

भारताला लाभलेल्या जैवविविधतेमुळे विविध प्रकारचे प्राणी-पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. सह्याद्रीच्या रांगांमधलं निसर्गसौंदर्य जसं मनमोहक आहे, तसंच विदर्भातल्या जंगलांमधलं निसर्गसौंदर्यही वेड लावणारं आहे. तीच बाब माळरानांचीही.
या माळरानांकडे निसर्गसौंदर्याच्या दृष्टीनं पाहिलं तर या त्यांची सुंदरता लक्षात येईल. ती ओसाड वाटणार नाहीत. इथली जैवविविधता या सुंदरतेकडे पाहण्यासाठी उपयोगी पडेल. आज अशाच एका सुंदर जंगलाची माहिती घेऊ या. हे जंगल म्हणजे रेहेकुरी काळवीट अभयारण्य. नगर जिह्यातलं हे अभयारण्य सन १९८० मध्ये अस्तित्वात आलं. कर्जत तालुक्यातील २१७.३१ हेक्टर जंगलाला ‘देऊळगाव-रेहेकुरी काळवीट अभयारण्य’ असं नाव देण्यात आलं. नावावरून लक्षात आलंच असेल की ‘काळवीट’ या सुंदर प्राण्याच्या संरक्षणासाठी हे अभयारण्य आहे.
काळवीटाला कृष्णमृग असंही म्हणतात. हा एक देखणा प्राणी आहे. तो कळपानं राहणारा असून एका कळपात १० ते ३० काळवीट असतात. गवताळ व खुरटी झुडपं असलेल्या क्षेत्रात प्रामुख्यानं काळवीटांचं अस्तित्व आढळतं. घनदाट तसंच डोंगराळ जंगलात राहण्याचं काळवीटं टाळतात. प्रौढ नराच्या पाठीचा रंग राखाडी किंवा पूर्ण काळा आणि पोटाकडील भाग पांढरा असतो. नराची लांबी १२० ते १३० सेंटिमीटर व उंची खांद्याजवळ ८० सेंटिमीटर आढळते.
माद्या नरापेक्षा लहान असतात आणि त्यांना शिंगं नसतात. त्यांच्या पाठीचा रंग पिवळसर बदामी आणि पोटाचा भाग नराप्रमाणेच पांढरट असतो. नरांना पीळदार आणि डौलदार शिंगं असतात. काळवीट हा वेगानं धावणारा प्राणी आहे. त्याचं आयुष्यमान असतं अंदाजे १२ ते १५ वर्षं.
काळवीट हा हरणांच्या ‘कुरंग’वर्गातील प्राणी आहे. हरणांमध्ये ‘सारंग’ आणि ‘कुरंग’ ही दोन उपकुळं असतात. या उपकुळांत काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा आदी प्रजातींच्या हरणांचा समावेश होतो. कुरंग हरणांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शिंगं. ही शिंगं सारंग उपकुळातील हरणांच्या शिंगांपेक्षा पूर्णत: वेगळी असतात. ती पोकळ असून हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतात. ही शिंगं कधीही गळून पडत नाहीत. याउलट, सारंग प्रजातीच्या हरणांची शिंगं दरवर्षी गळून पडतात आणि नव्यानं येतात. कुरंग प्रजातीच्या हरणांच्या शिंगाला एकच टोक असतं. शिंगाचं आकारमान सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा बरंच लहान असतं.
काळवीट हा भारतीय संस्कृतीत फार वर्षांपासून असणारा प्राणी आहे. अगदी इसवीसनपूर्व काळातही दगडावर केलेल्या रंगकामात काळवीटाचं चित्र आढळून आलेलं आहे. एकेकाळी भारतीय उपखंडात मोठ्या संख्येनं दिसणारा हा प्राणी अवैध आणि मोठ्या प्रमाणावरच्या शिकारीमुळे कमी होत चालला आहे. सन १९७२ मधील अभ्यासानुसार, भारतीय उपखंडात या प्राण्यांची संख्या चार दशलक्षच्या आसपास होती. सन १९८२ मध्ये रणजितसिंह यांनी केलेल्या अभ्यासानुसार, भारतात २२ हजार ५०० ते २४ हजार ५०० इतकी काळवीटांची संख्या होती, तर २०१० ला झालेल्या गणनेनुसार, नगर आणि सोलापूर या जिल्ह्यांत काळवीटांची संख्या दहा हजारहून अधिक होती. सन १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानं काळवीटांना मिळालेलं संरक्षण आणि वनविभागानं केलेला प्रयत्न यांमुळे काळवीटांची संख्या वाढीस लागली आहे.
शुष्क माळरान असलेल्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात हा प्राणी आढळत असल्यामुळे रेहेकुरीसारख्या जंगलांचं महत्त्व अधोरेखित होतं. रेहेकुरीचं जंगल या प्राण्याच्या संरक्षणासाठी घोषित करण्यात आलं असलं तरी या इथं आणखी एक महत्त्वपूर्ण प्राणी आढळतो व तो म्हणजे भारतीय लांडगा. ‘शुष्क माळरानांचा हा बादशहा’ या जंगलभागातला नैसर्गिक समतोल राखण्याचं मोठं काम करतो. महाराष्ट्रात अतिशय कमी संख्येनं शिल्लक राहिलेल्या या प्राण्याच्या अस्तित्वामुळे रेहेकुरी अभयारण्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. अभयारण्याच्या प्रदेशात १५ विहिरी आहेत. प्राण्यांची पाण्याची गरज
या विहिरींमुळे भागते. या विहिरींच्या पाण्याचा वापर करून वनविभागानंही अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय केली आहे. नाल्यावर घातलेले बंधारे, गवताळ माळरानांच्या वाढीसाठी केलेले प्रयत्न, पावसाचं पाणी साठून राहण्यासाठी ठिकठिकाणी खोदलेले खंदक, वन्यजीवांना आणि जंगलाला दिलेलं संरक्षण या वनविभागाच्या प्रयत्नांमुळे रेहेकुरी अभयारण्याला तर फायदा झाला आहेच; याशिवाय आजूबाजूच्या भागातील जमिनीतील पाण्याची पातळीही सुधारली आहे.
रेहेकुरी अभयारण्यात या माळरानांवर अवलंबून असणारे इतर वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणावर आढळतात. खुरटी झुडपं, गवताळ प्रदेश, छोटी-मोठी झाडं यांवर अवलंबून असलेले १०० हून अधिक प्रजातींचे पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरं इथं पाहायला मिळतात. अभयारण्यात असलेल्या पाण्याच्या जागांच्या आसपास दहाहून जास्त प्रजातींचे उभयचर पाहायला मिळतात. या माळरानांवर अवलंबून असलेलं हे जीवनचक्र पाहताना आणि त्याच्या निरीक्षणाचा आनंद लुटताना भान हरपून गेलं नाही तरच नवल. अशा अनेक जीवांचं आश्रयस्थान असलेले रेहेकुरीसारखे प्रदेश वाचवणं ही आपली गरज आहे.
‘लेसर फ्लोरिकन’सारखा सुंदर पक्षी भारतात असलेल्या या प्रकारच्या माळरानांवरच अवलंबून आहे. अशा अनेक प्रजातींच्या प्राणी-पक्ष्यांचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर रेहेकुरीसारखी जंगलं वाचवावी लागतील. स्थानिक लोकांना या माळरानांचं महत्त्व पटवून देणं, लहान मुलांमध्ये या जंगलांविषयी प्रेम आणि ओढ निर्माण होईल हे पाहणं असे प्रयत्न करावे लागतील.
रेहेकुरी हे अभयारण्य घोषित होण्यापूर्वी या जंगलात १५-२० काळवीटांचा केवळ एक कळप होता. सन १९८० मध्ये अभयारण्य म्हणून मान्यता मिळाल्यापासून काळवीटांना संरक्षण मिळालं. जंगलाच्या आणि माळरानांच्या दर्जात सुधारणा झाली आणि आज रेहेकुरीत वनविभागाच्या प्राणिगणनेनुसार, सुमारे ४५० पेक्षा जास्त काळवीटं पाहायला मिळतात. जंगलात आजूबाजूच्या भागातून येणारी भटकी कुत्री ही या काळवीटांना असलेला मोठा धोका आहे.
वनविभागानं या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या जंगलाचं आणि इथं मोठ्या संख्येनं आढळणाऱ्या काळवीट, लांडगा यांसारख्या प्राण्यांचं संरक्षण-संवर्धन करायचं असेल तर माळरानांचं संरक्षण-संवर्धन हा एकमेव मार्ग आहे. याकडे केवळ ‘ओसाड भूप्रदेश’ यादृष्टीनं बघून चालणार नाही. या भागात दडलेली सुंदरता, जैवविविधता पाहून त्यादृष्टीनं प्रयत्न करायला हवेत, तरच ही जंगलं आणि त्यांत असलेली जैवविविधता वाचवता येऊ शकेल. त्यासाठी आपली दिठी अर्थात् दृष्टी स्वच्छ करणं आणि निसर्गाच्या नजरेतून या जंगलांकडे पाहणं हेच आवश्यक आहे, अन्यथा ही सुंदर माळरानं कधी भकास होतील हे सांगता येणार नाही.
कसे जाल?
पुणे/मुंबई-भिगवण-राशीन-कर्जत-रेहेकुरी.
भेट देण्यास उत्तम कालावधी :
ऑक्टोबर ते फेब्रुवारी आणि जून ते ऑगस्ट.
काय पाहू शकाल?
सस्तन प्राणी : काळवीट, भारतीय लांडगा, वटवाघळांच्या काही प्रजाती, खवल्या मांजर, मुंगूस, जवादी मांजर, साळिंदर, रानससा, वानर, कोल्हा, खोकड, रानडुक्कर, काळवीट इत्यादी.
पक्षी : टकाचोर, हळद्या, नाचण, पिंगळा, दयाळ, सोनपाठी सुतार, रानलावा, खडकलावा, राखी तित्तर, सुगरण, डोंबारी, काळा कोतवाल, करडा कोतवाल, माळ टिटवी, नकल्या खाटीक, तुईया, पावशा, चातक, गायबगळा, भारद्वाज, सातभाई, रानभाई, राखी वटवट्या इत्यादी.
सरपटणारे प्राणी : घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, दुतोंड्या, तस्कर, धामण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, नाग, फुरसे, मण्यार, घोणस इत्यादी.
वृक्ष : अर्जुन, बहावा, बाभूळ, बेल, बोर, चंदन, चिंच, धामण, जांभूळ, करवंद, खैर, मोवई, नीम, पळस, पांगारा, पिंपळ, सालई, तेंदू, वड, उंबर, आपटा इत्यादी.
झुडपं : लोखंडी, मुरुडशेंग, निरगुडी, रुई, तरोटा, रानतुळस इत्यादी.
(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.