‘मैं भीम का दिवाना हूँ’ने देशभर पोचवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Shinde hindi song Main Bhim Ka Deewana Hoon

कार्यक्रमांमध्ये मी कधी दादांची तर कधी स्वतःची हिंदीतील गाणी गात होतो. मात्र प्रसिद्धी काही मिळत नव्हती. शेवटी तो दिवस आलाच. माझं हिंदी गाणं प्रचंड प्रसिद्ध झालं. ते बाबासाहेबांवरील गीत होतं. ‘मैं भीम का दिवाना हॅंू’ असे त्या गीताचे बोल. कव्वाली प्रकारातील या गाण्याला चाहत्यांनी उत्तुंग प्रतिसाद दिला आणि आज ते गाणं प्रत्येक भीम जयंतीमध्ये वाजू लागलं. फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांतदेखील या गाण्याची फर्माईश होते.

‘मैं भीम का दिवाना हूँ’ने देशभर पोचवलं

माझे वडील प्रल्हाद शिंदे यांची अनेक हिंदी गाणीही प्रसिद्ध आहेत. जेव्हा मी कार्यक्रमांना सुरुवात केली तेव्हा प्रेक्षकांकडून दादांच्या हिंदी गाण्यांची फर्माईश केली जायची. त्यामुळे आपल्याला कार्यक्रमामध्ये हिंदी गाणीदेखील गावी लागणार, हे कळून चुकले. प्रेक्षकांच्या फर्माईशीनुसार मी स्टेजवर हिंदी गाणीही सादर करायचो. मात्र माझ्या हिंदी गाण्यात मराठीपणाचा टोन होता. यामुळे मलाही ते आवडत नसायचे. एकदा दादांनी ही बाब माझ्या निदर्शनास आणून देत हिंदी आणि उर्दू भाषेचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला.

हिंदी गाण्यांची मला आवड होती. त्यासाठी मी हिंदी आणि उर्दू भाषा खास करून उच्चारण शिकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी गोरेगावमध्ये राहत होतो. आमच्या शेजारी मुस्लिम कुटुंब होते. त्यांची हिंदी आणि उर्दूवर चांगली पकड असल्याने त्यांच्याकडे शिकवणी लावण्याचा मी निर्णय घेतला. त्यांच्याकडून अगदी बाराखडीची शिकवणी घेतली. याचा फायदा पुढे मला हिंदी गाण्यांच्या रेकॉर्डिंगला आणि कार्यक्रम करताना झाला.

माझे कार्यक्रम ‘नवीन पोपट’ येण्याआधीपासूनच सुरू झाले होते. अनेक ठिकाणी माझे स्टेज शो व्हायचे. या कार्यक्रमांमध्ये मी दादांची गाणी गायचो. एका कार्यक्रमात मी दादांचं ‘उड जायेगा एक दिन पंछी, रहेगा पिंजडा खाली’ हे गाणं गायलं. त्यावेळी दादा स्वत: त्या कार्यक्रमाला हजर होते. माझं गाणं ऐकून दादा खुश झाले. त्या आधी ते माझ्या गाण्यावर कधीही खुश झाले नव्हते. मी गाण्यात पुढे काही चांगलं करेन का, याबद्दल ते साशंक होते. मात्र त्यांचं प्रसिद्ध हिंदी गाणं मी त्यांच्याच समोर त्यांच्या मनाप्रमाणे गायल्याने माझी गायकी त्यांच्या मनात भरली होती. त्यानंतर ते बोलताना ‘आनंद माझा वारसा चालवेल, आता मला या क्षणी मरण आले तरी चालेल’ असे सांगायचे. दादांचं हे कौतुक ऐकून मीही भारावून गेलो. दादांना आपलं गाणं आवडलं हे मला कळल्यावर अपार आनंद झाला होता. त्यासाठी मी केलेली तयारी आणि अभ्यास सत्कारणी लागला होता.

माझ्या कार्यक्रमांमध्ये हिंदी गाण्यांचा समावेश सुरू झाला होता. कधी दादांची तर कधी स्वतःची हिंदीतील गाणी मी गात होतो. मात्र प्रसिद्धी काही मिळत नव्हती. शेवटी तो दिवस आलाच. माझं हिंदी गाणं प्रचंड प्रसिद्ध झालं. या गाण्यालादेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद होता. कारण हे बाबासाहेबांवरील हिंदी गीत होतं. ‘मैं भीम का दिवाना हूॅं’ असे त्या गीताचे बोल होते. कव्वाली प्रकारातील हे गाणं लोकांकडून उचलून धरलं गेलं. प्रत्येक भीम जयंतीमध्ये ते गाणं वाजू लागलं. फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांतदेखील या गाण्याची फर्माईश होते. केवळ भीम जयंतीमध्येच नाही तर इतरही कार्यक्रमांमध्ये हे गाणं प्रेक्षकांच्या आग्रहास्तव गावं लागतं.

मी अनेक गाण्यांच्या चाली बांधायचो. त्यातील काही गाण्यांवर हिंदी शब्दरचना करून गाणी बनवायचो. कधी-कधी माझ्या गीतकारांना मी माझ्या चालींवर हिंदी गाणी लिहायला सांगायचो. त्यातून अनेक हिंदी गाणी तयार झाली. माझ्या हिंदी कार्यक्रमांची सुरुवात ही नागपुरातून झाली. विदर्भात मोठा हिंदी बोलणारा प्रेक्षक असल्याने तिथे हिंदी कार्यक्रमांना खूप प्रतिसाद मिळतो. त्यातूनच हिंदी कार्यक्रमांना सुरुवात झाली. ‘अरे सागरा’ हे प्रसिद्ध गीत ‘सलाम’ गीत म्हणून हिंदीमध्ये केलं. माझी अनेक वंदन गीते हिंदीमध्ये केली. मी आणि दादा चाली तर बांधायचो; मात्र माझ्याकडे जे मराठी गीतकार होते त्यांच्याकडूनच मी बहुतांश हिंदी गाणी लिहून घेतली आहेत, हे विशेष.

बऱ्याचदा मागे वळून बघताना मला जुने दिवस आठवतात. खरं तर दादा हे दगडी चाळीसारख्या मुस्लिम वस्तीमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांच्यावर हिंदी-ऊर्दूचा प्रभाव पडला नसता तरच नवल. दादांनी खूप आधीपासून हिंदी गीतांचा कार्यक्रम सुरू केला होता. मीही लहानपणापासून त्यांचे कार्यक्रम ऐकत आलो आहे. त्यांचा हिंदी गीतांचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यामुळे आपल्यालाही दर्जेदार हिंदी यायला हवं, असं मला वाटायचं. १०० टक्के नको, पण निदान १० टक्के तरी आपण हिंदी गाणं चांगलं गावं असा माझा प्रयत्न असायचा. त्यासाठीच मी मनापासून मराठीशिवाय इतर भाषांचाही अभ्यास केला.

मी महाराष्ट्राबाहेरदेखील अनेक कार्यक्रम केले. ‘मै भीम का दिवाना हूॅं’, ‘तुम्हारी कसम, मै शराबी न होता’, ‘भीमजी के गांव मे’, ‘जयभीमवाला है, आगे आगे बढ जायेगा’ अशी अनेक हिंदी गीतं प्रसिद्ध झाली. लक्ष्मण राजगुरू, दिलराज पवार, बोदडे अशा मराठी गीतकारांनी हिंदी गीतं लिहिली. माझ्या ‘मै भीम का दिवाना हूॅं’ या गाण्याच्या सुरुवातीला जो ‘याद करो बीते दिनो की’ हा शेर आहे, तो विलास घोगरे यांचा आहे. त्यांनीच माझ्यासाठी ‘ममैवाले के लागून नादी’ हे गीतदेखील लिहिलं.

मी हिंदीमध्ये कव्वाली, जलसे, गीते गायली आहेत. अनेक कार्यक्रमही केले आहेत. हिंदी शिकण्याचा फायदा मला ‘उत्तर’ भाषेतील गाणी गायलादेखील झाला. भोजपुरी, पंजाबी, गुजराती अनेक भाषांमध्ये मी गाणी गायली आहेत. मी अगदी दिल्ली, भोपाळ, इंदोर आदी ठिकाणीदेखील कार्यक्रम केले आहेत. सोलवा सावन, भीम का पैगाम, भीमजी की सेना, हट के लेगा दुकान, इक तीर दो निशान, भीम का नाम लिये जा, बुद्ध की राह पर, भीमजी के गाव मे, आयो रे नंदलाल... असे अनेक हिंदी अल्बम माझे आले आहेत. हिंदी ही प्रभावी भाषा आहे. ती थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडते. शेर तर कार्यक्रमांना अधिक रंगतदार बनवतात. त्यामुळे मराठी कार्यक्रमांमध्येदेखील मी हिंदी शेर म्हणतो. अनेक कार्यक्रमांमध्ये मला प्रेक्षकांच्या आग्रहास्तव दोन तरी हिंदी गाणी गावी लागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरदेखील मी बरीच हिंदी गाणी केली आहेत. त्यांच्यावर तीन तासांचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रमदेखील होऊ शकतो. असा कार्यक्रम करण्याची माझी मनापासूनची इच्छा आहे.

Web Title: Anand Shinde Hindi Song Main Bhim Ka Deewana Hoon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top