चीनमधील भारतीय मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian temple in chin

साधारणपणे एक हजार वर्षांपूर्वी चोल राजांच्या राज्यकालात दक्षिण भारतातील बंदरांवरून मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू होता.

चीनमधील भारतीय मंदिर

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

साधारणपणे एक हजार वर्षांपूर्वी चोल राजांच्या राज्यकालात दक्षिण भारतातील बंदरांवरून मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू होता. त्या वेळी दक्षिण भारतातील बंदरांवर चीनकडून इराणकडे जाणारी आणि इराणकडून चीनकडे जाणारी जहाजं थांबत असत. यातून करस्वरूपात महसूल चोल राजांना मिळत असे.

भारत आणि चीन यांच्या मध्ये असणाऱ्या सध्याच्या मलेशियाच्या आणि इंडोनेशियाच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या समुद्री मार्गावरील बंदरावर इंडोनेशियातील श्रीविजयसाम्राज्याचं वर्चस्व होतं. तिथल्या बंदरांवरदेखील कर भरल्याशिवाय ही जहाजं पुढं चीनकडे रवाना होऊ शकत नसत. यामुळे भारतीय व्यापारी थेट चीनशी व्यापार करू शकत नव्हते. दक्षिण भारतातील चोल राजांनादेखील श्रीविजयसाम्राज्याची मध्यस्थी झुगारून थेट चीनशी स्वतः व्यापार करण्याची इच्छा होती.

दक्षिण भारतातील चोल घराण्यातील राजराजा यानं इसवीसन १०१५ मध्ये आपलं एक शिष्टमंडळ चीनच्या राजाकडे पाठवलं होतं. इंडोनेशियातील श्रीविजयसाम्राज्यात काही महिने काढल्यावर हे शिष्टमंडळ चीनमध्ये दाखल झालं. राजराजा यानं चिनी सम्राटाला लिहिलेलं एक पत्र या शिष्टमंडळाबरोबर पाठवण्यात आलं होतं. या शिष्टमंडळाबरोबर राजराजा यानं चिनी राजासाठी उंची वस्त्रं, ६० हस्तिदंत, ७९० किलो मोती, २७ किलो धूप इत्यादी वस्तू भेट म्हणून पाठवल्या होत्या, अशी माहिती चिनी वृत्तान्तांमधून मिळते. इसवीसन १०२० मध्ये चोल राजानं पुन्हा एक शिष्टमंडळ चीनला पाठवलं होतं. चोलांचा चिनी दरबारातील हा वाढता प्रभाव बघून श्रीविजयसाम्राज्याच्या राजानंदेखील आपलं शिष्टमंडळ चिनी दरबारात पाठवण्यास सुरुवात केली होती.

इसवीसन १०२५ मध्ये राजराजा चोल याचा मुलगा राजेंद्र चोल यानं इंडोनेशियातील श्रीविजयसाम्राज्यावर स्वारी केली. राजेंद्र चोल राजाच्या इंडोनेशियातील या स्वाऱ्यांमुळे इंडोनेशियातील नगरांत आणि बंदरात जाऊन व्यापार करणाऱ्या भारतीय, विशेषतः तमिळ, व्यापाऱ्यांची संख्या वाढू लागली होती. यानंतर जवळजवळ दोनशे वर्षांनी भारतीय लोक चीनमध्ये वास्तव्य करत असल्याचा पुरावा आपल्याला मिळतो.

चीनमधील तमिळ शिलालेख

चीनमधील सोंग घराण्यातील राजाला हरवून तिथं मंगोल घराण्यातील चेंगीजखानाचा नातू कुबलईखान यानं आपलं राज्य प्रस्थापित केलं. इसवीसन १२७१ मध्ये कुबलईखानानं चीनमध्ये अधिकृतरीत्या युआन घराण्याची स्थापना केली.

या कुबलईखानाच्या काळात आग्नेय चीनच्या किनाऱ्यावरील च्वानझु हे चीनमधील प्रमुख बंदर म्हणून उदयाला आलं. या च्वानझुनगरात अरब, इराणी, युरोपीय इत्यादी परदेशी व्यापाऱ्यांच्या वसाहती होत्या. त्याचबरोबर तिथं भारतीय व्यापारीदेखील राहत होते.

तमिळ भाषेत लिहिलेला एक शिलालेख च्वानझु इथल्या एका घरात सन १९५६ मध्ये सापडला. या शिलालेखात नोंद केल्यानुसार, तो शिलालेख शके १२०३ मध्ये (म्हणजे इसवीसन १२८१) मध्ये लिहिलेला होता. आजपासून सातशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या या तमिळ शिलालेखाखाली चिनी भाषेत आणि लिपीत काही मजकूर कोरलेला आहे; परंतु त्याचा मूळ तमिळ शिलालेखाशी संबंध नाही असं काही अभ्यासकांचं मत आहे.

या शिलालेखात पुढील प्रमाणे मजकूर आहे. ‘संबंधपेरूमल यानं हे मंदिर निर्माण केलं आहे. हे शिवमंदिर चेकचाईखान याच्या फर्मानानुसार निर्माण केलेलं असून चेकचाईखान याच्या कल्याणासाठी हे मंदिर निर्माण केलेलं आहे.’

या शिलालेखात उल्लेख केलेला चेकचाईखान म्हणजे चीनमध्ये तेव्हा राज्य करणारा युआन घराण्याचा राजा कुबलईखान असावा असं अनेक संशोधक मानतात. चेंगीजखान, त्याचा नातू कुबलईखान हे मुस्लिम नव्हते. ते मंगोलियातील स्थानिक लोकधर्माचे अनुयायी होते. त्यांच्या साम्राज्यातील बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, दाओ या धर्माच्या अनुयायांना आपापल्या धर्मानुसार वागण्याची मुभा होती. (याबद्दल आपण पुढील एका लेखात विस्तारानं बघणार आहोत.)

चीनमध्ये युआन राज्य स्थापन केल्यावर कुबलईखानानं फाग्पा नावाच्या तिबेटी गुरूंना त्याच्या राज्यातील ‘बौद्ध भिक्षूंचे आणि विहारांचे सर्वोच्च अधिकारी’ या पदावर बसवलं होतं. फाग्पा हे धार्मिक गुरू असण्याबरोबरच कुबलईखानाचे जवळचे सल्लागार होते. ‘कुबलईखान आणि गुरू फाग्पा हे आकाशातील चंद्र-सूर्यासारखे आहेत,’ असा उल्लेख तिबेटी ग्रंथांतून येतो. कुबलईखानानंतर काही पिढ्यांनंतरच्या मंगोल राजांनी इस्लाम धर्म स्वीकारला. आजही चेंगीजखानाच्या मंगोलिया या देशात बौद्ध धर्माचं प्राबल्य आहे हे याबाबतीत लक्षात घेतलं पाहिजे.

सर्वधर्मीयांविषयी असलेल्या कुबलईखानाच्या या धोरणाचा आणि वागणुकीचा संदर्भ लक्षात घेऊन च्वानझु इथल्या तमिळ शिलालेखातील वाक्य वाचलं की त्याचा अर्थ लक्षात येतो. कुबलईखानानं फर्मान काढून भारतीय व्यापाऱ्यांना च्वानझु इथं शिवमंदिर बांधण्याला परवानगी दिली होती. त्यामुळे तिथल्या भारतीयांनी, चीनमध्ये राज्य करणाऱ्या कुबलईखानाच्या कल्याणासाठी हे मंदिर निर्माण करत आहोत, असं शिलालेखात नमूद केलं होतं.

मंदिराचे अवशेष

या तमिळ शिलालेखाशिवाय च्वानझु इथं एकेकाळी उभारण्यात आलेल्या भारतीय मंदिराचेही पुरावे सापडले आहेत. च्वानझु इथं उत्तर चोल राजांच्या काळातील शैलीत नक्षीकाम आणि शिल्पकाम केलेले जवळजवळ तीनशे कोरीव दगड आणि खांब सापडले आहेत. यातील अनेक दगड आणि खांब हे च्वानझु इथल्या एका बौद्ध मंदिरात वापरलेले आढळतात, तर मंदिराचे काही कोरीव दगड च्वानझु इथल्या संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहेत.

च्वानझु इथं असलेल्या एका बौद्ध मंदिराच्या जोत्यावरील दगडांवर दक्षिण भारतीय मंदिराप्रमाणे शिल्पं दिसून येतात. सहाशे वर्षांपूर्वी या चिनी बौद्ध मंदिराचा जीर्णोद्धार करताना गावातील भारतीय हिंदू मंदिराचे घडीव दगड आणि खांब चिनी बौद्ध मंदिराच्या जोत्याच्या नक्षीकामासाठी वापरले आहेत. या बौद्ध मंदिरात बाहेरील बाजूस वापरलेले खांब दक्षिण भारतातील दारासुरम इथल्या मंदिरातील खांबांप्रमाणे कोरलेले दिसून येतात.

या घडीव दगडांवरून आणि खांबांवरून च्वानझु इथं दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीतील एक मंदिर कदाचित तेराव्या शतकात उभारलं गेलं होतं हे लक्षात येतं. नंतर काही कारणानं, कदाचित भारतीय व्यापाऱ्यांचं तिथलं वास्तव्य संपल्यावर, हे हिंदू मंदिर काळाच्या ओघात ढासळलं असावं. त्या कोरीव दगडांचा आणि खांबांचा तिथल्या हिंदू मंदिराशी असलेला संबंधही रहिवाशांच्या स्मृतीतून गेला असावा. चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात या बौद्ध मंदिराचा जीर्णोद्धार करताना गावात सहज उपलब्ध असलेले हे भारतीय मंदिराचे नक्षीदार कोरीव दगड आणि खांब आणले गेले असावेत. बौद्ध मंदिराच्या जोत्याला बाहेरून हे नक्षीदार दगड बसवले गेले आणि खांबही ओवरीमध्ये वापरले गेले. या कोरीव खांबांवर नरसिंह, उखळाला बांधलेला कृष्ण, शिवलिंगावर कमलपुष्प वाहणारा हत्ती, इत्यादी कमी उठावातील शिल्पं दिसून येतात. याशिवाय इथंच दक्षिण भारतीय शैलीतील शंख, चक्र आणि गदा हातात घेतलेली एक विष्णुमूर्तीही सापडली आहे.

सातशे वर्षांपूर्वी अशी एक किंवा दोन मंदिरं चीनमध्ये बांधण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रयास लक्षात घेतले पाहिजेत. यावरून भारतीय व्यापारी च्वानझु इथं केवळ व्यापारासाठी प्रवास करत नव्हते, तर भारतीयांची एक वसाहतच चीनमधील च्वानझु इथं असावी.

Web Title: Anand Kanitkar Writes Chin Indian Temple

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaChinatemplesaptarang