आणि त्याचा उपयोग टायटनच्या चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म तपासण्यासाठी झाला.

कक्षीय मार्गात बदल
२६ सप्टेंबर २०१० ला कॅसिनीचा कक्षीय मार्गबदल करण्यात आला. शनीच्या ‘अवष्टंभ’ स्थितीच्या निरीक्षणास सुरुवात झाली. सूर्य दक्षिण गोलार्धात, सर्वात जास्त दक्षिणेकडं असण्याची ही स्थिती. शनीवरचे ऋतूबदल टिपण्याची ही सुवर्णसंधी होती. २८ नोव्हेंबर २०१०ला कॅसिनी ‘ऱ्हिया’ उपग्रहाच्या वातावरणाच्या सर्वांत वरच्या ‘एक्‍झोस्फिअर’ थरातून प्रवास करत होतं. तिथल्या वातावरणाच्या नमुन्यात कार्बन डाय ऑक्‍साइड आणि ऑक्‍सिजन आयनिक स्थितीत मिळालं. पृथ्वीखेरीज सूर्यमालेत इतर कुठंतरी ऑक्‍सिजन मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. ४ डिसेंबर २०१० ला शनीच्या उत्तर गोलार्धात, जिथं उन्हाळा होता, तिथं अचानक आणि प्रचंड मोठं चक्रीवादळ निर्माण झालेलं पाहायला मिळालं. कॅसिनीच्या तिरप्या कक्षामार्गामुळं सातत्यानं त्याचे वेधही घेता आले. उत्तर गोलार्धात मध्यावरच सुमारे १५ हजार किलोमीटरची दक्षिणोत्तर रुंदी असणारं हे वादळ पश्‍चिमेकडं घोंघावत निघालं. गेल्या बारा वर्षांतलं शनीवरचं हे सर्वांत मोठं वादळ होतं.

२१ जून २०११ ला एन्सेलॅड्‌सच्या कारंज्यातून वर फेकल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रत्यक्ष नमुने उपकरणात पकडणं शक्‍य झालं. त्याच्या विश्‍लेषणातून ते पाणी खारं असल्याचा आणि अनुषंगानं एन्सेलॅड्‌सच्या पृष्ठभागाखाली खाऱ्या पाण्याचा समुद्र असण्याचा पुरावाच जणू हाती लागला. १५ सप्टेंबर २०११ला कॅसिनी ‘ऱ्हिया’पासून ११ लाख किलोमीटरवर, तर एन्सेलॅड्‌सपासून १८ लाख किलोमीटरवर होते. इथून एकाच वेळी शनीचे पाच चंद्र आणि कडीही दिसत होती. असं छायाचित्र मिळणं हा एक योगायोग होता. हे छायाचित्र खूपच प्रसिद्ध झालं. १ मार्च २०१२ला डायोनच्या वातावरणातून जाणारी कक्षा असल्यानं त्याचे नमुने घेता आले. या वातावरणात सुमारे ११ घन सेंटिमीटरमध्ये एक ऑक्‍सिजनचा अणू असल्याचं कळलं. अर्थात हे वातावरण पृथ्वीच्या संदर्भात फारच विरळ म्हणावं लागेल. २२ एप्रिल २०१२ला शनीच्या कड्यांमध्ये निरनिराळ्या ठिकाणी आजूबाजूच्या रंगाहून अधिक चमकदार वस्तू, तर कधी शेपटीसारख्या तर काही सर्व दिशांनी जणू आभा फेकणाऱ्या वस्तू दिसून आल्या.
८ जुलै २०१२ला परत एकदा अधिक तिरप्या कक्षेत जाण्याचा मार्गबदल करण्यात आला. त्यामुळं शनीच्या विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस पाहणं शक्‍य झालं. शनीची कडी वरून आणि खालून दोन्ही दिशांनी पाहता आली. त्यातून काही नव्या कड्यांचा शोध लागला. या कक्षेमुळं शनीचे दोन्ही ध्रुवीय प्रदेशही निरीक्षणाखाली आले. ३० जानेवारी २०१३ला आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली, की उत्तर गोलार्धात जे वादळ निर्माण झालं होतं, त्याचं शनीभोवती एक वेटोळं पूर्ण होत आलं. एखाद्या पुराणकथेतल्या स्वत:च्या शेपटीला गिळणाऱ्या सापाप्रमाणं या चक्रीवादळाच्या मुखानं त्याची शेपूट गिळण्याची निरीक्षणं यावेळी मिळाली! मात्र, त्यासोबतच ते हळूहळू विरून जाऊ लागलं. १८ जुलै २०१३ला आयोजनात नसलेली एक गोष्ट साध्य करता आली, ती म्हणजे शनीच्या कड्यांमधून चक्क पृथ्वीचं एवढ्या दूरवरून छायाचित्र काढता आलं. तेही प्रथमच! त्यालाही खूप प्रसिद्धी मिळाली.

२४ ऑक्‍टोबर २०१३ : शनीच्या उत्तर ध्रुवावरून खूप उंचावरून प्रवास करताना शनी आणि कड्यांचं एकत्रित छायाचित्र काढता आलं, तर शनीच्या ध्रुवप्रदेशात एक ‘षटकोनी’ आकार आढळला! या षटकोनाचा अधिक मागोवा घेण्यासाठी सलगपणे अनेक छायाचित्रं काढून त्यांचा एक चलचित्रपटच तयार करण्यात आला. यात शनीच्या ध्रुवीय प्रदेशात विविध वायूंच्या वादळी उद्रेकातून हा षटकोनी आकार जन्माला येतो हे समजतं. ५ मार्च २०१४ : टायटनशेजारून कॅसिनीची ही शंभरावी फेरी. टायटनचं पृष्ठीय तापमान वजा २९० अंश सेल्शिअस असलं, तरी टायटनच्या अंतर्भागाची रचना मात्र काहीशी पृथ्वीच्या अंतर्गत रचनेसमान असण्याचे पुरावे हाती आले. २७ जुलै २०१४ला एन्सेलॅड्‌सवरची उन्हेरी पाण्याची कारंजी मोजताना ती एकूण १०१ भरली! २७ जानेवारी २०१५ला टायटन हा शनीच्या चुंबकीय क्षेत्राच्या बाहेरच्या अंगाला असल्यानं, शुक्रावर जसा सौरवाताचा परिणाम दिसतो, तसाच तो टायटनवरही होतो असं दिसून आलं. ३० मे २०१५ला शनीच्या अगदी वेगळ्याच दिसणाऱ्या हायपेरियन या चंद्राशेजारून कॅसिनीचा प्रवास झाला. ही वस्तू सूर्यमालेतील सर्वांत आगळी वस्तू आहे, असं दिसून आलं. त्याचा आकारही ओबडधोबड आणि अनेक विवरांनी बनलेला आहे. ही विवरं खूप खोल, नरसाळ्याच्या आकाराची आणि प्रत्येक विवराच्या तळाशी गडद काळेकुट्ट काहीतरी असल्याची निरीक्षणं मिळाली. म्हणावं तर बर्फाळ; पण छायाचित्रांवरून खडकाळ मातीनं बनलेला हा उपग्रह असावा असं वाटतं. शिवाय वातावरण अजिबात नाही!

१६ ऑगस्ट २०१५ ला डायोनशेजारून अखेरचा प्रवास, तर १८ डिसेंबर २०१५ला एन्सेलॅड्‌सजवळून ४९९९ किलोमीटरवरून बाविसावी आणि अखेरची फेरी. २३ मार्च २०१६ला टायटन जवळून जाताना त्याच्यावरील तीन पर्वतरांगांची उंची मोजता आली. यातलं सर्वांत उंच शिखर ३३३७ मीटर (१०९४८ फूट) भरलं!

कक्षेत पुन्हा बदल
सुमारे दोन वर्षं प्रचंड तिरप्या कक्षेत फिरत असल्यानं चंद्रांपासून दूर राहिलेलं कॅसिनी आता परत एकदा कक्षाबदल करून विषुववृत्तीय कक्षेत दाखल करण्यात आलं, ते २१ मार्च २०१६ला. तेही आता कड्यांना जवळ असलेल्या कक्षेत. लगेच १३ एप्रिल २०१६ला कड्यांमधले बर्फाळ कण आणि धुळीचे नमुने उपकरणात पकडून त्यांचं विश्‍लेषण झालं. यात या कड्यांमधे दोन प्रकारचे पदार्थ आढळले. एक तर ते कण शनीसारखेच घटक असणारे होते, तर काही कण सूर्यमालेबाहेरील आंतरतारकीय द्रव्यासारखे घटक असणारे होते. २६ एप्रिल २०१६ला टायटनवरची सरोवरं मिथेनची, तर त्या सरोवरांचे किनारे कार्बन डाय ऑक्‍साइड आणि द्रव नायट्रोजनच्या मिश्रणातून बनलेल्या चिखलांचे आहेत, हे दिसून आलं. ५ मे २०१६ ला एक आश्‍चर्यजनक निरीक्षण हाती आलं. एन्सेलॅड्‌सच्या फवाऱ्यांच्या वर जे दूरचे तारे होते, ते जणू फवाऱ्यांच्या पडद्यातून आरपार असल्याचं दिसत होतं. हे तर्काला न पटणारं होतं, कारण हे फवारे इतक्‍या उंच उडणं अनुमानित नव्हतं. मग लक्षात आलं, की उपग्रह शनीपासून दूर अंतरावर असताना फवारे अधिक उंच उडतात!

कॅसिनीच्या कक्षेत २९ नोव्हेंबर २०१६ ला परत एकदा बदल करण्यात आला आणि आता ते अतिलंबवर्तुळाकार कक्षा असणाऱ्या शेवटच्या २२ फेऱ्या मारण्यासाठी सिद्ध झालं. शनीच्या ‘एफ’ कड्याच्या बाहेरून, उसळी मारून विषुववृत्तीय कक्षा सोडून, ते परत एकदा तिरप्या कक्षेत मार्गक्रमण करू लागलं. या मार्गावर असताना ‘ॲटलस’ या ‘ए’ कड्याच्या बाहेरून फिरणाऱ्या छोट्याशा उपग्रहाची सुमारे अकरा हजार किलोमीटरवरून निरीक्षणं करता आली. गंमत म्हणजे विज्ञानकथांमधून कल्पना केलेल्या एखाद्या उडत्या तबकडीसारखा ॲटलसचा आकार आहे, तर एन्सेलॅड्‌सच्या कारंज्यातून उडणाऱ्या बर्फाळ कणांमध्ये हायड्रोजनचं अस्तित्व आता जाणवलं. १९ एप्रिल २०१७ला शनीच्या कड्यांमधून परत एकदा पृथ्वीचं दर्शन कॅमेऱ्यात पकडता आलं. टायटनशेजारून २३ एप्रिलला १२७वी आणि शेवटची फेरी कॅसिनीनं केली ती अगदी जवळून फक्त ९०९ किलोमीटरवरून. त्यानंतर कॅसिनीची शनी आणि त्याच्या कड्यांच्या मधून, पहिली झेप झाली ती २७ एप्रिल २०१७ला. या मधल्या जागेत कोणतेही कण आढळले नाहीत! पूर्ण रिकामी जागा...हेही गृहीत नव्हतं.

कॅसिनीची अखेरच्या फेऱ्यांकडं ‘ग्रॅंड फिनाले’कडं वाटचाल सुरू झाली. २४ मे २०१७ हा शनीच्या आयुष्यातला ‘विष्टंभ’बिंदू. उत्तर गोलार्धातल्या सर्वांत मोठा दिवस. अर्थात उत्तर ध्रुवावर अखंड सूर्यप्रकाश राहाणारा दिवस. शनीच्या उत्तर ध्रुवीय प्रदेशाची निरीक्षणं घेण्याची सुवर्णसंधी. २९ जून २०१७ला अखेरच्या २२पैकी ११ फेऱ्या पूर्ण झाल्या. कॅसिनी हळूहळू शनीजवळ सरकू लागलं. या कक्षेत असताना कॅसिनीला एका फेरीसाठी साडेसहा दिवस लागत होते. ताशी १,२१,००० किलोमीटर ते १,२६,००० किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगानं कॅसिनी फिरत होतं. याच वेळी १,२०,०००वर दूर असताना टायटनच्या गुरुत्वीय बलाचा वापर करून असा कक्षाबदल करून घेण्यात आला, की आता तो शनीच्या गुरुत्वीय बलानं अखेरच्या फेरीत त्याच्या वातावरणात खोलवर घुसेल. ११ सप्टेंबर २०१७ ला सकाळी १०:२७ वाजता कॅसिनी शनीपासून सर्वांत दूर होता. तिथून त्याने अखेरच्या फेरीला, शनीकडे झेपावण्यास सुरुवात केली. मात्र हे करतानाच, त्यानं त्याची अँटेना पृथ्वीकडे कायम रोखलेली राहील, अशी व्यवस्था केली आणि त्याच्याकडं जमलेल्या माहितीचा साठा पृथ्वीकडं पाठवण्यास सुरुवात केली. हे माहिती संग्रहित करण्याचं काम पुढचे ११ तास सलगपणे सुरू राहिलं! कॅसिनी १५ सप्टेंबरला सकाळी सव्वाबारापर्यंत माहिती गोळा करून यानावरील संगणकात साठवून नंतर कधी दोन दिवसांनी, कधी आठवड्यानं पृथ्वीकडं पाठवत असे; पण आता तसा वेळ शिल्लक नसल्यानं, प्रत्यक्ष वातावरणात घुसताना घेतलेल्या निरीक्षणांचं प्रक्षेपण तत्क्षणी करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली. तसंच सगळे अग्निबाण उरलेलं सारं इंधन वापरून शंभर टक्के कार्यान्वित करण्यात आलं. यातून ताशी १,४४,२०० किलोमीटर वेग प्राप्त झाला आणि दुपारी तीन वाजून तीस मिनिटं आणि पन्नास सेकंदांनी कॅसिनी शनीच्या वातावरणात शिरलं... वातावरणात तीनशे किलोमीटर आत गेल्यावरही वातावरणाचे नमुने घेण्याचे प्रयत्न झाले; पण आता वायू इतक्‍या वेगानं उपकरणात शिरत होता, की सगळ्याच उपकरणांचं तापमान तीस ते चाळीस पटींनी वाढलं! पंधराशे किलोमीटर आत गेल्यावर यानाला स्थिर ठेवणारी यंत्रणा कोलमडली, यान कोलांट्या मारू लागलं. तो अखेरचा संदेश... अर्थात तो आपल्यापर्यंत पोचायलाही दीड तास लागला! अर्थात आता प्रचंड तापमान वाढल्यानं आणि यानाला कोणतेही उष्णतारोधक बसवलेले नसल्यानं ते चक्क वितळून गेलं असेल...

अगदी ‘अखेरच्या श्वासापर्यंत’ कार्यरत राहणाऱ्या ‘कॅसिनी’ यानाची ही समृद्ध सांगता...तांत्रिकदृष्ट्या मोहिमेची सांगता झाली असली, तरी कॅसिनीनं आजपर्यंत पाठवलेल्या माहितीचा फार मोठा साठा अजून विश्‍लेषणांची वाट पाहत आहे...त्या विश्‍लेषणांच्या कामालाही काही वर्षं लागतील...त्यातून किती तरी नवे शोध पुढं येतील, हे मात्र नक्की!
(उत्तरार्ध)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com