esakal | गजराजाच्या साम्राज्यात राजाजी I Rajaji National Park
sakal

बोलून बातमी शोधा

Elephant

गजराजाच्या साम्राज्यात राजाजी

sakal_logo
By
अनुज खरे informanuj@gmail.com

उत्तर भारतातल्या जंगलांनी मला कायमच भुरळ घातली आहे. इथल्या जंगलांचं सौंदर्य, इथल्या प्राण्या-पक्ष्यांमध्ये असणारी विविधता, भूप्रदेशाचे प्रकार, यामुळे इथला निसर्ग अधिकच बहरला आहे. पक्षी निरीक्षण हा एकूणच माझा जिव्हाळ्याचा विषय. शाळेत आणि कॉलेजात असताना मी पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात तासनतास पक्षी निरीक्षण करण्यात घालवत असे. पक्षी, त्यांच्या घरट्यांचे आकार, त्यांच्या खाण्याच्या पद्धती, खाण्याच्या प्रकारात असलेली विविधता याचं निरीक्षण करणं आणि त्याची टिपणं उतरवून ठेवणं हा माझा अत्यंत आवडीचा विषय. उत्तर भारतातल्या जंगलात दिसणारे पक्षी हे आपल्याकडे दिसणाऱ्या पक्ष्यांपेक्षा निराळे. त्यांचं निरीक्षण करणं आणि आपल्याकडे असणाऱ्या पक्ष्यांशी त्यांची तुलना करणं मला आवडतं. त्यामुळे एकूणच या उत्तर भारतातल्या जंगलांचं मला भयंकर अप्रूप वाटत आलं आहे.

यामुळे मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जिम कॉर्बेट, बारसें, सिंगबा, दुधवा अशा ठिकाणी तिथल्या निसर्ग संपदेचा आनंद लुटण्यासाठी जात असे. बारसें, सींगबा या ठिकाणी पक्षी निरीक्षण करण्याचा आनंदच विरळा.

या सगळ्यात मला आणखी एका जंगलाने निसर्ग निरीक्षणाचा आनंद दिला. ते म्हणजे राजाजी राष्ट्रीय उद्यान. उत्तराखंड राज्यातील हिमालय पर्वताच्या शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याला वसलेल्या या जंगलात आपल्याला अप्रतिम भौगोलिक विविधतेसोबत अप्रतिम जैवविविधताही आढळते.

उत्तराखंड राज्यातील डेहराडून, पौडी गढवाल आणि हरिद्वार या जिल्ह्यात वसलेल्या या राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती १९८३ मध्ये करण्यात आली. मोतीचूर वनविहार, राजाजी वनविहार आणि चिला वनविहार या तीन जंगलांना मिळून १९८३ मध्ये या जंगलाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. कालांतराने भारतीय हत्ती आणि वाघ यांच्या संरक्षणासाठी या जंगलाला २०१५ मध्ये १५ एप्रिलला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली. सुमारे ८१९.५४ चौरस किलोमीटरचा कोअर भाग आणि सुमारे २५५.६३ चौरस किलोमीटरचा बफर भाग मिळून सुमारे १०७५.१७ चौरस किलोमीटर एवढ्या मोठ्या भागात हा व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि १९५४ मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलेले चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्यावरून या राष्ट्रीय उद्यानाला राजाजी राष्ट्रीय उद्यान हे नाव देण्यात आले. राजगोपालाचारी यांना राजाजी किंवा सी. आर. या नावाने ओळखले जाई.

देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंड राज्यातील या सुंदर जंगलातून गंगा नदी वाहते. जंगलाच्या सुमारे २४ किमी एवढ्या भागातून वाहणाऱ्या गंगा नदीने जंगलातील वन्यजिवांची पाण्याची प्रमुख गरज भागवली आहे. शिवालिक टेकड्यांमुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येथे पाऊस पडतो. उंच देवदार वृक्षांमुळे जंगलाच्या सौंदर्यात भर पडली आहे. याशिवाय नदीलगतच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गवताळ कुरणे आढळून येतात. देवदार या मुख्य वृक्षाखेरीज जंगलात रोहिणी, अमलतास, शीसम, साल, पळस, अर्जुन, सावर, आवळा, बेल अशा अनेक प्रकारची झाडं आढळून येतात.

याशिवाय प्राणी, पक्षी, कीटक, उभयचर, फुलपाखरे या सगळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर विविधता आढळून येते. जंगलाचे मुख्य आकर्षण म्हणजे हत्ती. हत्ती हा जमिनीवर राहणारा सर्वांत मोठा व शक्तिमान प्राणी आहे. एकूण प्राणिसृष्टीत फक्त काही देवमासे हत्तीपेक्षा मोठे आहेत. लांब सोंड हे त्याचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. वरचा ओठ व नाक पुष्कळ लांब होऊन सोंड बनली आहे. त्याचे सुपासारखे सपाट कान सर्व प्राण्यांत मोठे आहेत. त्याचे सुळे सर्व प्राण्यांच्या दातांच्या तुलनेत सर्वाधिक लांब आहेत.

शरीराचे प्रचंड वजन पेलणारे त्याचे पाय जाड खांबांसारखे असतात. त्याचे डोके प्रचंड मोठे असून शरीराच्यामानाने त्याचा मेंदू लहान असतो. त्याचा रंग करडा, तपकिरी व काळपट असून शरीरावरील केस विरळ व राठ असतात. हत्तींच्या दोन उपजाती आफ्रिकेमध्ये सापडतात तर तिसरी उपजात आशिया खंडात सापडते. आशियाई हत्ती भारत, कंबोडिया, चीन , इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, श्रीलंका, थायलंड व व्हिएटनाम येथील वनांत आढळतात. प्रौढ नराची खांद्याजवळ उंची २.७-३.२ मी. व वजन ३,६०० किग्रॅ.पर्यंत असते. मादीची खांद्याजवळ उंची सु. २.४ मी., तर वजन सु. ३,००० किग्रॅ. असते. त्याचा रंग फिकट करडा असून त्यावर फिकट गुलाबी व पांढरे ठिपके असतात. कपाळावर कानाच्या अगदी वर दोन उंचवटे असतात.

बहुतेक नरांचे सुळे सुमारे १.२-१.५ मी. लांब असतात. काही हत्तींना सुळे नसतात, त्यांना ‘मखना’ म्हणतात. हत्तीला प्रत्येक जबड्यात एकूण सहा दाढा येतात. एका वेळेस दोनच दाढा येतात. यांपैकी एक पूर्ण वाढलेली व दुसरी अर्धवट हिरडीवर आलेली असते. नवीन येणारी दाढ पहिल्या दाढेमागे व पहिलीपेक्षा आकारमानाने मोठी असते. दुधाच्या दाढा दुसऱ्या वर्षी पडतात. दुसऱ्या दाढांचा संच सहाव्या वर्षी, तिसरा संच नवव्या वर्षी, चवथा संच २०-२५ वर्षांदरम्यान म्हणजे हत्ती पूर्ण वयात येतो तेव्हा आणि पाचवा संच ६० व्या वर्षी येतो आणि सहावा संच शेवटपर्यंत राहतो. हत्तीचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते. वास घेण्यासाठी त्याला सोंडेची फार मदत होते. गंधाच्या संवेदनेवर तो इतर संवेदनांपेक्षा जास्त अवलंबून असतो. सोंड हवेत उंच धरून तो ती सतत हलवितो. याद्वारे त्याला अन्न आणि शत्रू यांचा गंध लक्षात येतो. सुमारे ६ किमी.हून अधिक दूर असलेल्या माणसाचा गंध त्याला कळू शकतो. आसपास वाघ आल्यास त्याच्या गंधाने तो अस्वस्थ होतो व त्याचा श्वासोच्छ्वास जोराने होऊ लागतो आणि तो सोंडेचे टोक एकसारखे जमिनीवर आपटतो.

हत्तीला चांगले ऐकू येते. माणसाला जाणवणाऱ्या ध्वनीच्या पल्ल्या-खालील ध्वनी (अवश्राव्य ध्वनी) हत्ती काढू व ऐकू शकतो. हत्ती किमान चार किलोमीटर अंतरावरून एकमेकांशी संपर्क साधू शकतात. गवत, जलवनस्पती, वृक्षांची पाने, मुळे, साली, फांद्या वफळे, झुडपे इ. हत्तीचे खाद्य आहे. मोठा प्रौढ वन्य हत्ती दिवसभरात १४० किलोग्रॅमपर्यंत खाद्य खातो व १५० लिटरर्यंत पाणी पितो. तो पाण्याशिवाय तीन दिवस राहू शकतो. अन्नपाण्याच्या उपलब्धतेनुसार ते हंगामी स्थलांतर करतात. या काळात ते स्मृतीचा चांगला वापर करतात. त्यांनी स्थलांतरणाच्या मार्गावरील पाण्याचे स्रोत लक्षात ठेवलेले असतात. दुष्काळात हत्तींना नाले, ओढे, नदी यांच्या पात्रांतील पाण्याच्या जागा कळतात. तेथे ते पायाने किंवा सोंडेने एक मीटरपर्यंत जमीन उकरून पाणी मिळवितात. हे पाणी इतर प्राण्यांनाही उपलब्ध होते. राजाजी राष्ट्रीय उद्यानात सुमारे पाचशेहून अधिक हत्ती आहेत. हत्तींच्या अधिवासाच्या दृष्टीने या जंगलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

एकूणच तुम्ही एकदा या जंगलात आलात की त्या जंगलाच्या प्रेमात पडता. सारखं सारखं या जंगलात यावं असं वाटतं. या जंगलात फिरताना, इथला संपन्न निसर्ग बघताना आपलं भान हरपून जातं. हरिद्वार, ऋषिकेश सारख्या पवित्र स्थानांचा शेजार लाभलेल्या या जंगलात आल्यावर निसर्ग आणि आपण यांच्यातल्या मी-तू पणाची बोळवण होते. आपल्यातली आणि निसर्गातली द्वैतावस्था संपून आपण अद्वैत होतो. आणि मग खरा निसर्ग आपल्याला कळायला लागतो. त्याच्या सहवासात आपण अधिक समृद्ध होत जातो.

कसं जाल?

पुणे/मुंबई-दिल्ली-मीरत-खतौली-मुझफ्फर नगर-रुरकी-हरिद्वार-चिला राजाजी

भेट देण्यास उत्तम हंगाम -

नोव्हेंबर ते जून

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : वाघ, बिबट्या, हत्ती, सांबर, चितळ, भेकर, मुंगुस, वानर, लालतोंडी माकड, नीलगाय, अस्वल, हॉग डियर,अस्वल , येलो थ्रोटेड मार्टिन, इ.

पक्षी : ग्रीन मॅगपाय, रंगीत करकोचा, तिरंदाज, काळ्या मानेचा करकोचा, कुरव चोचीचा सुरय, मत्स्यगरुड, रुफस-बेलीड निल्टावा, व्हाईट-कॅप्ड रेडस्टार्ट, खलीज फिजंट, ब्लू-थ्रोटेड बार्बेट, ब्लू विन्ग्ड मीनला, टॉनी फिश आउल, लिनीएटेड बार्बेट , तांबट, ब्लॅक नेप्ड ग्रीन वूडपेकर, सोनेरी पाठीचा सुतार, लॉंग टेल्ड ब्रॉडबिल, हळद्या इ.

सरपटणारे प्राणी : मगर, कासव, सुसर, धामण, नाग, घोणस, हिमालयन पिट वायपर, मण्यार, घोरपड, इ.

(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

loading image
go to top