इंडोनेशियातील भारतीय संस्कृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indonesia Inscription

सध्याचा इंडोनेशिया देश हा सुमात्रा, जावा, कालीमंतन इत्यादी मोठ्या बेटांचा आणि इतर लहान बेटांचा मिळून असलेला द्वीपसमूह आहे.

इंडोनेशियातील भारतीय संस्कृती

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

सध्याचा इंडोनेशिया देश हा सुमात्रा, जावा, कालीमंतन इत्यादी मोठ्या बेटांचा आणि इतर लहान बेटांचा मिळून असलेला द्वीपसमूह आहे. इंडोनेशियातील सुमात्रा बेटाच्या आणि सध्याच्या मलेशिया देशाच्या मध्ये मलाक्काची सामुद्रधुनी आहे, तर इंडोनेशियातील सुमात्रा आणि जावा बेटांच्या मध्ये सुंदा सामुद्रधुनी आहे. या दोन सामुद्रधुनी या भागातील सागरी प्रवासाच्या दृष्टीनं आजही महत्त्वाच्या आहेत.

अंदाजे दीड हजार वर्षापूर्वीपासून एका बाजूला भारत आणि इतर पाश्चिमात्य देशांशी मसाल्याचा व्यापार करणारे इंडोनेशियातील व्यापारी चीनबरोबरही व्यापार करत असत. दक्षिण आशिया आणि चीन इथल्या जहाजांना जवळचा मार्ग म्हणून मलाक्काची सामुद्रधुनी आणि सुंदा सामुद्रधुनी ओलांडावी लागते, हे नकाशा बघितल्यावर लक्षात येतं.

प्राचीन काळापासून स्थानिक राजांना या दोन सामुद्रधुनींच्या आसपासच्या किनाऱ्यांवरील महत्त्वाची ठिकाणं ताब्यात ठेवून इथून समुद्रमार्गानं चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणं सोपं होतं. साधारणतः इसवीसनाचं आठवं शतक ते चौदावं शतक या काळात या सामुद्रधुनीच्या किनारी प्रदेशात प्रामुख्यानं व्यापारावर अवलंबून असणारी राज्ये निर्माण झाली, तर किनाऱ्यापासून आत असणाऱ्या प्रदेशात शेतीच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असणारी राज्ये निर्माण झाली.

प्राचीन भारत आणि इंडोनेशिया

भारत आणि इंडोनेशिया यांच्यात सांस्कृतिक आणि व्यापारीसंबंध प्रामुख्यानं भारतातील गुप्त राजवंशाच्या काळात (म्हणजे इसवीसनाचं चौथं शतक ते सहावं शतक) आणि दक्षिण भारतातील पल्लव राजांच्या काळात (म्हणजे अंदाजे इसवीसनाचं सातवं शतक ते नववं शतक) मोठ्या प्रमाणात प्रस्थापित झालेले दिसून येतात.

भारतीय संस्कृतीचा आणि धर्मांचा इंडोनेशियातील राज्यांत प्रभाव पडण्याचा हा काळ होता. भारतीय धर्मांचे आणि राज्यपद्धतीचे अवलंबन करणाऱ्या प्राचीन इंडोनेशियातील राजांचे शिलालेख सापडले आहेत, त्यावरून आपल्याला इंडोनेशियातील काही प्राचीन राज्यांबद्दल माहिती मिळते.

यज्ञ करणारा मूलवर्मन राजा

इंडोनेशियात सापडलेले सर्वात प्राचीन लेख म्हणजे मूलवर्मन नावाच्या राजाचा उल्लेख असलेले शिलालेख. इंडोनेशियातील कालीमंतन प्रदेशात सापडलेले हे अंदाजे दीड हजार वर्षापूर्वीचे शिलालेख संस्कृत भाषेत आणि दक्षिण भारतीय वळणाच्या ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहेत.

दगडांवर कोरलेल्या या छोटेखानी लेखांतून आपल्याला मूलवर्मन राजाच्या राज्याचं नाव समजत नाही; परंतु त्याच्या वडिलांचं नाव अश्ववर्मन, तसंच आजोबांचं नाव कुंडुंग्ग असल्याचं समजतं. या शिलालेखांत मूलवर्मन राजाला ‘राजेंद्र’, त्याच्या वडिलांना ‘वंशकर्ता’, तर आजोबा कुंडुंग्ग यांना ‘नरेंद्र’ असं म्हटलं गेलं आहे. यातील एका शिलालेखात राजेंद्र मूलवर्मन राजानं युधिष्ठिराप्रमाणे इतर राजांना युद्धात हरवून आपलं मांडलिक बनवल्याचा उल्लेख आहे. यावरून मूलवर्मनच्या आजोबांचं कुंडुंग्ग हे नाव स्थानिक असावं. ते नरेंद्र म्हणजे ‘लोकांवर राज्य करणारे’ स्थानिक राजे होते. कुंडुंग्गचा मुलगा अश्ववर्मन यानं भारतीय संस्कृती, धर्म आणि राज्यपद्धतीचा अवलंव करून अश्ववर्मन हे नाव घेतलं असावं, त्यामुळे त्यांना ‘वंशकर्ता’ असं म्हटलं असावं. मूलवर्मन राजानं शेजारील इतर राजांना मांडलिक केल्यानं त्याला ‘राजेंद्र’ म्हणजे ‘राजांवर राज्य करणारा’ अशी उपाधी लावली असावी असं अभ्यासकांचं मत आहे.

मूलवर्मन राजानं इतर राजांना मांडलिक केल्यावर ब्राह्मणांना बोलावून त्यांच्याकडून यज्ञ करवून घेतल्याची माहिती त्याच्या लेखांतून मिळते. कदाचित् हे ब्राह्मण भारतातून बोलावले गेले होते. या ब्राह्मणांना राजानं हजारो गाईंचं दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखातून केला आहे.

इंडोनेशियातील जावा बेटावर सापडलेल्या पूर्णवर्मन नावाच्या राजाच्या चार छोटेखानी संस्कृत शिलालेखांतून त्याच्या तारुमानगर या राज्याचं नाव समजते. अंदाजे चौदाशे वर्षांपूर्वीच्या या तारुमानगर राज्याबद्दल आपल्याला इतर माहिती मिळत नाही. मूलवर्मनचं राज्य किंवा पूर्णवर्मनचं तारुमानगर या राज्यांचं नंतर काय झालं याबद्दलही माहिती मिळत नाही.

मातरम राज्य

इंडोनेशियातील पूर्णवर्मन राजानंतर अंदाजे दीडशे वर्षांनी संजय नावाच्या राजानं जावा बेटावर ‘मातरम’ नावाच्या ज्याची स्थापना केली होती, असं तिथल्या शिलालेखातून आपल्याला समजतं. हा राजा शिवभक्त होता. त्यानं इसवीसन ७३२ मध्ये शिवलिंगाची स्थापना केल्याचा उल्लेख जावा बेटावरील एका शिलालेखात आहे.

संजय राजानंतर राज्यावर आलेल्या पनगकरन नावाच्या राजानं बौद्ध महायान परंपरा स्वीकारून बौद्ध धर्माला प्रोत्साहन दिलं. जावा बेटावर इसवीसनाच्या नवव्या शतकात प्रंबानन इथं मोठा हिंदू मंदिरसमूह आणि त्याच्या शेजारील प्रदेशात शैलेंद्र घराण्याच्या काळात बोरोबुदूर इथला प्रचंड मोठा बौद्ध स्तूप निर्माण झालेले दिसून येतात.

श्रीविजय साम्राज्य

अंदाजे सातव्या शतकात (आजपासून तेराशे वर्षांपूर्वी) श्रीविजय नावाच्या राज्याची सुरुवात प्रामुख्यानं सुमात्रा बेटाच्या दक्षिण भागात झाली होती. मलाक्का सामुद्रधुनीतील व्यापार ताब्यात ठेवणाऱ्या या साम्राज्यातील वास्तूंचे भग्नावशेष फारसे आढळत नाहीत. शेजारील जावा बेटावरील राजे दगड-विटांनी बांधलेली प्रचंड मंदिरं, विहार आणि स्तूप बांधण्यास प्रोत्साहन देत होते, त्या वेळी श्रीविजय राज्यातील राज्यकर्ते केवळ व्यापारावर आणि व्यापारीमार्गाच्या रक्षणावर भर देत असावेत, त्यामुळे त्यांच्या काळात भव्य वास्तू निर्माण झाल्या नाहीत.

श्रीविजय साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळातील म्हणजे, तेराशे वर्षांपूर्वीचे, काही शिलालेख जुन्या मलै भाषेत आहेत; परंतु त्याच वेळी श्रीविजय साम्राज्य हे बौद्ध धर्मशिक्षण घेण्यासाठी आणि संस्कृत शिकण्यासाठी महत्त्वाचं ठिकाण होतं, असं चिनी प्रवाशांच्या नोंदींवरून समजतं.

इसवीसन ६७१ मध्ये (आजपासून अंदाजे तेराशे वर्षांपूर्वी) यिजिंग नावाचा चिनी बौद्ध प्रवासी चीनमधून परतणाऱ्या इराणी व्यापारीजहाजातून इंडोनेशियात आला होता. त्या वेळी सुमात्रातील श्रीविजय राज्यात तो सहा महिने संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी राहिला होता. त्यानंतरच तो महिन्याच्या समुद्रप्रवासानंतर भारतात दाखल झाला. इंडोनेशियातील तत्कालीन श्रीविजय राज्यात एक ते दोन वर्षे संस्कृत शिकण्यासाठी राहून मगच भारतात जाण्याचा सल्ला यिजिंग हा त्याच्या लिखाणातून चिनी भिक्षूंना देतो. त्याच्या नोंदीनुसार, त्याकाळी श्रीविजय राज्यातील विहारांमध्ये एक हजार भिक्षू होते.

भारतात संस्कृत भाषेचा वापर शिलालेखासाठी साधारणपणे अठराशे वर्षांपूर्वी झालेला दिसून येतो. अंदाजे सोळाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील वाकाटक घराण्यातील राजे आपल्या लेखांसाठी संस्कृत भाषा वापरू लागले होते. साधारणपणे त्याच काळात इंडोनेशियातील स्थानिक राजे त्यांच्या शिलालेखांसाठी संस्कृत भाषा वापरत होते. इतकंच नव्हे तर, चीनमधून भारतात येणारे चिनी बौद्ध भिक्षू इंडोनेशियात काही महिने संस्कृत शिकण्यासाठी राहून मगच भारतात येत असत. यावरून प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचा, धर्मांचा आणि संस्कृत भाषेचा प्रभाव इंडोनेशियात किती मोठ्या प्रमाणात पडला होता हे लक्षात येतं.

इंडोनेशियातील भारतीय संस्कृतीच्या प्रसाराच्या या संक्षिप्त पार्श्वभूमीवर आपण इंडोनेशियातील काही महत्त्वाची हिंदू-मंदिरं, बोरोबुदूर यांसारखी प्रसिद्ध बौद्धस्थळं, दक्षिण भारतातील चोल राजांचे श्रीविजय साम्राज्याशी आलेले सामरिक संबंध याबद्दल पुढील लेखांतून जाणून घेऊ या...

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

Web Title: Anand Kanitkar Writes Indian Culture In Indonesia Inscription

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top