कुब्लईखान आणि तिबेटी लामा पाग्पा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kublai khan and bauddha god mahakala idol

इसवीसनाच्या बाराव्या शतकात सध्याच्या मंगोलियाच्या भूभागात असलेल्या अनेक टोळ्यांपैकी एक होती मंगोल टोळी. याच टोळीत चेंगीजखानाचा जन्म अंदाजे इसवीसन ११६२ मध्ये झाला.

कुब्लईखान आणि तिबेटी लामा पाग्पा

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

इसवीसनाच्या बाराव्या शतकात सध्याच्या मंगोलियाच्या भूभागात असलेल्या अनेक टोळ्यांपैकी एक होती मंगोल टोळी. याच टोळीत चेंगीजखानाचा जन्म अंदाजे इसवीसन ११६२ मध्ये झाला. त्याच्या अंगच्या नेतृत्वगुणांमुळे तो सर्व मंगोल टोळ्यांचा प्रमुख झाला. हळूहळू त्याला विरोध करणाऱ्या इतर सर्व टोळ्यांना हरवून आपलं नेतृत्व त्यानं सिद्ध केलं.

चेंगीजखानाचं मूळ नाव तेमूजीन असं होतं. राज्य करताना मात्र त्यानं चेंगीजखान हे नाव घेतलं. खान हा शब्द आपल्या नावाबरोबर वापरण्याची सुरुवात चेंगीजखानानं आणि त्यानंतरच्या मंगोल वंशाच्या इतर गैरइस्लामी राजांनी केली हे लक्षात घेतलं पाहिजे. चेंगीजखानाच्या पूर्वी आणि त्याच्या काळातही मंगोल टोळ्या नैसर्गिक शक्तींना देवता मानत असत. उलटपक्षी चेंगीजखानाचे वंशज नंतर आशिया खंडात ज्या भागात गेले तिथले धर्म त्यांनी स्वीकारले. चेंगीजखानाच्या काळात मंगोल टोळ्यांनी इस्लाम स्वीकारला नव्हता. चेंगीजखानानंतरच्या काही पिढ्यांनंतर काही मंगोल राजांनी इस्लाम धर्म स्वीकारला.

खान या शब्दाचं मूळ तुर्की, चिनी, मंगोल किंवा अगदी कोरिअन असण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे. खान या शब्दाचा अर्थ काळानुसार बदलत गेला असं दिसतं. चेंगीजखानाच्या सर्व वंशजांनी राज्य करताना ‘खागान’ म्हणजे ‘सम्राट’ असा शब्द वापरला. तिथल्या स्थानिक भाषेत खागान या शब्दातील ‘गा’ अनेकदा उच्चारला जात नाही. त्यामुळे या ‘खागान’चं नंतर ‘खान’ असं रूपांतर झालं असावं.

नंतरच्या काळात मध्य आणि पश्चिम आशियातील इस्लामिक राज्यांतून खान हा शब्द हुद्द्याशी निगडित असावा. भारतात मुघल दरबारात खान हा शब्द सरदारांसाठी वापरला गेला, त्यामुळे दक्षिण आशियात आलेला खान हा शब्द भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात आजही वापरला जातो.

चेंगीजखानानं सध्याचा पश्चिम चीनचा भूभाग आणि त्याला लागून असलेला मध्य आशिया हा सर्व प्रदेश काबीज केला. तिथपासून ते इराण, इराकपर्यंतचा भूभाग चेंगीजखानानं जिंकला. सन १२२५ मध्ये चेंगीजखानानं आपलं साम्राज्य आपल्या चार मुलांत वाटून दिलं.

चेंगीजखानाच्या मृत्यूनंतर गादीवर आलेल्या मंगोल सम्राटानं तिबेट काबीज करण्याचं ठरवलं; परंतु हल्ला करून तिबेट घेण्यापेक्षा सामोपचारानं वाटाघाटी कराव्यात असं चेंगीजखानाचा नातू गोदान यानं ठरवलं. त्यानं तिबेटमधील त्या वेळचे प्रख्यात बौद्ध गुरू शाक्यपंडित यांना चीनमध्ये येण्याचं निमंत्रण पाठवलं. चीनमध्ये झालेल्या या भेटीदरम्यान गोदान यानं शाक्यपंडित यांच्यासमोर, तिबेटनं मंगोल साम्राज्याचं मांडलिकत्व पत्करावं,’ असा प्रस्ताव मांडला. बऱ्याच वाटाघाटींनंतर तिबेटमधून हा प्रस्ताव स्वीकारला गेला. तिबेटनं मंगोल साम्राज्याचं वर्चस्व मान्य केलं, त्यामुळे मंगोल सैन्यानं तिबेट कधीच पादाक्रान्त केला नाही. एकाअर्थी तिबेट हा मंगोल साम्राज्यातील स्वायत्त प्रदेश राहिला.

शाक्यपंडित यांच्या चीनमधील वास्तव्यादरम्यान त्यांच्यात आणि चेंगीजखानाचा नातू गोदान यांच्यात बौद्ध धर्माबद्दल चर्चा झाली होती. शाक्यपंडित यांनी गोदानला दीर्घकालीन आजारातून बरं केलं असं काही लिखित पुराव्यांतून नमूद केलं गेलं आहे. गोदाननं शाक्यपंडित यांना चीनमध्ये राहण्याची विनंती केली. शाक्यपंडित यांच्याबरोबर त्यांचे दोन पुतणे तिबेटमधून चीनला आले होते. तेदेखील शाक्यपंडित यांच्यासमवेत चीनमध्येच राहिले. शाक्यपंडित यांचा पुतण्या म्हणजे मंगोलसम्राट कुब्लईखानाच्या राजवटीत नावारूपाला आलेले लामा पाग्पा.

त्यानंतर म्योंग्क हा मंगोलिया, चीन, तिबेट येथील राज्याचा चौथा मंगोलसम्राट बनला. म्योंग्कचा भाऊ आणि राजपुत्र असलेला कुब्लईखान शाक्यपंडितांचा पुतण्या लामा पाग्पा यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करत असे. कुब्लईखानाचा चीनमधील बौद्धधर्माच्या शाखेशी परिचय होता. लामा पाग्पा यांच्यामुळे कुब्लईखानाची तिबेटमधील बौद्ध वज्रयानाशी ओळख झाली. कुब्लईखानाची पत्नी चाबी हिनं वज्रयानातील हेवज्र देवतेच्या नावानं असलेल्या हेवज्र तंत्राची दीक्षा घेतली. त्यानंतर लामा पाग्पा यांनी कुब्लईखानाला बौद्ध हेवज्र तंत्राची दीक्षा दिली. लामा पाग्पा आणि कुब्लईखान यांच्यामुळे मंगोलसाम्राज्यात एका अर्थी गुरू-शिष्यपरंपरा सुरू झाली.

सन १२६० मध्ये कुब्लईखान चीनमधील मंगोल साम्राज्याचा सम्राट झाला. पुढं त्यानं युआन घराण्याची स्थापना केली. बौद्धधर्म हा मंगोल राज्यातील प्रमुख धर्म असल्याचं कुब्लईखानानं जाहीर केलं. याशिवाय कुब्लई खानानं एक फर्मान काढलं. या फर्मानानुसार, ‘बौद्ध धर्माच्या विविध पंथांतील बौद्ध आचार्यांचा आणि भिक्षूंचा सर्वांनी आदर करावा...भिक्षूंना कोणतंही काम सांगितलं जाऊ नये...तसंच बौद्ध विहारांच्या सीमेतील भूमी, नदी किंवा पाणचक्की सैन्यानं ताब्यात घेऊ नये’ अशी सर्वांना ताकीद दिली गेली. लामा पाग्पा यांनी यानंतर चीनमधील दाओ नावाच्या धर्मातील एका गुरूला वादविवादात हरवलं होतं. त्यामुळे लामा पाग्पा यांचं चीनमधील मंगोलसाम्राज्यातील महत्त्व वाढलं, त्याचबरोबर त्यांची कुब्लईखानाशी असलेली मैत्रीही वाढत होती. या विविध कारणांनी तिबेटी बौद्धगुरूंचा प्रभाव मंगोलसाम्राज्यात वाढला.

कुब्लईखानानं २६ वर्षांच्या लामा पाग्पा यांना चीनमधील मंगोलसाम्राज्याचे सर्वोच्च आचार्य म्हणून नेमलं. या नेमणुकीमुळे लामा पाग्पा हे चीनमधील बौद्ध धर्माच्या सर्व शाखांचे सर्वोच्च आचार्य बनले. मंगोलसाम्राज्यातील सर्वोच्च आचार्य या नात्यानं मंगोलसम्राटाला बौद्ध धर्मातील शिकवण देणं, राजघराण्यातील सर्वांच्या समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं इत्यादी कर्तव्येदेखील लामा पाग्पा यांनी पार पाडली. शत्रूंना जिवे मारण्याच्या कुब्लईखानाच्या कृत्याचा लामा पाग्पा यांनी निषेध केला होता. शांततेच्या आणि करुणेच्या मार्गानं राज्यकारभार करून कुब्लईखानानं चक्रवर्ती सम्राट व्हावं असा संदेश लामा पाग्पा यांनी कुब्लईखानाला दिला.

कुब्लई खान आणि लामा पाग्पा या दोघांनीही चीनमधील मंगोलसाम्राज्याचा कारभार एकत्रितपणे केला. कुब्लईखानानं तिबेटचा कारभार बघण्यासाठी आपल्या राज्यात ‘बौद्ध आणि तिबेटी प्रशासन विभाग’ निर्माण केला. त्या विभागावर लामा पाग्पा यांची ‘तिबेटचा प्रशासन अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली. या विभागांतर्गत कुब्लईखानानं लामा पाग्पा यांना तिबेटमधील प्रशासनाची पुनर्रचना करण्यास सांगितलं. कुब्लईखानाच्या सांगण्यावरून लामा पाग्पा यांनी मंगोलियन भाषेसाठी लिपी निर्माण केली असं सांगितलं जातं. ती राष्ट्रीय लिपी म्हणून मंगोलसाम्राज्यात सर्वत्र शिकवण्यास सांगितली गेली. त्यांच्या नावावरून या लिपीला ‘पाग्पा लिपी’ असं संबोधलं जातं. त्याद्वारे त्यांनी कुब्लईखानाच्या मंगोलसाम्राज्याचं एकीकरण करण्याला मदत केली.

तिबेटी बौद्ध धर्मात महत्त्वाची असलेली ‘महाकाल’ नावाची बौद्धरक्षक उग्रदेवता आजही नेपाळ, तिबेटमध्ये पूजली जाते. ही महाकालदेवता कुब्लईखानाची रक्षकदेवता होती. याबाबत काही लिखित पुराव्यांमधून माहिती मिळते. कुब्लईखानाच्या काळात महाकालाच्या काही प्रतिमा चीनमध्ये निर्माण केल्या गेल्या. चीनमधील सन १२९२ मध्ये निर्माण केल्या गेलेल्या महाकालाच्या एका प्रतिमेवर असलेल्या कोरीव लेखात कुब्लईखानाचं आणि लामा पाग्पा यांचं नाव आहे.

इसवीसन १२७८ मध्ये कुब्लईखानाचा मुलगा जिंगीम याच्या सांगण्यावरून लामा पाग्पा यांनी एक ग्रंथ कुब्लईखानासाठी लिहिला होता. त्यात त्यांनी ‘चेंगीजखान हा एक चक्रवर्ती राजा होता, पूर्वजन्मांतील पुण्यकर्मांमुळे तो शेवटी या जन्मात चेंगीजखान म्हणून प्रसिद्ध झाला,’ असा उल्लेख केला आहे. या ग्रंथात त्यांनी कुब्लईखानाचा उल्लेख ‘पहिला मंगोल धर्मराज’ म्हणून केला आहे.

मंगोल साम्राज्यातील तिबेटमधील बौद्धांचा प्रभाव केवळ कुब्लईखानाच्या अमदानीत राहिला असं नव्हे, तर त्याच्या घराण्यातील पुढील वंशजदेखील बौद्ध होते. मध्ययुगातील मंगोलसम्राटांच्या तिबेटी वज्रयानाचा स्वीकार करण्यामुळे आणि त्याला आश्रय देण्यामुळे मंगोलिया देशातील रहिवाशांचा आजही बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म आहे.

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

टॅग्स :Devi Idolsaptarang