
कम्बोडियातील भारतीय संस्कृती
- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com
चीन, अफगाणिस्तान, इराण, मध्य आशियातील देश आदींशी भारतीयांचा, भारतीय संस्कृतीचा आलेला संबंध या सदरातील आधीच्या लेखांतून आपण पहिला. सलग भूभागामुळे भारतीय संस्कृती जशी भारताच्या वायव्य भागातून बाहेर पडून अफगाणिस्तानमार्गे चीन, जपान, कोरियापर्यंत पोहोचली, तशीच ती पूर्व आणि दक्षिण भारतातील बंदरांद्वारे समुद्रमार्गानं दक्षिणेत श्रीलंका ते आग्नेय आशियात मलेशिया, इंडोनेशिया, कम्बोडिया, व्हिएतनाम, अगदी बोर्निओ बेटांपर्यंत जाऊन पोहोचली.
आग्नेय आशियातील प्राचीन हिंदू-मंदिरं, बौद्ध स्तूप, विहार, तसंच तिथल्या अनेक गावांची नावं, राजांची नावं, प्राचीन लेखांची संस्कृत भाषा, ब्राह्मी लिपी, चाली-रीती, परंपरा, भारतीय देवता यांतून तिथल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन जागोजागी घडतं. पुढील काही लेखांतून आग्नेय आशियातील शिलालेख, मूर्ती, हिंदू-मंदिरं, स्तूप यांमधून दिसणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा आपण बघणार आहोत. त्याची थोडी पार्श्वभूमी या लेखातून बघू या.
प्राचीन काळी म्हणजे, अंदाजे सतराशे वर्षांपूर्वी, भारतीय लोक सध्याच्या ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इत्यादी राज्यांतील बंदरांतून जहाजानं सध्याच्या मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कम्बोडिया या देशांपर्यंत व्यापारानिमित्तानं जात-येत असत. त्यामुळे भारतीयांचा हळूहळू आग्नेय आशियातील प्यु, चंपा, द्वारावती, श्रीविजय इत्यादी प्राचीन राज्यांशी संबंध आला. आणि, काही शतकांतच भारतीय चाली-रीती, परंपरा, संकल्पना, हिंदू आणि बौद्ध हे धर्म, संस्कृत भाषा, ब्राह्मी लिपी इत्यादींचा अंगीकार या प्रदेशातील राजांनी आणि रहिवाशांनी केला.
आग्नेय आशियाचा अभ्यास
एकोणिसाव्या शतकात युरोपातील देशांना कम्बोडियातील प्राचीन संस्कृतीचा पुनर्शोध लागला. एन्री मुओ नावाच्या फ्रेंच तज्ज्ञानं पहिल्यांदा सन १८५० च्या दरम्यान कम्बोडियातील अंकोर इथल्या मंदिरांची पाहणी केली आणि त्यांबद्दल लिखाण केलं. त्यानंतर अनेक युरोपीय अभ्यासकांनी एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात कम्बोडिया, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी देशांतील प्राचीन शिलालेख, मूर्ती, मंदिरं यांच्या साह्यानं अभ्यास केला; पण त्यांच्या पुस्तकांतील अनेक मतांना त्या वेळी उपलब्ध असलेले पुरातत्त्वीय पुरावे, तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि वसाहतवादाची पार्श्वभूमी होती, हेदेखील लक्षात ठेवलं पाहिजे.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि त्यानंतरही काही दशकं अनेक भारतीय अभ्यासकांनीदेखील आग्नेय आशियातील भारतीय संस्कृतीवर मोठं काम केलं. पारतंत्र्याच्या काळात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरदेखील ‘ब्रिटिश-वसाहत’ या दर्जातून बाहेर पडल्यानंतर ‘भारतीयांनीही प्राचीन काळात आग्नेय आशियातील देशांमध्ये भारतीय वसाहती किंवा इंडियन कॉलनीज् निर्माण केल्या होत्या आणि भारतीयदेखील प्राचीन काळात जगातील इतर भागावर राज्य करत होते,’ असा एक स्वरदेखील त्या पुस्तकांतून जाणवतो.
ब्रिटिश-वसाहतकाळात निर्माण झालेल्या ‘भारताच्या सांस्कृतिक वसाहती’ इत्यादी संज्ञा वापरताना हे लक्षात घेतलं पाहिजे की, आग्नेय आशियातील ही राज्ये म्हणजे ब्रिटिश, फ्रेंच यांच्या जगभरातील वसाहतींसारख्या भारतीय वसाहती नव्हत्या. नऊशे वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील चोल राजांनी इंडोनेशियातील श्रीविजय साम्राज्यावर केलेले नाविक हल्ले वगळता भारतीय राजांनी प्राचीन कम्बोडिया, थायलंड इथं आपलं राज्य स्थापण्याचा किंवा तिथल्या स्थानिक राजांना मांडलिक बनवण्याचा प्रयत्न केला नाही.
याउलट, किमान सोळाशे वर्षांपूर्वीपासून भारतीय संस्कृतीच्या संपर्कात आलेल्या कम्बोडियातील स्थानिक राजांनी भारतीय धर्म आणि संस्कृती यांतील त्यांना राज्य करण्यासाठी उपयोगी ठरतील त्या भारतीय संकल्पना, चाली-रीती, प्रथा, परंपरा, तत्त्वज्ञान अंगीकारलं असं आता अनेक आंतरराष्ट्रीय संशोधकांचं मत आहे. व्हिएतनाम, कम्बोडिया इत्यादी देशांतील या भारतीय संस्कृतीच्या प्रभावाबद्दल आणि त्याच्या कारणांबद्दल आपण पुढील काही लेखांत अधिक विस्तारानं पाहणार आहोत.
प्राचीन कम्बोडिया
आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीचे पुरावे आपल्याला तिथले शिलालेख, ताम्रपट, मंदिरं, मूर्ती इत्यादींच्या स्वरूपात आढळतात. इसवीसनाच्या अंदाजे चौथ्या शतकापासूनचे संस्कृत शिलालेख, हिंदू-देवतांच्या मूर्ती आग्नेय आशियात आढळतात. साधारणपणे उत्तर भारतात गुप्त राजवंशाचं राज्य असताना हा सांस्कृतिक संबंध मोठ्या प्रमाणावर सुरू झाला; परंतु भारतातील प्राचीन साहित्यात अथवा शिलालेखांत पंधराशे वर्षांपूर्वीच्या या संपर्काबद्दल, आग्नेय आशियाबद्दल ऐतिहासिक माहिती मिळत नाही.
भारतीय साहित्यातून आग्नेय आशियातील राज्ये किंवा काही प्रदेश ‘सुवर्णभूमी’ या नावानं नमूद केलेली आहेत. बौद्ध साहित्यातील काही कथांतून या सुवर्णभूमीकडे, म्हणजे आग्नेय आशियातील राज्यांकडे, जाणाऱ्या आणि तिथून श्रीमंत होऊन भारतात परत येणाऱ्या व्यापाऱ्यांची काही उदाहरणं आढळतात; परंतु तिथल्या राजांचे उल्लेख किंवा त्यांच्या वंशावळी याबद्दल माहिती मिळत नाही.
प्राचीन कम्बोडियातील महत्त्वाचं राज्य अंकोर नावाच्या प्रदेशात होतं. अंकोरचं राज्य हा कम्बोडियातील सुवर्णकाळ असला तरी त्याच्या आधीपासून भारतीय लोक आणि कम्बोडियातील रहिवासी यांच्यात व्यापारी-संबंध आणि सांस्कृतिक संबंध होते असं पुराव्यांवरून दिसून येतं. त्यामुळे इसवीसनाचं दुसरं/तिसरं शतक ते आठवं शतक हा अंकोरपूर्व-कालखंड, इसवीसन आठवं शतक ते चौदावं शतक हा अंकोर-कालखंड आणि इसवीसन चौदावं शतक ते अंदाजे अठरावं शतक हा अंकोरनंतरचा कालखंड अशा कालखंडांमध्ये कम्बोडियाच्या इतिहासाचं आणि कलास्थापत्याचं वर्गीकरण केलं जातं.
भारताशी इतक्या मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक संबंध आलेल्या या प्रदेशातील अंकोरपूर्व-काळातील दोन महत्त्वाच्या राज्यांची माहिती चिनी प्रवाशांनी करून ठेवलेल्या नोंदींतून मिळते. ती दोन राज्ये म्हणजे फुनान आणि झेनला.
फुनान राज्य
साधारणपणे इसवीसनाच्या दुसऱ्या ते सहाव्या शतकापर्यंत असलेलं फुनान राज्य सध्याच्या कम्बोडिया आणि व्हिएतनाम या देशांच्या दक्षिणेकडील भागात होतं. फुनान हे नाव कम्बोडियातील स्थानिक ख्मेर भाषेतील प्नोम (म्हणजे टेकडी) या मूळ शब्दाचा चिनी उच्चार असावा असंही अभ्यासकांचं मत आहे. इथल्या रुद्रवर्मन नावाच्या राजाचा उल्लेख शिलालेखांतून येतो. त्यानं काही शिवमंदिरंही उभारली होती.
चिनी वृत्तान्तानुसार, फुनान इथले रहिवासी चांदीची भांडी वापरत असत आणि राजाला आपला कर सोनं, चांदी, मोती किंवा अत्तर यांच्या स्वरूपात देत असत. फुनानचा राजा आणि त्याचा राणीवसा हत्तीवरून प्रवास करत असे. इसवीसनाच्या सहाव्या शतकातील एक नोंदीनुसार फुनान इथले रहिवासी देवांची पूजा करत असत. ते या देवांच्या एक किंवा चार मस्तक असलेल्या आणि दोन ते चार हात असलेल्या धातूच्या मूर्ती तयार करत असत. या मूर्तींच्या हातात विविध आयुधं किंवा वस्तू असत.
घरात मृत्यू झाल्यास पुरुषांचे डोक्यावरचे केस भादरले जात असत, तसंच मृतदेहाच्या अग्निसंस्काराबद्दलही या वृतान्तात उल्लेख आहे. या वृत्तान्तावरून, चौदाशे वर्षांपूर्वी कम्बोडियात भारतीय धर्माचा आणि संस्कृतीचा प्रभाव कशा पद्धतीनं पडलेला होता ते लक्षात येतं. चिनी वृत्तान्तात या फुनान राज्याची शेवटची नोंद अंदाजे सातव्या शतकात आढळते.
झेनला राज्य
फुनाननंतर इसवीसन ६१६ मध्ये चिनी वृत्तान्तामध्ये कम्बोडियातील झेनला नावाच्या राज्याचा उल्लेख येतो. एकेकाळी हे झेनला राज्य फुनान राज्याचं मांडलिक होतं; पण झेनला राज्याच्या चित्रसेन राजानं फुनान राज्य आपल्या ताब्यात घेतलं. त्याच्या ईशानसेन नावाच्या मुलानं ईशानपूर इथं आपली राजधानी हलवली. हे ईशानपूर म्हणजे कम्बोडियामधील सध्याचं संबोर प्रेई कुक नावाचं ठिकाण. संबोर प्रेई कुक इथं त्या काळातील गर्भगृह आणि शिखर असलेल्या विटांच्या मंदिरांचे अवशेष सापडले आहेत.
अर्थात्, फुनान इथलं राजघराणं आणि झेनला इथलं राजघराणे यांच्यांत संबंध होता. कम्बोडियातील एका शिलालेखात फुनान राज्याचा राजा रुद्रवर्मन याच्यापासून ते झेनला राज्याचे राजे भववर्मन, चित्रसेन (महेंद्रवर्मन), ईशानसेन यांच्यापर्यंतची वंशावळ दिलेली आहे. त्यावरून या दोन्ही राज्यांतील राजे एका घराण्यातील होते हे स्पष्ट होतं. या पार्श्वभूमीवर कम्बोडियातील काही वैशिष्ट्यपूर्ण हिंदू-मंदिरांबद्दल आणि मूर्तींबद्दल पुढील लेखातून माहिती घेऊ या.
(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)
Web Title: Anand Kanitkar Writes Indian Culture In Cambodia
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..