निसर्गाचा मुक्तछंद!

भारतातल्या प्रत्येक भागातल्या जंगलात आपण जाऊन आलो की आपल्याला त्या त्या भागात असणारी विविधता लगेच लक्षात येते. प्रत्येक भागातला जंगलप्रकार वेगळा.
Elephant
Elephantमोहन थॉमस

माझ्या जंगलभटकंतीची सुरुवात मी मेळघाटच्या जंगलापासून केली. त्यानंतर मी अनेक वर्षं मध्य भारतातील अनेक जंगलांमध्ये भटकंती केली. त्या भटकंतीचा आनंद घेतला. मेळघाट, ताडोबा, नागझिरा, पेंच अशा मध्य भारतातील जंगलांत मी अनेक वर्षं मनसोक्त भटकलो. तेव्हा तर पायी जंगल तुडवण्याचीही परवानगी होती. त्या काळात मी ही जंगलं अनेकदा पालथी घातली. याअगोदरच्या लेखांमधून आपण या सर्व जंगलांची माहिती घेतली आहे. ही सगळी जंगलं वेळोवेळी पालथी घालत असताना मला भारताचा दक्षिण भाग अनेकदा खुणावत होता; पण संधी मिळत नव्हती. आणि अखेर मी ठरवलं, हातातली सगळी कामं बाजूला सारायची आणि दक्षिण भारतातल्या जंगलांना भेट द्यायला जायचं. माझ्या या ‘दक्षिणदिग्विजय’ मोहिमेतल्या पहिल्या टप्प्यासाठी मी काही जंगलं ठरवून घेतली.आणि या सगळ्यात मी पहिलं जंगल निवडलं ते म्हणजे आपल्या अलौकिक सौंदर्यानं मला अनेक वर्षं साद घालणारं ‘बंदीपूर व्याघ्रप्रकल्प’.

भारतातल्या प्रत्येक भागातल्या जंगलात आपण जाऊन आलो की आपल्याला त्या त्या भागात असणारी विविधता लगेच लक्षात येते. प्रत्येक भागातला जंगलप्रकार वेगळा. दक्षिण भारत तर अप्रतिम निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतातल्या जंगलात गेल्यावर हिरवंगार जंगल बघूनच आपण त्याच्या प्रेमात पडतो; पण दक्षिण भारतातल्या इतर जंगलांपेक्षा किंचित वेगळं असणारं हे बंदीपूर जंगल. दक्षिण भारतातली बहुतेकशी जंगलं ‘निमसदाहरित’ किंवा ‘सदाहरित’ या जंगलप्रकारात मोडतात; पण हे जंगल मात्र ‘शुष्क पानगळी’ या प्रकारात मोडतं. या जंगलात काही भाग ‘ओलसर पानगळी’ या जंगलप्रकारात मोडणाराही आढळतो. यामुळे एकूणच जंगलात वैविध्य आढळतं.

कर्नाटक राज्यातील चामराजनगर जिल्ह्यातील या जंगलालाही इतिहास आहे. म्हैसूर राज्याच्या महाराजांनी सन १९३१ मध्ये सुमारे ९० चौरस किलोमीटर क्षेत्राच्या या जंगलाला अभयारण्याचा दर्जा दिला. या जंगलाचं नाव ठेवण्यात आलं होतं वेणुगोपाल वन्यजीव पार्क. सन १९७३ मध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ची स्थापना झाल्यावर ज्या नऊ जंगलांना प्रथम व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा देण्यात आला त्या नऊ जंगलांत बंदीपूर या जंगलाचा समावेश होतो. वनविभागाच्या प्रयत्नांमुळे या जंगलाच्या क्षेत्रातही वाढ झाली.

आज सुमारे ८७२.२४ चौरस किलोमीटरचा कोअर भाग आणि सुमारे ५८४.०६ चौरस किलोमीटरचा बफर भाग मिळून सुमारे १४५६.३० चौरस किलोमीटर क्षेत्रात हा व्याघ्रप्रकल्प पसरलेला आहे. याशिवाय, बंदीपूर हे जंगल आणि नागरहोळे राष्ट्रीय उद्यान, मदुमलाई राष्ट्रीय उद्यान, वायनाड वन्यजीव अभयारण्य, अरालम वन्यजीव अभयारण्य, मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, करीमपुझा वन्यजीव अभयारण्य आणि सत्यमंगलम् वन्यजीव अभयारण्य मिळून नीलगिरी बायोस्फीअर या सुमारे ५५२० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या संरक्षित क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. या नीलगिरी बायोस्फीअरला सन २०१२ मध्ये ‘युनेस्को’नं ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ म्हणून मान्यता दिली आहे.

बंदीपूर जंगलाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, इथं जंगलप्रकारात आढळणारी विविधता. जंगलात मोठमोठे वाढणारे वृक्ष आहेत, तसंच काही खुरटी वाढणारी झुडपंही मोठ्या प्रमाणावर आहेत. याशिवाय, गवताळ माळरानंही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. या सर्वांच्या सुंदर मिलाफामुळेच बंदीपूरमध्ये जैवविविधता आढळते. जंगलाच्या उत्तर भागात कबिनी ही नदी, तर दक्षिण भागात मोयार ही नदी वाहते. याशिवाय, नुगू ही नदीही जंगलातून वाहते. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे जंगलात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, तसंच ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत परतीच्या ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळेही इथं पाऊस पडतो. साधारणतः एप्रिल महिन्यात वळवाचा पाऊस झाला की बंदीपूरचं सौंदर्य खुलायला लागतं. स्थानिक पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरू होतो. गवताला नवे अंकुर फुटल्यामुळे हत्तींचे मोठमोठे कळप आकर्षित होतात. याचबरोबर या गवताचा आस्वाद घेण्यासाठी आलेले रानगवेही मोठ्या संख्येनं बंदीपूरच्या माळरानावर बघायला मिळतात. यामुळे एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अनेक पर्यटक हे प्राणी पाहण्यासाठी जंगलाला भेट देतात. उन्हाळ्याच्या काळात जेव्हा जंगलात मोठ्या प्रमाणावर कोरडेपणा जाणवायला लागतो तेव्हा प्राणी मोठ्या संख्येनं जंगलाच्या वायव्य भागात असणाऱ्या कबिनी धरणाच्या जलाशयाच्या आसपास जमा होतात. यात प्रामुख्यानं हत्ती आणि रानगवे असतात. एवढ्या मोठ्या संख्येनं हे प्राणी एखाद्या जलाशयाच्या आसपास एकवटल्याचं हे अद्वितीय दृश्य साधारणतः आशिया खंडातील एकमेवच असेल.

व्याघ्रसंरक्षणाच्या दृष्टीनंही बंदीपूर जंगलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुळात व्याघ्रप्रकल्प असल्यामुळे जंगलाला चांगल्या प्रकारे संरक्षण लाभलं आहे. पर्यायानं बंदीपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाघ आढळतात. याशिवाय, बंदीपूर जंगलातून नागरहोळे, वायनाड, सत्यमंगलम्, मदुमलाई या इतर जंगलांमध्ये वाघांना जाण्यासाठी सुरक्षित मार्गही आहेत. वाघाच्या पांगण्याच्या महत्त्वाच्या क्रियेत हे सुरक्षित मार्ग अर्थात कॉरिडॉर्स अत्यंत मोलाची भूमिका बजावतात.

बंदीपूर आणि नागरहोळे या जंगलांतून जाणारा कोल्लेगल-कोझिकोडे राष्ट्रीय महामार्ग हा या दोन्ही जंगलांसमोर असलेला मोठा धोका आहे. या महामार्गावरून भरधाव वेगानं धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक प्राण्यांना नाहक जीव गमावावा लागतो. हा धोका ओळखून कर्नाटक सरकारनं रात्री नऊ ते सकाळी सहादरम्यान या जंगलभागातून या महामार्गावरून होणारी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटलं असलं तरी संपूर्णतः थांबलेलं नाही. त्यात ही बंदी उठवावी असा आग्रह केरळ सरकारनं कर्नाटक सरकारकडे धरला आहे. मात्र, ही बंदी योग्य असल्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत.

माझ्या ‘दक्षिणदिग्विजया’त भेट दिलेलं पहिलं जंगल म्हणून बंदीपूरला माझ्या मनाच्या कोपऱ्यात एक विशिष्ट स्थान आहे. मात्र, या जंगलाला भेट देणाऱ्या कुणाही निसर्गवेड्याला हे जंगल पहिल्या भेटीत आवडेल असंच आहे. जंगलात आढळणाऱ्या विविधतेमुळे निसर्गानं आपल्या रंगांचा कुंचला या जंगलात सढळ हस्ते फिरवला आहे. या कुंचल्यातून उधळणारे हे निसर्गरंग आपल्यालाही भारावून टाकतात आणि या जंगलावर आपला जीव जडतो.

कसे जाल?

पुणे/मुंबई-बंगळूरू-म्हैसूर-बंदीपूर

भेट देण्यासाठी उत्तम कालावधी :

ऑक्टोबर ते एप्रिल

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : वाघ, बिबट्या, गवे, चितळ, सांबर, भेकर, रानडुक्कर, वानर, मुंगुस, तरस, अस्वल, रानकुत्रे, पिसोरी, लाजवंती(स्लेंडर लॉरीस), रानमांजर, हत्ती, शेकरू इत्यादी.

पक्षी : सुमारे २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी - मोर, रानकोंबडा, भृंगराज , मोहळ घार , रेड हेडेड व्हल्चर्स, इंडियन व्हल्चर्स, हळद्या, बुरखा हळद्या, हुदहुद , नीलपंख मत्स्य घुबड, सर्पगरुड , वेद राघू , क्रीम्सन सनबर्ड, छोटा निखार चष्मेवाला, रानतुईय्या, तांबट इत्यादी.

सरपटणारे प्राणी : मण्यार, नाग, घोणस, धामण, अजगर, फ्लाइंग लिझर्ड/ड्रेको, घोरपड, इ.

फुलपाखरे : कॉमन रोझ (गुलाबी राणी), क्रीम्सन रोझ, कॉमन जे, लाईम बटरफ्लाय (लिंबाळी), मलाबार रेवन, कॉमन मॉर्मॉन, रेड हेलन, ब्लू मॉर्मन (रान पाकोळी), सदर्न बर्डविंग, कॉमन वॉंडरर, (भटक्या), कॉमन इमिग्रंट (प्रवासी), मॉटल्ड इमिग्रंट (ठिपकेवाला प्रवासी), कॉमन ग्रास येलो ,वन स्पॉट ग्रास येलो, निलगिरी क्लाऊडेड येलो, कॉमन जेझेबल (हळदीकुंकू) इत्यादी.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

(छायाचित्र : मोहन थॉमस)

(शब्दांकन : ओंकार बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com