
भारतात बिहारमध्ये असलेल्या प्राचीन ‘अंग’ या महाजनपदाची चंपा नावाची राजधानी होती. सध्याच्या बिहारमधील भागलपूर या ठिकाणी हे चंपानगर होतं.
- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com
आतापर्यंत आपण कम्बोडिया, इंडोनेशिया या देशांतील भारतीय संस्कृतीच्या खुणा जाणून घेतल्या. कम्बोडिया देशाच्या पूर्वेला असलेल्या व्हिएतनाम देशात प्राचीन काळी चंपा नावाचं राज्य होतं. या प्राचीन चंपा राज्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊ या.
चंपा - चाम लोकांचं नगर
इसवीसनाचं दुसरं शतक ते आठवं शतक या काळात उत्तर व्हिएतनाममधील एका राज्यासाठी चिनी वृत्तान्तातून ‘लिन यि’ हा शब्द वापरलेला दिसतो; परंतु इसवीसनाच्या नवव्या शतकापासून ‘चाम लोकांचं नगर’ या अर्थाचा शब्दप्रयोग चिनी वृत्तान्तातून ‘चंपानगर’ किंवा ‘चंपापूर’ यासाठी वापरण्यास सुरुवात झालेली होती. खुद्द व्हिएतनाममधील ‘मी सन’ या ठिकाणी सापडलेल्या इसवीसनाच्या सातव्या शतकातील एका शिलालेखात पहिल्यांदा ‘चंपापूर’, ‘चंपापूरपरमेश्वर’, ‘चंपानगर’ असे शब्द वापरलेले आहेत, तर शेजारील कम्बोडिया देशात सापडलेल्या इसवीसनाच्या सातव्या शतकातील एका शिलालेखात ‘चंपेश्वरा’नं (म्हणजे चंपा येथील राजानं) आपला दूत कम्बोडियातील राजाकडे पाठवल्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे, किमान तेराशे वर्षांपूर्वी चंपा हे नाव व्हिएतनाममधील चाम लोकांच्या राज्यासाठी वापरलं जात होतं.
भारतात बिहारमध्ये असलेल्या प्राचीन ‘अंग’ या महाजनपदाची चंपा नावाची राजधानी होती. सध्याच्या बिहारमधील भागलपूर या ठिकाणी हे चंपानगर होतं. भारतातील या चंपानगराच्या नावावरून व्हिएतनाममध्ये चंपा हे राज्य निर्माण झालं असावं, असं काही अभ्यासकांचं मत होतं, तर व्हिएतनाममधील या किनारी प्रदेशात चाम नावाचे रहिवासी राहत होते, त्यांच्या ‘चाम’ या नावावरून चंपा हे नाव आलं असल्याचा काही संशोधकांचा अंदाज आहे.
वर पाहिल्यानुसार, तत्कालीन चंपापूर या शब्दासाठी व्हिएतनामी किंवा चिनी भाषेत ‘चाम लोकांचं नगर’ अशा अर्थाचे शब्द वापरले आहेत.
चंपा हे एका राज्याचं नाव असण्यापेक्षा व्हिएतनाममधील एकसमान सांस्कृतिक-राजकीय परिस्थिती असणाऱ्या प्रदेशाचं नाव होतं असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. कदाचित चंपा एखाद्या संघराज्यासारखं असावं, ज्यात ‘इंद्रपूर’, ‘अमरावती’, ‘विजय’, ‘कौठार’ आणि ‘पांडुरंग’ अशी पाच राज्ये किंवा नगरराज्ये होती. काही अभ्यासकांच्या मते, कदाचित इंद्रपूर हे केवळ राजधानीचं शहर असावं. व्हिएतनामचा पूर्वेकडील समुद्रकिनारा आणि त्याच्या पश्चिमेला असलेल्या पर्वतरांगा यांमधील भूप्रदेशात ही राज्ये होती.
येथील चाम रहिवासी मुख्यतः भातशेतीवर अवलंबून असणारे शेतकरी होते. चंदन, गेंड्याचं शिंग, हस्तिदंत इत्यादींचा व्यापार करणारे व्यापारी होते, कारागीर होते आणि अर्थातच येथील महत्त्वाच्या बंदरांतून चीनकडे व्यापारासाठी जाणारे खलाशी होते.
इसवीसनाच्या चौथ्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत संस्कृतमध्ये लिहिले गेलेले आणि काही चाम या भाषेत लिहिले गेलेले शिलालेख, चिनी वृत्तान्त, व्हिएतनाममधील मध्ययुगातील नोंदी यांतून आपल्याला चंपा आणि तेथील राज्यांचा इतिहास काही प्रमाणात उभा करण्यासाठी मदत होते.
व्हिएतनाममधील इसवीसनाच्या चौथ्या शतकातील शिलालेखांवरून, त्या काळापासून येथे भारतीय संस्कृतीचा आणि धर्माचा प्रभाव असल्याचं समजतं. शिलालेखांतून आपल्याला तेथील राजांची ‘भद्रवर्मन’, ‘इंद्रवर्मन’, ‘हरिवर्मन’ अशी भारतीय वळणाची नावं समजतात. येथील राजे प्रामुख्यानं शैव पंथाचे अनुयायी असल्याचं तेथील प्राचीन शिवमंदिरांवरून, मूर्तींवरून आणि शिलालेखांवरून लक्षात येतं. तेथील अनेक शिलालेखांतून संस्कृत भाषा आणि ब्राह्मी लिपी वापरली गेली आहे.
सर्वात प्राचीन संस्कृत शिलालेख
आग्नेय आशियातील सर्वात प्राचीन संस्कृत शिलालेख हा सध्याच्या दक्षिण व्हिएतनाममध्ये व्हॉ कंह येथे सापडला आहे. ब्राह्मी लिपीत आणि संस्कृत भाषेत लिहिलेला हा शिलालेख आता बऱ्याच प्रमाणात खंडित झालेला आहे. या लेखातील ब्राह्मी लिपीच्या अक्षरलेखनावरून, हा लेख इसवीसनाच्या दुसऱ्या ते चौथ्या शतकाच्या दरम्यान लिहिला गेला असावा, असं अभ्यासकांचं मत आहे. म्हणजे, हा शिलालेख किमान सोळाशे वर्षांपूर्वी लिहिला गेला आहे. आग्नेय आशियात आतापर्यंत सापडलेल्या संस्कृत शिलालेखांतील हा सर्वात जुना शिलालेख मानला जातो. या शिलालेखातील दोन श्लोक ‘वसंततिलका’ या वृत्तात आहेत, तर बाकीचा लेख गद्यात लिहिलेला आहे. तेथील स्थानिक ‘श्री मार’ राजाच्या राजकुलाचा उल्लेख या शिलालेखात केलेला आहे. हा राजा चामवंशीय होता की शेजारच्या कम्बोडिया देशातून आलेला होता, याबद्दल या शिलालेखात कोणतीही माहिती मिळत नाही.
शेजारील राज्यांशी संबंध
सध्याच्या उत्तर व्हिएतनाममध्ये हजार वर्षांपूर्वी ‘दाइ व्हिएत’ नावाचं राज्य होतं. त्यांनी चीनपासून स्वातंत्र्य मिळवल्यावर दक्षिणेकडे चंपा राज्यावर स्वाऱ्या करण्यास सुरुवात केली. एक हजार वर्षांपूर्वी दाई व्हिएतच्या राजानं चंपामधील इंद्रपूर ही राजधानी जिंकल्यावर चाम राजांनी दक्षिणेला ‘विजय’ या राज्यात स्थलांतर केलं.
इसवीसन १०७४ पासून पुढील जवळजवळ दीडशे वर्षे व्हिएतनाममधील चंपाचे राजे आणि शेजारील कम्बोडियातील ख्मेर राजे यांच्यातही युद्धं होत होती. याशिवाय, चीनमध्ये इसवीसनाच्या तेराव्या शतकात आलेल्या मंगोलवंशीय कुबलईखानानंदेखील चंपा राज्य आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्या काळात चंपातील चाम राजांसमोर कम्बोडियातील ख्मेर राजे, दाइ व्हिएत राज्यातील व्हिएत राजे आणि चीनमधून येणारे मंगोल सेनाधिकारी प्रबळ ठरत होते. इसवीसनाच्या तेराव्या, चौदाव्या शतकात होणाऱ्या या सततच्या हल्ल्यांमुळे, युद्धांमुळे चंपा हे राज्य हळूहळू खिळखिळं होऊ लागलं होतं.
इसवीसन १४७१ मध्ये दाई व्हिएतच्या राजानं चंपातील ‘विजय’ या राज्याचा प्रदेश जिंकला आणि तेथील चाम राजाची हत्या केली. व्हिएत राजानं चंपाच्या ‘विजय’ या राज्यातील स्थानिक चामसंस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हजारो चाम लोकांना मारून टाकण्यात आलं, अनेकांना बंदिवान केलं गेलं, तर अनेकजण देशोधडीला लागले. एका अर्थानं व्हिएतनाममधील हिंदू चंपा राज्य सन १४७१ मध्येच संपलं होतं. उरलेल्या ‘कौठार’, ‘पांडुरंग’ या राज्यांचा कारभारदेखील व्हिएत राजाचे सैन्याधिकारीच पाहू लागले होते. शिल्लक राहिलेल्या ‘पांडुरंग’ या राज्याच्या प्रदेशात व्हिएत राजांविरुद्ध काही चाम पुढारी इसवीसनाच्या अठराव्या शतकात उठाव करू लागले होते. शेवटी, सन १८३२ मध्ये व्हिएत राजानं ‘पांडुरंग’ या राज्याचा प्रदेश आपल्या व्हिएत राज्याला पूर्णपणे जोडून घेतला. यामुळे चाम लोकांच्या प्राचीन चंपा राज्याचा शेवट झाला आणि संपूर्ण व्हिएतनाममध्ये व्हिएत लोकांचं राज्य सुरू झालं. एकेकाळी व्हिएतनाममधील चंपा राज्यात राज्य करणारे चामवंशीय रहिवासी व्हिएतनाममध्ये अल्पसंख्याक म्हणून गणले जाऊ लागले.
चंपा राज्याच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती घेतल्यावर, व्हिएतनाममधील राजांनी निर्माण केलेली मंदिरं, मूर्ती आणि या राजांचे काही संस्कृत शिलालेख यांबद्दलची माहिती पुढील लेखांत घेऊ या.
(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.