‘मानस’चा चित्रकार ‘तो’

भारताच्या ईशान्य भागात गेल्यावर निसर्ग वेड लावतो. निसर्गाची मनोहारी रूपं तिथं बघायला मिळतात. तिथल्या जंगलांमध्ये आपल्याला कमालीची जैवविविधता आढळते.
Gloden Monkey
Gloden MonkeySakal

आपला भारत देश संपूर्ण जगात एक समृद्ध देश मानला जातो. ही समृद्धी केवळ पैशात मोजता येणारी नाही. साहित्य, कला, ज्ञान, पौराणिक, ऐतिहासिक अशा अनेक गोष्टींचा समृद्ध वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि आपण तो जतन करून ठेवलेला आहे. या सगळ्यात आपणही कुठं मागं नाही हे निसर्गानंसुद्धा दाखवून दिलेलं आहे! आपल्या अमूल्य अशा वैविध्यपूर्ण खजिन्याची भारतावर उधळण करून निसर्गानं आपल्या देशाची समृद्धी शतपटींनी वाढवली आहे, त्यामुळे भारताच्या कोणत्याही भागातील निसर्गाची मजा लुटताना एक निराळाच आनंद मिळतो.

भारताच्या ईशान्य भागात गेल्यावर निसर्ग वेड लावतो. निसर्गाची मनोहारी रूपं तिथं बघायला मिळतात. तिथल्या जंगलांमध्ये आपल्याला कमालीची जैवविविधता आढळते. अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, सरीसृप यांचं माहेरघर असणाऱ्या अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण व्याघ्रप्रकल्पाविषयी आज माहिती घेऊ. या प्रकल्पाचं नाव आहे ‘मानस व्याघ्रप्रकल्प’. सन १९७३ मध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ची स्थापना झाल्यावर ज्या नऊ जंगलांना सर्वप्रथम व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा देण्यात आला त्यांपैकी एक म्हणजे ‘मानस व्याघ्रप्रकल्प’. भारत आणि भूतान यांच्या सीमेवर असलेलं नितांतसुंदर जंगल.

ता. एक ऑक्टोबर १९२८ रोजी सुमारे ३६० चौरस किलोमीटर क्षेत्रातील या जंगलाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर १९७३ मध्ये या जंगलाला बायोस्फीअरचा दर्जा देण्यात आला. व्याघ्रप्रकल्प म्हणून दर्जा मिळण्यापूर्वी हे जंगल ‘मानस संरक्षित वन’ आणि ‘उत्तर कामरूप संरक्षित वन’ म्हणून प्रसिद्ध होतं. पूर्वी गौरीपूरचे महाराज आणि कूचबिहारचे महाराज यांच्याकडून या जंगलाचा शिकारीसाठी उपयोग केला जात असे. शिकारीवर बंदी आणली गेल्यावर आणि व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाल्यावर जंगलाला मोठ्या प्रमाणावर संरक्षण मिळालं. काही प्रमाणात चोरट्या शिकारी होत असत; पण ७० व ८० च्या दशकात व्याघ्रप्रकल्पाचे पहिले क्षेत्रसंचालक देब रॉय आणि त्यांच्या टीमनं या शिकारींना आळा घातला. त्यांनी या भागातील शिकाऱ्यांना पकडण्याचं अथवा त्यांचा नायनाट करण्याचं काम एकहाती केलं होतं. त्या वेळेच्या सरकारकडून त्यांना तशा प्रकारची मुभा आणि स्वातंत्र्यही देण्यात आलं होतं.

हळूहळू ‘मानस’चं गतवैभव परत यायला लागलं आणि इथं आढळणाऱ्या एकशिंगी गेंड्यांची संख्या १०० पेक्षाही जास्त झाली. संरक्षणाच्या काटेकोर उपाययोजनांमुळे वाघांच्या संख्येतही चांगलीच वाढ झाली. आज सुमारे ५२६.२२ चौरस किलोमीटरचा कोअर भाग आणि सुमारे २३१०.८८ चौरस किलोमीटरचा बफर भाग मिळून सुमारे २८३७.१० चौरस किलोमीटर एवढ्या मोठ्या क्षेत्रात हा व्याघ्रप्रकल्प पसरलेला आहे. भूताननं आपल्या भागाकडील जंगलालाही संरक्षण दिलं आहे. भूतानमधील सुमारे १०५७ चौरस किलोमीटर पसरलेल्या या जंगलाला ‘रॉयल मानस राष्ट्रीय उद्यान’ म्हणून ओळखलं जातं.

या जंगलाला मानस हे नाव ब्रह्मपुत्रा नदीच्या ‘मानस’ या उपनदीवरून मिळालं आहे. मानस व्याघ्रप्रकल्पाच्या पश्चिम भागातून वाहणारी ही महत्त्वाची नदी या जंगलातील अनेक जीवांची तहान भागवते. याशिवाय आणखी पाच छोट्या नद्याही जंगलातून वाहतात. मानस ही नदी भारतातून तर वाहतेच; याशिवाय भूतानमधूनही सुमारे २७२ किलोमीटरचा प्रवास ही नदी करते आणि पुन्हा भारतात येते.

पुढं ही नदी जोगीगोपा इथं ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. आख्यायिकेनुसार, भगवान शंकराची मानसकन्या आणि नागदेवता मनसा या देवीवरून या नदीला मानस हे नाव मिळालं आहे. मानस व्याघ्रप्रकल्पात आढळणाऱ्या जैवविविधतेच्या दृष्टीनं या नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्व हिमालयाच्या रांगांमुळे इथं निमसदाहरित आणि ओलसर पानगळी वनप्रकार आढळतो. याशिवाय, तराई गवताळ प्रदेशानं जंगलाचा ५० टक्क्यांहून अधिक भाग व्यापला आहे. यामुळे या भागात निरनिराळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक, सरीसृप पाहायला मिळतात. एकशिंगी गेंडा, वाघ, हत्ती यांसाठी ‘मानस’ प्रसिद्ध आहेच; पण आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांसाठीही ते प्रसिद्ध आहे. रानम्हैस, अतिशय दुर्मिळ गोल्डन लंगूर (सोनेरी वानर), पिग्मी हॉग, हिस्पीड हेअर, दुर्मिळ ढगाळ बिबट्या (क्लाउडेड लेपर्ड) या प्राण्यांसाठी ‘मानस’ विशेष प्रसिद्ध आहे, तसंच तिथं बेंगाल फ्लोरिकन हा दुर्मिळ पक्षीही आढळतो. आसाम रुफ्ड टर्टल ही कासवाची प्रजातही तिथं पाहायला मिळते.

‘मानस’चं मुख्य आकर्षण म्हणजे केवळ ईशान्य भारत आणि भूतान या भागांत आढळणारं सोनेरी वानर. सोनेरी वानर ही वानरांमधील एक जात आहे. ही वानरं ईशान्य भारत आणि भूतानमध्ये ‘प्रदेशनिष्ठ’ आहेत. इतर वानरांपेक्षा ही जात अत्यंत दुर्मिळ आहे व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या वानराची फर सोनेरी रंगाची असते म्हणून त्याला सोनेरी वानर असं म्हणतात.

या वानराची उंची साधारणपणे अर्धा मीटरपर्यंत असते व वजन १०-१२ किलोपर्यंत भरतं. झाडांची पानं व फळं हा यांचा मुख्य आहार आहे. इतर वानरांप्रमाणेच ही वानरंही मुख्यत्वे कळप करून राहतात. कळपाचा म्होरक्या नर असतो व इतर माद्या असतात. या जंगलाला नुसताच संवर्धनाचा आणि संरक्षणाचा इतिहास नाही. या जंगलाची एक काळी बाजूही आहे. बोडो दहशतवाद्यांच्या कारवायांंनी या जंगलाचा मोठा भाग एकेकाळी ग्रस्त होता. पूर्वी बऱ्याचदा लपण्यासाठी ते या जंगलाचा आश्रय घेत असत. शिवाय, शस्त्रास्‍त्रं विकत घेण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी त्यांच्याकडून वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणावर शिकारही केली गेली. वनविभागातील काही कर्मचाऱ्यांच्या हत्याही त्यांनी केल्या. त्यात मुख्यत्वे फॉरेस्ट गार्डना जीव गमावावा लागला. पुढं २००३ मध्ये ‘बोडोलँड क्षेत्रीय परिषदे’च्या स्थापनेनंतर या परिस्थितीत बदल झाला आणि आता हे जंगल वन्यजीवांसाठी आणि इथं काम करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसाठीही सुरक्षित झालं आहे.

अतिशय दुर्मिळ प्राणी-पक्षी आढळणाऱ्या या जंगलाचं संरक्षण-संगोपन-संवर्धन करणं हे केवळ आपल्या हातात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जैवविविधता एका जंगलात बघायला मिळणं हा खरं तर आपल्यासाठी आनंदाचा योग. एकदा का या जंगलाला भेट दिली की या जंगलाच्या सौंदर्यानं आपलं भान हरपून जातं. निसर्गाचे विविध रंग इथं आल्यावर बघायला मिळतात. या रंगांत न्हाऊन निघाल्यावर एक निराळं समाधान लाभतं. या समाधानाचं मूल्य पैशात करता येणं असंभवच. या समाधानाच्या भावनेतूनच ‘मानस’च्या या अप्रतिम चित्राच्या ‘चित्रकारा’समोर म्हणजेच निसर्गासमोर आपण नतमस्तक होतो!

कसे जाल?

पुणे/मुंबई-गुवाहाटी-मानस

भेट देण्यासाठी उत्तम कालावधी

नोव्हेंबर ते एप्रिल

काय पाहू शकाल? :

सस्तन प्राणी : सुमारे ६० प्रजाती. सोनेरी वानर, वाघ, बिबट्या, हत्ती, ढगाळ बिबट्या (क्लाउडेड लेपर्ड), हुलॉक गीबॉन, कॅप्ड् लंगूर, आसामी मकॉक, स्लो लॉरिस, पिग्मी हॉग, अस्वल, गवा, एकशिंगी गेंडा, रानम्हशी इत्यादी.

पक्षी : सुमारे ४५० हून अधिक प्रजातींचे पक्षी. ग्रेट हॉर्नबिल, रुफस नेक्ड् हॉर्नबिल, खलीज फिजंट, रेड ब्रेस्टेड पॅराकिट, पाईड हॅरियर, बेंगॉल फ्लोरिकन, क्रेस्टेड किंगफिशर, स्कार्लेट बॅक्ड् फ्लॉवरपेकर, मर्गेंझर इत्यादी.

सरपटणारे प्राणी : मगर, आसाम रुफ्ड् टर्टल, नागराज, अजगर, धामण, नाग, घोणस, इंडियन सॉफ्टशेल टर्टल इत्यादी.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com