अण्णांची सावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 अशोक सब्बन

अण्णांची सावली

अण्णा हजारे यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते आले आणि गेले. त्यांत नामवंत व्यक्ती होत्या. राळेगण ते दिल्ली या प्रवासात हजारे यांचे सहकारीही बदलत गेले; पण हजारे यांच्याबरोबर गेली ३२ वर्षं निष्ठेनं टिकलेला समर्पित कार्यकर्ता आहे अशोक सब्बन. कुणी त्याला ‘अण्णांची सावली’ म्हणतं, तर कुणी ‘अण्णांचा एकनिष्ठ हनुमान.’ हजारे यांच्या उपोषणकाळात नवे कार्यकर्ते समोर येऊन बाईट देत असताना अशोक सब्बन (९४२२०८३२०६) हे मांडवाबाहेर कुठल्या तरी कामात गढलेले असतात.

सब्बन हे नगर शहरातील कष्टकरी तेलगू पद्मसाळी समूहातील. अविवाहित असलेले सब्बन गेली ३२ वर्षं हजारे यांच्याबरोबर काम करत आहेत. महाविद्यालयात असताना त्यांनी राळेगणसिद्धीला भेट दिली. तिथली कामं बघून ते भारावून गेले व हजारे यांच्याबरोबर काम सुरू झालं.

ग्रामविकासाची कामं करत असताना सामाजिक वनीकरण विभागातील भ्रष्टाचार हजारे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यासंदर्भात खूप पत्रव्यवहार केला...‘पद्मश्री’ किताब परत केला...शेवटी, आळंदीत उपोषणही झालं...त्यातून १७ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. तेव्हा ३५०० संस्थांनी हजारे यांना पाठिंबा दिला व हजारो पत्रं आली. या सर्वांना निमंत्रित करून हजारे यांनी ‘भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन’ स्थापन केलं. सब्बन हे या आंदोलनाचे राज्य सरचिटणीस आहेत.

सब्बन यांनी महाराष्ट्रभर फिरून जिल्हा-तालुका स्तरावर संघटनेची बांधणी केली. ३२५ समित्या स्थापन केल्या. याच काळात भ्रष्टाचाराच्या हजारो तक्रारी राळेगणला आल्या. सब्बन यांनी त्यांचं वर्गीकरण केलं, त्यासाठी वकिलांच्या मीटिंग घेतल्या. नंतरही रोज किमान २०० तक्रारी येत. त्यांवर मार्ग म्हणून कार्यकर्त्यांनाच सक्षम करण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला. कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या विषयावर शिबिरं आयोजिली. शासनाच्या विविध विभागांची रचना, योजना यांची माहिती कार्यकर्त्यांना झाली. तक्रारी कशा कराव्यात, याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. महसूल विभाग अनेक प्रकारचे परवाने देतो. त्याची तपशीलवार माहिती कार्यकर्त्यांना शिबिरांद्वारे देण्यात आली. त्यातून कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीनं विविध प्रकारचा भ्रष्टाचार शोधून संघर्ष करू लागले. त्यातून प्रत्येक जिल्ह्यात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकश्या सुरू झाल्या. कार्यकर्त्यांनी त्या त्या जिल्ह्यांत विविध आंदोलनं केली.

ग्रामीण भागांतील कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवणं, विविध तक्रारी आल्यावर त्या कशा हाताळाव्यात याविषयी मार्गदर्शन करणं, राज्यभर फिरून संघटनेला बळकटी आणणं ही कामं सब्बन यांनी केली.

हजारे यांचं राजकीय नेत्यांविरुद्ध आंदोलन झालं की त्याकडे राज्याचं लक्ष जात असतं; पण त्यासाठीची पाठीमागची ही बांधणी सब्बन हे सलग ३२ वर्षं करत आहेत.

आज मोबाईलमुळे संघटना बांधणं सोपं झालं आहे; पण त्या काळात मोबाईल तर नव्हताच; पण लॅंडलाइन फोन नसलेलेही गरीब कार्यकर्ते होते. अशा परिस्थितीत पोस्टकार्ड हेच माध्यम होतं व सब्बन यांनी ते प्रभावीपणे वापरलं. हजारो पोस्टकार्डं लिहिली. पत्रांतून मार्गदर्शन करत कार्यकर्ते जोडले.

‘मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडणारी आंदोलनं’ अशी हजारे यांच्या आंदोलनांची प्रतिमा आहे; पण या संघटनेनं पाठपुरावा करून अनेक प्रशासकीय सुधारणाही घडवून आणल्या आहेत हे फारसं माहीत नसतं. ग्रामसभा सक्षम करणं, बदल्यांचा कायदा, दफ्तरदिरंगाईचा कायदा, वाळूउपसा, जलसंधारण, एखाद्या गावात दारूचं दुकान बंद करण्याचे कायदे ठरवणं, दारूतून जमलेल्या महसुलातून व्यसनमुक्तीसाठी निधी देण्याचा आग्रह, दारूदुकानांसाठी लोकसंख्येची अट घालणं, नागरिकांची सनद...अशा अनेकविध विषयांवरील कायदे करण्यासाठी हजारे यांच्या पाठीशी सब्बन व इतर कार्यकर्त्यांनी ताकद उभी केली. त्यातून महाराष्ट्रात अनेक कायदे करायला सरकारला भाग पाडलं.

या आंदोलनाच्या पाठपुराव्यानं तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर दारूबंदी समिती, भ्रष्टाचारविरोधी समिती, तसंच रेशनिंग दक्षता समित्या स्थापन झाल्या व त्या प्रत्येकीत या समितीचा सदस्य घेण्याची तरतूद करण्यात आली. यातून कार्यकर्ते थेट प्रशासनाला जाब विचारू लागले. कार्यकर्त्यांना प्रशासनात सन्मान मिळाला. त्यांची दखल घेतली जाऊ लागली. खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांचं केलेलं सक्षमीकरण हे हजारे यांच्या या आंदोलनाचं मोठं यश आहे.

रेशनिंग विभागाच्या एका समितीवर अशासकीय सदस्य म्हणून सब्बन यांनी काम केलं. राज्यभर रेशन न मिळण्याचा विषय त्यांनी तिथं काम करताना लावून धरला. त्यातही स्वस्त धान्याचा ठरवून दिलेला लभ्यांश असल्यानं दारिद्र्यरेषेखाली नसलेल्यांना दोन रुपये किलोचं धान्य मिळत नव्हतं; पण या वर्गापलीकडील कष्टकरी वर्गाला स्वस्तातील धान्य मिळावं यासाठी त्यांनी शासनाला निर्णय घ्यायला भाग पाडलं व तसा आदेश काढायला लावला. हे त्यांचं खूप महत्त्वाचं योगदान ठरलं.

माहितीचा अधिकार मिळावा म्हणून देशपातळीवर नंतरच्या काळात आंदोलनं झाली; पण १९९७ मध्ये सब्बन यांनी पहिलं आंदोलन नगरला केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी तेव्हा तीन दिवस उपोषण केलं होतं. त्याच्या समारोपाला हजारे, बाबा आढाव, ग. प्र. प्रधान आले होते. त्यानंतर सब्बन यांनी असंख्य आंदोलनं केली.

१५० पेक्षा अधिकाऱ्यांवर कारवाया झाल्या.

न्यायालयाविरुद्ध कुणी आंदोलनं करत नाही; पण सब्बन यांनी न्यायालयातील दिरंगाई, सहकार-न्यायालयं, न्यायालयाच्या सुट्ट्या यांबाबत तीन वेळा उच्च न्यायालयाविरुद्ध आंदोलन केलं व कायदापालन न केलेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात ‘कायदा अवमानना याचिका’ दाखल करता आली पाहिजे असा आग्रह धरला. त्यासाठी देशाच्या ‘लॉ कमिशन’समवेत तीन बैठकाही झाल्या. याबाबत पाठपुरावा अद्यापही सुरू आहे.

जेव्हा हजारे यांना उपोषण करायचं असतं त्याआधी सब्बन राज्यभर दौरा करतात. उपोषणकाळात राज्यभर आंदोलनं होतील याची रचना ते या दौऱ्यादरम्यान करतात.

भ्रष्टाचाराविषयी सब्बन सांगतात : ‘‘भ्रष्टाचार हा चार प्रकारचा असतो. देव-घेव भ्रष्टाचार, विकासकामांतला भ्रष्टाचार, धोरणांतला भ्रष्टाचार आणि सांस्कृतिक-वैचारिक भ्रष्टाचार...पण बहुतेक तक्रारी या

‘देव-घेव भ्रष्टाचारा’च्या असतात. मात्र, आम्ही कार्यकर्त्यांना

विकासकामाची तपासणी करायला शिकवलं. धोरणाचा अभ्यास करायला शिकवलं. त्यातून कार्यकर्ते विकासकामांची आणि धोरणांची उलटतपासणी करू लागले.’’

सब्बन यांनी कार्यकर्त्यांसाठी लिहिलेली पुस्तकं व पुस्तिका महत्त्वाच्या आहेत. ‘रेशनिंग आपल्या हक्काचे’ हे पुस्तक, तसंच माहितीचा अधिकार, ग्रामसभा या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण पुस्तिका लिहिल्या आहेत. हे कदाचित अविश्वसनीय वाटेल; पण रेशनिंगवरील पुस्तकाच्या आतापर्यंत आठ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. विक्रीतून आलेली सर्व रक्कम सब्बन यांनी आंदोलनासाठी वापरली, इतके ते निःस्पृह आहेत.

माहितीच्या अधिकारात अनेक कार्यकर्ते मृत्यूला सामोरे गेले. असंख्य कार्यकर्त्यांना धमक्याही येतात. अशा वेळी कार्यकर्त्यांनी कसं काम कराव, याविषयी सब्बन महत्त्वाच्या सूचना करतात. ते म्हणतात : ‘‘ज्या लोकांसाठी तुम्ही काम करता त्यांना बरोबर घेतलं पाहिजे. लोक जर मोठ्या संख्येनं तुमच्यासमवेत असतील तर तेच तुमचं ‘संरक्षण’ असतं. कुण्या व्यक्तीला लक्ष्य न करता कायद्याची अंमलबजावणी करणं, संबंधित व्यक्तीला अंगावर न घेता पत्रव्यवहार, चौकशी यावर लक्ष देण्यावर भर ठेवला तर समोरच्याची सूडभावना वाढत नाही.’ सब्बन यांच्यावरही वीसहून जास्त गुन्हे दाखल आहेत. कोर्ट-कचेऱ्यांत त्यांचा खूप वेळ व पैसा जातो.

असे हे अशोक सब्बन. अतिशय सामान्य आर्थिक परिस्थितीत जगतात. अविवाहित राहून त्यांनी पूर्ण वेळ आंदोलनाचा संसार केला. हजारे यांच्यावर निष्ठा ठेवून महाराष्ट्राच्या ३२५ तालुक्यांत भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे कार्यकर्ते उभे केले हे त्यांचं मोठं योगदान आहे.

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)