पुनर्विवाह करायचा विचार आहे?; पण तत्पूर्वी 'हे' नक्की वाचा

स्मिता जोशी
रविवार, 30 जून 2019

आयुष्यातील उतार-चढाव मान्य करत जोडीदार, कुटूंब आणि नात्यांसोबत वृध्दींगत होत राहणे, याचे खूप महत्त्व आहे. याची जाण करुन देणारी काही उत्तर तुमच्या समस्यांवर नक्की मिळतील 'समस्यांवर बोलू काही' या सदरात. वाचत राहा 'सकाळ पुणे टुडे'तील 'मोकळे व्हा' पुरवणी.

पुनर्विवाह करावासा वाटत आहे. 
प्रश्‍न : माझा घटस्फोट होऊन दहा वर्षे झालेली आहेत. मला सतरा वर्षांची मुलगी आहे. ती आत्ताच बारावी झाली आहे. ती तिच्या अभ्यासात आणि तिच्या विश्वात दंग असते. मी नोकरी करते. परंतु, सध्या मला खूप एकटे पडल्यासारखे झाले आहे. घटस्फोट घेतल्यानंतर मी माझ्या माहेरी राहिलेली नाही. माझ्या मुलीला घेऊन मी स्वतंत्र घर केले. घटस्फोटाची चर्चा नको म्हणून मी कोणत्याही नातेवाइकांमध्ये जात नाही. माझ्यासोबतच्या सहकारी मैत्रिणी आहेत, मी त्यांच्यामध्ये रमते. परंतु, शेवटी त्यांनाही त्यांचा संसार असतो. घटस्फोट झाल्यानंतर सर्वांनी मला पुनर्विवाहाचा सल्ला दिला होता. मात्र, त्या वेळी मी तो विचार केला नाही. आता मात्र कुणीतरी सोबत असावे, असा विचार मनात येतोय. हे चुकीचे आहे का? मुलगी एवढी मोठी झाल्यानंतर याबाबतचे विचार मनात येणे हा मला एक अपराध वाटतो. मी काय करावे याचे आपण मार्गदर्शन करावे. 
उत्तर : मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्यासोबत कोणीतरी असावे, कोणीतरी आपले सुखदुःख समजून घ्यावे, असे वाटत असते. तुझा घटस्फोट झाला त्या वेळी तुला सगळ्यांनी पुनर्विवाहाचा सल्ला दिला होता. परंतु, मागील काही कटू गोष्टींमुळे तू नकार दर्शविलास. पुन्हा लग्न या विषयात पडायचे नाही, असे ठरवले. मात्र, इतर मैत्रिणींचे साथीदार जेव्हा त्यांच्यासोबत असतात त्यावेळेस तुला कुठेतरी दुःख होते. एकटे पडल्यासारखे वाटते. त्यातूनच माझे सुखदुःख समजून घेणारे कोणीतरी असावे, असे तुला वाटू लागले आहे. यामध्ये चूक काहीच नाही. खरेतर मुले मोठी झाल्यावरच जोडीदाराची सोबत हवी असते. मुलगी मोठी झाली म्हणून तू या गोष्टीचा विचार करू शकत नाही, असे नाही. अजूनही तुला समजून घेणारा, मुलीसह तुझा स्वीकार करणारा कोणी मिळत असल्यास याबाबत विचार करायला काहीच हरकत नाही. कारण, अजूनही आपल्या समाजात पती-पत्नी या नात्याव्यतिरिक्त एकत्र राहणे समाज मान्य करत नाही. तरीही लग्न या गोष्टीचा विचार तुला करायचाच नसेल तर केवळ निखळ मैत्री करणारा तुला शोधावा लागेल. त्यात धोकाही असतो, याचाही विचार करावा लागेल. एकट्या राहणाऱ्या स्त्रीला कळत नकळत अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. तिच्या अगतिकतेचा फायदा घेणारे अनेक लोक असतात. या सर्व गोष्टींचा विचार कर. आपला आनंद आपणच शोधायचा असतो, तो कोणावरही अवलंबून नसतो. स्वतःला अपराधी समजणे सोडून दे. तुझ्या मनात हे विचार येणे यात गैर काहीच नाही. हे नैसर्गिक आहे. फक्त कोणताही मार्ग स्वीकारलास तरी त्यातून येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि बंधन याचाही स्वीकार करावा लागतो, हे लक्षात ठेव. 

पत्नी नांदण्यास तयार नाही. 
प्रश्‍न : माझ्या पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे. लग्न झाल्यानंतर केवळ सहा महिने ती माझ्यासोबत राहिली. कोणतेही कारण नसताना ती माहेरी निघून गेली. आमचे काही विचार पटत नव्हते, पण ते किरकोळ होते. या कारणावरून तिने आपला संसार मोडणे योग्य नाही, हे मी तिला अनेक वेळा समजून सांगितले. अनेक व्यक्तींनी तिला समजावून सांगितले. परंतु, ती कोणाचेही ऐकण्यास तयार नाही. तिने माझ्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायदा, 498 अ, घटस्फोट आणि पोटगी या सर्व केसेस दाखल केल्या आहेत. गेली पाच वर्षे आम्ही विभक्त राहात आहोत. मला तिला घटस्फोट द्यायचाच नाही. काहीही झाले तरी मी तिला सोडणार नाही. नांदायला येण्याबाबतचा माझा अर्ज कोर्टात मंजूर झाला आहे. तरीही ती माझ्यासोबत राहायला येत नाही. तिने परत माझ्यासोबत राहायला यावे यासाठी काय करता येईल? 
उत्तर : पती आणि पत्नीचे एकत्र राहणे हे कोणत्याही कायद्याने शक्‍य नसते. त्यासाठी दोघांचेही विचार जुळणे गरजेचे आहे. दोघांचीही एकमेकांसोबत एकत्र राहण्याची मनापासून तयारी असेल, तरच एकत्र संसार होतो. गेल्या पाच वर्षांपासून तुम्ही पती-पत्नी विभक्त राहत आहात. तुम्ही आणि तुमच्या हितचिंतकांनी अनेक प्रयत्न करूनही ती एकत्र नांदायला येण्यास तयार नाही. तिची मनापासून तुमच्यासोबत राहण्याची इच्छा नाही, हे दिसून येत आहे. जबरदस्तीने कोणताही संसार होणार नाही. न्यायालयामध्ये या सर्व केसेस चालल्या आणि कोणताही निकाल झाला तरीही यातून काहीही साध्य होणार नाही. कोर्टकचेरी चालवण्यापेक्षा हा प्रश्न सामंजस्याने मिटविणे गरजेचे आहे. काहीही झालं तरी मी तिला सोडणार नाही, असे म्हणणे म्हणजे सूडबुद्धीने वागण्यासारखे आहे. कदाचित तुमची कोणतीही चूक नसेल, पण यामध्ये चूक आणि बरोबर कोण हे शोधत बसण्यापेक्षा एका गोष्टीचा स्वीकार करायला हवा की कोणत्याही व्यक्तीला आपण जबरदस्ती करू शकत नाही. तुमच्याकडून तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत; परंतु, तिची खरंच इच्छा नसेल तर तुम्ही जबरदस्ती करू नका आणि कोर्टकचेऱ्याही चालू ठेवू नका. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि वेगवेगळ्या केसेस करण्यापेक्षा सत्याचा स्वीकार करा आणि सद्य परिस्थितीत योग्य तो निर्णय घ्या. आपल्या आयुष्याची अनमोल वर्षे कोर्ट कचेरीत वाया घालवू नका. दुसऱ्याला धडा शिकवत असताना शिक्षा आपल्यालाही होत असते, ही गोष्ट लक्षात घ्या आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. 

आयुष्य संपविण्याचे विचार मनात येतात. 
प्रश्‍न : मी पदवीधर तरुणी आहे. माझी एका तरुणासोबत ओळख झाली. आमच्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने मला लग्नाची मागणी घातली, परंतु लगेच लग्न करणे शक्‍य नाही, असे त्याने सांगितले. मागील दोन वर्षे आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. त्याच्या आई-वडिलांनी त्याचे दुसरीकडे लग्न ठरविले आणि आई-वडिलांच्या इच्छेखातर मी हे लग्न करत आहे, असे त्याने मला कळविले. त्याने माझी फसवणूक केलेली आहे. त्याच्याविरुद्ध मी पोलिस चौकीत गुन्हा दाखल केला आहे. मी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरीही त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न करून तो आनंदाने संसार करत आहे. त्याला आता एक मुलगाही झाला आहे. दोन वर्षांपूर्वी मी पोलिस तक्रार दाखल केली आहे. अजूनही केस सुरू झाली नाही. तो त्याच्या पत्नीसोबत बाहेर दिसला की माझा खूप संताप होतो. त्याला संपवून टाकावे किंवा स्वतःचे आयुष्य संपवावे, असे अतिरेकी विचार मनात येतात. मी काय करावे? 
उत्तर : अनेक मुली अतिशय हळव्या आणि भावनाशील असतात आणि दुसऱ्याच्या गोड बोलण्यावर भाळतात आणि लगेच विश्वास ठेवतात. त्यामुळेच त्यांची फसवणूक होते. तू त्या तरुणावर मनापासून प्रेम केले असले, तरीही त्याने तुझी फसवणूक केली आहे, हे तुझ्या लक्षात आलेले आहे. आता त्याच गोष्टीमध्ये अडकून बसणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक केल्यासारखे आहे. त्या मुलाचे लग्न झाले आणि त्याला मुलगाही झाला आहे. तो आनंदात आहे आणि तू स्वतः मात्र दुःख करत बसली आहेस. ज्याने गुन्हा केला त्याला काहीच शिक्षा नाही, परंतु तू मात्र रोज शिक्षा भोगते आहेस. या सर्व गोष्टी तू स्वतः ओढवून घेतलेल्या आहेस. आता या फसवणुकीतून तुला बाहेर पडायला हवे. तू स्वतःच्या पुढच्या आयुष्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. दुसऱ्याच्या चुकीमुळे आपले आयुष्य आपण का संपवायचे? दुसऱ्याला शिक्षा करण्याने आपले झालेले नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे मनात येणारे नकारात्मक विचार झटकून टाक आणि आपल्या आयुष्यातला आनंद शोधण्याचा प्रयत्न कर. तुला आयुष्यभर साथ देणारा जोडीदार नक्कीच मिळेल. एक अपघात झाला असे समजून कितीही अवघड असले तरी झाल्या गोष्टी विसरून जाण्यातच शहाणपणा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: answers on marital and family problems in sakal today supplement