मध्ययुगीन भारत व मलेशिया यांचे संबंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati

मलेशिया देशाच्या किनारी प्रदेशात सध्याचा केडा नावाचा प्रांत आहे. हजार वर्षांपूर्वी कटह या नावानं ओळखल्या जाणाऱ्या केडा प्रांतातील प्राचीन राज्याबद्दल, तेथील भारतीय मंदिरांबद्दल या लेखातून थोडक्यात जाणून घेऊ या.

मध्ययुगीन भारत व मलेशिया यांचे संबंध

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

मलेशिया देशाच्या किनारी प्रदेशात सध्याचा केडा नावाचा प्रांत आहे. हजार वर्षांपूर्वी कटह या नावानं ओळखल्या जाणाऱ्या केडा प्रांतातील प्राचीन राज्याबद्दल, तेथील भारतीय मंदिरांबद्दल या लेखातून थोडक्यात जाणून घेऊ या.

मलेशियातील सध्याच्या केडा प्रांतातील राज्य हजार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. मलेशियाच्या जवळील मलाक्काच्या सामुद्रधुनीतून प्रवास करताना व्यापारीजहाजं येथे थांबत असत. चीनकडून भारताकडे, इराणकडे जाणारी जहाजं, तसंच भारतातून चीनकडे जाणारी व्यापारीजहाजं येथे थांबत असत. केडा येथे केल्या गेलेल्या उत्खननात पश्चिम आशियातून आणलेल्या काचेच्या भांड्यांचे तुकडे, तसेच इराण आणि चीनमधील अकराशे वर्षांपूर्वीच्या मातीच्या भांड्यांचे तुकडे सापडले आहेत. या वस्तू समुद्री मार्गानं व्यापारासाठी केडा येथे आणल्या गेल्या असणार.

साधारणपणे चौदाशे वर्षांपूर्वी सुरू झालेला हा व्यापार केडा प्रांतातील खाडीच्या प्रदेशातील दोन बंदरांतून होत होता. या दोन बंदरांच्या आसपासच्या प्रदेशात वसाहत वाढत गेली आणि तेथे मंदिरंही निर्माण झाली. इसवीसनाच्या सातव्या शतकात म्हणजे, तेराशे वर्षांपूर्वी, केडा येथे चिनी शिष्टमंडळ पाठवण्यात आलं होतं. यावरून केडा राज्याचं व्यापारदृष्ट्या असलेलं तत्कालीन महत्त्व लक्षात येतं. त्या वेळी केडा नगराला तीन तटबंदी होत्या आणि अनेक प्रवेशद्वारं होती असं चिनी अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलं आहे.

मागील एका लेखात पाहिल्यानुसार, इसवीसनाचं सातवं शतक ते बारावं शतक या काळात इंडोनेशियात श्रीविजय साम्राज्य होतं. या श्रीविजय साम्राज्यानं व्यापारीवर्चस्वासाठी मलेशियातील केडा या प्रांतातही आपला राज्यविस्तार केला होता. केडा येथील राज्य हा श्रीविजय साम्राज्यातील महत्त्वाचा भाग होता.

कदारम, कटारम, कटाह, कटहनगर, कटहद्वीप इत्यादी नावांनी मलेशियातील या प्राचीन राज्याचा उल्लेख विविध लिखित पुराव्यांतून केलेला दिसून येतो. बाराशे वर्षांपूर्वी अरब व्यापाऱ्यांनी या स्थानाचा उल्लेख ‘कलाह’ असा केलेला आहे. कटाह या शब्दाचं मलेशियातील सध्याच्या केडा (Kedah) या प्रांताच्या नावाशी साम्य दिसून येतं, तसंच केडा या प्रांताचं भौगोलिक स्थानदेखील चिनी प्रवाशांच्या वर्णनानुसार प्राचीन कटह या राज्याशी जुळतं यावरून ही स्थाननिश्चिती केली गेली.

दक्षिण भारतातील चोल राजांच्या राजवटीत अंदाजे हजार वर्षांपूर्वी तमिळनाडूमधील नागपट्टीनम येथील एका मंदिरात किटा (केडा) येथील राजाच्या भारतीय प्रतिनिधीनं सोन्याचे छोटे तुकडे दान दिले होते असा उल्लेख शिलालेखातून आढळतो. म्हणजे, सुरुवातीला चोल राजांचे आणि केडा येथील राजांचे चांगले व्यापारीसंबंध होते असा अंदाज त्यावरून व्यक्त करता येतो.

चीनपर्यंतच्या संपूर्ण समुद्री मार्गावर म्हणजे, मलेशिया आणि इंडोनेशियाच्या पलीकडे सध्याच्या दक्षिण चिनी समुद्रातील व्यापारावरदेखील आपला ताबा असावा, याकरता चोलवंशातील राजेंद्र या राजानं इंडोनेशियातील श्रीविजय साम्राज्यावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानं एक हजार वर्षांपूर्वी इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील आणि मलेशियाच्या प्रदेशातील श्रीविजय साम्राज्याच्या नगरांवर आणि बंदरांवर हल्ले केले. त्या वेळी राजेंद्र चोल राजाच्या आरमारानं मलेशियातील विविध राज्यांवरदेखील हल्ले केले होते. कदारम (किंवा कटारम) या राज्यावर हल्ला करून तेथील विजयोत्तुंगवर्मन राजाला कैद केल्याचा उल्लेख राजेंद्र राजाच्या तमिळ प्रशस्तीलेखातून आढळतो. हा उल्लेख मलेशियातील केडा प्रांतातील राज्याचा असल्याचं आता अनेक अभ्यासकांना मान्य आहे.

अंदाजे चारशे वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या मलेशियाच्या राजदरबारातील वृत्तान्तात मलय राजघराण्याच्या वंशावळीत अलेक्झांडर, श्रीविजय साम्राज्यातील राजे यांच्याबरोबरच दक्षिण भारतातील चोल राजांचा उल्लेखसुद्धा केलेला आहे. म्हणजेच, मलेशियातील राजघराण्यातील राजांना स्वतःला चोल राजांच्या वंशातील मानण्यात अभिमान वाटत होता हे यावरून स्पष्ट होतं.

केडा येथील मंदिरांचे अवशेष

मलेशियातील केडा प्रांतातील दोन वेगळ्या भागांत उत्खननादरम्यान अनेक मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. केडा येथील दक्षिणेला सुंगाई मास आणि उत्तरेला बुजंग (संस्कृत भुजंग) खोऱ्यातील विविध ठिकाणी या मंदिरांचे अवशेष विखुरलेले आहेत. या दोन ठिकाणांवरून ही मंदिरं दोन वेगळ्या बंदरांच्या भागात निर्माण झाली असल्याचं लक्षात येतं. यातील काही हिंदू-मंदिरं होती, तर काही बौद्ध-मंदिरं होती. अर्थात्, आता या मंदिरांची केवळ जोतीच आपल्याला दिसतात आणि त्यावरील भिंतींवरून गाभाऱ्याचा अंदाज करता येतो.

केडा येथे सापडलेल्या स्तुपांचे अवशेष, बुद्धमूर्ती, मातीच्या विविध मुद्रा यावरून येथे बौद्ध-स्तूप आणि मंदिरंही होती हे लक्षात येतं. नेपाळमधील अंदाजे एक हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या एका बौद्ध-ग्रंथात कटाहद्वीपावरील अवलोकितेश्वर या देवतेचा उल्लेख केलेला आहे. हे कटाहद्वीप म्हणजे मलेशियातील सध्याचा केडा हा प्रांत होय. येथील बौद्ध-मंदिरातील अवलोकितेश्वर ही देवता हजार वर्षांपूर्वी प्रसिद्ध असणार, ज्यामुळे या देवतेचं नाव तिच्या स्थानासह नेपाळमधील ग्रंथात दिलेलं आहे.

येथील काही मंदिरांच्या अवशेषांच्या आवारात सापडलेल्या शाळुंका, शिवलिंग, गणपती आणि विष्णुमूर्ती यावरून ही हिंदू-मंदिरं होती हे लक्षात येतं. केवळ चौकोनी गाभारा आणि समोर मंडप असलेली अशी ही साधी, छोटेखानी पूर्वाभिमुख मंदिरं होती. आता फक्त गाभाऱ्याचं जोतं आणि त्यावरील भिंतीचा थोडाच भाग शिल्लक राहिलेला दिसतो. गाभाऱ्यासमोरील फरसबंदीवर खांबांसाठी बसवलेले घडीव दगड दिसतात. या दगडांवर खांब उभारून येथे लाकडी मंडप उभारलेला असावा. त्यामुळे विटांचे किंवा दगडानी बांधलेले जोते, त्यावर विटांत बांधलेला चौकोनी गाभारा आणि त्यावर शिखर आणि समोर कदाचित लाकडात बांधलेला मंडप असं या मंदिरांचं स्वरूप होतं. बुजंग खोऱ्यातील मंदिरं अंदाजे एक हजार ते आठशे वर्षांपूर्वीच्या काळात बांधली गेली असावीत.

केडा येथील मंदिरांना इंडोनेशियातील किंवा कम्बोडियातील भव्य दगडी प्राचीन मंदिरांना मिळाल्यानुसार राजाश्रय लाभला नसावा. त्यामुळे येथील मंदिरांवर मोठ्या प्रमाणावर मूर्तिकाम, नक्षीकाम दिसून येत नाही. येथील मंदिरांच्या साध्या स्वरूपावरून केडा येथे येणाऱ्या भारतीय व्यापाऱ्यांनी त्यांच्यासाठी ही मंदिरं उभारली असावीत असं वाटतं. अर्थातच, व्यापारीकेंद्र म्हणून केडाचं महत्त्व संपल्यावर येथे व्यापाऱ्यांचं येणं हळूहळू बंद झालं असावं आणि ही मंदिरं काळाच्या ओघात नष्ट झाली असावीत. अंदाजे सोळाशे वर्षांपूर्वी केडा येथील हे राज्य प्रामुख्यानं व्यापारीकेंद्र म्हणून उदयाला आलं होतं. तेथील नद्यांच्या मुखाशी असणाऱ्या बंदरांवरून चालणारा हा व्यापार होता. नदीतून येण्याऱ्या गाळामुळे हळूहळू ही बंदरं भरू लागली आणि या बंदरांचा वापर करता येईनासा झाला. अंदाजे सहाशे वर्षांपूर्वी येथील व्यापार बंद पडला असावा आणि मलेशियात तेव्हा उदयाला येणाऱ्या मलाक्का नावाच्या राज्यासमोर केडा राज्य संपुष्टात आलं. मलेशियातील केडा राज्याच्या राजांच्या नावांवरून, तेथील मंदिरांचे अवशेष, मूर्ती, शिलालेख यातून आपल्याला मलेशिया आणि भारत यांच्यातील तत्कालीन राजनैतिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध लक्षात येतात.

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)