भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार

हडप्पासंस्कृतीच्या काळातील भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल सुरुवातीच्या काही लेखांमधून आपण जाणून घेतलं.
Sculpture of ships
Sculpture of shipssakal
Summary

हडप्पासंस्कृतीच्या काळातील भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल सुरुवातीच्या काही लेखांमधून आपण जाणून घेतलं.

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

हडप्पासंस्कृतीच्या काळातील भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल सुरुवातीच्या काही लेखांमधून आपण जाणून घेतलं. भारतातील मसाल्याचे पदार्थ, तसंच सुती कापड भारतातून युरोपमध्ये किमान गेल्या दोन हजार वर्षांपासून निर्यात केलं जात असे, तसंच भारतीय बाजारपेठेतील मागणीप्रमाणे भारताबाहेरून काही वस्तू आयातही केल्या जात असत. यासाठी भारतीय व्यापारी जसे भारताबाहेर जात असत, तसेच परदेशी व्यापारीही भारतात येत असत.

उदाहरणादाखल या व्यापारातील दोन वस्तूंबद्दल माहिती करून घेऊ या.

मिरे

मसाल्याच्या पदार्थांच्या गरजेपोटी पाचशे वर्षांपूर्वी युरोपीय दर्यावर्दींना भारताचा शोध लावण्याची निकड भासली; परंतु त्याच्या आधीच १५०० वर्षांपूर्वी युरोपमधील रोमन साम्राज्यात भारतातील मसाल्याचे पदार्थ भारतातून आयात केले जात असत. भारतीय आणि रोमन साहित्यातून ही माहिती मिळते. परदेशी व्यापारी सोन्याची नाणी देऊन काळे मिरे विकत घेत असल्यानं तामिळनाडूमधील प्राचीन संगमसाहित्यात काळ्या मिऱ्यांना ‘काळं सोनं’ असं म्हटलेलं आहे.

रोमन साम्राज्यात मिरे केवळ स्वयंपाकात वापरले जात नव्हते तर, धार्मिक कार्यांतदेखील त्यांचा वापर केला जात असे. भारत आणि रोमदरम्यान समुद्रमार्गानं चालणारा व्यापार इजिप्तमधून जात असे. इजिप्तमध्ये पुरातत्त्वीय उत्खननात सापडलेल्या १९०० वर्षांपूर्वीच्या एका मातीच्या भांड्यात साडेसात किलो काळे मिरे सापडले होते. हे मिरे अर्थातच भारतातून तिथं नेलेले होते.

काळे मिरे साठवण्यासाठी रोममध्ये १९०० वर्षांपूर्वी एक मोठं कोठार उभारण्यात आलं होतं, तर रोमवर हल्ला करू नये म्हणून १५०० वर्षांपूर्वी रोमन अधिकाऱ्यांनी शत्रूला शेकडो किलो मिऱ्यांची लाच दिली होती. दक्षिण भारतातील बंदरांतून मसाल्याच्या पदार्थांचा हा व्यापार अव्याहत सुरू राहिला. यामुळे रेशीममार्गाप्रमाणे आशिया, आफ्रिका खंडांतील काही मार्गांना मसाल्याचा मार्ग (स्पाइस रूट) म्हणूनही संबोधलं जातं. याच मसाल्यांच्या गरजेमुळे काही युरोपीय दर्यावर्दी भारताकडे येण्याच्या समुद्रीमार्गाचा शोध घेत पंधराव्या शतकात भारतात आले.

घोड्यांचा व्यापार

मौर्य घराण्याच्या काळात भारताच्या इतिहासातील पहिलं साम्राज्य निर्माण झालं. यामागं अर्थातच मौर्यांचं प्रशासन आणि मोठं सैन्य होतं. मौर्यकाळातील ‘कौटिल्य अर्थशास्त्रा’त, अश्वशाळेचे आणि रथशाळेचे अनुक्रमे अश्वाध्यक्ष आणि रथाध्यक्ष असे अधिकारी असावेत, असं नमूद आहे.

मौर्यकाळातील या ‘अर्थशास्त्र’ नावाच्या ग्रंथात युद्धासाठी काम्बोज (कदाचित उत्तर पाकिस्तान), सिंधू (पाकिस्तानातील सिंध प्रांत), आरट्ट (उत्तर पंजाब) आणि वनायू (अरेबिया किंवा इराण) येथील घोडे उत्तम प्रतीचे, तर बाल्हिक (उत्तर अफगाणिस्तानातील बाल्ख), सौवीरक (सिंध प्रांताला लागून असलेला प्रदेश) येथील घोडे मध्यम प्रतीचे असल्याचं सांगितलं आहे. इतर घोडे कनिष्ठ प्रतीचे असतात. घोड्यांची ही प्रतवारी त्यांच्या रथ ओढण्याच्या आणि लढाईत तग धरून राहण्याच्या शारीरिक क्षमतेवरून केली असावी. मौर्यकाळातील युद्धासाठी लागणारे उत्तम किंवा मध्यम प्रतीचे घोडे मुख्यतः भारताच्या वायव्येकडे असणाऱ्या प्रदेशांतून येत होते हे यातून दिसून येतं.

भारताच्या वायव्येकडील प्रदेशातून, म्हणजे सध्याच्या अफगाणिस्तानच्या आणि पाकिस्तानच्या प्रदेशातील खुष्कीच्या मार्गांनी घोडे भारतात आणले जात असत, तर इराणचं आखात, येमेन येथील घोडे समुद्रमार्गानं भारताच्या आणि श्रीलंकेच्या बंदरांमध्ये आणले जात असत. मागणीनुसार हे घोडे भारतातील विविध प्रदेशांत किंवा आग्नेय आशियातील देशांमध्ये पाठवले जात असत.

सध्याच्या येमेन, तसंच विविध अरब अमिरातींच्या प्रदेशांत उत्तम प्रतीच्या घोड्यांची पैदास केली जात असे. तेथील व्यापारी हे घोडे विकत घेऊन जहाजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील विविध बंदरांकडे पाठवत असत, अशी नोंद भारतात तेराव्या शतकात आलेला इटालियन प्रवासी मार्को पोलो यानं करून ठेवली आहे.

येमेनमधून दक्षिण भारतातील पांड्य घराण्यातील एका राजाकडे दहा हजार घोडे पाठवल्याची माहितीही मार्को पोलोच्या नोंदींवरून मिळते. ‘जितके आणता येतील तितके अरबी घोडे आणावेत,’ अशी मागणी पांड्य राजानं एका अरब व्यापाऱ्याकडे केलेली होती. दक्षिण भारतातील चोळ/चोल आणि पांड्य या राजांमधील युद्धांचा आणि लढायांचा इतिहास बघता पांड्य राजाची ही मागणी रास्त होती.

लढाईसाठी लागणारे घोडे उत्तरेकडून किंवा समुद्रमार्गानं आणले जात असल्याचा उल्लेख दक्षिण भारतातील काही लिखित पुराव्यांतून मिळतो. तमिळनाडूतील चोल राजांच्या एका शिलालेखात मीठ, तांदूळ, लोखंड, रेशीम, चंदन, कापूर, कापराचं तेल, लाकूड आणि घोडे यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापाराचा उल्लेख येतो.

इब्न बतूता या परदेशी लेखकाच्या सहाशे वर्षांपूर्वीच्या नोंदीनुसार, अरबी घोड्याची किंमत एक ते चार हजार चांदीची नाणी इतकी होती. उत्तम प्रतीचा तातारी, म्हणजे मध्य आशियातील घोडा, ५०० चांदीची नाणी देऊन मिळत असे.

सातशे वर्षांपूर्वी गुजरात आणि केरळकडील बंदरांकडे अरबी जहाजं जास्त प्रमाणात जात असल्यानं महाराष्ट्रातील प्राचीन श्रीस्थानक (म्हणजे आजचं ठाणं) येथील राजाला मोठ्या संख्येनं अरबी घोडे मिळत नसावेत. कदाचित्, त्यामुळे ठाण्याच्या राजानं किनारपट्टीवरील समुद्री चाच्यांशी संगनमत केलं होतं. समुद्री चाच्यांनी व्यापारीजहाजं लुटल्यावर त्यातील सर्व घोडे ठाण्याच्या राजाच्या हवाली करायचे आणि जहाजातील सोनं, चांदी, रत्नं इत्यादी सर्व माल चाच्यांनी स्वतःकडे ठेवायचा, अशी व्यवस्था ठाण्याचा राजा आणि समुद्री चाचे यांच्यात झालेली होती. ही माहिती त्या वेळी महाराष्ट्रात आलेला युरोपीय प्रवासी मार्को पोलो देतो. त्याचबरोबर भारतात घोड्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहितीही तो देतो.

सातशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील बंदरांतून तांदूळ, मीठ, नारळ, सुपारी, आंबे, लिंबं, मध, सुती कापड, इत्यादी वस्तू निर्यात केल्या जायच्या अशीही नोंद मार्को पोलोनं करून ठेवली आहे, तर कवडी, लोखंड, तांबं, जस्त, शिसं, तलवारी, घोडे, चिनी बनावटीची भांडी इत्यादी बाबी आयात केल्या जात असत. याशिवाय काही वस्तू भारताबाहेरून भारतातील बंदरांवर आणल्या जात आणि त्या इतर देशांमध्ये निर्यात केल्या जात. उदाहरणार्थ : खजूर, रेशमी कापड, प्रवाळ, कापूर, कवडी, वाईन इत्यादी वस्तू येमेन, चीन, मालदीव, इंडोनेशिया इत्यादी देशांतून भारतीय बंदरांवर आणल्या जात असत आणि मागणीनुसार इतर देशांकडे रवाना केल्या जात असत.

भारतीय बंदरात आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर भारतीय राजे काही टक्के जास्त कर लावत असत असं तत्कालीन शिलालेखांतून दिसून येतं.

या काळातील, म्हणजे इसवीसनाच्या बाराव्या-तेराव्या शतकात, महाराष्ट्रातील जहाजं कशी होती याचा पुरावा आपल्याला बोरिवलीमधील एकसर येथील वीरगळांद्वारे मिळतो. बोरिवलीतील देवीदास रस्त्यावरील एका टोलेजंग इमारतीच्या आवारात हे ‘एकसर वीरगळ’ म्हणून प्रसिद्ध असलेले वीरगळ आहेत.

वीरगळ म्हणजे मध्ययुगात मृत्यू पावलेल्या वीराची स्मारकशिला. या शिळेवर तीन किंवा चार टप्प्यांत शिल्पं कोरलेली असतात.

तो वीर कसा मृत्युमुखी पडला ते सर्वात खालच्या भागातील शिल्पात दाखवलेलं असतं. उदाहरणार्थ : लढाई करताना, गुरांचं रक्षण करताना इत्यादी. स्वर्गातील अप्सरा त्या वीराला स्वर्गात नेत असल्याचं वरील भागातल्या शिल्पात दाखवतात, तर तो वीर शिवलिंगाची पूजा करताना - म्हणजे कैलासवासी झाला आहे असं - त्याच्याही वरच्या, म्हणजे सर्वात वरच्या शिल्पात, दाखवतात.

एकसर येथील वीरगळांचं वैशिष्ट्य म्हणजे, येथील वीर नाविकयुद्धात मृत्युमुखी पडला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. याकरता सर्वात खालच्या शिल्पात मोठ्या जहाजांवरून युद्ध सुरू असल्याचं दाखवलं आहे. हे वीरगळ आजपासून साधारणपणे नऊशे ते सातशे वर्षांपूर्वीचे असल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे.

या वीरगळांवर आपल्याला महाराष्ट्रातील त्या काळातील शिडाच्या जहाजांचं चित्रण दिसून येतं. गोव्यातील पुरातत्त्वीय संग्रहालयातदेखील जहाजांचं शिल्प असलेले काही वीरगळ ठेवलेले आहेत.

हिंदी महासागरातून, अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातूनचालणाऱ्या विविध वस्तूंच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा काहीसा अंदाज वरील माहितीवरून येईल. या व्यापाराकरता भारतीय व्यापारी आफ्रिका आणि आशिया खंडांतील आताच्या विविध देशांमध्ये प्रवास करत होते असं तेथील पुराव्यांवरूनदेखील लक्षात येतं.

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com