एका अरण्याची गोष्ट (अनुज खरे)

anuj khare
anuj khare

पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी आणि एक वाघ आणून ती संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले. आर. श्रीनिवास मूर्ती या अधिकाऱ्यानं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आता या प्रकल्पातल्या वाघांची संख्या 35वर गेली आहे. या सगळ्या धडपडीची ही कहाणी.

अखेर "तो' काळा दिवस उजाडला. एका अरण्याच्या भूतलावरचा अखेरचा नर वाघ गायब झाल्याची बातमी आली. हिऱ्यांच्या खाणी असलेल्या "त्या' जंगलातला खरा "हिरा' नाहीसा झाला याचंच दुःख खरं होतं. भारतीय संस्कृतीत पूर्वीच्या प्रत्येक पिढीनं जतन केलेल्या "या' अरण्याच्या ऱ्हासाची सुरवात झाली की काय अशी भीती वाटायला लागली. वाघ नष्ट झाला तर जंगलही नाहीसं होईल आणि जंगल नाहीसं झालं तर वाघही नाश पावतील, असं पुराणांत म्हटलं आहेच. म्हणजेच जंगल वाघांचं आणि पर्यायानं वाघ जंगलाचं रक्षण करतो. अशा स्थितीत या अरण्याचा विनाश दिसायला लागला होता; पण यात ठामपणे उभा राहिला एक अत्यंत चांगला, कर्तव्यदक्ष मनुष्य. त्यानं या जंगलाचं "पानिपत' होऊ दिलं नाही. या "आमूलाग्र' बदलाची कहाणी म्हणजेच "पन्ना' व्याघ्रप्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची यशोगाथा.

ही कहाणी ऐकायला तुम्हाला थोडंसं इतिहासात डोकवावं लागेल. बुंदेलखंडात असलेल्या या भूमीवर पूर्वी खूप घनदाट अरण्य होतं. ही म्हणजे पार बुंदेला राजांच्या वेळची गोष्ट. पाठोपाठ इंग्रज आले आणि या ना त्या कारणानं इथल्या समृद्ध खजिन्याची म्हणजेच तरुलतांची तोड सुरू झाली. झाडांबरोबरच हळूहळू इथले वाघही राजे-महाराजे, इंग्रज यांच्या शौकाची शिकार बनू लागले. पुढं भारत स्वतंत्र झाला; पण हे चित्र काही फार सुखकर झालं नाही. अखेर या जंगलाच्या संवर्धनासाठी सन 1981 मध्ये "पन्ना' राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली. पुढं सन 1994मध्ये जंगलाला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला. ही थोडी आशादायक गोष्ट होती. कारण व्याघ्रप्रकल्पाच्या दर्जामुळं वाघांना आणि पर्यायानं इतर झाडं, पशू-पक्षी यांनाही आपोआप संरक्षण मिळतं. व्याघ्रप्रकल्पाच्या दर्जामुळं माणसाच्या वावरावर बंधन येतात. कडक कायदे लागू होतात आणि मानवी हस्तक्षेप कमी झाला, की आपोआपच जंगलाचं संवर्धन होतं. मात्र, 2009 वर्ष उजाडेपर्यंत इथल्या वास्तव्याला असलेल्या सर्व वाघांचा निःपात झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही जंगलात एकही वाघ शिल्लक नाही, अशी विदारक स्थिती निर्माण झाली.

जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत काही विवेकी, विचारी, अभ्यासक लोकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. सन 2009मध्ये बांधवगड आणि कान्हा या दोन व्याघ्रप्रकल्पांतून दोन वाघिणी पन्ना व्याघ्रप्रकल्पात आणण्यात आल्या. बांधवगडमधून आणलेल्या वाघिणीला नाव देण्यात आलं "T-1' आणि कान्हातून आणलेल्या वाघिणीला "T-2.' मात्र, याच दरम्यान इथल्या धरेवर वावरणारा शेवटचा नर वाघही नाहीसा झाल्यानं या वाघिणी साथीदाराशिवाय इथं टिकतील का, अशी शंका अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आली. मग "पेंच' व्याघ्रप्रकल्पातून "T-3' नावाचा नर वाघ इथं आणण्यात आला. पन्नाचं गतवैभव पुन्हा उभं करण्याच्या या कामी एका अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. त्यांचं नाव आर. श्रीनिवास मूर्ती. या जंगलाच्या विनाशाच्या मध्ये उभा राहिलेला हाच तो अधिकारी. या नवीन तीन "रत्नां'वर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या गळ्यात "रेडियो कॉलर' नावाचं उपकरण बांधण्यात आलं. यातून निघणारे "सिग्नल्स' एका अँटेनाद्वारे मिळवले जातात. यावर 24 तास लक्ष ठेवण्यासाठी आर. श्रीनिवास मूर्तींनी काही कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आणि अखेर एक खडतर "तपश्‍चर्या' सुरू झाली.
T-1 आणि T-2 यांनी पन्नाच्या भूमीचा त्यामानानं लवकर स्वीकार केला. इथं त्या मुक्तपणे वावरू लागल्या. प्रत्येक वाघाची स्वतःची हद्द ठरलेली असते. T-1 आणि T-2 यांनीही आपापल्या हद्दी निश्‍चित केल्या; पण T-3 च्या बाबतीत तसं झालं नाही. "पन्ना' व्याघ्रप्रकल्प ही त्याची जन्मभूमी नव्हती. कर्मभूमी तर त्याहून नव्हती. त्याचा जन्म "पेंच' व्याघ्रप्रकल्पातला. ऐन उमेदीच्या वयात "पेंच'मध्ये स्वतःचा दरारा निर्माण करण्यास सुरवात केलेली असतानाच त्याला पन्नात आणण्यात आलं होतं. त्यामुळं त्याला साहजिकच त्याच्या घराची ओढ होती. याच ओढीनं त्यानं एक दिवस पन्ना व्याघ्रप्रकल्पाचा प्रदेश सोडला. मग सर्वांचाच सुरू झाला एक मॅरेथॉन प्रवास. त्याच्यामागोमाग त्याच्यावर लक्ष ठेवायला नेमलेली टीम त्याचा मागोवा घेत निघाली. घराच्या ओढीनं या नर वाघानं "पेंच'च्या दिशेनं थोडाथोडका नाही, तर तब्बल 442 किलोमीटरचा प्रवास केला. पन्नापासून त्याचं अंतर जसं वाढत गेलं तसं त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. त्याला शेवटी पुन्हा बेशुद्ध करून पन्ना व्याघ्रप्रकल्पात आणण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा त्याच्या तैनातीला तब्बल सत्तर कर्मचारी, चार हत्ती आणि स्वतः मूर्ती स्वतः असा फौजफाटा होता. आता मात्र पुन्हा ही स्थिती निर्माण होऊ नये आणि पुन्हा तो "पन्ना'चं जंगल सोडून जाऊ नये म्हणून T-3 ला या दोन्ही वाघिणींकडं आकृष्ट करण्यासाठी मूर्ती यांनी नामी शक्कल शोधून काढली. त्यांनी T-3 ला सोडायच्या वेळी वाघिणीचं मूत्र आणि पाणी यांच्या मिश्रणाचा ठिकठिकाणी शिडकावा केला. ही युक्ती लागू पडली. T-3 दोन्ही वाघिणींच्या शोधार्थ निघाला. अखेर दोन्ही वाघिणींनी त्याला जोडीदार म्हणून स्वीकारलं आणि सरतेशेवटी मूर्ती आणि त्यांच्या टीमच्या भगीरथ प्रयत्नांना यश आलं.

16 एप्रिल 2010 हा "तो' दिवस. या दिवशी T-1 या वाघिणीनं चार इवल्या पिल्लांना जन्म दिला. यापाठोपाठ T-2 नं ऑक्‍टोबर 2010 मध्ये चार पिल्लांना जन्म दिला. जंगलाच्या नियोजनाचं काम बघणारे सर्व कर्मचारी आणि मूर्ती या भगीरथाच्या वारसदारांनी या जंगलाच्या पुनर्जन्माचा नवा अध्यायच जणू लिहिला होता. तेव्हापासून 16 एप्रिल हा दिवस पन्ना व्याघ्रप्रकल्पाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. 2011 हे वर्ष निसर्गसंवर्धनाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं वर्ष आहे. या वर्षी T-4 या वाघिणीला कान्हामधून पन्ना व्याघ्रप्रकल्पात आणण्यात आलं. या पाच वर्षांच्या वाघिणीची आई तिच्या जन्मानंतर थोड्याच काळात मरण पावली. त्यामुळं ही T-4 आणि तिची अजून दोन भावंडं अनाथ झाली. कान्हा प्रशासनानं चार वर्षं एका मोठ्या बंदिस्त परिसरात ठेऊन त्यांचं पालनपोषण केलं होतं. "पन्ना'मध्ये आणल्यावर अर्थातच रेडिओ कॉलर लावून T-4 वर लक्ष ठेवणं सुरू झालं. या वाघिणीनं या जंगलातल्या एका भागात स्वतःची हद्द स्थापन केली. आईनं न शिकवता शिकार करायला स्वतःहून शिकणारी जगातली पहिली वाघीण असा गौरव तिनं प्राप्त केला. तिच्या पावलावर पाऊल ठेवून T-5 या तिच्या बहिणीला पन्नात आणण्यात आलं. तिनंही थोड्याच कालावधीत बहिणीचा कित्ता गिरवला. 2014 मध्ये T-6 या वाघिणीला "पन्ना'मध्ये आणण्यात आलं.

इथल्या अवनीतली वाढणाऱ्या या वाघांच्या बछड्यांची नावं ठेवण्याची पद्धत मोठी अनोखी आहे. उदाहरण म्हणून आपण T-1 ला झालेल्या बछड्यांना ठेवण्यात आलेली नावं पाहू. या चार पिल्लांना नावं दिली होती ः P111, P112, P113 आणि P114. यातलं "P' म्हणजे पन्ना. 111 मधला पहिला "1' म्हणजे आईचं "T1' हे नाव दर्शवतो. दुसरा "1' म्हणजे म्हणजे पहिल्या वेळेचा बछडा हे दर्शवतो. तिसरा "1' हा चारमधल्या बछड्याचं नाव दर्शवतो. आत्ता T-1 नं पाचव्यांदा बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळं त्यांची नावं ठेवण्यात आली आहेत ः P151 आणि P152. तसंच T-2 च्या बछड्यांना नावं आहेत ः P211, P212. आता तुम्ही म्हणाल, की "पन्ना'त जन्मलेल्या या वाघांना पुढं बछडे झाले, तर त्यांना काय नावं दिली असतील? समजा P111 ला दोन बछडे झाले असतील, तर त्यांना नावं असतील ः P(111)11 आणि P(111)12. इतर व्याघ्रप्रकल्पांपेक्षा अगदी निराळी अशी ही पद्धत आहे. अशा रीतीनं इथल्या भूभागावर पुन्हा नंदनवन फुलायला लागलं. सहाजिकच जंगल वाढण्यात आणि त्यातला समतोल राखून ठेवण्यात मदत झाली.

माझ्या मते वाघांना "सोनम', "माया', "गब्बर', "जय' अशी नावं देणं हे त्या वाघांभोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण करतं. असं करणं एकूणच वाघांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून तारकही आहे आणि तितकच मारकही. जंगलातल्या प्रत्येक वाघाला सारखंच; पण अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या वेगळ्या नावांनी हे वाघ प्रसिद्ध झाले, की त्या भागातलं पर्यटन त्या वाघाभोवती केंद्रित होतं आणि मग काही अतिउत्साही पर्यटकांमुळं या सर्वाचे दुष्परिणाम दिसायला लागतात. पन्ना व्याघ्रप्रकल्पाच्या प्रशासनानं मात्र नावांची आगळीवेगळी पद्धत रूढ केली आणि इथं गाइड म्हणून काम करणाऱ्या लोकांनी प्रत्येक वाघाची ओळख याच नावानं लोकांना करून दिली. प्रशासन आणि गाइड या दोघांनीही हा एक आदर्शच इतर व्याघ्रप्रकल्पांसमोर ठेवला आहे.

या जंगलाच्या संवर्धनाची यशस्वी कथा तुम्हाला सांगितली, आता पन्नाच्या भूभागांची आणि एकूणच वैशिष्ट्यांची माहिती तुम्हाला सांगावीच लागेल. पन्ना व्याघ्रप्रकल्पाचा प्रदेश तीन टापूंमध्ये विभागला आहे. हे तीन टापू त्यांच्या उंचीनुसार कमी ते अधिक असे आहेत. सर्वांत खालचा म्हणजेच कमी उंचीचा टापू आहे "मडला.' त्यापेक्षा उंच टापू म्हणजे "हिनौता' आणि सर्वाधिक उंचीवरचा टापू आहे "पन्ना.' या सर्व भागांवर तुम्हाला मोठी मैदानं, मोठ्या झाडांचा काही प्रदेश असे वैविध्यपूर्ण भाग दिसतील. या झाडांमध्ये सागाच्या झाडांची संख्या अधिक. पन्नाच्या भूभागातून कमनीय वळणं घेत वाहणारी "कर्णावती' ही नदी म्हणजे इथं वास्तव्याला असणाऱ्या अनेक जीवांची जीवनवाहिनी. अत्यंत शुद्ध असणारा तिचा प्रवाह "पन्ना'च्या सौंदर्यात अधिकच भर पाडतो. पन्ना राष्ट्रीय उद्यान, गंगाऊ अभयारण्य आणि केन-घडीयाल अभयारण्य यांच्या एकत्रीकरणातून "पन्ना' व्याघ्रप्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या सर्वांचा मिळून 1,597 चौरस किलोमीटरचा आवाका. यातल्या 576 चौरस किलोमीटर भाग "कोअर' आणि 1021 चौरस किलोमीटर भाग "बफर'मध्ये मोडतो. एकंदरच "पन्ना'चा भूभाग अनेक छोट्या-मोठ्या नद्या, असंख्य छोटे जलप्रवाह, गवताळ भाग, डोंगररांगा आणि नैसर्गिकरित्या बनलेल्या अजस्त्र घळी यांनी बनलेला आहे. इथल्या जैवविविधतेत भर टाकणाऱ्या सात प्रकारच्या गिधाडांच्या वास्तव्याची ठिकाण असलेली "धुंधवा सेहा' ही घळ म्हणजे इथल्या जंगलाच्या उत्पत्तीच्या वेळेस झालेल्या हालचालींचा उत्कृष्ट नमुना आहे. जंगलाच्या आश्रयाला असणारे विविध प्रकारचे पक्षी, सस्तन प्राणी तुम्हाला इथं सापडतील. अनेक प्रकारचे पाणपक्षी, माळरानावरचे पक्षी, शिकारी पक्षी, गिधाडांसारखे जंगलाचे सफाई कामगार असणारं तरस; तसंच बिबट्या, कोल्हा, खोकड, अस्वल, कुरंग वर्गातला प्राणी म्हणजेच चिंकारा, चौशिंगा, नीलगाय आणि सारंग वर्गातला प्राणी म्हणजेच चितळ, सांबर, भेकर हे म्हणजे या जंगलाच्या शिरपेचात खोवलेल्या माळेतले मोतीच जणू.
आज सुमारे 35 वाघ वास्तव्याला असणाऱ्या या जंगलाच्या संवर्धनाची यशस्वी कहाणी विस्तारानं सांगणं गरजेचं होतं. 0 ते 35 हे अंतर गाठणारा हा प्रवास अनेक लोकांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवणारा होता. या व्याघ्रप्रकल्पाच्या या "टिकवल्या' गेलेल्या वैभवावर आणखी एक धोका काळ बनून उभा आहे तो म्हणजे केन-बेतवा नदीजोड प्रकल्प. केन म्हणजेच कर्णावती आणि बेतवा या दोन नद्यांना जोडणाऱ्या या प्रकल्पामुळं संपूर्ण मडला गाव आणि जंगलाचा असंख्य भूभाग पाण्याखाली जाणार आहे. मला खात्री आहे, या धोक्‍याला परतवून लावण्याकरिता पुन्हा एखादा "भगीरथ' उभा राहील आणि जंगलाच्या या सौन्दर्याला अबाधित ठेवण्याचं- किंबहुना ते वाढवण्याचं शिवधनुष्य तो लीलया पेलेल. आपल्याला लाभलेल्या समृद्ध निसर्गाच्या संवर्धनाची जबाबदारी आपली आहे. माणूस हा भूतलावरचा सर्वांत हुशार प्राणी. आपली ही हुशारी आपण निसर्गाचं रक्षण करण्यासाठी वापरली, तरच आपल्या पुढच्या पिढ्यांचं अस्तित्व अबाधित राहील. अन्यथा विनाश अटळ आहे.
(शब्दांकन ः ओंकार बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com