मानव-निसर्ग सहजीवनाचा आदर्श गोरेवाडा

नागपूर हे शहर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. ‘संत्र्यांचं शहर’ म्हणून प्रसिद्ध असलेलं नागपूर महाराष्ट्राची उपराजधानीही आहे. अनेक ऐतिहासिक स्थळांमुळे आणि घटनांमुळे नागपूरची इतिहासातही नोंद आहे.
swargiy nartak bird
swargiy nartak birdSaptarang

नागपूर हे शहर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. ‘संत्र्यांचं शहर’ म्हणून प्रसिद्ध असलेलं नागपूर महाराष्ट्राची उपराजधानीही आहे. अनेक ऐतिहासिक स्थळांमुळे आणि घटनांमुळे नागपूरची इतिहासातही नोंद आहे. नागपूरचं भौगोलिक स्थान लक्षात घेतलं तर ‘वासाहतिक भारता’चा मध्यबिंदू नागपूरमध्ये येत असे. ब्रिटिशांच्या काळात त्यांनी केलेल्या एका भौगोलिक सर्वेक्षणानुसार भारतीय उपखंडात त्यांच्या असलेल्या वसाहतींचा केंद्रबिंदू नागपूरमध्ये येत असे, त्यामुळे त्यांनी तिथं ‘शून्य मैलाचा दगड’ स्थापित केला. आज ब्रिटिशांच्या वसाहतीमधील काही भाग भारतात नसले तरीही चेन्नई, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या भारतातील प्रमुख शहरांचा भौगोलिक केंद्रबिंदू नागपूर शहरच आहे. अशा विविध दृष्टींनी महत्त्व असलेल्या नागपूरनं निसर्गवैविध्याचा वसाही टिकवून ठेवला आहे. नागपूरच्या चहूबाजूंना काही किलोमीटरवर असलेल्या मध्य भारतातील ताडोबा, पेंच, नागझिरा, बोर, उमरेड कऱ्हांडला, कान्हा यांसारख्या जंगलांनी नागपूरच्या भोवती माळच गुंफलेली आहे! या हिरवाईच्या हारानं नागपूरच्या सौंदर्यात तर भर पडली आहेच; शिवाय नागपूरचं नैसर्गिक महत्त्वही त्यामुळे वाढलं आहे. या सर्व जंगलांमध्ये जाण्यासाठी नागपूर शहरात येऊनच पुढचा मार्ग धरावा लागतो. त्यामुळे नागपूरला ‘गेट वे ऑफ सेंट्रल इंडियाज् जंगल्स’ असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

या नागपूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर वायव्य दिशेला एक छान जंगल आहे. त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. या जंगलाला संरक्षित वनाचा दर्जा देण्यात आला आहे. या जंगलाचं नाव आहे ‘गोरेवाडा’. कोणत्याही जंगलाची वर्गवारी ‘संरक्षित वन’, ‘अभयारण्य’, ‘राष्ट्रीय उद्यान’ किंवा ‘व्याघ्रप्रकल्प’ अशी केली जाते. पूर्वी गोरेवाडा हे केवळ एक जंगल म्हणून ओळखलं जाई. तिथं वनविभागानं उभारलेलं प्राणिसंग्रहालयही होतं. शिवाय, वन विभागाचं ‘रेस्क्यू सेंटर’ही तिथं होतं. सन २०१७ मध्ये सुमारे १९१४ हेक्टरवर पसरलेल्या या जंगलाला संरक्षित वनाचा दर्जा देण्यात आला. यात ५६४ हेक्टर भागात प्राणिसंग्रहालय आहे, तर २५ हेक्टर भागात ‘रेस्क्यू सेंटर’ आहे. उर्वरित भाग हा संरक्षित वनाचा आहे. नागपूरपासून अवघ्या २१ किलोमीटरवर असणाऱ्या या जंगलाला लागून मानवी वस्तीही आहे, त्यामुळे संपूर्ण जंगलाला काँक्रिटची संरक्षणभिंत बांधण्यात आली आहे.

गोरेवाडा जंगलाच्या विविध भागांची सविस्तर माहिती आता घेऊ या. प्राणिसंग्रहालय वगळता जंगलाला ‘गोरेवाडा बायो-पार्क’ असं म्हटलं जातं.

अप्रतिम निसर्गवैविध्य हे या संरक्षित वनाचं अर्थात ‘बायो-पार्क’चं वैशिष्ट्य. सर्वसामान्य नागरिकांना नैसर्गिक परिसंस्था म्हणजे काय हे कळून त्याबद्दल सविस्तर माहिती मिळावी, जंगलाचं महत्त्व कळावं या उद्देशानं या पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. जंगलाचा माणसाच्या दृष्टीनं असलेला उपयोग, माणसाचं जंगलावर असलेलं अवलंबित्व कळावं असा प्रयत्नही वनविभागानं इथं केला आहे.

त्यासाठीचे वेगवेगळे फलक इथं लावण्यात आलेले आहेत. या फलकांमुळे निसर्गाविषयीची माहिती पर्यटकांना मिळते. वनविभागानं इथं २.५ किलोमीटरचा एक सुंदर ‘नेचर ट्रेल’ तयार केला आहे. निसर्गमार्गदर्शकाच्या मदतीनं या ट्रेलचा आनंद घेता येऊ शकतो. जंगलात असलेल्या नानाविध जातींच्या झाडांमुळे आणि मुबलक पाणीसाठ्यामुळे इथं विविध पक्षी मोठ्या प्रमाणावर आहेत, तसंच वनविभागानं तिथं सफारीचंही आयोजन केलं आहे. त्यामुळे या जंगलात इतर वन्यप्राणी बघण्याचाही आनंद घेता येऊ शकतो.

या जंगलसफारीचं उद्घाटन ता. १७ डिसेंबर २०१५ रोजी महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं होतं. या ठिकाणी दिवसाच्या जंगलसफारीबरोबरच रात्रीच्या जंगलसफारीचीही सुविधा आहे, त्यामुळे जंगलातलं रात्रीचं जीवन कसं असतं तेही अनुभवता येतं. बिबट्या हा सस्तन प्राणिवर्गातला सदस्य इथल्या परिसंस्थेच्या उच्चस्थानी असलेला शिकारीप्राणी आहे. जंगलसफारीदरम्यान हा धूर्त शिकारी अवचित दर्शन देऊ शकतो. याशिवाय चितळ, नीलगाय, सांबर, ससे इत्यादी प्राणीही या सफारीच्या वेळी दिसू शकतात. या बायो-पार्कच्या २५ हेक्टर भागात वनविभागाचं रेस्क्यू सेंटरही आहे. आजूबाजूच्या प्रादेशिक जंगलांत निरनिराळ्या कारणांनी जखमी झालेले वन्यप्राणी आणि पक्षी सापडले तर त्यांना अधिक उपचारांसाठी इथं आणलं जातं. तिथं त्यासाठी सुसज्ज इस्पितळ आहे. या रेस्क्यू सेंटरमध्ये वाघ, अस्वल, बिबट्या, चितळ-सांबर यांसारखे शाकाहारी प्राणी उपचार घेत आहेत. काही प्रजातींचे पक्षीही आहेत. फक्त प्रादेशिकच नव्हे, तर महाराष्ट्राच्या इतर अभयारण्यांत, राष्ट्रीय उद्यानांत आणि व्याघ्रप्रकल्पांत सापडलेले जखमी प्राणीही इथं उपचारासाठी आणले जातात.

विस्तीर्ण प्रदेशात पसरलेला गोरेवाडा तलाव हे या जंगलाचं आणखी एक वैशिष्ट्य. गोंड राजाच्या शासनकाळात आजूबाजूच्या लोकांची पाण्याची गरज भागवण्याच्या दृष्टीनं हा तलाव बांधण्यात आला. ‘सीता’ नावाच्या गोंड महिलेनं या तलावाची निर्मिती केली, त्यामुळे या तलावाला ‘सीतागोंडीन तलाव’ असंही संबोधलं जाई. सन १९८२ मध्ये नागपूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेत या तलावाचा समावेश करण्यात आला. जवळच असलेल्या गोरेवाडा या गावामुळे या तलावाचं नामकरण ‘गोरेवाडा तलाव’ असं करण्यात आलं. आज अर्ध्या नागपूर शहराची तहान भागवणारा तलाव म्हणून हा तलाव ओळखला जातो. या तलावाचं व्यवस्थापन नागपूर महानगरपालिकेकडे आहे. काही कारणास्तव यातील पाणीसाठा कमी झाला तर नागपूरजवळ असणाऱ्या तोतलाडोह धरणातून इथं पाणी सोडण्यात येतं. जंगलाच्या एकूण परिसंस्थेच्या दृष्टीनं या तलावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी पाण्यासाठी या तलावावर अवलंबून आहेत. उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे वर्षभर मुबलक पाणीसाठा या तलावात असतो. तलावाच्या तीन बाजू नानाविध प्रकारच्या वृक्षांनी वेढलेल्या आहेत. थापट्या बदक, रेड क्रस्टेड पोचार्ड यांसारखे अनेक स्थलांतरित पक्षीही हिवाळ्यात तलावाच्या भागात स्थलांतर करून येतात. या ठिकाणी वनविभागानं निरीक्षणासाठी मनोरा उभारला आहे. पक्षी-प्राणिनिरीक्षणाचा आनंद त्यावरून घेता येतो, तसंच पक्षी-निरीक्षणासाठी दुर्बीण, स्पॉटिंग स्कोपची व्यवस्थाही वनविभागानं इथं केली आहे. सायकलिंगचा आनंदही इथं घेता येतो. इथं एका ‘सेल्फी पॉइंट’ची निर्मितीही करण्यात आली आहे.

गोरेवाडा जंगलाचा आणखी एक प्रमुख घटक आहे व तो म्हणजे इथलं प्राणिसंग्रहालय. या प्राणिसंग्रहालयाचं नाव नुकतंच चर्चेत आलं होतं. वर्तमानपत्रं आणि इतर माध्यमांतून ते अनेकांनी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे प्राणिसंग्रहालय आहे. या ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालया’चं’ उद्घाटन २६ जानेवारी २०२१ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. ५६४ हेक्टर एवढ्या विस्तीर्ण भागात पसरलेल्या प्राणिसंग्रहालयात विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात. यापैकी १४० हेक्टर भागात ‘इंडियन झू सफारी’ या आगळ्यावेगळ्या कल्पनेची सुरुवात वनविभागानं केली आहे. या प्राणिसंग्रहालयात असणाऱ्या आणि भारतात आढळणाऱ्या या वन्यप्राण्यांचं दर्शन इथं असणाऱ्या वनविभागाच्या गाड्यांनी प्रवास करून घेता येतं.

सध्या ‘राजकुमार’ नावाचा वाघ इथं येणाऱ्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. अनेक निसर्गपर्यटक केवळ या रुबाबदार वाघाला बघायला या इंडियन झू सफारीसाठी येतात. हा वाघ इथं का आणण्यात आला याची कथाही मोठी रंजक आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील जंगलात हा वाघ सर्वप्रथम आढळून आला होता. हळूहळू त्याची माणसांबद्दल असणारी भीती संपली आणि तो मानववस्तीजवळ वारंवार येऊ लागला. कोणत्याही माणसावर तो हल्ला करायचा नाही; पण माणसांबद्दल त्याच्यात आकर्षण निर्माण झालं होतं. याच आकर्षणातून डिसेंबर २०१७ मध्ये तो चक्क मासूल-खापा गावातल्या लग्नमंडपात अवतरला. त्यानंतर मात्र वनविभागानं त्याला पकडून गोरेवाडा इथं आणलं. आज तो ‘गोरेवाडा’चा आकर्षणबिंदू ठरला आहे.

नागपूरसारख्या दाट लोकवस्तीच्या भागापासून जवळ असूनही इथं मानव-वन्यप्राणी संघर्षाची एकही घटना घडलेली नाही. वनविभागाचं इथल्या जंगलभागावर असलेलं लक्ष आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे मानव आणि वन्यप्राण्यांचं खऱ्या अर्थानं असलेलं सहजीवन इथं पाहायला मिळतं. हेच सहजीवन माणसाच्या भवितव्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे जरी प्रत्येकानं आपल्या गोरेवाडाभेटीतून जाणलं तरी वनविभागाच्या परिश्रमांचं सार्थक होईल.

कसे जाल?

पुणे/मुंबई-नागपूर-गोरेवाडा

भेट देण्यास उत्तम कालावधी संरक्षित जंगल : ऑक्टोबर ते जून, प्राणिसंग्रहालय : पूर्ण वर्षभर

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : प्राणिसंग्रहालयात विविध प्रजातींचे प्राणी पाहायला मिळतात.

संरक्षित जंगलभागात : बिबट्या, सांबर, चितळ, ससा, मुंगूस, नीलगाय, कोल्हा, खोकड इत्यादी.

पक्षी : सुमारे २५० हून अधिक प्रजातींचे पक्षी : खाटीक, बुश चॅट्स, लावा, राखी तित्तर, हळद्या, शिंपी, कापशी, टिटवी, थिक-नी, हॅरिअर्स, कॉमन पोचार्ड, तलवारबदक, थापट्या, कोंब डक, रेड क्रस्टेड पोचार्ड, कमळपक्षी, ब्राँझ विंग्ड् जॅकाना, इत्यादी.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com