प्राचीन अयोध्या आणि आध्यात्मिक वारसा

विविध परंपरांचे विचारवैविध्य भारतातील इतर अनेक पवित्र ठिकाणांप्रमाणेच अयोध्येनेही जपलेले आहे. अयोध्येला मोठा भावात्म वारसा आहे. तो क्वचितच अन्य शहराला लाभलेला आहे. प्राचीन आणि आध्यात्मिक परंपरा असलेल्या या शहरात ग्रामीण रूप दाखवणारे पुरावे आढळून येतात.
ayodhya
ayodhyasakal media
Summary

-डॉ. श्रीनन्द लक्ष्मण बापट

विविध परंपरांचे विचारवैविध्य भारतातील इतर अनेक पवित्र ठिकाणांप्रमाणेच अयोध्येनेही जपलेले आहे. अयोध्येला मोठा भावात्म वारसा आहे. तो क्वचितच अन्य शहराला लाभलेला आहे. प्राचीन आणि आध्यात्मिक परंपरा असलेल्या या शहरात ग्रामीण रूप दाखवणारे पुरावे आढळून येतात.

Summary

अष्टचक्रा नवद्वारा देवानां पूरयोध्या।

तस्यां हिरण्ययः कोशः स्वर्गो लोको ज्योतिषावृतः॥ अथर्ववेद १०.२.३१

(आठ वर्तुळांमध्ये वसलेली आणि नऊ द्वारे असलेली ही अयोध्या नगरी. तिचा सोन्याचा खजिना हा जणू तेजस्वी स्वर्गच होय.) हा अयोध्येचा सर्वांत पहिला ग्रांथिक उल्लेख आहे. यजुर्वेदाच्या तैत्तिरीय आरण्यकातही हा संदर्भ येतो. अथर्ववेदाच्या काळापासून गेली सुमारे तीन हजार वर्षे अयोध्या हे नाव इतिहासात सतत झळकत राहिलेले आहे. अनेक योजने लांबरुंद असणारा तिचा व्याप, तिथले राजमार्ग, उद्याने, टुमदार घरे यांचे सविस्तर वर्णन रामायणामध्ये आणि त्याच्या अनुषंगाने रामकथेवर आधारलेल्या इतर वाङ्‌मयामध्ये येते. ‘जिच्याबरोबर युद्ध करणे शक्य नाही आणि योग्यही नाही अशी नगरी’ असा तिच्या नावाचा अर्थ आहे.

अयोध्येचे दुसरे नाव ‘साकेत’ हे प्राधान्याने जैन आणि बौद्ध वाङ्‌मयामध्ये येते. ते नावही तितकेच सार्थ होय. ‘आकेत’ म्हणजे इमारत. आकेतांनी युक्त म्हणजे साकेत अशी या नावाची व्युत्पत्ती होते. काही भाषाशास्त्रज्ञ या नावाचा संबंध ‘केतु’ म्हणजे ध्वज या शब्दाशीही जोडतात. ध्वजांनी युक्त असे ठिकाण, असा त्याचा अर्थ देता येतो. साकेत हे नाव फक्त बौद्ध आणि जैन ग्रंथामध्येच येते अशी काहींची समजूत आहे, ती मात्र खरी नाही. विष्णुपुराणासह अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये साकेत हे नाव आढळते. कालिदासानेही आपल्या रघुवंशामध्ये अयोध्या आणि साकेत ही दोन्ही नावे उपयोगात आणलेली आहेत, असे दिसते. याउलट ‘पउमचरिय’ या जैन रामकथेच्या ग्रंथामध्ये साकेत आणि अयोध्या या दोन नावांबरोबरच ‘विनीया’, ‘कोसलपुरी’, ‘इक्खागभूमि’ (इक्ष्वाकूंची भूमी) अशीही नावे या शहराची म्हणून येतात.

आध्यात्मिक परंपरा

अयोध्या ही ज्या कोसल किंवा कोशल प्रदेशाची राजधानी, तो प्रदेश इक्ष्वाकू लोकांचा. कौशल्य, कसबीपणा हा या प्रदेशाच्या नावातच सामावलेला आहे. उसाचे उत्पादन अगदी प्राचीन काळापासून इथे होत असल्यामुळे ‘इक्षु’ या ऊसवाचक शब्दापासून या प्रदेशाचे नाव प्रचलित झालेले असावे, असे भाषाशास्त्रज्ञ मानतात.

इक्ष्वाकू कुळाच्या वंशपरंपरागत राजधानीत, म्हणजे अयोध्येत, प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. इथूनच तो वनवासाला गेला, वनवास भोगून इथेच परत आला आणि आपला केवळ विश्वस्त म्हणून राज्यकारभार पाहणाऱ्या भरताकडून त्याने राज्याची सूत्रे हाती घेतली, राज्याभिषेक करून घेतला. सीतात्यागाचा दुःखद प्रसंग घडला तो इथेच. लक्ष्मणासह रामाने शरयू नदीच्या प्रवाहात आत्मत्याग केला तोही अयोध्येतच, असे या नगरीचे भावपूर्ण दर्शन आपल्याला रामकथेमध्ये घडते. इतका मोठा भावात्म वारसा क्वचितच दुसऱ्या एखाद्या शहराला लाभलेला असेल.

पुरातत्त्वीय पुरावे

बौद्ध ग्रंथांमधील तपशील काहीसे निराळे आहेत. त्यानुसार प्रसेनजित् राजाच्या आज्ञेने धनंजय नावाच्या व्यापाऱ्याने साकेत हे शहर वसवले होते, असा उल्लेख धम्मपद-अट्ठकथांमध्ये येतो. व्यापार-उदीम आणि धर्मपरंपरा या दोन्ही दृष्टींनी महत्त्वाच्या असणाऱ्या श्रावस्ती या नगरापासून साकेत जवळच होते. तेही व्यापाराचे केंद्र होते. शाक्यमुनी बुद्धांचा निवास या शहरात घडलेला होता. त्यामुळे या पवित्र वारशाच्या दर्शनाकरिता चिनी प्रवासी फाहिएन आणि युवान श्वांग हे इसवीसनाच्या अनुक्रमे पाचव्या आणि सातव्या शतकांमध्ये इथे येऊन गेलेले आहेत आणि तिथल्या बौद्ध मठांचे वर्णन त्यांनी केलेले आहे. जैन परंपरेनेही अयोध्या ही नगरी पवित्र मानलेली आहे. भगवान ऋषभदेव (आदिनाथ) यांच्यासह अजितनाथ, अभिनंदनाथ, सुमतिनाथ, आणि अनंतनाथ अशा एकूण पाच तीर्थंकरांचा जन्म इथे झाला असे जैन परंपरा सांगते. भगवान आदिनाथांचे अत्यंत भव्य मंदिर

अयोध्येमध्ये इसवीसनाच्या बाराव्या शतकापर्यंत होते.

अयोध्येच्या परिसरामधील पुरातत्त्वीय पुरावाही लक्षणीय आहे. तिथले पुरातत्त्वीय अवशेष सुमारे पंचवीस चौरस किलोमीटर इतक्या परिसरात विखुरलेले आहेत. त्या थरांची उंची भोवतालच्या परिसरापासून सुमारे दहा मीटर आहे. एखाद्या ठिकाणी मानवी वस्ती काही सहस्रके सलग असल्याशिवाय एवढा थर तयार होत नाही. अयोध्येमध्ये अनेक ठिकाणी उत्खनने झालेली आहेत, आणि आताही होत आहेत. इसवीसनापूर्वी सुमारे १५०० वर्षे जुन्या असणाऱ्या राखाडी रंगाच्या मातीच्या भांड्यांचे (Painted Grey Ware) अवशेष इथे मिळालेले आहेत. कुडाच्या भिंती असणाऱ्या घरांच्या लहानशा वस्तीची शहरीकरणाकडे होणारी वाटचाल या काळात दिसून येते. तांब्याबरोबरच लोखंडाचा उपयोग सुरू झाल्याचे आढळते. त्यानंतरचा उत्तरी झिलईयुक्त काळ्या भांड्यांच्या वापराचा काळ (Northern Black-polished Ware Culture) हा इथला वैभवाचा प्रारंभ ठरतो.

या काळात, म्हणजे इसवीसनापूर्वीच्या सातव्या शतकापासून इसवीसनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत पशुपालन, शेती, उद्योगधंदे, व्यापार अशा चहू अंगांनी या ठिकाणाचा विकास झाल्याचे दिसते. पक्क्या भाजलेल्या विटांची घरे, आखीव रस्ते यांनी युक्त असलेली कोसल महाजनपदाची राजधानी असे अयोध्येचे अथवा साकेताचे स्वरूप या काळात होते. मातीच्या मूर्ती आणि खेळणी, विविध प्रकारचे मणी, महिलांच्या प्रसाधनाची साधने, बांगड्या, काचेच्या वस्तू असा या काळातील वस्तूंचा पुरावा दिसतो. शुंग घराण्याशी नाते सांगणाऱ्या ‘धन...’ (धनमित्र, धनदेव असा कोणी) याचा इसवीसनापूर्वीच्या पहिल्या शतकातील शिलालेख सांगतो की फल्गुदेव नावाच्या व्यक्तीचे स्मारक इथे उभारले गेलेले होते. गुप्त घराण्याच्या कारकीर्दीच्या शेवटानंतर, म्हणजे इसवीसनाच्या पाचव्या शतकापासून ते सुमारे दहाव्या शतकापर्यंत पुन्हा एकदा अयोध्येचे ग्रामीण रूप दाखवणारे पुरावे आढळून येतात. त्यानंतर मात्र आजपर्यंत या ठिकाणाने आपले नागरी स्वरूप जतन केलेले आहे. १९६९पासून आजपर्यंत हे पुरातत्त्वीय शोधाचे काम सुरूच राहिलेले आहे.

(लेखक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे निबंधक व अभिरक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com