esakal | पक्ष्यांचं दक्षिणेतील माहेरघर; रंगनथिट्टू आणि गुदावी
sakal

बोलून बातमी शोधा

Ranganathittu Bird Sanctuary

पक्ष्यांचं दक्षिणेतील माहेरघर; रंगनथिट्टू आणि गुदावी

sakal_logo
By
अनुज खरे informanuj@gmail.com

दक्षिण भारतातील काही जंगलांची माहिती आपण याअगोदर घेतली आहे. दक्षिण भारतातील निसर्गाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं राज्य असलेल्या कर्नाटकात अनेक जंगलं आहेत. कर्नाटकाच्या सुंदरतेत या जंगलांनी भर घातली आहे; पण ही सगळीच जंगलं एकसारखी नाहीत. त्यातही विविधता आढळते. कर्नाटकाच्या उत्तर भागात शुष्क प्रकारची काही वनं आढळतात. त्यात मुख्यत्वे छोटी झुडपं आणि मोकळी माळरानं असलेली वनं आहेत, तर पूर्व भागात कमी शुष्क वनं आहेत. यातही झुडपी वनं आणि मोकळी माळरानं आहेत. कर्नाटकाच्या पश्चिम भागात अरबी समुद्र असल्यामुळे त्या भागातही वेगळ्या प्रकारची वनं आढळतात, तर दक्षिण दिशेला प्रामुख्यानं सदाहरित वनं आढळतात. या विविधतेमुळे इथले प्राणी, पक्षी, कीटक, झाडं, सरपटणारे प्राणी यांतही कमालीची विविधता पाहायला मिळते.

अत्यंत रमणीय भूप्रदेश, वनांच्या विविधतेमुळे ठायी ठायी भरलेली जैवविविधता यामुळे कर्नाटकाला अनेक निसर्गप्रेमी भेट देतात. या विविधतेमुळे कर्नाटकातील जंगलात अगदी हत्तीपासून ते वाघापर्यंत प्राणी पाहायला मिळतात. सरपटणाऱ्या प्राण्यांतही विविधता आहे. तीच गोष्ट पक्ष्यांबाबत. इथं पक्ष्यांच्या विविध प्रजाती आहेत. केवळ पक्षीनिरीक्षणासाठी अनेक निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी, वन्यजीव-छायाचित्रकार कर्नाटकाला भेट देतात. पश्चिम घाटाचं कर्नाटकातील अस्तित्व हे पक्षीवैभवाचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. या पश्चिम घाटात अनेक दुर्मिळ पक्षीही पाहायला मिळतात. शिवाय, पश्चिम घाट हा उगमस्थान असलेल्या अनेक नद्या कर्नाटकातून वाहतात. यांपैकी काही नद्यांवर धरणंही आहेत. या नद्यांची पात्रं, धरणांचे जलाशय, मोठमोठे तलाव या ठिकाणी पाणथळी पक्ष्यांची विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. खासकरून पाणथळी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दोन अभयारण्यांची माहिती आज आपण घेऊ या.

यातलं पहिलं पक्षी-अभयारण्य म्हणजे ‘रंगनथिट्टू पक्षी-अभयारण्य’. कर्नाटकातील अनेक समृद्ध पाणथळ जागांपैकी एक. अशा पाणथळ जागी तयार झालेली इकोसिस्टिम हीही तितकीच समृद्ध असते. नद्या, तलाव, धरणांचे जलाशय यांच्या आजूबाजूला तयार झालेल्या दलदलीच्या पाणथळ जागा, त्यांच्या आसपास असलेली गवताळ कुरणं यांची मिळून ही इकोसिस्टिम असते. कर्नाटकाचा विचार केला तर राज्यात सुमारे ४८ हजार लहान-मोठी तळी आहेत, तर सुमारे २३२ धरणं आहेत. या सर्व पाणवठ्यांच्या काठावर असलेलं पक्षी-जीवन कर्नाटकाच्या निसर्गवैभवात भर टाकतं.

या सगळ्या पाणथळ जागांमध्ये ‘रंगनथिट्टू पक्षी-अभयारण्य’ हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. पक्षी-निरीक्षणासाठी आणि पक्षी पाहण्यासाठी अत्यंत आदर्श अशी जागा. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात असणारं हे अभयारण्य कावेरी नदीवर तयार झालं आहे. कावेरीत असलेली सहा छोटी-मोठी बेटं हा या अभयारण्याचा महत्त्वाचा भाग आहे. जगप्रसिद्ध पक्षी-तज्ज्ञ सालीम अली यांनी या भागाला भेट दिली होती. या भागाचं निरीक्षण केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की, इथं मोठ्या प्रमाणावर पक्षी-वैभव आहे. शिवाय, त्यांच्या विणीच्या हंगामात बांधलेली घरटीही मोठ्या प्रमाणावर आहेत. ही इकोसिस्टिम वाचवायची असेल तर या भागाला संरक्षण देणं अतिशय गरजेचं आहे. त्यांनी ही बाब तेव्हाच्या म्हैसूर राजाच्या लक्षात आणून दिली आणि त्यांना हा भाग वाचवण्याची गळ घातली, त्यामुळे म्हैसूरच्या राजानं ता. एक जुलै १९४० रोजी या जागेला पक्षी-अभयारण्य म्हणून मान्यता दिली. पुढं भारत स्वतंत्र झाल्यावरही या जागेचा पक्षी-अभयारण्याचा दर्जा कायम राखला गेला. वनविभागानं या अभयारण्याच्या संरक्षणासाठीही विशेष प्रयत्न केले आहेत. पक्षी-अभयारण्याच्या पश्चिम भागाला पक्षी-निरीक्षक मोठ्या संख्येनं भेट देतात. अभयारण्याचा पूर्व भाग ‘गेंदेहोसहल्ली’ हाही पक्षी-वैभवासंदर्भात समृद्ध आहे; पण या भागाकडे तुलनेनं कमी पर्यटक भेट देतात.

पक्षी-निरीक्षणाला जाण्यासाठी बोटींचा वापर केला जाऊ शकतो. विविध प्रजातींच्या पक्ष्यांशिवाय काही प्रजातींचे प्राणीही या भागात आहेत.

कर्नाटकातील दुसरं महत्त्वाचं अभयारण्य म्हणजे ‘गुदावी पक्षी-अभयारण्य’. शिमोगा जिल्ह्यातील हे पक्षी-अभयारण्य केवळ पाणथळी पक्ष्यांसाठीच नव्हे, तर इतर पक्ष्यांसाठीही महत्त्वाचं स्थान आहे. ता. १० जुलै १९८९ रोजी या जंगलाला पक्षी-अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली. अभयारण्याच्या पश्चिम आणि उत्तर भागात काही प्रमाणावर शेती आहे, तर पूर्व आणि दक्षिण बाजूला ओलसर पानगळी जंगल आहे. हे छोटं अभयारण्य सुमारे २१७ प्रजातींच्या पक्ष्यांचं आश्रयस्थान आहे. यांपैकी सुमारे ६३ प्रजाती पाणथळी जातीतील आहेत. जून ते नोव्हेंबर या कालावधीत विणीचा हंगाम असतो. सुमारे २० प्रजाती इथं आपली वीण करतात. सरासरी आठ हजार व्हाईट आयबीस या अभयारण्याला दरवर्षी भेट देतात. काही कालावधीसाठी इथं वास्तव्य करतात. बाकीचे पक्षीही मोठ्या प्रमाणावर इथं येतात.

अभयारण्यात असलेला नैसर्गिक तलाव हे या पक्ष्यांचं मुख्य आश्रयस्थान आहे. या तलावाच्या भोवती असलेली दाट झाडं या पक्ष्यांना आडोसा मिळवून देतात. पक्षी-निरीक्षणासाठी या तलावावर वनविभागातर्फे सोय करण्यात आली आहे. इथं बांधलेल्या मचाणावर बसून पक्ष्यांचं निरीक्षण करता येऊ शकतं.

कर्नाटक राज्यातील या दोन पक्षी-अभयारण्यांनी कर्नाटकच्या निसर्गसौंदर्यात मोलाची भर घातली आहे. हजारो पक्षी-निरीक्षक या दोन्ही अभयारण्यांना दरवर्षी भेट देतात. या ठिकाणी येऊन पक्षी-निरीक्षणाचा आनंद लुटणं म्हणजे पाण्याच्या काठावर घडणारा एखादा चित्रपट पाहण्यासारखं आहे! यातील प्रत्येक ‘कलाकार’ आपली भूमिका चोख वठवतो आणि पर्यटकांना अमर्याद आनंद देऊन जातो.

कसे जाल?

रंगनथिट्टू पक्षी-अभयारण्य : पुणे/मुंबई-बंगळूरू-श्रीरंगपट्ट- रंगनथिट्टू

भेट देण्यासाठी उत्तम कालावधी

नोव्हेंबर ते मार्च

काय पाहू शकाल? :

सस्तन प्राणी : बॉनेट मकाक, मुंगूस, उदमांजर, पाणमांजर (ऑटर), फ्लाइंग फॉक्स इत्यादी.

पक्षी : ग्रेट स्टोन प्लोवर, नदी सुरय, क्लिफ स्वॅलो, हळदी-कुंकू बदक, तुतवार, कांडेसर, ओपन बिल्ड् स्टॉर्क, छोटी अडई, चित्रबलाक, लाजरी पाणकोंबडी, टिबुकली, तीरंदाज, छोटा पाणकावळा, रातबगळा, कमळपक्षी इत्यादी.

कसे जाल?

गुदावी पक्षी-अभयारण्य : पुणे/मुंबई-बंगळूरू-शिमोगा-सागर-सोराब-गुदावी

भेट देण्यासाठी उत्तम कालावधी

नोव्हेंबर ते मार्च

पक्षी : व्हाईट आयबीस, तीरंदाज, लिटिल कार्मोरंट, चमच्या, राखी बगळा, पर्पल हेरॉन, रातबगळा, जॅकाना, लिटिल रिंग्ड् प्लोवर, लिटिल ग्रीब, कॉमन टील, टिटवी, वारकरी बदक इत्यादी.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.) (शब्दांकन : ओंकार बापट)