निसर्गसंपन्न मयूरेश्वर

पुणे जिल्ह्यात असणाऱ्या एका सुंदर अभयारण्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. अष्टविनायकांपैकी एक मोरगावच्या मोरेश्वराच्या सानिध्यात असलेलं सुरेख अभयारण्य. मयूरेश्वर वन्यजीव अभयारण्य’.
Chinkara
ChinkaraSakal

महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा अनेक आघाड्यांवर अग्रणी असा जिल्हा समजला जातो. पुणे जिल्ह्याला लाभलेला रांगड्या सह्याद्रीचा शेजार, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले अनेक गडकिल्ले, मराठी साम्राज्याच्या पराक्रमाचा देदीप्यमान इतिहास सांगणाऱ्या अनेक ऐतिहासिक जागा, अष्टविनायकांसारखी अनेक धार्मिक स्थळं, समृद्ध परंपरेचा आणि संस्कृतीचा वारसा सांगणारी गावं, आपल्या अतुल्य सौंदर्याने वेड लावणारी जंगलं आणि त्यात सापडणारी जैवविविधता अशा अनेक गोष्टींचा वसा पुणे जिल्ह्याला लाभला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक या गोष्टी अनुभवण्यासाठी पुण्यात येतात आणि तृप्तीची भावना मनात घेऊन परततात.

पुणे जिल्ह्यात असणाऱ्या अशाच एका सुंदर अभयारण्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. अष्टविनायकांपैकी एक मोरगावच्या मोरेश्वराच्या सानिध्यात असलेलं सुरेख अभयारण्य. मयूरेश्वर वन्यजीव अभयारण्य’. एका सुंदर प्राण्याच्या संरक्षणासाठी १९९७ मध्ये १९ ऑगस्टला या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. हा प्राणी म्हणजे चिंकारा. कुरंग वर्गात मोडणाऱ्या या हरणाच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि पुरंदर या तीन तालुक्यांच्या संगमावर वसलेल्या ५१४.५५ हेक्टर जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.

पुणे शहराकडून आपण बारामतीच्या दिशेने निघालो की आपल्याला अनेक ठिकाणी गवताळ माळरानं बघायला मिळतात. चिंकारा हरणांसाठी आदर्श समजण्यात येणारा अशा प्रकारचा अधिवास मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे चिंकारांची मोठी संख्या आपल्याला सुपे गावातील मयूरेश्वरामध्ये बघायला मिळते.

चिंकारा हा कुरंग अर्थात अँटीलोप या हरणाच्या उपकुळातला प्राणी आहे. भारत, बांगलादेश, इराण व पाकिस्तान या देशांच्या गवताळ आणि वाळवंटी प्रदेशांत हा प्राणी आढळतो. भारताच्या वायव्य व मध्य भागातील मैदानी प्रदेश, टेकड्यांचा प्रदेश आणि महाराष्ट्राचा गवताळ माळरानांचा प्रदेश यात हा प्राणी आढळतो. चिंकारा बांधेसूद आणि डौलदार प्राणी आहे. पूर्ण वाढ झालेल्या नराची खांद्यानजीक उंची सुमारे ६५ सेंमी. आणि वजन २०-२५ किलो असते. पाठीचा रंग गडद तपकिरी असून पोटाकडील भाग फिकट असतो. चेहऱ्यावर दोन्ही बाजूंना तोंडापासून डोळ्यांपर्यंत एक पांढरी रेषा गेलेली दिसते. नाकाच्या वर गडद तपकिरी चट्टा असतो. शिंगे सुमारे २५-३० सेंमी. लांब असतात. मादीची शिंगे आखूड व नितळ असतात. शेपूट आखूड असते. यांचे डोळे, कान आणि नाक तीक्ष्ण असतात.

चिंकाऱ्याचे लहान कळप असतात. चिंकाराचा पळण्याचा वेगही चांगलाच असतो. हा प्राणी बुजरा असून मानवी वस्तीपासून दूर राहतो. सकाळी व संध्याकाळी चिंकारे दिसण्याची शक्यता जास्ती असते . गवत, पाने व निरनिराळी फळे हे त्यांचे मुख्य अन्न. पाण्याशिवाय ते खूप वेळ राहू शकतात. कारण खाद्यातून मिळणारे पाणी त्यांना दीर्घकाळ पुरते. प्रजनन काळ निश्चित नसून ऑक्टोबर-जानेवारी या कालावधीत हे प्राणी मिलनासाठी एकत्र येतात. मादी वर्षातून दोनदा पिल्लांना जन्म देते. एका वेळी मादीला एक किंवा दोन पिल्ले होतात. राजस्थानात बिष्णोई जमातीच्या लोकांनी या प्राण्याला मोठ्या प्रमाणावर संरक्षण दिलेले आहे.

मयूरेश्वर अभयारण्याचा परिसर हा मुख्यत्वे कमी पावसाचा प्रदेश आहे. वनविभागाच्या प्रयत्नांमुळे अभयारण्यात असलेल्या पाणीसाठ्यात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी वनविभागाने काही कृत्रिम पाणवठे बनविले आहेत. संरक्षणामुळे इथल्या वन्यजीवनात आपल्याला लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळते. सुमारे ४०० पेक्षा अधिक चिंकारांची नोंद मयूरेश्वर मध्ये करण्यात आली आहे. शुष्क काटेरी वन या प्रकारात मयूरेश्वराचे जंगल मोडते. सपाट माळरानेही येथे मोठ्या प्रमाणावर आहेत. या माळरानांवर अवलंबून असणाऱ्या सुमारे ५० हून अधिक प्रजातींचे पक्षी आपल्याला येथे पहावयास मिळतात. काही स्थलांतरित पक्षीही येथे पहावयास मिळतात. सुमारे १८० प्रजातींच्या वनस्पती, सुमारे १०० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी, सुमारे १२ प्रजातींचे सरपटणारे प्राणी, सुमारे १२ प्रजातींचे उभयचर आपल्याला येथे बघायला मिळतात. कुसळी, मारवेल, पवन्या या प्रजातींचे गवतही येथे आढळते.

सस्तन प्राण्यांमध्ये भारतीय लांडगा हा वैविध्यपूर्ण आणि दुर्मीळ होत चाललेला प्राणीही येथे आढळतो. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की येथे येणाऱ्या मेंढपाळांच्या पाठोपाठ या भागातील लांडगेही जागा बदलतात. पण विणीच्या हंगामात या टोळ्या मयूरेश्वरामध्ये आश्रय घेतात. याशिवाय तरस, कोल्हा, रानमांजर असे सस्तन प्राणीही येथे आढळून येतात. घोरपड या प्राण्याचीही नोंद अभयारण्यात झालेली पाहायला मिळते. जंगलाच्या नजीकच मोठ्या प्रमाणावर शेती आहे. शेती आणि जंगल यात खांब किंवा खंदक याद्वारे सीमारेषा आखली आहे. मानव-वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी व्हावा यासाठी वनविभागाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. वन विभागाच्या प्रयत्नांमुळे अभयारण्याच्या भागातच पाणी, खाद्य वगैरे मिळत असल्यामुळे प्राण्यांचे अभयारण्याच्या बाहेर येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

अप्रतिम निसर्ग सौंदर्य, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली सपाट माळरानं आणि त्यावर आढळणारं वैशिष्ट्यपूर्ण वन्यजीवन, डोळ्याचं पारणं फेडणारे चिंकारांचे कळप, दुर्मिळ लांडग्यांच्या टोळ्या यामुळे मयूरेश्वर अभयारण्य आपल्या मनात घर करून राहतं. शेजारी असलेल्या मोरेश्वराच्या नावावरून नाव मिळालेलं हे अभयारण्य आकाराने छोटं असलं तरीही त्यात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते. आणि ती आपल्या मनावर वेगळीच जादू करते.

कसे जाल?

पुणे/मुंबई-चौफुला-मोरगाव रस्ता-सुपे

भेट देण्यास उत्तम हंगाम

जून ते मार्च

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : वटवाघळांच्या काही प्रजाती, मुंगूस, जवादी मांजर, उदमांजर, खवल्या मांजर, साळिंदर, रानससा, वानर, कोल्हा, खोकड, रानडुक्कर, चिंकारा, भेकर, भारतीय लांडगा, तरस, इ.

पक्षी : टकाचोर, हळद्या, नाचण, मॉटल्ड वूड आउल, पिंगळा , दयाळ, सोनपाठी सुतार, सर्पगरुड , रानलावा, खडकलावा, राखी तित्तर, भटतित्तर, चंडोल, सुगरण, डोंबारी, कोतवाल, करडा कोतवाल, माळटिटवी, नकल्या खाटीक, तुईया, पावश्या, चातक, ढोकरी, गायबगळा, भारद्वाज, सातभाई, रानभाई, वटवट्या, इ.

सरपटणारे प्राणी : सरडा, घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, दुतोंड्या, तस्कर, धामण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, हरणटोळ, मांजऱ्या, नाग, फुरसे, मण्यार, घोणस, इ.

वृक्ष : बहावा, बाभूळ, बोर, नीम, पळस, पांगारा, पिंपळ, वड, उंबर, आपटा, इ.

झुडुपे : लोखंडी, मुरुडशेंग, निरगुडी, रुई, तरोटा, रानतुळस, इ.

(सदराचे लेखक ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’ चे सदस्य आहेत) (शब्दांकन : ओंकार बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com