US Green Card : देश सोडून भारतीय बाहेर का जात आहेत?

दरवर्षी वीस लाखांहून अधिक भारतीय परदेशात स्थलांतरित होत आहेत.
US Green Card Citizenship
US Green Card Citizenshipesakal
Summary

'१९८० च्या दशकात मी सर्व काही सोडून अमेरिकेतून ग्रामीण महाराष्ट्रात परतलो. कारण या देशाशी असलेली बांधिलकी मला परदेशात स्वस्थ बसू देत नव्हती.'

-अनिल राजवंशी

आपल्या सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी वीस लाखांहून अधिक भारतीय परदेशात स्थलांतरित होत आहेत. ही संख्या जगभरात सर्वाधिक आहे. सर्वसामान्य नागरिकच नव्हे, तर देशासाठी ठेवा असलेले भारतीयही (India) देश सोडून परदेशातील नागरिकत्व स्वीकारत आहेत. पर्यावरण, उच्चतम जीवनशैली आणि चांगल्या संधींसाठी देश सोडत असल्याचं या स्थलांतर करणाऱ्यांपैकी काही भारतीयांनी सांगितलं. बहुतांश देशांमध्ये भारतीयांशी भेदभाव केला जातो. पण तरीही भारतीय विद्यार्थी तिथं जाण्यासाठी अक्षरशः जीवाची बाजी लावतात. पण लाखो भारतीयांना देश सोडून जावंसं वाटण्याचं कारण नक्की आहे तरी काय?

भारतीयांनी देश सोडून जाण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या देशाला कमी लेखणं. काही वर्षांपूर्वी, मी जिथं शिकलो त्या आयआयटी कानपूरमध्ये मी एका व्याख्यानासाठी गेलो होतो. त्या वेळी मी विद्यार्थ्यांना विचारलं, की समजा माझ्याकडं तुम्हाला अमेरिकेचे ग्रीन कार्ड (US Green Card Citizenship) देण्याची शक्ती आहे. तर किती जणांना अमेरिकेत स्थायिक व्हायला आवडेल? त्या वेळी दोनशे विद्यार्थ्यांनी भरलेल्या त्या सभागृहातील बहुतांश हात वर झाले होते. तो प्रतिसाद माझ्यासाठी फार वेदनादायी होता. देशातील सर्वांत प्रतिष्ठित अशा आयआयटीमधील हुशार, प्रतिभावान विद्यार्थी देश सोडून जाऊ इच्छित आहे. ते पाहून मी विचारात पडलो, की आपल्याकडे आपल्या देशाची उभारणी करण्यासाठी चांगले नागरिक, चांगले अभियंते राहतील का? यापैकी बहुतांश विद्यार्थी म्हणाले, आम्ही फक्त उच्च शिक्षणासाठी तिकडं जाऊ आणि परत येऊ. परंतु, पूर्वीची आकडेवाडी पाहता असं होणं दुर्मीळ आहे.

US Green Card Citizenship
Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

देश सोडण्यामागं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे देशाविषयी बांधिलकी नसणं. आपलं कुटुंब वगळता या देशात सर्वकाही वाईटच आहे, अशा समजुतीमुळं भारतातून निघून जावंसं वाटतं. पण यात खरंतर चूक या तरुणांची नाही. त्यांना पालक, मित्रमंडळी आणि नातेवाइकांकडून सतत सांगितलं जातं, की इथं थांबून काहीही होणार नाही, परदेशात जाऊन मोठ्या संधींचा विचार केला पाहिजे. जवळपास सर्वच विकसनशील देशांमध्ये हेच होत आहे. स्मार्ट आणि इंटरनेटशी (Internet) मैत्री असलेल्या या तरुणाईलाही भारतातील भ्रष्टाचाराची, सध्याच्या विभाजनवादी आणि ध्रुवीकरण करणाऱ्या राजकारणाची माहिती असते. सध्याचं वातावरण विकासाला पूरक नाही, असं त्यांना वाटतं. खोलवर विचार केला असता, बहुतांश भारतीयांना देशाच्या भविष्याबद्दल विश्वास वाटत नाही, असे चित्र आहे.

माझ्या बहुतांश व्याख्यानांमध्ये मी विद्यार्थ्यांना सांगत असतो, की हो, देशात सध्या अशीच परिस्थिती आहे. पण जर आपण ती सुधारली नाही, तर कोण सुधारणार? देशातील तरुणाई हेच देशाचं भविष्य आहे आणि देशाच्या प्रगतीमध्ये आणि त्याला महान बनवण्यामध्ये तरुणाईची भूमिका महत्त्वाची आहे. तुम्ही कुठंही गेलात, तरी तुम्ही तुमच्यातील भारतीयत्वाला बाहेर काढू शकणार नाही, हेही मी त्यांना सांगतो. ते भारताशी कायमच भावनिकरीत्या जोडलेले राहणार आहेत. मग ते देश सोडून बाहेर जाऊ नयेत, म्हणून देशामध्ये बदल घडवून का आणू नये? संपूर्ण जगातील महत्त्वाचे बदल हे त्या त्या देशातील तरुणांनी घडविले आहेत. ब्रिटिशांविरोधीतील आपल्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीय तरुणांनीच महात्मा गांधीजींच्या चळवळीला ताकद दिली आहे.

US Green Card Citizenship
CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

१९८० च्या दशकात मी सर्व काही सोडून अमेरिकेतून ग्रामीण महाराष्ट्रात परतलो. कारण या देशाशी असलेली बांधिलकी मला परदेशात स्वस्थ बसू देत नव्हती, माझे वडील जगदीश राजवंशी १९४२ च्या भारत छोडो चळवळीमध्ये काम करताना तुरुंगात गेले होते. त्या वेळी ते फक्त २४ वर्षांचे होते आणि चळवळीत काम करणारे त्यांचे इतर बहुतांश मित्रही त्याच वयाचे होते. त्यांची विचारधारा आणि देशासाठी असलेले प्रेम माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले आणि त्यामुळे भारताचा गौरवशाली इतिहास, येथील महान परंपरा, संस्कृतीबद्दल मी माहिती घेतली आणि हे सर्व समजून घेतले. या गोष्टींमुळे मला भारताविषयी ओढ वाटू लागली.

विद्यार्थिदशेत मी आयआयटी कानपूरमध्ये असताना आम्ही देशात घडणाऱ्या विविध घटनांबद्दल चर्चा करायचो. त्या वेळी इंटरनेट आणि सोशल मीडिया नसल्यानं बहुतांश चर्चा या समोरासमोरच व्हायच्या. सध्याच्या काळात लोकांचं फक्त स्वतःकडं लक्ष असतं. त्यामुळं प्रत्येक गोष्ट मला, माझ्यासाठी अशाच प्रमाणांमध्ये मोजली जाते. जेव्हा देशभरात कुठंही मी तरुणाईशी बोलतो, तेव्हा मला हे जाणवतं, की देशात घडणाऱ्या घटना बहुतांश तरुणांच्या खिजगणतीतही नसतात. त्यांचं लक्ष फक्त चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यावरच केंद्रित असतं. त्यामुळं त्यांच्या चर्चाही नोकरी, पॅकेज याच संदर्भात होत असतात.

पण यात फक्त विद्यार्थ्यांची चूक आहे, असं मला वाटत नाही. समाजानं त्यांच्यावर पैसे कमविण्याचा खूप जास्त दबाव टाकलेला आहे. सध्याच्या काळात पैशाहून जास्त महत्त्वाचं काहीच नाही, असं चित्र दिसतं. माणसाची पात्रता तो किंवा ती किती पैसे कमावते, त्यावरून ठरवली जाते. बहुतांश देशांमध्ये अमेरिकी जीवनशैलीचं अनुकरण केलं जातं. त्यामुळं अमेरिकी समाजाची ओळख असलेला हा घटक आता भारतीय समाजातही रुजू लागला आहे. मी अशा काही मोजक्या वक्त्यांपैकी एक आहे, जे देशाबद्दल आणि विद्यार्थी देशात कोणत्या सुधारणा आणू शकतात, त्याबद्दल बोलतात, अशी प्रतिक्रिया मला विद्यार्थ्यांकडून बऱ्याचदा येते. बहुतांश वक्ते फक्त नोकरी आणि कोणत्या नोकरीतून जास्तीत जास्त पैसा कमावता येईल, याबद्दलच बोलत असतात.

मलाही असं वाटतं, की जेव्हा विद्यार्थ्यांजवळ कोणतेही उच्च ध्येय नसतं किंवा प्रेरणा नसते, तेव्हा पैसा कमावणं हेच त्यांचं उच्चतम ध्येय बनतं. समाजमाध्यमं या विचाराला खतपाणी घालतात आणि खूप पैसा मिळवला, म्हणजे यश मिळवलं, असं चित्र निर्माण करतात. त्याचबरोबर भ्रष्टाचारी आणि अतिश्रीमंत जीवनशैलीला आदर्श म्हणून सातत्यानं लोकांच्या पुढं आणतात. आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची इच्छा असणारे अनेक हुशार विद्यार्थी मला भेटतात. त्यांच्याकडं अनेक अडथळ्यांचा सामना करून असामान्य कामगिरी करण्याची क्षमता असते.

US Green Card Citizenship
Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

पण तरीही त्यांना उच्चतम ध्येयासाठी मार्गदर्शन मिळत नाही किंवा त्यांच्याकडून तशी अपेक्षाही कोणी करत नाही. जर त्यांनी ही ध्येये गाठण्यासाठी मेहनत घेतली, तर हे विद्यार्थी नक्कीच ध्येय गाठू शकतात आणि समाधानी राहू शकतात. रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं, असं म्हणतात. तसेच त्यांना त्यांच्या विद्यार्थिदशेमध्ये अधिकाधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले जात नाही, आव्हान दिले जात नाही. याचे कारण म्हणजे बरेचसे शिक्षक आणि प्राध्यापक स्वतःच खोल अभ्यास करत नाहीत. ते त्यांच्या विषयात तज्ज्ञ नाहीत.

काय पावले उचलायला हवीत?

सर्व इयत्तांमध्ये कार्यसंस्कृती, कार्यपद्धती आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं समाजासाठी द्यावयाचं योगदान याविषयी चर्चा व्हायला हवी. अगदी स्वच्छतेसारख्या मूलभूत विषयांपासून हे धडे विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात. विद्यार्थ्यांना भारताच्या परंपरा, कला, तत्त्वज्ञान यांची ओळख करून देणं, आपापल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं, विविध क्षेत्रांतील प्रतिभाशाली व्यक्तींविषयी विद्यार्थ्यांना वाचायला, ऐकायला प्रवृत्त करणे आवश्यक आहे.

एकदा विद्यार्थ्यांना प्रावीण्य मिळवण्याची प्रेरणा मिळाली आणि तशी सवय जडली, तर ते आपले प्रत्येक काम उत्साहानं आणि हिरिरीनं करतील. हा त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग बनेल. प्रावीण्याचा हा छंद एका दिवसात जडणारा नाही. ही सवय अंगीकारण्यासाठी अनेक वर्षे लागणार आहेत. पण भारत देशाला महान बनविण्यासाठी घेतलेले हे प्रयत्न एक दिवस नक्कीच फळाला येतील.

(लेखक फलटण येथील ‘निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’चे संचालक आहेत.)

(अनुवाद : वैष्णवी कारंजकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com