
कम्बोडियातील सांबोर प्रेई कुक इथली प्राचीन हिंदू-मंदिरं आणि फ्नोम दा इथल्या हिंदू-मूर्तींबद्दलची माहिती गेल्या लेखात आपण घेतली. यानंतरच्या कालखंडातील एका महत्त्वाच्या मंदिराबद्दल या लेखातून जाणून घेऊ या.
- आनंद कानिटकर
कम्बोडियातील अनेक शिलालेख, मूर्ती, मंदिरं, प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचं वर्णन यांच्या आधारानं कम्बोडियातील अनेक ऐतिहासिक घटनांचा क्रम ठरवता येणं शक्य झालं आहे. गेल्या दीडशे वर्षांत झालेल्या संशोधनातून तिथल्या राजांबद्दल, समाजाबद्दल, मंदिरांबद्दल विविध प्रकारची माहिती आपल्यासमोर आली आहे. कम्बोडियातील राजा जयवर्मन (दुसरा) यानं इसवीसन ८०२ मध्ये तिथल्या महेंद्रपर्वतावर म्हणजे कम्बोडियातील सध्याच्या फ्नोम कुलेन नावाच्या पर्वतावर स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. याबद्दल आपल्याला कम्बोडियामधील एका शिलालेखातून माहिती मिळते. आजपासून अंदाजे १८०० वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेनं कम्बोडियातील प्रसिद्ध ख्मेर साम्राज्याचा पाया घातला गेला.
या फ्नॉम कुलेन पर्वतावरील जंगलात गेल्या काही दशकांत झालेल्या सर्वेक्षणात अनेक मंदिरांचे अवशेष सापडले, तसंच काही ठिकाणी शिवलिंगंदेखील आढळून आली आहेत. महेंद्रपर्वतावरील नदीच्या पात्रातही अनेक शिवलिंगं कोरलेली दिसतात. या नदीचं पाणी अत्यंत स्वच्छ असल्यानं नदीच्या उथळ पात्राच्या तळाशी पाषाणात कोरलेली अनेक शिवलिंगं दृष्टीस पडतात.
‘बांते श्राय’ शिवमंदिर
जयवर्मन (दुसरा) याच्या नंतर इंद्रवर्मन, राजेंद्रवर्मन, सूर्यवर्मन यांच्यासारखे पराक्रमी राजे कम्बोडियात होऊन गेले. या राजांनी त्यांच्या राज्यकालात स्वतःच्या राजधान्या तर वसवल्याच; परंतु शिव आणि विष्णू यांच्या मंदिरांची उभारणीही केली.
कम्बोडियातील ‘अंकोरवाट’ या मंदिराच्या खालोखाल प्रसिद्ध असलेलं मंदिर म्हणजे एक हजार वर्षांपूर्वी बांधलेलं तिथलंच ‘बांते श्राय’ नावाचं मंदिर. हे शिवमंदिर त्यावरील स्त्रीदेवतांच्या मानल्या जाणाऱ्या सुंदर शिल्पांमुळे कम्बोडियातील स्थानिक ख्मेर भाषेत आता ‘बांते श्राय’ या नावानं ओळखलं जातं. अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी या मंदिराचा गेल्या शंभर वर्षांत अभ्यास केला आहे.
कम्बोडियातील जयवर्मन राजाच्या यज्ञवराह नावाच्या गुरूंनी उभारलेलं हे त्रिभुवनमहेश्वराचं, म्हणजेच शंकराचं, मंदिर त्यावरील शिल्प आणि सुंदर नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या बाह्यभिंतीवर असणाऱ्या द्वारपालांच्या आणि स्त्रीदेवतांच्या मूर्ती तर कम्बोडियातील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत.
‘बांते श्राय’ हे छोटेखानी मंदिर जांभा दगड आणि वालुकाश्म (सँडस्टोन) वापरून निर्माण केलेलं आहे. मंदिराचं जोतं आणि भिंती इत्यादींचं बांधकाम जांभा दगड वापरून केलेलं आहे, तर त्यावरील मूर्ती आणि नक्षीकामासाठी वालुकाश्म (सँडस्टोन) वापरलेला आहे. एकानंतर एक असलेल्या तीन प्राकारांच्या (म्हणजे भिंतींच्या) आत असलेलं हे पूर्वाभिमुख मंदिर एका खंदकानंदेखील वेढलेलं आहे. त्यामुळे खंदकावर असलेल्या कॉजवेवरून मंदिराच्या आवारात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या या मुख्य भागात तीन गर्भगृहं दिसतात. यातील मधल्या गर्भगृहात शिवलिंग होतं. हेच शिवलिंग त्रिभुवनमहेश्वर या नावानं ओळखलं जात असे.
या मंदिराच्या आवारात संस्कृतमधील आणि कम्बोडियाच्या स्थानिक ख्मेर भाषांतील शिलालेख आहेत. त्रिभुवनमहेश्वराचं हे मंदिर ईश्वरपूर नावाच्या गावात उभारलं असल्याचीदेखील माहिती या शिलालेखांतून मिळते.या मंदिराच्या दरवाज्याच्या चौकटीवर असलेल्या शिलालेखानुसार, हे मंदिर त्रिभुवनमहेश्वराचं होतं. त्रिभुवनमहेश्वराचं हे मंदिर इसवीसन ९६७ मध्ये (म्हणजे एक हजार वर्षांपूर्वी) बांधून पूर्ण झालं होतं. राजगुरू यज्ञवराह यांची बहीण जान्हवी हिनंदेखील या मंदिरसमूहातील एका मंदिरात शिवलिंग स्थापन केलं होतं.
या मंदिरातील संस्कृत शिलालेखांत मिळते. यज्ञवराह यांच्याबद्दल थोडी माहिती या मंदिरातील शिलालेखातून मिळते. यज्ञवराह हे कम्बोडियातील ख्मेर राजा हर्षवर्धन (पहिला) याचे नातू होते. राजेंद्रवर्मन नावाच्या ख्मेर राजाचे ते सल्लागार होते. राजेंद्रवर्मनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जयवर्मन केवळ दहा वर्षांचा असताना राजा झाला. या दहा वर्षांच्या राजाचे यज्ञवराह हे गुरू झाले आणि त्यांनी राजाला पुढील शिक्षण दिलं. यावरून एका राजाचे सल्लागार आणि त्या राजाच्या मुलाचे गुरू म्हणून राजदरबारातील त्यांचं महत्त्व लक्षात येतं.
मंदिरातील मूर्ती
‘बांते श्राय’ इथल्या मुख्य मंदिरांच्या दरवाज्यावरील भागात दिक्पाल म्हणजे दिशांच्या रक्षकदेवता कोरलेल्या आहेत. या मंदिरात शिवाचं वाहन असलेला नंदी तर दिसतोच; परंतु शिव-पार्वतीची एक मूर्तीही इथं सापडली होती. याशिवाय, या मंदिराच्या प्रांगणात महिषासुरमर्दिनी आणि नटेश यांच्या मूर्तीदेखील आढळतात.
हे शिवमंदिर असल्यानं, कामदेवानं शंकराला बाण मारला होता, त्या कथेचं शिल्प, रावणानुग्रह म्हणजे रावणानं कैलासपर्वत उचलण्याचा प्रयत्न केला होता त्या कथेचं शिल्प इत्यादी शंकराशी संबंधित पुराणांतील कथांचे शिल्पपट्टदेखील इथं दिसतात. रावणानुग्रह हे शिल्प भारतातील अनेक प्राचीन शिवमंदिरांत, अगदी घारापुरी इथल्या लेण्यांत, तसेच वेरूळ इथल्या कैलास लेण्यांतदेखील कोरलेलं दिसतं.
‘बांते श्राय’ इथल्या इतर दोन छोट्या मंदिरांच्या दरवाज्यांच्या वरच्या भागात, तसंच प्रांगणातील प्रवेशद्वारांवरील भागात काही कथांची शिल्पं कोरलेली आहेत. या शिल्पांत वाली आणि सुग्रीव यांचं मुष्टियुद्ध, भीम आणि दुर्योधन यांचं युद्ध, कंसवध, खांडववनदहन इत्यादी कथांचं अंकन केलेलं दिसून येतं.
‘बांते श्राय’ मंदिरसमूहातील या शिल्पांवरून एक हजार वर्षांपूर्वी कम्बोडियात रामायण, महाभारत आणि पुराणांतील कथाही माहीत होत्या असं लक्षात येतं. अर्थात्, याला कम्बोडियातील शिलालेखातून पुरावादेखील मिळतो. कम्बोडियात सापडलेल्या इसवीसनाच्या सातव्या शतकातील (म्हणजे १३०० वर्षांपूर्वीच्या एका शिलालेखात) रामायण, महाभारत आणि पुराणांची हस्तलिखितं तिथल्या एका मंदिरात ठेवल्याचा उल्लेख आहे. या ग्रंथांचं मंदिरात रोज पठण केलं जावं यासाठीदेखील शिलालेखात सूचना केलेल्या आहेत. म्हणजे, ‘बांते श्राय’ हे मंदिर बांधलं जाण्यापूर्वी तीनशे वर्षं आधी कम्बोडियात रामायण, महाभारत आणि भारतीय पुराणं माहीत झालेली होती.
कम्बोडियातील भव्य मंदिरसमूह, शिलालेख, रामायण, महाभारत यांच्यावर आधारित शिल्प, लिखित पुरावे, तिथं सापडणाऱ्या मूर्ती आणि उत्खननात सापडणारे पुरावे यावरून भारतीय संस्कृती तिथं मोठ्या प्रमाणात रुजली होती हेच स्पष्ट होतं. अर्थात्, आजच्या काळात आपल्याला या सांस्कृतिक संबंधांचं आश्चर्य वाटू शकतं; परंतु दीडेक हजार वर्षापूर्वीपासूनचा भारतातील विविध राज्ये आणि कम्बोडियातील राज्ये यांच्यातील समुद्रमार्गानं चालणारा व्यापार यांमुळे ही सांस्कृतिक आणि धार्मिक देवाण-घेवाण सोपी होत होती हेही लक्षात घेतलं पाहिजे.
व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलंड, कम्बोडिया इत्यादी देशांशी चालणाऱ्या भारताच्या प्राचीन काळातील व्यापाराच्या माध्यमातून या सर्व देशांतील प्राचीन राज्यांची भारतीय संस्कृतीशी आणि हिंदू, बौद्ध धर्मांशी ओळख झाली. यातूनच पुढं इंडोनेशियात बोरोबुदूर इथं जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप अकराशे वर्षांपूर्वी निर्माण झाला, तर आठशे वर्षांपूर्वी ‘अंकोरवाट’ हे जगातील सर्वात मोठं प्राचीन हिंदू-मंदिर कम्बोडियात बांधलं गेलं. कम्बोडियातील अंकोरवाट या जगप्रसिद्ध मंदिराबद्दल पुढील लेखात जाणून घेऊ या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.