
सन १८११ ते १८१६ दरम्यान इंडोनेशियातील जावा बेटावर ब्रिटिशांची सत्ता होती. त्या वेळी सर थॉमस रॅफल्स हे ब्रिटिशांतर्फे जावा बेटाचा राज्यकारभार पाहत होते.
- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com
सन १८११ ते १८१६ दरम्यान इंडोनेशियातील जावा बेटावर ब्रिटिशांची सत्ता होती. त्या वेळी सर थॉमस रॅफल्स हे ब्रिटिशांतर्फे जावा बेटाचा राज्यकारभार पाहत होते. रॅफल्स यांना जावा बेटाच्या इतिहासात रस होता. त्यासाठी ते बेटावरील विविध ठिकाणांना भेटी देत असत. सन १८१४ मध्ये त्यांना मध्य जावामधील जंगलात एका टेकडीवर असलेल्या काही अवशेषांबद्दल माहिती मिळाली. त्यांनी त्या ठिकाणाला त्वरित भेट दिली. या ठिकाणाचं नाव होतं ‘बोरोबुदूर’. गवत, झाडा-झुडपांमध्ये बोरोबुदूर टेकडीवर असलेले अवशेष बघून रॅफल्स यांनी कोर्नेलियस या डच अभ्यासकाला बोलावणं पाठवलं. कोर्नेलियस त्या वेळी जावा बेटावरील विविध प्राचीन मंदिरांची नोंद करत होता. त्यामुळे त्याला हे अवशेष ओळखता आले असते.
कोर्नेलियसनं सुमारे दोनशे कामगारांकडून या अवशेषांच्या आजूबाजूची झाडं तोडून, झुडपं आणि गवत कापून, माती खणून काढण्याचा प्रयत्न केला. हे काम जवळपास दोन महिने चाललं होतं. या साफसफाईमुळे बोरोबुदूरच्या टेकडीवरील दगडी स्मारकाचा अंदाज येऊ लागला. मात्र, कोरीवकाम केलेले इथले दगड ढासळण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यावर कोर्नेलियसनं खणण्याचं काम थांबवलं.
सन १८१७ पासून या टेकडीवरील काही जागा खणून अवशेष मोकळे करण्याचं काम सुरू होतं; परंतु १८३४ मध्ये स्थानिक डिस्ट्रिक्ट ऑफिसर हार्टमान यानं पुन्हा ही सर्व टेकडी स्वच्छ करून उत्खनन सुरू केलं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, बोरोबुदूरचा हा स्तूप केवळ त्या टेकडीच्या माथ्यावर नसून पूर्ण स्तूपाभोवतीच माती जमा होऊन त्यावर झाडं-झुडपं उगवली आहेत. हे लक्षात आल्यावर त्यानं आजूबाजूची सर्व जागा साफ करून स्तूपाचा सर्व भाग मोकळा केला.
पुढं १८८५ मध्ये उत्खनन करताना या स्तूपाच्याही खाली चौथरा असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पाच वर्षांनी या चौथऱ्याच्या बाजूची माती पूर्णपणे काढल्यावर या चौथऱ्याच्या भिंतीवर अनेक शिल्पं कोरलेली असल्याचं समजलं.
यानंतर मात्र ढासळण्याची शक्यता असलेल्या चौथऱ्यासह हा स्तूप पूर्णपणे वाचवण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. त्याबरोबरच या बोरोबुदूर स्तूपाचा विविध पद्धतींनी अभ्यासही सुरू झाला. दोनशे वर्षांपूर्वी पुन्हा जगासमोर आलेल्या प्रचंड मोठ्या बोरोबुदूर स्तूपाच्या पुनर्शोधानंतर अनेक संशोधकांनी या बौद्ध स्तूपाचा, त्याच्या स्थापत्याचा, शिल्पांचा अभ्यास केला. यातून पुढं आलेली माहिती थोडक्यात पाहू या.
स्तूपाचा काळ
बोरोबुदूरच्या या प्रचंड मोठ्या स्तूपाच्या स्थापनेबद्दलचा कोणताही शिलालेख इथं न मिळाल्यानं नक्की कोणत्या राजानं हा स्तूप उभारला असावा याबद्दल आपल्याला माहिती मिळत नाही. मात्र, या स्तूपावरील स्थापत्यघटक, इथल्या शिल्पांची शैली यावरून हा स्तूप इसवीसनाच्या आठव्या-नवव्या शतकात, म्हणजे अंदाजे ११०० वर्षांपूर्वी निर्माण झाला असावा, असं अभ्यासकांचं मत आहे. त्या काळात जावा बेटावर शैलेंद्र घराण्याचे राजे राज्य करत होते. या घराण्यातील राजांनी अनेक बौद्ध मंदिरं या भागात बांधलेली आहेत. या शैलेंद्र घराण्याच्या राज्यकालात बोरोबुदूर इथल्या स्तूपाची निर्मिती करण्यात आली.
स्तूपाची रचना
एक खालचा चौथरा, त्यावर कठडे असलेले पाच स्तर किंवा गॅलरी, त्यावरील बाजूस तीन स्तरांवर वर्तुळाकारात उभारलेले स्तूप आणि सर्वात वर मध्यभागी मुख्य स्तूप अशी या बोरोबुदूरच्या स्तूपाची रचना आहे. स्तूपाची ही दहा स्तरांची रचना असण्याची वेगवेगळी अनुमानं अभ्यासकांनी लावली आहेत. या स्तूपात पूर्वजांची पूजा करण्याचीस्थानिक परंपरा आणि बौद्ध महायान परंपरा दिसून येतात असं पाश्चात्त्य अभ्यासकांचं मत आहे.
हा स्तूप चढून जाताना वाटेतील गॅलरींमध्ये आतल्या बाजूनं भिंतींवर आणि कठड्यांवर मिळून विविध कथाशिल्पं कोरलेली आहेत. या स्तूपावर १४६० कथाशिल्पं आहेत, तर चारही बाजूंच्या कोनाड्यांमध्ये आणि वरील स्तूपांमध्ये मिळून ५०४ बुद्धमूर्ती आहेत.
या स्तूपाच्या सर्वात खालच्या चौथऱ्याच्या बाह्यभिंतीवर ‘महाकर्मविभंग’ नावाच्या बौद्ध ग्रंथातील कथाशिल्पं कोरलेली आहेत. पहिल्या गॅलरीतील भिंतींवर ‘ललितविस्तर’ या बौद्ध ग्रंथातील प्रसंगांवर आधारित शिल्पं कोरलेली आहेत. त्यावरील तीन गॅलरींमध्ये ‘गंडव्यूह’ या बौद्ध ग्रंथातील कथांवर आधारित शिल्पं आहेत. या चारही गॅलरींच्या कठड्यांवर आतल्या बाजूनं बौद्ध जातककथा आणि अवदानकथा कोरलेल्या आहेत. सर्वात वरच्या तीन स्तरांवर ७२ स्तूप आहेत. या दगडी स्तूपांमध्ये बुद्धमूर्ती आहेत.
या स्तूपांवरून पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी इथल्या स्थपतींनी बांधकाम करतानाच तशी सोय केली होती. यासाठी वापरले जाणारे विविध मकरप्रणाल इथं पाहायला मिळतात, तसंच स्तूपाच्या चारही बाजूंनी जिन्यांची सोय करण्यात आली आहे.
या स्तूपाचे खालून वर तीन भाग पडतात. १२३ मीटर बाय १२३ मीटर असलेला सर्वात खालचा चौथरा हा या स्तूपाचा खालचा भाग आहे. त्यामध्ये पाच गॅलरी असलेला मधला भाग आहे, तर सर्वात वरच्या बाजूला तीन वर्तुळाकार स्तरांवर ७२ स्तूप उभारलेले आहेत.
बौद्ध परंपरेनुसार हे तीन भाग कामधातू, रूपधातू आणि अरूपधातू दर्शवतात असं अभ्यासकांचं मत आहे. बोरोबुदूर इथला सर्वात खालचा चौथरा ‘कामधातू’चं प्रतीक आहे. मधील पाच चौकोनी स्तर हे ‘रूपधातू’चं प्रतीक आहेत, तर स्तूप असलेले सर्वात वरील तीन गोलाकार स्तर हे ‘अरूपधातू’ दर्शवतात.
बोरोबुदूरमधील विविध कथाशिल्पांतून इंडोनेशियातील बाराशे वर्षांपूर्वीची केशभूषा, वेशभूषा, स्थापत्य, वापरण्यात येणाऱ्या वस्तू कशा होत्या हेदेखील समजतं. इथल्याच एका शिल्पात कोरलेलं जहाजाचं शिल्प विशेष प्रसिद्ध आहे.
साधारणपणे अकराव्या शतकात जावा बेटावरील राजकीय परिस्थिती बदलली. राजाश्रय थांबल्यामुळे बोरोबुदूर स्तूपासोबतच इथल्या इतरही मंदिरांमधील पूजाअर्चा थांबली असावी. हळूहळू हा स्तूप विस्मृतीत गेला आणि त्यावर झाडं-झुडपं वाढून याचा पुनर्शोध लागण्यास १८१४ हे वर्ष उजाडावं लागलं.
अनेक देशांच्या साह्यानं ‘युनेस्को’नं सन १९७२ च्या दरम्यान या बोरोबुदूर स्तूपाच्या विविध भागांतील दगड काढून त्याखालील ढासळणारी जमीन पक्की करून, पाणी वाहून जाण्यासाठी म्हणून पन्हाळी घालून ते दगड पुन्हा रचून स्तूपाच्या भिंतींचे पाये पुन्हा एकदा भक्कम केले. सन १९९१ मध्ये बोरोबुदूर स्तूपाला ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून दर्जा मिळाला. आजही इंडोनेशियात येणारे पर्यटक प्रंबाननमंदिरं आणि बोरोबुदूरचा स्तूप या जागतिक वारसा स्थळांना आवर्जून भेट देतात.
भारतीय संस्कृतीच्या खुणा इंडोनेशियातील विविध शिलालेख, मंदिरं, स्तूप, मूर्ती यांच्या स्वरूपात दिसतात हे आपण याआधीच्या लेखांतून पाहिलं. याशिवाय, भारतीय राजांचा आणि इंडोनेशियातील राजांचादेखील एकमेकांशी संबंध आला होता, त्याबद्दल आपण पुढील लेखात विस्तारानं पाहू या.
(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)