सुखाचे जे सुख भीमेचिये काठी

आपल्याच राज्यातल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यात असलेलं हे ‘भीमाशंकर’ वन्यजीव अभयारण्य पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या रांगेतील जंगल.
Shekaru
ShekaruSakal

आकाशात झालेली काळ्या मेघांची गर्दी, अविरत कोसळणारा पाऊस, समोरच्याच्या डोळ्यात बोट जाईपर्यंत पावसानं आलेलं दाट धुकं, उत्तुंग कड्यावर जाणारी नागमोडी वाट, जंगलाचा हरिप्रसाद चौरासिया असणाऱ्या पर्वत कस्तुराची कानाला तृप्त करणारी शीळ, एखाद्या मशिनगनमधून गोळ्या सुटाव्यात तसा लांबवरून येणारा एका ‘खास’ प्राण्याचा आवाज, गर्द निळ्या रंगाच्या कारवीची दुलई पांघरलेला अफाट कडा आणि आजूबाजूला पसरलेलं घनदाट अरण्य... या वातावरणात मी पहिल्यांदा ‘त्या’ जंगलात गेलो. मनाच्या एका कोपऱ्यात एक वेगळी जागा निर्माण करणाऱ्या त्या जंगलानं मला पहिल्या भेटीतच वेड लावलं. ऐन तारुण्यात अंगात असलेल्या रगीमुळं मी चिक्कारवेळा ते जंगल पालथं घातलं. मनात माझ्यासाठी असलेलं ‘त्या’ सुहृदाचं स्थान मात्र प्रत्येक भेटीत अधिकच बळकट होत गेलं. इतक्या वर्षांत या जंगलाबद्दल मनात असलेली ओढ तसूभरही कमी झाली नाही. इथं असलेल्या सांबसदाशिवाच्या साक्षीनं मी अनेक रात्री या जंगलात काढल्या. शिवशंकराच्या सान्निध्यात असलेलं माझं आवडतं ‘भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य’ मला अजूनही भुरळ घालतं. या जंगलात आलो की जंगलभ्रमंतीची वेगळी नशा चढते.

आपल्याच राज्यातल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यात असलेलं हे ‘भीमाशंकर’ वन्यजीव अभयारण्य पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या रांगेतील जंगल. सुमारे तीन हजार फूट उंचीच्या कड्यांनी दोन भागांत विभागलेलं हे जंगल निसर्गवैविध्याचा अफलातून खजिना आहे. १९८५ मध्ये १६ सप्टेंबरला अभयारण्य म्हणून घोषित झालेल्या या अभयारण्याची निर्मिती एका खास दुर्मीळ प्राण्याच्या संरक्षणासाठी करण्यात आली होती, तो प्राणी म्हणजे शेकरू. भीमाशंकरच्या जंगलात आपल्याला पानगळी, निमसदाहरित वनप्रकार आढळून येतात. १३०.७८ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या जंगलात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळून येते.

अभयारण्यात प्रामुख्यानं आढळणारा शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. शेकरू ही एक मोठ्या आकाराची खार आहे, तसंच तिला स्थानिक भाषेत शेकरा, शेकरी किंवा भीमखार अशीही नावं आहेत.

हा प्राणी दिनचर, वृक्षवासी आणि शाकाहारी आहे. तो मुख्यत: पश्चिम घाट, पूर्व घाट आणि सातपुडा पर्वतरांगांच्या उत्तरेकडं अगदी मध्य प्रदेशपर्यंत आढळतो. उष्ण प्रदेशांतील पानझडी, तसंच अर्धपानझडी वनांमध्ये, नदीकाठच्या प्रदेशांतील गर्द झाडांवर आणि सदाहरित वनांत राहणं हा प्राणी पसंत करतो. या प्राण्याच्या अधिवासात घट झाल्यानं या सुंदर प्राण्याची संख्या कमी झाली झाली आहे. भारतीय उपखंडात या प्राण्याच्या चार उपजाती आढळतात. शेकरूची डोक्यापासून शेपटीपर्यंतची लांबी साधारणतः २५ ते ५० सें.मी. असते; शेपटी जवळजवळ धडाइतकीच किंवा किंचित लांब असते. वजन सुमारे १.५ ते २ कि.ग्रॅ. असतं. मादी आकारानं आणि वजनानं नरापेक्षा लहान असते.

शेकरूच्या रंगात पांढुरका, पिवळसर करडा, फिकट तपकिरी, मातकट लाल, गडद लाल किंवा काळा अशा विविध रंगांच्या छटा दिसून येतात. पोटाखालचा भाग आणि पुढचे पाय सहसा पिवळसर करड्या रंगाचे असतात. डोकं फिकट तपकिरी किंवा तपकिरी असतं. मात्र, दोन्ही कानांच्यामध्ये एक विशिष्ट पांढरा भाग असतो. उपजातीप्रमाणे या भागाच्या रंगांमध्ये विविधता आढळून येते. पाय रुंद असून, नख्या मोठ्या व बळकट असतात. शेकरू पूर्णपणे शाकाहारी प्राणी असून, तो प्रामुख्यानं फळं खातो. फळांशिवाय त्याच्या आहारात फुलं, बिया आणि झाडाची साल असते. हा प्राणी पाच ते सहा घरटी बांधतो. साधारणतः उंच झाडांच्या फांद्यांवर आढळून येणारा हा प्राणी साधारणतः १५ ते २० फूट लांब उडी मारू शकतो. धोका वाटला तर मशीनगनमधून गोळ्या सुटाव्यात तसा आवाज हे प्राणी करतात.

वनविभागानं केलेल्या शेकरूच्या गणनेत भीमाशंकर अभयारण्यात त्यांचा सर्वाधिक वावर आढळून आला. भीमा आणि घोड या अभयारण्यातून वाहणाऱ्या नद्या आहेत. भीमा नदी ही पश्चिम घाटातील अतिशय महत्त्वाची नदी समजली जाते. भीमा नदीचा उगम इथं असणाऱ्या ज्योतिर्लिंगात आहे. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते. मंदिरापासून सुमारे १.५ किलोमीटर अंतरावर पूर्वेला जंगलात ती पुन्हा प्रकटते असं मानलं जातं. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचं धार्मिक स्थळ असलेलं हे मंदिर प्रचंड गर्द झाडी, जंगल आणि उंच डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. हेमाडपंती पद्धतीचं हे मंदिर आहे.

मंदिराच्या छतावर, खांबांवर सुंदर नक्षीकाम आढळतं. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचं सांगण्यात येतं. या घंटेवर १७२९ अशी इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचं बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवं बांधकाम करण्यात आलं आहे. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. जंगलात एक शिखर असं आहे, जे कोकणातून नागाच्या फण्यासारखं दिसतं, त्यामुळं या शिखराला ''नागफणी'' म्हणून ओळखलं जातं. याशिवाय मंदिराच्या पश्चिमेला सुमारे अकराशे मीटर उंचीचा कोकणकडा आहे. अत्यंत विहंगम दृश्य दिसणाऱ्या या कोकणकड्यावरून एक रस्ता सीतारामबाबा आश्रम या ठिकाणी जातो.

वनस्पती, पशू-पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी, उभयचर यांच्या नानाविध प्रजाती असणारं हे अभयारण्य निसर्गसंपत्तीचा अनमोल खजिना आहे. भोरगिरी ते भीमाशंकर हा नेचर ट्रेल अनेक निसर्गप्रेमींना कायम भुरळ घालतो. याशिवाय अभयारण्याच्या जवळ असणाऱ्या आहुपे गावात एक सुंदर धबधबा आहे. डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या भीमाशंकर मंदिराच्या आवारात आलो, की आपली आणि निसर्गाची वीण अधिक घट्ट होते. भीमेच्या काठी फुललेला हा निसर्गमळा पाहताना आपण तल्लीन होऊन जातो. इथल्या घनदाट अरण्यात फिरताना आपल्याला सुखाची अनुभूती मिळते आणि मग '' सुखाचे जे सुख भीमेचीये काठी'' असं म्हणून आपण शिवशंकराच्या साक्षीनं निसर्गमय होतो.

कसं जाल? : पुणे/मुंबई-राजगुरुनगर-घोडेगाव-भीमाशंकर

भेट देण्यास उत्तम हंगाम : सप्टेंबर ते जून

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : बिबट्या, शेकरू, भेकर, वानर, रानडुक्कर, खवल्या मांजर, ससा, सांबर, कोल्हा, पिसोरी, इ.

पक्षी : नीलगिरी रानपारवा, हरियाल, पर्वत कस्तूर, मलबार पॅराकीट, तुईया, कापशी , कृष्ण गरुड , दयाळ, सातभाई, हळदी बुलबुल, शामा, मोर, कोतवाल, कोकीळ, तांबट, घुबडांच्या काही प्रजाती, खाटिक, रानकोंबडा, शिक्रा इ.

सरपटणारे प्राणी : नाग, फुरसे, मण्यार, घोणस, अजगर, धामण, गेको, घोरपड इ.

वृक्ष आणि वनस्पती : जांभूळ, रिठा, आपटा, अडुळसा, शिसम, हिरडा, बेहडा, अंजन, आंबा, उंबर इ.

(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com