

Indian warfare techniques
esakal
प्राचीन काळात झालेल्या युद्धांदरम्यान त्या युद्धांवर आधारित श्रृति, स्मृती व लिखित स्वरूपात दस्तऐवजीकरण आपल्या येथे केले गेले. ‘आपली विपुल ग्रंथसंपदा आक्रमकांद्वारे नष्ट करण्यात आली’ असे आपण ऐकतो. ही अथांग ज्ञानसंपदा नष्ट झाल्यामुळेच की काय, आपण आजवर मागे आहोत. अन्यथा आम्ही जगावर राज्य केले असते, असा विचारही मनात येतो. मात्र करोडो ज्ञानवर्धक ग्रंथ नष्ट होऊन देखील जितके काही साहित्य आज शिल्लक आहे, त्याचा विविधांगी अभ्यास केला तर आपण पुनश्च वैभवशाली होऊ शकू. अशाच काही ग्रंथांमधील ‘युद्धतंत्र’ या विषयावर आपल्या पूर्वजांनी किती सखोल अभ्यास केला होता, त्याचा एक आढावा येथे घेऊया.
वैदिक काळापासून आजवर भारतीय युद्धतंत्राचा झालेला विकास थक्क करणारा आहे. पाश्चात्त्य युद्धशास्त्रामध्ये आपल्याला प्रामुख्याने भौतिक विजयांचे उल्लेख आढळतात, मात्र भारतीय युद्धपरंपरा ही धर्माधिष्ठित (धर्म म्हणजे कर्तव्य याअर्थी), नैतिक आणि बहुआयामी स्वरूपाची आहे.
प्राचीन काळी हाताने केली जाणारी लढाई (मुष्टियुद्ध, द्वंद्वयुद्ध) पुढे लांब हाडे, काठ्या व दगडांच्या साहाय्याने होऊ लागली. नंतर काठीच्या टोकाला जड वस्तू बांधून ‘गदा’ बनविली गेली. काठीला टोकदार दगड किंवा हाडे लावून ‘भाला’ बनविला गेला. यांत्रिक शक्तीचे महत्त्व समजल्यावर गोफणीच्या वापराने दगड जास्त वेगाने आणि लांबवर फेकून शत्रूसैन्याचे अधिक नुकसान करता येऊ लागले. धनुष्य-बाणाचा शोध लागल्यावर युद्धतंत्र बदलले. दारूगोळ्याचा शोध लागण्यापूर्वी ‘धनुष्य’ आणि ‘गोफण’ हीच मानवाची सर्वांत शक्तिशाली शस्त्रे होती. वेद काळात आपल्याला युद्धाचे प्रारंभिक स्वरूप पाहायला मिळते. कालवे खणून किंवा पाणी अडवून अचानक शत्रूसैन्यावर पाण्याचा मारा करण्याचे उल्लेख ऋग्वेदात येतात. (ऋग्वेद ७-१८.८). प्राचीन ग्रंथांमध्ये जागोजागी दैवी शक्तीच्या वापराचा उल्लेख येतात. सर्वसामान्यांना माहिती नसलेल्या किंवा अचाट शक्तीला ‘दैवी’ शक्तीचे नाव दिल्याचे सूक्ष्मरित्या पाहिल्यास समजते. सुदास राजाच्या मागावर शत्रू असताना विश्वामित्रांनी आपली ससर्परीविद्या व मंत्रशक्तीच्याद्वारे दुथड्या भरून वाहणाऱ्या विपाश व शुतुद्री नद्यांच्या पलिकडे राजाला ससैन्य पोहोचविले, असा उल्लेख येतो (ऋग्वेद ३-३३.५). नद्यांचा उतार माहिती असल्याने त्याद्वारे विश्वामित्रांनी सुदासराजाला सुखरुप पैलतीरी पोहोचविले असावे.