अवनीच्या प्रदेशातलं टिपेश्वर !

महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ भागातील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा. कापसाचे शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसाही लाभला आहे.
Saptarang
SaptarangSakal

यवती अर्थात यवतमाळ.. महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ भागातील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा. कापसाचे शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. पूर्वी यवत अथवा यवती या नावांनी हे शहर ओळखले जाई. आजूबाजूला दाट झाडी आणि उंच झाडांच्या अस्तित्वामुळे पुढे या गावाला ‘योतमाड’ नावाने ओळखले जाऊ लागले. काही कालावधीनंतर या गावाला यवतमाळ म्हणून संबोधले जाऊ लागले. या गावाला हे नाव मिळाले ते हे गाव माळरानावर वसलेले असल्यामुळे. ‘यवतमाळ’ जिल्हा ऐतिहासिक, भौगोलिक, आर्थिक दृष्टीने विदर्भातील अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. कापूस पिंजण्याचे आणि त्याचे गठ्ठे बनवण्याचे कारखाने असल्यामुळे महाराष्ट्राच्या कापड उद्योगात यवतमाळ जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

ऐतिहासिक कागदपत्रानुसार ‘जगातील सर्वांत सुरक्षित शहर’ म्हणून या जिल्ह्याची ओळख होती. काही वर्षांपूर्वी मात्र या जिल्ह्याचे वातावरण अक्षरशः ढवळून निघाले होते. यवतमाळ जिल्ह्यातील ‘पांढरकवडा’ या शहराने पुन्हा या जिल्ह्याला प्रकाशझोतात आणले होते. काही वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये T-१ अर्थात ‘अवनी’ नावाच्या नरभक्षक वाघिणीने इथलं राजकीय, सामाजिक आणि नैसर्गिक स्वास्थ्य हादरवलं होतं असं म्हणायला हरकत नाही. याच ‘अवनी’ वाघिणीवर आधारित ‘शेरनी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आणि हा भाग पुन्हा चर्चेत आला.

महाराष्ट्रातील वन्यजीवन, वनसंपदा यांच्या दृष्टिकोनातून या भागाला पूर्वीपासून महत्त्व होते. पण या भागाबद्दल फारशी चर्चा नव्हती. महाराष्ट्रातील वाघ, त्यांच्या पांगण्याची क्रिया आणि त्यांचे भ्रमणमार्ग यांच्या दृष्टीने इथले एक जंगल फार मोलाची भूमिका बजावते ते म्हणजे ‘टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य’. आज आपण या जंगलाविषयी माहिती घेणार आहोत. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर आणि घाटंजी तालुक्यात असणाऱ्या या अभयारण्याची अधिसूचना १९९७ मध्ये काढण्यात आली होती. यवतमाळपासून ८० किमी असणाऱ्या या अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आपल्याला पहायला मिळते. पांढरकवडा या अवनीमुळे प्रसिद्ध झालेल्या शहरापासून अवघ्या २० किमीवर असणारे हे टिपेश्वर अभयारण्य सुमारे १४ हजार ८३२ हेक्टर म्हणजेच सुमारे १४८.६४ चौरस किलोमीटर एवढ्या भागात पसरलेले आहे.

‘तिपाई’ देवीच्या नावावरून ‘टिपेश्वर’ असे नाव मिळालेल्या या जंगलात पूर्वी येथे राहत असलेल्या लोकांकडून अभयारण्यातील टेकडीवर असलेल्या प्राचीन मंदिरात ‘तिपाई’ देवीची पूजा केली जात असे. अभयारण्याच्या निर्मितीनंतर जंगलाच्या आतील काही गावांचे पुनर्वसन अभयारण्याच्या बाहेर करण्यात आले. आज काही गावे अजून अभयारण्याच्या क्षेत्रात आहेत आणि त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न वनविभागाकडून केले जात आहे. टिपेश्वरच्या दक्षिणेला आंध्र प्रदेशाची सीमा लागून आहे. आंध्र प्रदेश मधील आदिलाबाद हे शहर टिपेश्वरपासून ३५ किमी. अंतरावर आहे. अभयारण्याच्या क्षेत्रात नसलेल्या पण नजीकच्या झरी तालुक्यातील दाट जंगलातही मोठ्या प्रमाणावर वन्यजीवन आढळते. आंध्र प्रदेशातील ‘कावल’ व्याघ्र प्रकल्प टिपेश्वरपासून १३० किमी अंतरावर आहे. या सर्वांमुळे या अभयारण्याला महाराष्ट्रातील वाघांच्या संरक्षणात ‘टिपेश्वर’ मोलाची भूमिका बजावते. जंगलच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास केला तर येथे उंचसखल डोंगररांगांबरोबर सपाट माळरानेही आढळतात. त्यामुळे जंगलात वाघांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.

टिपेश्वर अभयारण्यात प्रामुख्याने साग या जातीची झाडे मोठ्या प्रमाणात आहे. तसेच धावडा, हिवर, नींब, अर्जुन, ऐन, सालई, तेंदु, बोर, मेढशिंग, मोई, चींच, बेल, खैर, उंबर, लेंडी, मोह, पळस, अमलतास, जांभुळ, तीवस, पिंपळ, वड, हळदु, चंदन, काटेसावर, सीताफळ, बाभुळ, आंबा, अंजन, बिजा, बेहडा, इत्यादी प्रकारच्या वृक्षांसह मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पतीही मुबलक प्रमाणात आहे. सस्तन वन्यप्राण्यांच्या बाबतही टिपेश्वर सधन आहे. जंगलातील सांबर या वन्यप्राण्याची संख्या कमी झाल्यामुळे वनविभागाने यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पातून काही सांबरं इथे आणण्यात आली आहे. वाघाच्या खाद्यात या प्राण्याचा प्रामुख्याने समावेश असल्यामुळे वनविभागाने यांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बाकी या जंगलात सापडणारे रानडुक्कर, नीलगाय, चितळ, इ. सस्तन वन्यप्राण्यांच्या चांगल्या संख्येमुळे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या वाघांची संख्याही येथे मोठ्या प्रमाणावर आहे. विविध प्रजातींचे पक्षीही आपल्याला येथे पाहायला मिळतात.

टिपेश्वरमध्ये पर्यटनासाठी माथणी आणि सुन्ना ही दोन प्रवेशद्वारे आहेत. जंगलाच्या व्यवस्थापनासाठी जंगलात सुमारे १३६ किमी लांबीचे मातीचे रस्ते तयार करण्यात आले आहे. यापैकी सुमारे ६० किमीचे रस्ते पर्यटनासाठी खुले ठेवण्यात आले आहेत. व्याघ्रदर्शन आणि जंगलातील इतर विविधता यामुळे अनेक पर्यटक या जंगलाला भेट देतात. जंगलाच्या आत इंग्रजांच्या काळातील सुंदर विश्रामगृह आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे येथे पर्यटकांना निवासाची व्यवस्था देता येत नाही. या विश्रामगृहाजवळ एक मोठा तलाव आहे. याचे नाव आहे ‘टिपेश्वर तलाव’. वन्यप्राण्यांसाठी आवश्यक पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रमाणावर केले आहे. जंगलात टिपेश्वर तलाव, पिलखान नाला, बहात्तर नाला, जुना पाणी, गवानहेटी नाला, भवानखोरी नाला, इ. नैसर्गिक पाणवठे आहेत. तर वनविभागानेही इतर अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठ्यांची सोय केली आहे. जंगलात पूर्वी असणाऱ्या टिपेश्वर आणि मारेगाव या गावांचे जंगलाबाहेर पुनर्वसन करण्यात आले आहे. या मोकळ्या झालेल्या अनेक जागांमध्ये गवताळ कुरणवाढीसाठी वनविभागाने प्रयत्न सुरु केले आहे. याशिवाय येदलापूर आणि अंधारवाडी या गावांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न वनविभागाकडून सुरु आहेत.

अभयारण्याच्या आजूबाजूला आणि अभयारण्यात असलेल्या लोकांची उपजीविका ही प्रामुख्याने या जंगलावर अवलंबून आहे. या लोकांचे विविध कारणास्तव असलेले जंगलावरील अवलंबित्व कमी व्हावे यासाठी वनविभाग अनेक योजना राबवत आहे. इथे असलेले जंगल, वाघांना मिळणारे संरक्षण यामुळे वाघांची संख्या अभयारण्यात वाढत आहे. प्रत्येक जंगलाची वाघ धारण करण्याची एक निश्चीत क्षमता असते. या क्षमतेपेक्षा जास्त वाघ वाढले की हे वाघ आपली हद्द प्रस्थापित करण्यासाठी जंगलाबाहेर पडतात. दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी या वाघांना सुरक्षित भ्रमणमार्गांची आवश्यकता असते. या भ्रमणमार्गांचा अभ्यास करण्यासाठी २०१९ मध्ये T१-C१ उर्फ वॉकर या वाघाला रेडियो कॉलर हे उपकरण लावण्यात आले होते. त्याने आपली हद्द प्रस्थापित करण्यासाठी थेट बुलढाणा जिल्ह्यातील ‘ज्ञानगंगा अभयारण्य’ गाठले. यासाठी त्याने सुमारे १४७५ किमीचा प्रवास केला होता. त्याच्या गळ्यातील रेडियो कॉलरची बॅटरी संपण्यापूर्वी त्याने सुमारे ३०१७ किमीचा एकूण प्रवास केला होता. या वाघाच्या हालचालींचा अभ्यास करताना वनविभागाला आणखी एका वाघाने केलेला प्रवास शोधण्यात यश आले. या वॉकर-१ च्या भ्रमणमार्गाने प्रवास करून पांढरकवडा प्रादेशिक जंगलातला एक वाघ औरंगाबादजवळील गौताळा अभयारण्यात येऊन पोहोचला. या वॉकर-२ ने केलेल्या प्रवासावरून टिपेश्वर-पैनगंगा-ज्ञानगंगा-काटेपुर्णा-गौताळा या भ्रमणमार्गाचे अस्तित्व आणि महत्त्व अधोरेखित झाले आहे.

या दोन्ही वाघांच्या प्रवासाच्या पद्धतीवरून असे लक्षात आले की त्यांनी मानवी वस्तीच्या जवळून प्रवास केला. पण मानवसंपर्कात येणे टाळले. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी माणसाकडून प्रयत्न केले जाणे अतिशय गरजेचे आहे. जंगलाकडे आणि वन्यप्राण्यांकडे पाहण्याची आपली दृष्टी सुधारणे हे यासाठी अतिशय आवश्यक आहे. एकदा का ही दृष्टी सुधारली की आपल्या दृष्टिकोनातही बदल होईल. निसर्ग हा माणसाचा सखा, सवंगडी होईल. त्याच्या जोडीने आपण आपलं भविष्य अधिक उज्ज्वल करू शकू.

कसे जाल ? : पुणे/मुंबई-नागपूर-पांढरकवडा-टिपेश्वर

भेट देण्यास उत्तम हंगाम : ऑक्टोबर ते जून

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : मुंगुस, जवादी मांजर, खवल्या मांजर, साळींदर, ससा, वानर, रानडुक्कर, अस्वल, रानमांजर, चितळ, सांबर, नीलगाय, चौशिंगा, काळवीट, बिबट्या, पट्टेरी वाघ, पखमांजर, इ.

पक्षी : तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळ घार, कापशी घार, मत्स्य घुबड, कंठेरी शिंगळा घुबड, गव्हाणी घुबड, ठिपकेदार पिंगळा, मत्स्य गरुड, कोतवाल, कुरटुक,सूर्यपक्षी, स्वर्गीय नर्तक, नवरंग, सुतारपक्षी, इ.

वृक्ष : साग, धावडा, हिवर, नींब, अर्जुन, ऐन, सालई, तेंदु, बोर, मेढशिंग, मोई, चिंच, बेल, खैर, उंबर, लेंडी, मोह, पळस, अमलतास, जांभुळ, तीवस, पिंपळ, वड, हळदु, चंदन, काटेसावर, सीताफळ, बाभुळ, आंबा, अंजन, बिजा, बेहडा, इ.

(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार पांडुरंग बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com