esakal | अकराजणांची ‘युनिकॉर्न’ भरारी

बोलून बातमी शोधा

Ola Electric Company Project
अकराजणांची ‘युनिकॉर्न’ भरारी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एकविसावे शतक हे नवकल्पनांचं युग आहे. त्यावर आधारित बिझनेस आयडिया कोट्यवधी डॉलरच्या कंपन्यांमध्ये रूपांतरित होत आहे. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून स्टार्टअप इकॉनॉमिला बुस्ट मिळाल्याचे चित्र सध्या देशात दिसत आहे. मागील चार महिन्यात तब्बल ११ स्टार्टअप्स हे युनिकॉर्न प्रकारात पोचले आहे. म्हणजे या स्टार्टअपचे एकूण भागभांडवल किंवा उलाढाल ही एक अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे.

अवघ्या काही वर्षांतच भारतीय स्टार्टअप्सच्या सेवा, सुविधा आणि उत्पादने ही जागतिक दर्जाची असल्याचे सिद्ध झाले. अमेरिकेसारख्या विकसित देशांच्‍या तोडीनं भारतीय नवउद्योजक स्वतःला सिद्ध करत आहे. माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ क्षेत्रात भारतीय स्टार्टअप्स वेगवान प्रगती करत आहे.

ग्रोव्ह, फार्मा इजी, क्रेड, मेशो, इन्फ्रा.मार्केट, इनोव्हेकर, डिजीट, फाईव्ह स्टार बिझनेस, शेअरचॅट गपशप, चार्जबी आदी स्टार्टअप्स युनिकॉर्न स्टार्टअप बनले आहेत. २०१५ पूर्वी स्थापन झालेल्या या स्टार्टअप्सनी वेळेआधीच युनिकॉर्न स्टार्टअप्सचा प्रवास पूर्ण केला आहे. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत भारतीय स्टार्टअप इंडस्ट्री २.७ अब्ज डॉलर्सने वाढली आहे. सध्या सातशे खासगी पतपुरवठादारांनी स्टार्टअप्समध्ये ४.५ लाख कोटी गुंतवणूक करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. ही सर्व लक्षणे भारतीय स्टार्टअप इकॉनॉमीच्या यशस्वी घोडदौडीचे द्योतक आहे.

डिजिटलयुगातील सुवर्ण खाण...

देशात ६० कोटीहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आहेत. एक प्रकारे हे देशाचे शक्तिस्थान असून, याच्याशी निगडित डिजिटल स्टार्टअप्ससाठी ही एक सुवर्ण खाणच आहे. कोरोनाकाळातील चायनीज ॲप आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील बंदी, वाढते इंटरनेट वापरकर्ते, ओटीटीसारख्या मनोरंजन माध्यमांचा वाढता वापर आणि गेमींगचे डिजिटल मार्केट डिजिटल स्टार्टअप्ससाठी वेगवेगळ्या सुवर्णसंधी घेऊन येत आहे.

कोविड काळात इ-कॉमर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. घरपोच सेवा देणाऱ्या लॉजिस्टिक इंडस्ट्रीची कार्यक्षमता आणि सुरक्षितता नव्या तंत्रज्ञानामुळे अधिकच वाढली आहे. कोरोनाच्या निमित्ताने त्यातील सकारात्क बाबी समोर आल्या आहेत. कृषिक्षेत्राशी निगडित स्टार्टअप्सने या काळात २४ अब्ज डॉलरची इकोसिस्टम तयार केली आहे. ज्याद्वारे कृषी उत्पादनांची ई-मंडीद्वारे विक्री करणे, शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराला चालना मिळत आहे.

देशात ६.३ कोटी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत. त्यांच्यामध्ये इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. अशा उद्योगांतील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी स्टार्टअप्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. डिजिटल तंत्रज्ञाणि आणि एमएसएमई यांच्यातील दुवा स्टार्टअप्सच्या माध्यमातून प्रस्थापितच होईल. वैद्यकीय क्षेत्रातही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन वेगवान पद्धतीने होत आहे. कोरोनामुळे टेलिमेडिसीन च्या वापरातही वाढ झाली आहे. वित्तीय आणि डिजिटल क्षेत्र एकत्र येऊन ‘फाईनटेक’ क्षेत्रातही स्टार्टअप्ससाठी भरपूर संधी आहे.

इलेक्‍ट्रॉनिक व्हेईकल हे क्षेत्रही दरम्यानच्या काळात विस्तारले आहे. ओला-इलेक्ट्रीक या कंपनीने तर जगातील सर्वात मोठी इ-स्कूटर फॅक्टरी उभी करण्याचा चंग बांधला आहे. ५०० एकराच्या कॅंपसमध्ये १०० कोटी इ-व्हेईकलचे उत्पादन करण्याचा त्यांचा मानस आहे. २०२२ च्या उन्हाळ्यापर्यंत ही फॅक्टरी उभी राहील असा दावा कंपनीने केला आहे. भारतातील चारशे शहरांमध्ये एक लाख ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे कंपनीने नियोजन केले आहे. एकंदरीत काय तर भारतीय स्टार्टअप इको-सिस्टमच्या सुवर्णयुगाची सुरवात झाली आहे आणि जगानेही त्याची दखल घेतली आहे. असंख्य भारतीय नव उद्योजकांसाठी हा रोमांचक काळ आहे. देशातील समस्यांवर भन्नाट उपाय शोधण्याची ही सुवर्णसंधी आहे. अर्थातच यामध्ये विविध गुंतवणूकदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

(लेखक विविध ‘स्टार्टअप्स’ चे मार्गदर्शक आणि मेन्टॉर असून ‘टीआयइ’ च्या पुणे चॅप्टरचे सदस्य आहेत. )

(अनुवाद : सम्राट कदम)