esakal | अवतरणार्थ : आधुनिक महात्म्याचे गुणसंकीर्तन
sakal

बोलून बातमी शोधा

Anna Hazare

अवतरणार्थ : आधुनिक महात्म्याचे गुणसंकीर्तन

sakal_logo
By
राहुल गडपाले

अवतरणार्थ : आधुनिक महात्म्याचे गुणसंकीर्तन

विशिष्ट राजनैतिक आणि अधिकारीक प्रश्नांबाबत बोलताना अण्णा सावध भूमिका घेतात आणि मंदिर बचाव कृती समितीच्या दबावाला बळी पडतात. म्हणूनच संस्कारक्षम विचारांचा पाठीराखा मंदिरांची भाषा करायला लागतो तेव्हा महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भावना उचंबळून येते आणि सत्त्वशील अण्णांवर आरोपांच्या फैरी सुरू होतात. मुळात मंदिर बचाव की मंदिरांपासून भक्तांना बचाव, अशीच काहीशी आजची परिस्थिती आहे. मंदिरं कॉर्पोरेट कमाईची केंद्रं झाली आहेत आणि भक्त त्यांचे ग्राहक. बडव्यांनी आज देवालाही कंपन्यांच्या डायरेक्टर बॉडीवर बसवले आहे. आता फक्त देवाच्या नावाचा आयपीओ काढून त्याला शेअर बाजारातल्या उंचीवर न्यायचे बाकी आहे. तेथे देव उंचीवर जाईलही; पण देवत्वाच्या सात्त्विकतेचे काय, हा खरा सवाल आहे.

म्ही कधी विवेकाचा पुतळा पाहिलाय का? त्यागमूर्ती, ध्येयवादी, परंपरावादी, एकनिष्ठ, सचेत आणि सजीवन असा विवेकाचा पुतळा. ज्या विवेकाला गवसणी घालण्यासाठी भल्याभल्यांना जंग जंग पछाडावे लागले; अगदी महात्मा गांधींसारख्या अख्ख्या जगाला पूजनीय असलेल्या महात्म्यालादेखील सत्याचे प्रयोग करावे लागले. तो विवेक कुणालाही सहज गवसेल असे वाटत नाही. गांधीवाद जोपासत, गांधींच्या विचारप्रवाहात बुडून संपूर्ण जीवन गांधी विचारांना समर्पित करणारे अनेक आहेत; पण म्हणून त्यांना गांधी भेटले किंवा गांधी समजले असे होत नाही. कारण बरेचजण गांधी समजून घेताना त्यांच्याकडे चरित्र किंवा एक महनीय व्यक्ती म्हणून पाहतात. मुळात गांधी हा एक विचार म्हणून समजून घेण्याची गोष्ट आहे आणि तिथेच नेमकी चूक होते.

महाराष्ट्रात सत्याधिष्ठित मूल्यांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या अण्णा हजारेंवर असाच गांधी विचारांचा पगडा आहे. अण्णांनी अनेक आंदोलने केली. अनेक प्रश्नांना वाचा फोडली. त्यांनी मांडलेल्या प्रश्नांमुळे भ्रष्टाचारासारख्या समस्येवर सर्वसामान्य माणूस बोलायला आणि विचार करायला लागला; पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एकच असू शकत नाही. शिवाय, बदलत्या काळासोबत व्यक्त होण्याच्या आणि विचारग्रहांच्या चक्रांनाही उलटा प्रवास करावा लागतो, याचा अण्णा विचार करताना दिसत नाहीत. विशेषतः गांधींच्या प्रेरणेतून परिचित झालेल्या सत्याग्रहाच्या शास्त्राला तर बदलांचा नियम लागतोच लागतो. सत्याग्रहाचे शास्त्र हे सदैव विकसित करावे लागेल आणि ‘गांधी’ हा शब्द त्याला मर्यादेत अडकवून ठेवू शकतो, असे खुद्द विनोबा सांगतात. आपण त्यापुढे कोण?

कुठल्याही प्रश्नावर उपोषणाचे हत्यार उगारणाऱ्या अण्णांनी मंदिर उघडण्यासाठी सत्याग्रह करण्याची भाषा केली. त्यामुळे साहजिकच त्यांच्या हेतूबद्दल शंका व्यक्त केली जाते आहे. विशेष म्हणजे लोकपालसारख्या महत्त्वाच्या मागणीसाठी अण्णांनी देशभरात वातावरण तयार केले, पण त्यानंतर अण्णांनीच त्या प्रश्नाचा हवा तसा पाठपुरावा केल्याचे दिसत नाही. त्यामुळे काही विशिष्ट पक्षांच्या बाजूने आणि काही विशिष्ट लोकांच्या प्रभावाने प्रेरित अण्णांची भूमिका असल्याचा आरोप त्यांच्यावर होतो आहे. कुठल्याही गोष्टीचा लोभ नसलेल्या आणि संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचलेल्या अण्णांसाठी हे निश्चितच क्लेशदायक असेल यात शंका नाही, पण या आरोपांमधून अण्णा निर्दोष सुटलेले नाहीत. बाईज्जत बरी होण्यासाठी त्यांना त्यांच्याच तत्त्वमूल्यांची सत्त्वपरीक्षा द्यावी लागणार आहे.

२०१४ पूर्वी दिल्लीत झालेल्या आंदोलनातील, तेव्हा देशाच्या नजरेत हिरो असलेले चेहरे पाहिले तर लक्षात येते, की कुणी कितीही समाजकारणाच्या गप्पा मारल्या तरी सामाजिक क्रांतीच्या चळवळीचा शेवट हा अखेर राजकारणाच्या मुष्टियुद्धाला पार करून राजनैतिक हव्यासाकडेच जातो. त्या प्रवासातल्या निरनिराळ्या भूमिका निभावण्यासाठी प्रवासातले वाटेकरी निव्वळ तेवढ्यापुरते सोबती असतात. अनोळखीपणे प्रवासात सापडलेला एखादा सहप्रवासी जसा प्रवास सुरू असतो तोपर्यंत आपला असतो. गाडी पुढे निघून गेली, की मागे धूळ उडवते. अण्णांनी लोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने देशभरात धुरळा उडवला; पण धूळच ती, आता पुन्हा खाली बसली आहे आणि त्यासोबतच अण्णादेखील. त्यानंतरही अण्णांनी दिल्लीतल्या जंतर मंतरवर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या आंदोलनाकडे फारसे कुणी फिरकले नाही. अण्णांना त्यातून जे हवे होते ते साधता आले नाही.

लोकपाल आंदोलनादरम्यान अण्णांना देशाचा दुसरा गांधी करण्याचा प्रयत्न केला गेला. डोक्यावर टोप्या लावून घराघरात ‘मी अण्णा’ तयार करण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्या प्रयत्नात खरे अण्णा कुठे तरी दिसेनासे झाले. गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर अण्णांनी घेतलेली भूमिका पाहिली तर अण्णांना तरी खरे अण्णा आता गवसतील असे वाटत नाही. लोकपालच्या मागणीसाठी आणि भ्रष्टाचारमुक्त देशाच्या संकल्पनेसाठी अण्णांना महात्मा बनवण्याचा घाट घातला गेला. देशासाठी काहीही करण्याची तयारी असलेले अण्णा त्या प्रक्रियेचे सर्वांत मोठे व्हिक्टीम ठरले. सत्तेच्या बुभुक्षितपणातून दुसरा गांधी जन्माला घालण्याचा वांझोटा प्रयत्न पुरता फसला. किमान त्यातून तरी अण्णांनी धडा घेणे अपेक्षित होते; मात्र ते परत परत त्याच चुका करताना दिसतात.

विशिष्ट राजनैतिक आणि अधिकारीक प्रश्नांबाबत बोलताना अण्णा सावध भूमिका घेतात आणि मंदिर बचाव कृती समितीच्या दबावाला बळी पडतात. म्हणूनच संस्कारक्षम विचारांचा पाठीराखा मंदिरांची भाषा करायला लागतो तेव्हा महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भावना उचंबळून येते आणि सत्त्वशील अण्णांवर आरोपांच्या फैरी सुरू होतात. मुळात मंदिर बचाव की मंदिरांपासून भक्तांना बचाव, अशीच काहीशी आजची परिस्थिती आहे. मंदिरं कॉर्पोरेट कमाईची केंद्रं झाली आहेत आणि भक्त त्यांचे ग्राहक. बडव्यांनी आज देवालाही कंपन्यांच्या डायरेक्टर बॉडीवर बसवले आहे. आता फक्त देवाच्या नावाचा आयपीओ काढून त्याला शेअर बाजारातल्या उंचीवर न्यायचे बाकी आहे.

तेथे देव उंचीवर जाईलही; पण देवत्वाच्या सात्त्विकतेचे काय, हा खरा सवाल आहे. अण्णांनी मंदिरांऐवजी शाळांच्या प्रश्नांवर मत व्यक्त केले असते तर बरे झाले असते. सुरुवातीला मंदिरांची भूमिका घेताना त्यांनी शाळा सुरू करण्याची गरज नाही, अशी भूमिका घेतल्याचा खोटा आणि चुकीचा प्रचार करण्यात आला. अशा चुकांना क्षमा नसते आणि नसावी; पण आता वाटतं की नाही, अण्णा तुम्ही शिक्षणाबाबत बोललात, नोकऱ्यांबाबत बोललात, उद्योगांबाबात बोलला असता तरी चालले असते; पण तुमच्या अंतःचक्षूमधून आलेली मंदिरांची ओढ काही पटणारी वाटली नाही. राजकारण्यांना कायम मंदिरांच्या राजकारणात रस असतो. कारण त्यावर सवंग लोकप्रियतेची हमखास गॅरंटी असते; पण अण्णा तुम्हाला कधीपासून लोकप्रियतेची चळ लागली. तुम्ही व्यक्त केलेली मतं ही लोकप्रियतेसाठी नसतील तर उतारवयात तुम्हालाही अध्यात्माची आस लागली असं म्हणायचं का, तसं असेल तर सांगा तरी अण्णा.

महात्मा होणे सोपे नाही. तो एक शब्द चिकटल्याने कित्येक गोष्टी आपल्यापासून दूर जातात. अण्णांनी देशासाठी, समाजासाठी अशा अनेक गोष्टींचा त्याग केला. त्यांच्या साध्या राहणीतून आणि विवेकनिष्ठ विचारांमधून ते सतत त्याची जाणीव करून देतात; पण अण्णांना महात्मा करण्याच्या प्रयत्नात एक भगवा पोशाखधारी साधू मल्टिबिलेनियर झाला, त्यांचा एक अधिकारी चेला मुख्यमंत्री झाला, एक उपमुख्यमंत्री, एक केंद्रात मंत्री झाला, पोलिस अधिकारी राज्यपाल झाली. भ्रष्टाचाराविरोधात गरळ ओकणारे त्याच प्रवाहात प्रवाही झाले. समाजकारणाची कास सोडून राजकारणाचे व्याही झाले. तुमच्याशिवाय त्यांना ही उद्दिष्टे गाठणे शक्य नव्हते, म्हणूनच त्यांनी तुम्हाला महात्म्याची बादशाही वस्त्रं घातली. पण सर्वसामान्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला होता; त्यांचा विश्‍वासघात झाला त्याचे काय? यात चूक कुणाची?

लेखाच्या सुरुवातीला विवेकाचा पुतळा कुणी पाहिलाय का, असा मुद्दाम उल्लेख केला होता. विवेकशून्य समाजात विवेकनिष्ठ आणि विवेकभ्रष्ट लोकांमधला भेद अधोरेखित करू शकतील अशी माणसे खूप कमी आहेत. अण्णा, तुमच्या कामाच्या प्रेरणेचा पाया विवेकनिष्ठ भासत होता, त्याला तत्त्वशील विचारांची जोड होती. तुमच्या मंदिरांच्या आग्रहाने त्याला तडा गेलाय. विशेष म्हणजे तुम्ही मोठमोठी आंदोलने केली. लोकांना रस्त्यावर आणले तर मी नक्की येईन असे तुम्ही सांगता. संतांच्या विचारांना मंदिरांशी जोडता. आपल्या देशात मंदिरांसाठी लोक येतीलही रस्त्यावर, त्यातून लोकपाल आंदोलनानंतर तयार झाले तसे आणखी वीर तयार होतील; पण अण्णा तुमचं काय? अण्णांनी आता खरे तर उपोषण आणि सत्याग्रहाची भाषादेखील बदलायला हवी. कारण त्यातून काहीच साध्य होत नाही हे सिद्ध झालंय. त्यामुळे सत्याग्रहाच्या खऱ्या अर्थावर चर्चा करण्यासोबतच खुजे महात्मे तयार करणारे कारखानेदेखील नेस्तनाबूत करावे लागतील.

सत्याग्रह म्हणजे सत्यासाठी आग्रही असणे. सत्याची ग्वाही देणे आणि असत्यातून होणारा अन्याय दूर करणे. उपवास करणे किंवा लाठ्याकाठ्यांचा मार सहन करणे म्हणजे सत्याग्रह नाही, तर असहकार, कायदेशीर लढाई, जाणीव आणि जागृतीतून होणारी कृती म्हणजे सत्याग्रह. हे सत्य केवळ आपल्यापुरते नाही तर सर्वसमावेशक असावे लागते. ज्या विरोधी शक्तींकडून आपण सत्याचा आग्रह करीत असता, त्याचेही सत्य आधी ग्रहण करावे लागते. पवनार आश्रमात १९७६ मध्ये झालेल्या एका प्रश्नोत्तरात खुद्द विनोबांनी याचा दाखला दिला होता. प्रथम सत्याग्रही बना आणि नंतर सत्याग्रह करा. समोरच्या पक्षात जेवढे सत्य आहे ते आधी ग्रहण करता आले पाहिजे; तेव्हाच सत्याग्रहाला अर्थ असतो. विशेष म्हणजे वेळेसोबत सत्याग्रहाचे शास्त्र हे सतत विकसित व्हायला हवे.

महाराष्ट्राची संत परंपरा तर कधीच मंदिरांमधून चालली नाही. त्या परंपरेत माणसातल्या देवाला देवत्व प्राप्त करून दिले जाते. त्यातून सात्विक माणसे तयार केली जातात. मंदिरांबाबतची तुमची भूमिका सत्याची मानली तर लोकांच्या काळजीपोटी घेतलेली सरकारची भूमिकादेखील सत्याची असू शकते. एकाचे सत्य दुसऱ्याच्या सत्यासमोर खुलेपणाने ठेवून चर्चा करायची असेल तर नीती-अनीतीच्या मापदंडाचा न्यायिक पसारा मांडावा लागेल. आजच्या घडीला त्यासाठी सत्याग्रहाचे आणि उपोषणाचे हत्यार उपयोगी पडणार नाही. मुळात अहिंसेचा प्रचार करणाऱ्यांना आधी सत्याग्रह किंवा उपोषण हे हत्यार मानायचे की साधन, यावर त्यांची अहिंसेवरची निष्ठा ठरते.

सत्याग्रह आणि त्याचे प्रयोग-प्रयोजन कुणाच्याही सत्ताकारणासाठी असू नये. समाजहिताच्या दृष्टीने ते मानवी कल्याणाच्या मार्गाने जाणारे असावे. शाळा बंद ठेवण्याचा आग्रह आणि मंदिरं उघडण्यासाठी मात्र सत्याग्रह, हा आग्रह आणि सत्याग्रह आपल्याला कुठे घेऊन चालला, याचे उत्तर शोधण्याची गरज आहे.

rahulgadpale@gmail.com

loading image
go to top