काल रातीला सपान पडलं...! 

Sleep Dreams
Sleep Dreams

झोपेत काय काय होऊ शकतं आणि ते का याचा शोध घेणं हे काम काही डॉक्‍टर, मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अनेक वर्षांपासून करत आहेत. अमेरिकेत तर 'अमेरिकन स्लिप असोसिएशन' अशी एक संस्थाच आहे. झोपेत बाधा येते ती कोणत्या प्रकारची आणि तिचा संबंध कशाकशाशी असतो, यावर गेली काही दशकं ही संस्था संशोधन करत आहे. या संशोधनातून पुढं आलेले निष्कर्ष गमतीशीर, धक्कादायक, आश्‍चर्यकारक आहेत. याच निष्कर्षांविषयी.... 

'धडाड धुडु ऽ म्‌'...आवाजानं मी अचानक दचकलोच! छान झोपलो होतो...शेजारी झोपलेली माझी बायकोदेखील जागी झाली; पण माझ्या दचकण्यानं ती चक्क जोरजोरात हसायलाच लागली. दिवाळीची सुटी म्हटल्यावर छान निवांत झोपू म्हटलं, तर हे फटाके...आणि एकदा झोप चाळवली की नंतर मला नीट झोपही येत नाही. उगाच लोळत पडावं लागतं परत नीट झोप लागेपर्यंत. नक्की शांत झोप कधी लागेल आणि ती कशानं चाळवेल हे कधीच नीट कळत नाही. कधी कधी तर काही आवाज नसला, तरी झोपेत दचकायला होतं. ते का, असा प्रश्‍न जाग आल्यावरही सतावत राहतो. 

झोपेत काय काय होऊ शकतं आणि ते का याचा शोध घेणं हे काम काही डॉक्‍टर, मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते काही वर्षांपासून करत आहेत. अमेरिकेत तर 'अमेरिकन स्लिप असोसिएशन' अशी त्यांची एक संस्थाच आहे. 

झोपेत बाधा येते ती कोणत्या प्रकारची आणि तिचा संबंध कशाकशाशी असतो, यावर गेली काही दशकं ती संस्था संशोधन करत आहे. 

या सर्वेक्षणातून फक्त झोप चाळवण्याचेच नव्हे, तर झोपेतून जागं न होताही काही जण झोपेत चालतात, बोलतात, खातातही असं दिसून आलं आहे. स्वप्नांचे तर अनेक प्रकार असतात. आपल्यालाही असे अनुभव कधीतरी आलेले असतात...हे मला त्यांनी दिलेली उदाहरणं वाचताना पटलं. ते तुम्हालाही सांगावंसं वाटलं... 

झोपेचे तीन मुख्य प्रकार पडतात. एक गाढ झोप. दुसऱ्या प्रकारात अगदी गाढ झोप नसली तरी अशा झोपेत मिटलेल्या डोळ्यांची हालचाल होत नाही, तर तिसऱ्या प्रकारात डोळे मिटलेले तर असतात; पण बुबुळांची आतच झरझर हालचाल होत आहे, असं दिसून येतं. 'नॉन-रॅपिड आय मूव्हमेंट' आणि 'रॅपिड आय मूव्हमेंट' असं या दोन प्रकारांना म्हटलं जातं. गाढ झोपेतही डोळ्यांची हालचाल होताना दिसत नाही; पण स्वप्न पडत असतात, तेव्हा मात्र डोळ्यांची हालचाल होत असते. या तिन्ही अवस्था आळीपाळीनं एका रात्रीत होत असतात. मात्र, या तीन अवस्थांच्या संधिकालात, म्हणजे गाढ झोप असणं आणि नसणं या बदल होण्याच्या काळात मात्र फारच वेगळ्या गोष्टी होत असतात. त्या वेळीच झोपेतल्या 'व्यत्ययां'चे' किंबहुना 'बाधां'चे अनुभव येत असतात. 

झोपेतल्या या बाधा ही काही फार मोठी दुखणी किंवा व्याधी नव्हेत. काही प्रकार कधीतरी होतात, नंतर कधीच अनुभवास येत नाहीत, तर काहींचे परिणाम अस्वस्थ करणारे असतात. त्यांच्यावर उपाय करावे लागतात; पण या सगळ्यावरच उपाय आहेत असंही नाही. या झोपेतल्या बाधांचे सुमारे 10 प्रकार आढळून आले आहेत. 

'राजकन्येची निद्रा' असं यातल्या एका प्रकाराला एका लोककथेवरून नाव पडलं आहे. या कथेत एका विषारी फळाच्या सेवनामुळं फार काळापर्यंत निद्रिस्त राहिलेल्या राजकन्येची गोष्ट आहे. या प्रकारात माणसं दिवसरात्र, चक्क 24/30 ताससुद्धा झोपून राहतात. हलवून हलवून जागं केलं तरी ती उठायचं नाव घेत नाहीत; पण जागेपणी मात्र ती चांगली तंदुरुस्त असतात. ही 'दीर्घनिद्रा' ठराविक दिवसांनी परत परत येते, असंही दिसलं आहे; पण बाकी काहीच त्रास दिसत नाही. हा प्रकार महाविद्यालयीन तरुणांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. यावर डॉक्‍टरी उपाय असा काही नाही; पण 'न झेपणारा अभ्यास' हे एक कारण असावं, असा अंदाज आहे. काही संशोधक, गणिती आणि प्राध्यापकांनी आपण सलग दोन दिवस झोप काढल्याचे अनुभव नोंदले आहेत. मेंदूतल्या 'हायपोथलॅमस'च्या कामात काही अनियमितता आल्यामुळं ही दीर्घनिद्रा येते, असं अनुमान आहे. 

'भीतिदायक, भयावह स्वप्न' हा अनुभव तर अनेकांचा. आपण कुठंतरी खोल गर्तेत पडतोय, धापा टाकत जोरात पळतोय, कुठलं तरी श्वापद आपल्यामागं लागलंय, झुडपामागं दबा धरून बसलेलं कुणीतरी अचानक आपल्यावर झेपावतंय, आपण चिखलात रुतत जातोय...रक्त...रक्ताचा सडाच पडलाय सगळीकडं...कुणीतरी आहे तिथं...अरे बाप रे...अन्‌ आपण अचानक दचकून जागे होतो. डोक्‍यावरचा पंखा शांतपणे फिरत असतो, शेजारी घरातले सगळे झोपलेले असतात. शांतपणे. मग ते झुडुप कुठं आहे? अरेच्चा, स्वप्न पडलं होतं आपल्याला...उगाच घाबरलो. असा अनुभव अनेकांचा; पण त्याची खोलात जाऊन कारणं शोधली तर ती मानसिक नव्हे; तर शारीरिक कामाचा ताण पडल्यानं, उपाशी असताना झोपणं आणि दीर्घकाळ रात्रपाळीमुळं सतत अपुरी झोप ही असतात. मात्र, काहींना या स्वप्नांचीच इतकी भीती वाटायला लागते, की ते झोपायलाच भितात. अंथरुणावर पडून राहतात पण झोपत नाहीत...म्हणजे स्वप्नातले श्वापद येणारच नाही...पण त्यानंच हे वाढतं! या व्याधीवर चिंता कमी करणारी औषधं (ट्रॅंक्विलायझर, सिडेटिव) देतात, समुपदेशनाचाही यात फायदा होतो, असं दिसून आलं आहे. 

'झोपेत चालण्याची सवय' हे मानसिक ताण आणि जागरण या दोहोंमुळं होतं असं दिसतं. बऱ्याच वेळा फक्त 'शू करायची आहे' अशा जाणिवेनं मुलं उठून चालू लागतात आणि मग ते तसंच पुढं सुरू राहतं...तसंच हा चालण्याचा प्रकार आनुवंशिकही आहे. म्हणजे फक्त आई-वडिलांमुळंच नव्हे तर मामा-काकांसारख्या जवळच्या नातेवाइकांमध्ये जर झोपेत चालायची सवय असेल, तर ती भाचे-पुतण्यांमध्ये संक्रमित झालेली दिसते. झोपेत चालणारी माणसं दार उघडणं, घरातलं फर्निचर हलवणं हेही करतात...त्यात धडपडत नाहीत हे विशेष; अशा प्रकारात सरावाच्या जागी अन्य कुठला धोका नसला, तरी झोपेत चालणं धोक्‍याचंच ठरतं. घरातल्या विजेच्या तारांना अडखळून झालेल्या अपघातांची आणि पायऱ्यांवरून घसरून पडल्यानं किंवा अनोळखी घरांच्या बाल्कनीतून पडल्यानं झोपेत झालेल्या अपघातांची संख्या खूप आहे. अशा झोपेत चालणाऱ्याला त्या त्या वेळी लगेच हलवून, थोपवून किंवा थापट्या मारून जागं करणं हेच महत्त्वाचं. यावर अजून तरी दुसरा उपाय नाही. 

'डोकेफोड करणं' हा वाक्‍प्रचार खूप विचार करण्यासंबंधात असतो; पण अचानक डोकं फुटण्याचा आभास, चक्क डोक्‍यात स्फोट होतोय असं वाटणं हे अचानक होतं ते झोप लागतानाच. कधी कधी कानाशी झांजा वाजल्यासारखा आवाज, काहीतरी खणखणत पडल्याचा, काच फुटल्याचा आवाज, तर कधी फटाकेच वाजत असल्यासारखा आवाज येतो आणि आपल्याला जाग येते; पण ती क्षणिक. त्यानंतर आपण गाढ झोपतोही. हे आवाज कधी कानाजवळ तर कधी डोक्‍याच्या आत येतात. यात 'झनझनाटा'च्या आवाजासोबत कधी मेंदूत झिणझिण्याही येण्याची जाणीव असते; पण वेदना मात्र नसतात किंवा भीतीही वाटत नाही. मात्र, जागं झाल्यावर याची आठवण राहिली, तर एक आश्‍चर्य मात्र मनात कायम राहतं. कुतूहल वाटत राहते. हे काही कोणत्या दुखण्याशी संबंधित नाही. त्रासदायकही नाही. गंभीरही नाही. झोपेची संप्रेरकं शरीरावर परिणाम करू लागण्याचे हे परिणाम असावेत, असं अनुमान आहे. 

'भ्रम' किंवा भूल पडणं हे सर्वसाधारणत: स्वप्नात होतं. चमत्कारिक प्राणी दिसणं, अनोळखी वाटाव्या अशा चमत्कारिक वस्तू आणि जागा दिसणं आणि आपण तिथं आहोत असं भासणं याचा सगळ्यांना अनुभव असतो; पण ते झोपेत पडलेलं स्वप्न नसेल तर? उशीवर डोकं टेकल्या टेकल्या, अजून डोळेही पूर्ण मिटले नाहीत आणि असं काही दिसायला लागलं तर? समोर दिसणाऱ्या वस्तूंसोबतच एक सावली सरकत जाते, तिथं कुणीही नसतं! ते आपल्याला कळतंही आणि हेही कळतं की आपण झोपेत नाही...हे स्वप्न नाही. मग अचानक दरदरून घाम फुटतो. दचकायला होतं. डोकंही ठणकायला लागतं. कधी कधी तर पाठीच्या कण्यातून एक विचित्र कळ सणसण करते. हे कधी कधी झोपेतून जाग येतानाही होतं. हा अर्धनिद्रावस्थेत होणारा एक रोगच आहे. विशेषत: अतिनशा आणि ती सोडायचा प्रयत्न सुरू असणं यादरम्यान हे असे भ्रम होत असतात. नशा सोडल्या सोडल्या याचं प्रमाण जास्त असतं. अशा वेळी डॉक्‍टरांचा सल्ला घेणं आवश्‍यक ठरतं; पण आपण जर नशा करणारे नसाल तर...? अरे बाप रे ! 'नार्कोलेप्सी' हे दुखणं म्हणजे 'अनियमित, अनियंत्रित झोप येणं.' जराशी शांतता मिळाली तरी झोप येते. काही माणसं पाहा कशी गाडीत, सिनेमा पाहत असतानाही पटकन झोपतात. हे असं नेहमी होणं ही एक व्याधी आहे. अशा लोकांना या व्याधीसोबत भ्रम होणं हेही घडताना दिसतं. याचं मुख्य कारण शारीरिक दुर्बलता. मग ती नशेनं आलेली असेल किंवा इतर कारणांनी. या व्याधीवर वेळीच डॉक्‍टरी उपाय करावेत, अन्यथा भ्रमात वाढ झालेली आणि त्यातून धोके निर्माण झालेले आढळले आहेत. 

झोपेत अचानक ओरडणं, किंचाळणं, बरळणं, जोरजोरात कण्हणं हेही होतं. अशा वेळी कुणीतरी आपल्याला जागं करतं आणि सांगतं. त्यामुळं ते आपल्याला कळतं. लहान मुलं ओरडण्याबरोबरच उठून बसतात, दचकून रडायला लागतात. काहीजण तर रडत घरभर धावतही सुटतात. मात्र, ती तसं का करत आहेत, असं कुणी त्यांना विचारलं तर त्यांना ते सांगता मात्र येत नाही. पोटदुखी; विशेषत: जंत, आव (ऍमिबिक डिसेंट्री) ही याची काही कारणं असतात. बसनं, मोटारीनं केलेला मोठा प्रवास आणि त्यासोबत अनियिमित झोप, जागरण हे कारणही यामागं असतं; पण वयानुसार हे प्रकार कमी होत जातात. मोठेपणी कधी कधी स्वप्नात जोरात बोलायचं किंवा ओरडायचं असतं; पण ते जमत नाही. मग जोर लावून ते केलं जातं आणि ते ओरडणं स्वप्नात नाही तर प्रत्यक्षात घडतं, असाही काहींना अनुभव येतो. शिवाय ही सगळीच अवस्था झोपेत डोळ्यांची हालचाल न होण्याच्या कालावधीत होते, असं जाणवलं आहे; तसेच यावर काही उपाय नाही. 

अंथरुणावर असतानाच आपल्याला वाटतं, की आपण जागे आहोत; पण हात-पाय हलवायचा प्रयत्न केला तर ते हलतच नाहीत. एक बोटही हलत नाही. मान वळवून बाजूला पाहावं म्हटलं, तर तेही करता येत नाही. अर्धांगवायूचा झटका तर नाही आला? धडकीच भरते. हा पक्षाघात किंवा लकवा तात्पुरता असतो. बंद डोळ्यांची झरझर हालचाल होण्याच्या स्थितीतून जाग येण्याच्या स्थितीच्या संधिकालात हे होतं. होतं काय की, ऐच्छिक स्नायूंवरचा मेंदूचा ताबा अजून आलेला नसतो; पण आपल्याला जाग मात्र आलेली असते. किंबहुना आपल्याला जाग येऊ नये हा मेंदूचा प्रयत्नच आज्ञाचेतातंतूंना संदेश देण्याचं काम टाळत असतो. त्यामुळं आपल्याला कळत असलं तरी आपण हालचाल करू शकत नसतो; पण काही काळ ही निश्‍चलता जाग आल्यावरही राहते आणि त्यामुळं आपल्याला धस्स होतं. खरंतर झोप सुरू ठेवण्याचा मेंदूनं केलेला हा प्रयत्न असतो; पण कधी कधी जर हीच गोष्ट भ्रमासोबत होत असेल, तर मात्र ती गंभीर बाब असते. कारण या काळात भ्रमात पडणारी स्वप्नं काही पिकनिकची, वाढदिवसाच्या पार्टीची, अप्सरांसोबतची नसतात. ती तर सैतानाची, कुणी अज्ञात प्राणी आपल्याला खायला येत आहे अशीच असतात. तो भयानक धूसर, ओळखता न येणारा आकार, त्यानंच आपलं शरीर जखडून टाकलं आहे, असा भ्रम होतो. कुणीतरी आपल्याला चिरडून मारत आहे, कुणीतरी राक्षस किंवा एकच नव्हे तर अनेक काळ्या भयावह आकृत्या चक्क छातीवर चढून बसल्या आहेत आणि त्यामुळं आपल्याला हलता येत नाहीय, तोंडातून शब्दही फुटत नाहीय, कुणीतरी गळा दाबतोय, श्वासही घेता येत नाहीय असा तो भ्रमही असतो आणि त्यातून खरंच येणारा निश्‍चलपणा, कोंडणारा श्वासही. हे धोकादायक असतं. याची बाधा कॉलेजमधल्या अभ्यासाचं टेन्शन असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळते, तसंच घरात जाच होणाऱ्या, वयात आलेल्या तरुणींमध्येही याचं प्रमाण जास्त आहे, असं 1999 ला केलेल्या एका सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे. कॉलेजच्या मुला-मुलींकडून एक प्रश्‍नावली भरून त्यांना झोपेसंबंधीच्या तक्रारींची नोंद करायला सांगण्यात आली होती. त्यात इतर प्रकारांच्या तुलनेत हा प्रकार 75 टक्के मुला-मुलींनी नोंदवलेला दिसला. 'छातीवर राक्षस बसण्याच्या' या अनुभवाविषयी तर 'न्यू फाउंडलॅंडर्स'नी' 'ओल्ड हॉग,' 'म्हातारी जखीण' अशी ही एक परंपरागत समजूत आहे,' असं लिहिलं होतं. चीनमध्ये याच प्रकाराला 'अंगावर बसणारं भूत', तर इतर विविध ठिकाणी 'पितरांची बाधा' असं म्हणतात. 'अमानवी अपहरणाचं' म्हणजे कुणीतरी 'यमदूत' आपल्या शरीरातून आपल्याला काढून कुठंतरी अनोळखी ठिकाणी घेऊन जात आहेत, असा भासही या 'अर्धपक्षाघाता'शी संबंधित असावा, असा निष्कर्ष आहे. 

मात्र, याच्या उलट होणारा प्रकार आणखी वाईट असतो. म्हणजे मेंदूचा निश्‍चलतेबाबतचा शरीरावर पूर्ण ताबा नसणं. यात काय होतं की, स्वप्नात दिसणारी शरीराची हालचाल प्रत्यक्षातच घडणं. यात पटकन कूस बदलणं, घाबरून अंग चोरणं, हसणं, रडणं, गादीवर पडल्यापडल्याच चालल्यासारखे पाय हलवणे, मारामारीच्या हालचाली करणे, तर कधी संपूर्ण वाक्‍य बोलणे हेही झोपेत होते. याचा त्रास शेजारी झोपणाऱ्याला अधिक होतो. लाथाही खाव्या लागतात...पण कधी अशी माणसं डोळे बंद असताना गादीवरून उठून चालायला लागतात, तेही त्यांच्या स्वप्नातल्या रस्त्यानं...! यात अपघात होण्याची शक्‍यता असते. यात हातवारे करताना फर्निचर लागल्यानं हाडं मोडल्याचीही उदाहरणं नोंदली गेली आहेत. ही बाधा साधारणत: प्रौढ व्यक्तींमध्ये अधिक आढळते. पुढे होणाऱ्या पार्किन्सन्स दुखण्याची (जो वयानुसार चेतातंतूंच्या वाढत जाणाऱ्या कमकुवतपणानं होत असतो) ही प्राथमिक लक्षणं असू शकतात, असे संकेत या सर्वेक्षणातून मिळाले आहेत. मात्र असा संबंध खरंच प्रस्थापित करता येतो का, ते आता तपासून पाहावं लागणार आहे. या बाधेवर स्नायू शिथिल करणारी आणि शांत झोप येणारी औषधं उपचार म्हणून दिली जातात. 

कधी स्वत:च्या ठरवलेल्या 'डाएट'साठी, कधी आई-वडिलांनी तो पदार्थच खायला देणं नाकारल्यानं खाणं टाळलं जातं; परंतु मनातून तर ते हवंच असतं. परिणामी, ती इच्छा अपुरी राहिलेली माणसं झोपेत असे पदार्थ खातात, तेही डोळे बंद असताना. मात्र, अंतर्मनात नोंदली गेलेली वस्तूची घरातली जागा बदलली असेल तर? तर फार मोठा अपघात होऊ शकतो. विशेष म्हणजे सुरीनं केक कापण्यापासून ते गॅस पेटवण्यापर्यंत हे लोक झोपेत कामं करतात. ते फार धोक्‍याचं. या प्रकारात गॅस न पेटताच सुरू राहतो! सगळ्यात जास्त कोणते खाद्यपदार्थ खातात ही माणसं? तर फ्रिजमध्ये ठेवलेले गोड पदार्थ, चॉकलेट, अनेकदा नुसतं लोणी... स्वस्थ झोप न लागणाऱ्या व्यक्तींमध्येच हे दिसतं. यावर 'डोपामाईन' या उत्साहवर्धक औषधाचा उपाय होतो' असं काही डॉक्‍टर म्हणतात; पण ते अजून सिद्ध झालेलं नाही. 

निद्रानाश, झोपच न येणं ही जगभरातच सगळ्यात मोठी समस्या आहे. जास्त वेळ जागं राहिल्यानं रात्री आपसूकच खाणं होतं, तेही टीव्ही पाहत, एका जागी बसून. मग लठ्ठपणासोबतच अपचन, उच्च रक्तदाब, हृदयरोग, दिवसा कामात एकाग्रता न येणं, सतत ग्लानी, झापड येणं हे त्रास वाढतात असं दिसून आलं आहे. अनेक मोटारअपघातही निद्रेच्या कारणामुळं होत असतात; पण याला एकतर मोठं दुखणं मानलं जात नाही. हा रोगही नाही आणि त्याला मानसिक रोगही मानलं जात नाही. यावर चांगले उपाय आहेत; पण त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं. 

ज्याला 'स्वप्नदोष' असं म्हटलं जातं, ती व्याधी मानसिक आणि शारीरिक दोन्हींशी संबंधित असते. हवासा आणि नकोसा परस्पर्श, स्त्री-पुरुष संबंधांबद्दलच्या भ्रामक आणि वेडगळ कल्पनांचाही यात मोठा परिणाम असतो. दडपून ठेवलेल्या इच्छा हेही कारण असतं. यावर उपाय म्हणून डॉक्‍टरांचं मार्गदर्शन आणि योग्य वैयक्तिक लैंगिक समुपदेशन आवश्‍यक असतं. 

स्वप्नांचा अर्थ काढण्याचा प्रयत्न पूर्वीपासून झाला आहे. पहाटे पडलेली स्वप्नं खरी होतात, इथपासून, लहानपणापासून झालेल्या घटनांचा मनावर जो परिणाम घडतो, त्याचेच स्वप्न हे पडसाद असतात इथपर्यंत अनेक अर्थ लावले जातात. 'स्वप्नं ही मानसिक आजाराशी संबंधित असतात,' असं सिग्मंड फ्राईड यांनी सांगितलं होतं; पण ते आता सगळ्यांना मान्य नाही. प्रत्यक्ष शारीरिक अनियमिततेतून आणि झोपेच्या शारीरिक गरजेतून आपला मेंदूच स्वप्न दाखवण्याचा खेळ करत असतो, ते आपल्याला अधिक विश्रांती मिळावी या हेतूनं, हे आता मान्य झालं आहे. गंमत म्हणजे 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता हेही झोपेच्या या व्याधींचं एक कारण असावं असं काही वैद्यकीय संशोधकांचं म्हणणं आहे; पण त्यावरही अधिक संशोधनाची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com