
रेशीममार्ग या व्यापारीमार्गाबद्दल आपण अनेकदा ऐकलेलं असतं; पण हा मार्ग नक्की कसा होता, त्या व्यापारीमार्गाचे जगाच्या इतिहासावर कसे परिणाम झाले याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊ या.
रेशीममार्ग
- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com
रेशीममार्ग या व्यापारीमार्गाबद्दल आपण अनेकदा ऐकलेलं असतं; पण हा मार्ग नक्की कसा होता, त्या व्यापारीमार्गाचे जगाच्या इतिहासावर कसे परिणाम झाले याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊ या. रेशीममार्ग म्हणजे युरोप, मध्य आशिया, भारत आणि चीन यांना जोडणाऱ्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारीमार्गांचं जाळं होय. यात आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक व्यापारीमार्गही होते. या मार्गावरील व्यापारात रेशीम ही मुख्य वस्तू होती. त्यामुळे एकोणिसाव्या शतकात फॉन रिश्तोफेन नावाच्या जर्मन अभ्यासकानं या व्यापारीमार्गाला ‘रेशीममार्ग’ असं संबोधलं. तेच नाव पुढं रूढ झालं.
चिनी रेशीम
साधारणपणे २२०० वर्षांपूर्वी चीनमध्ये विविध रंगवलेली रेशमाची वस्त्रं, पडदे, शोभेच्या वस्तू, जोडे इत्यादी तयार होत असत. जवळजवळ प्रत्येक चिनी शेतकऱ्याच्या घरात त्या वेळी रेशमाच्या किड्यापासून रेशीम तयार केलं जात असे. त्यामुळे शेतमालाबरोबरच रेशमाच्या स्वरूपातही कर भरला जाई. चिनी सैनिकांना पगार देण्यासाठी म्हणूनही राज्याकडून रेशमाच्या धाग्याच्या गुंडाळीचा वापर केला जाई.
साधारणपणे २१०० वर्षांपूर्वी तत्कालीन चिनी राज्याच्या हद्दीवर मध्य आशियातील व्यापारी येत असत. त्यांच्याकडून चिनी सैनिक इतर वस्तू खरेदी करताना रेशमी वस्त्राचे हे तागे देत असत. मध्य आशियातील हे व्यापारी आपापल्या नगरात जाऊन हे चिनी रेशीम विकत असत. अशा प्रकारे हळूहळू पश्चिमेकडे, म्हणजे रोमन साम्राज्यातील रहिवाशांना चिनी रेशमाची ओळख झाली.
रोमन साम्राज्यात या रेशमाची मागणी वाढू लागल्यावर मध्य आशियातील व्यापारीही चीनमधून अधिक रेशीम खरेदी करून ते विकू लागले. दोन हजार वर्षांपूर्वी केवळ चीनमध्येच रेशमाचं उत्पादन होत असल्यानं चिनी रेशमाची मागणी वाढू लागल्यावर त्याची किंमतही वाढली. याबरोबरच चिनी राज्यांत मध्य आशियातील उत्तम ताकदीच्या घोड्यांची युद्धासाठी गरज होती, त्यामुळे मध्य आशियातील घोडे आणि चीनमधील रेशीम यांचा वस्तुविनिमय वाढीला लागला. चिनी रेशीम आणि मध्य आशियातील घोडे यांना या मार्गांवर शेकडो वर्षं मोठी मागणी होती.
व्यापारीमार्ग
चीनपासून ते सध्याच्या पश्चिम आशियातील रोमन साम्राज्यापर्यंत जाणारा हा रेशीममार्ग अंदाजे ७५०० किलोमीटरचा होता. अर्थात्, हा एकच मार्ग नसल्यानं हा रेशीममार्ग म्हणजे किमान २५ ते ३० हजार किलोमीटर पसरलेल्या विविध मार्गांचं जाळं असावं. हा रेशीममार्ग सध्याच्या चीन, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, सीरिया, लेबानन इत्यादी देशांतून जाऊन नंतर भूमध्य समुद्रातून सध्याच्या इटलीत, म्हणजे रोमन साम्राज्याच्या मुख्य प्रदेशात, पोहोचत असे.
यातील एक मार्ग अफगाणिस्तानातून, पाकिस्तानातून, सिंधू नदीच्या काठानं भारतात गुजरातपर्यंत येत असे व गुजरातमधील भडोच या बंदरातून समुद्री मार्गानंही व्यापारीमाल रोमन साम्राज्यापर्यंत पोहोचवला जात असे, तसंच दुसऱ्या बाजूला हा मार्ग सध्याच्या पाकिस्तानातील तक्षशिला, मथुरा, पाटलीपुत्र (पाटणा) यांना जोडणारा होता. उत्तर भारतात निर्माण होणारा कच्चा माल, तयार उत्पादनं या मार्गानं रेशीममार्गावरील नगरांत पोहोचवली जात असावीत.
या मार्गावर विविध भागांत विविध कालखंडांत चिनी, भारतीय, अरब, तुर्की, बुखारी, उझबेकी असे व्यापारी होते. यांतील काही व्यापारी या मार्गावरील विविध नगरांमध्ये स्थायिक झालेले होते. व्यापाऱ्यांशिवाय राजदूत, भिक्षू, ख्रिस्ती धर्मप्रसारक, सैनिक, भटक्या टोळ्या हेदेखील या व्यापारीमार्गावरून प्रवास करत असत.
या मार्गांवर सामान वाहून नेण्यासाठी आणि प्रवासासाठी दोन मदारींचा बॅक्ट्रियन उंट, घोडे, खेचर, गाढव, बैल वगैरे प्राणी विविध तांड्यांत वापरले जात होते. विशेषतः मध्य आशियातील दोन मदारींचा उंट हा या भागातील गरम आणि थंड तापमानात तग धरू शकत असल्यानं या भागातील व्यापारासाठी योग्य होता. या मार्गावरील पर्वतातील खिंडी, वाळवंटं इत्यादी ठिकाणी दोन मदारींच्या उंटाचा वापर होऊ शकत होता. कान्हेरी लेणी (बोरिवली) इथल्या मुख्य चैत्यगृहात बॅक्ट्रियन उंट कोरलेला आहे. यावरून १८०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात या रेशीममार्गाशी संबंधित व्यापारी येत असावेत असा अंदाज व्यक्त करता येतो.
रेशीममार्गावर साधारणपणे २५ ते ३० किलोमीटरवर सराई, म्हणजे व्यापारीतांड्याच्या विश्रांतीसाठी बांधलेली जागा, असे. तिथंच व्यापाऱ्यांना राहण्याची, जेवणाची, तसंच जनावरांच्या दाणा-पाण्याची सोय असे. नगरांतून सामान वाहणारी ही जनावरं बदलली जात.
इथं एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे व तो म्हणजे, चीनच्या हद्दीपासून प्रवास करणारा व्यापारीतांडाच सध्याच्या इटली देशातील रोम शहरापर्यंत जाऊन पोहोचत होता असं नव्हे. तांड्यातील सामान एका मध्यस्थाकडून दुसरा मध्यस्थ ताब्यात घेई आणि कदाचित नवीन वाटाड्या घेऊन तो दुसरा मध्यस्थ पुढील प्रवासासाठी जात असे.
हे व्यापारी वाटेतील एखाद्या महत्त्वाच्या व्यापारीनगरात काही किंवा सगळा माल दुसऱ्या व्यापाऱ्याला विकत असत. त्यामुळे चीनमधून निघालेला हा व्यापारीमाल एका व्यापारीतांड्याकडून दुसऱ्या तांड्याकडे हस्तांतरित होत जवळजवळ सात हजार किलोमीटरचा प्रवास करून रोमन साम्राज्याच्या प्रदेशात पोहोचत असे. याला कदाचित वर्ष-दीड वर्षाचा कालावधी लागत असावा. वाटेत सुरक्षिततेसाठी आणि स्थानिक भौगोलिक माहितीसाठी हा व्यापारीतांडा अर्थातच सैनिक, स्थानिक वाटाडे सोबत घेऊन प्रवास करत असे.
व्यापारीवस्तू
साधारणपणे १८०० वर्षांपूर्वी या मार्गावरून चीनमध्ये सोनं आणि इतर धातू, काचसामान, सैन्याच्या वापरासाठी घोडे, हस्तिदंत इत्यादी वस्तू आयात केल्या जात, तर चिनी रेशीम, कागद, लाख, चिनी मातीच्या वस्तू, कातडी वस्तू निर्यात केल्या जात. मध्य आशियातील प्रदेशातून या मार्गावर जेड, शर्यत आणि युद्धासाठी घोडे निर्यात केले जात असत, तर भारतातून त्या मार्गावर हस्तिदंत आणि हस्तिदंती वस्तू, नीळ, मसाले, मौल्यवान रत्ने, मोती इत्यादी वस्तू निर्यात केल्या जात असत.
रोमन साम्राज्य अर्थातच यातील सर्वाधिक वस्तू आयात करत असे. या मार्गावरील रेशीम, हस्तिदंती वस्तू, कागद, मसाले, लाखेच्या वस्तू, रत्ने, मोती, तसंच युद्धासाठीचे घोडे, गुलाम इत्यादी रोमन साम्राज्यात विकले जात असत, तर रोमन साम्राज्यातील काचेचं सामान, कापड, मौल्यवान रत्नं, सोनं आणि इतर काही धातू रेशीममार्गावरील इतर प्रदेशांत विकल्या जात असत, त्यामुळे रोजच्या उपयुक्त वस्तूपेक्षा चैनीच्या वस्तू या मार्गावरून मुख्यतः आयात केल्या जात होत्या हे लक्षात येतं.
१७०० वर्षांपूर्वी कुषाण वंशाच्या राजांनी याच रेशीममार्गावरील व्यापारापासून फायदा मिळवण्यासाठी सध्याचा मध्य आशिया, अफगाणिस्तान, उत्तर पाकिस्तान, उत्तर भारताचा काही भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता.
रेशीममार्गाचे परिणाम
या रेशीममार्गावरील व्यापाराचे अनेक चांगले परिणाम झाले. मुख्य म्हणजे, या मार्गांवर अनेक नगरं उदयाला आली. या नगरांतून विविध व्यापारीमालाचं, वस्तूंचं उत्पादन, विक्री, वितरण होत असे. त्यामुळे महसूल वाढून या नगरांतील व्यापाऱ्यांना आणि शासकांना आर्थिक फायदा होत असे. हे धनिक व्यापारी, शासक यांच्या दानधर्माच्या आधारानं इथं अनेक धार्मिक स्थळं उदयाला आली, तसंच या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या प्रवाशांमुळे या मार्गावर तंत्रज्ञान, कलाशैली, भाषा, धार्मिक विचार यांचं आदानप्रदान झालं. बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्म, इस्लाम धर्म यांचा प्रसार या मार्गावरून झाला. रेशीम-उत्पादन, कागद, कागदी चलन, बंदुकीची दारू, छपाईचं तंत्रज्ञान इत्यादींचा प्रसारही या मार्गावरून विविध खंडांत झाला. त्याचबरोबर इराणी, ग्रीक, रोमन, मध्य आशियाई, भारतीय स्थापत्य-शिल्प-चित्र-संगीत-साहित्य इत्यादींचं आदानप्रदानही या मार्गांवर झालं.
या आंतरराष्ट्रीय रेशीममार्गावरून पसरलेला एक दुर्दैवी प्रकार म्हणजे महामारी किंवा साथीचे रोग. इसवीसन १३४६ ते १३५३ या काळात (आजपासून सहाशे वर्षांपूर्वी) ‘ब्यूबॉनिक प्लेग’ नावाची महामारी मध्य आशियात निर्माण झाली होती. इटालियन व्यापाऱ्यांच्या जहाजांतून उंदरांच्या माध्यमातून ही महामारी युरोपातदेखील पसरली. या महामारीनं त्या वेळी युरोपातील एकतृतीयांश लोकसंख्या मृत्युमुखी पडली होती असा अंदाज आहे. या रेशीममार्गावरून सध्याच्या चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला आणि तिथं अनेक बौद्ध लेणी, विहार निर्माण झाले. त्याबद्दल पुढील काही लेखांतून जाणून घेऊ या.
(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)
Web Title: Anand Kanitkar Writes Reshimmarg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..