esakal | सागरेश्वर : एका रानवेड्याचं जंगल | Sagareshwar
sakal

बोलून बातमी शोधा

Deer and Bird
सागरेश्वर : एका रानवेड्याचं जंगल

सागरेश्वर : एका रानवेड्याचं जंगल

sakal_logo
By
अनुज खरे informanuj@gmail.com

आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या सुंदर निसर्ग संपदेचं वर्णन आपण बऱ्याचदा ऐकतो. आपणही काही लेखांच्या माध्यमातून राज्यातल्या जंगलांचं सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या विविध भागात जंगलप्रकारात असलेली विविधता आणि त्यातून इथल्या जीवसृष्टीत आढळून येणारं वैविध्य यामुळं महाराष्ट्र अधिक समृद्ध झाला आहे. राज्यात असलेली ५० वन्यजीव अभयारण्ये आणि सहा व्याघ्र प्रकल्पांमुळं इथल्या निसर्ग सौंदर्याचे रंग अधिक गहिरे झाले आहेत. या जंगलांमध्ये फिरताना आणि त्यांचा आनंद घेताना आपलं भान हरपून जातं. यातली काही जंगलं विदर्भात आहेत, काही पश्चिम महाराष्ट्रात काही मराठवाड्यात, तर काही पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेली आहेत. येथे आढळणारी झाडं, पशु-पक्षी, भूभाग यात विविधता असली तरीही या सगळ्यात एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे सौंदर्य. राज्यातल्या कुठल्याही जंगलात गेलात तरीही तिथल्या वैभवाचा आस्वाद घेताना आपण त्यात हरवून जातो.

राज्यातल्या अशाच एका सुंदर जंगलाची आपण आज माहिती घेणार आहोत. वाघ किंवा बिबट्या अशा मोठ्या शिकारी वन्यप्राण्यांचा वावर इथे खूप नसला तरीही इतर वन्यप्राण्यांच्या वास्तव्यामुळं हे जंगल अधिक खास आहे. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे जवळच असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला सांबर किंवा चितळ असे प्राणी ‘पुरवण्याची’ या जंगलाची क्षमता आहे. हे जंगल म्हणजे ‘सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य’.

सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव, वाळवा आणि पलूस या तालुक्याच्या संगमावर वसलेल्या जंगलात आपल्याला अप्रतिम निसर्गसौंदर्य तर पाहायला मिळतंच पण त्याचबरोबर या जंगलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मृगविहार.

मोठ्या प्रमाणावर आढळणारी सांबर, चितळ, भेकर ही सारंग वर्गाची हरणं आणि क्वचित आढळणारे काळवीट हे कुरंग वर्गाचे हरीण अशा हरणांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे सागरेश्वर अभयारण्य हे हरणांच्या संरक्षणासाठी घोषित करण्यात आलेले अत्यंत महत्त्वाचे अभयारण्य आहे. सुमारे १ हजार ८७.७५ हेक्टर म्हणजेच सुमारे १०.८७ चौरस किलोमीटर एवढ्या विस्तारात पसरलेल्या अभयारण्याची स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली होती. या अभयारण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा या अभयारण्याची स्थापना झाली तेव्हा या अभयारण्याचा बराचसा भाग हा मानवनिर्मित प्रयत्नातून जंगल स्वरूपात तयार झाला होता. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या प्रयत्नातून येथे होणारी वृक्षतोड थांबली आणि सुंदर जंगल आकाराला आले.

कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेले हे जंगल इथे असणाऱ्या १० गावांतील भूभाग व्यापते. अभयारण्य असल्यामुळे जंगलाला वनविभागाने कुंपण घातले आहे. मानवी हस्तक्षेप जंगलात नसल्यामुळे जंगल अधिक समृद्ध झाले आहे. सागरेश्वर हे झुडपी जंगलप्रकारचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे या प्रकारच्या जंगलावर अवलंबून असणारे सांबर, चितळ हे हरणांचे प्रकार इथे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. उंच सखल भागही चांगल्या प्रमाणात आहे.

पूर्वी ओसाड माळरान असताना जंगलात काळवीट आणि चिंकारा यांची संख्या चांगली होती. पण पुढे अभयारण्याच्या निर्मितीनंतर जसजसं जंगल वाढत गेलं तसतसं काळवीट आणि चिंकारांचा वावर कमी झाला आणि त्यांची जागा भेकर, चितळ आणि सांबर या हरीणवर्गाच्या प्राण्यांनी घेतली. पूर्वी ओसाड माळरान असताना इतर जैवविविधता मात्र खूपच मर्यादित होती. मात्र आता मोठ्या प्रमाणावर जंगल असल्यामुळे इथे इतर विविधताही चांगलीच बहरली आहे. चितळ, सांबर या प्राण्यांची संख्या आता येथे चांगल्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सागरेश्वर मधील चितळ, सांबर हे प्राणी काही प्रमाणात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येऊ शकतात. वनविभागाचे तसे प्रयत्नही सुरू आहेत. जेणेकरून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांना मुबलक खाद्य मिळावं आणि ज्याची परिणिती पुढे वाघांची संख्या वाढण्यात होऊ शकेल.

जंगलात आपल्याला ३०-४० प्रजातींचे वृक्ष आढळून येतात. झुडपी जंगलावर आधारित असणारे अनेक प्रजातींचे पक्षी आपल्याला येथे दिसतात. कालशीर्ष भारीट, लाल डोक्याचा भारीट, राखाडी मानेचा भारीट असे काही स्थलांतरित पक्षी ठराविक ऋतूत येथे हमखास हजेरी लावतात. वाघ किंवा बिबट्या असा मोठा शिकारी प्राणी येथे पूर्वी आढळून आलेला नव्हता. मात्र नुकताच येथे एका बिबट्याचा आणि तरसांचा वावर वनविभागाच्या कॅमऱ्यांमध्ये आढळून आला आहे. खोकड, कोल्हा आणि भारतीय लांडगा या प्राण्यांचे अस्तित्व मात्र जंगलात चांगल्या प्रमाणात आढळून येते. हे प्राणी येथे स्थायिक नसले तरी दरवर्षीच्या स्थानिक स्थलांतराच्या ठराविक काळात हे प्राणी काही महिन्यांसाठी या अभयारण्यात हमखास असतात. मुख्यत्वे विणीच्या हंगामात इथे लांडग्यांचा वावर दिसला आहे. पिल्लांसाठी आवश्यक असणाऱ्या गुहा जंगलात असल्यामुळे हा अशा प्रकारच्या जंगलाच्या अन्नसाखळीतला सर्वोच्च शिकारी आपल्याला या अभयारण्यात आढळून येतो.

अभयारण्याच्या निर्मितीची गोष्टही खूपच रंजक आणि प्रेरणादायी आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी असणारे ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक धों. म. तथा धोंडीराम महादेव मोहिते हे एकदा विदर्भात प्रवास करत असताना एका जंगलात त्यांची बस एका फाटकासमोर थांबली. रात्रीची वेळ होती. अभयारण्याच्या कक्षेतून जाणाऱ्या या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी प्रवास करण्यास फाटकाशी असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्याने मज्जाव केला. मोहिते मात्र या घनदाट अरण्याच्या प्रेमात पडले होते. अशा प्रकारचं जंगल आपल्या सांगली जिल्ह्यात असायलाच हवं हा ध्यास त्यांनी घेतला. मंत्रालयात खेटे मारून, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या जंगलाचं महत्त्व पटवून देऊन त्यांनी या ओसाड डोंगरावर अभयारण्य निर्मितीची परवानगी १९७१ मध्ये मिळवली. प्रसंगी त्यांना बापू बिरू वाटेगावकर, स्थानिक गावकरी ते अगदी मंत्र्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला.

अखेर २१ ऑगस्ट १९७१ या ऐतिहासिक दिवशी डोंगरावर पहिलं रोपटं लावण्यात आलं. मात्र १९७२ साली महाराष्ट्रात मोठं दुष्काळ पडला. पण निर्धारी धों. म. मोहिते यांनी या दुष्काळात सर्व दुष्काळी शासकीय योजना अभयारण्यात आणल्या आणि पाहता पाहता ओसाड डोंगरावर नंदनवन उभं राहिलं. एक दिवस बापू बिरू पुन्हा मोहित्यांना डोंगरावर भेटला आणि खुल्या दिलाने त्याने त्याची चूक मान्य केली असं म्हणतात. आसपासच्या गावातले लोकही धों. मं. ना दाद देऊ लागले आणि त्यांच्या प्रयत्नांना हातभार लावायला लागले. वनविभागानेही त्यांना चांगलंच पाठबळ दिलं. अगदी शासन दरबारी मोहित्यांच्या या भगीरथ प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्काराने गौरवण्यात आलं.

अभयारण्याच्या नशेतून ओसाड डोंगराचं नंदनवन झालं. आणि धों. म. मोहिते या आधुनिक भगीरथाने भारतातलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य निर्माण केलं. अभयारण्यात असलेल्या सात-आठशे वर्ष जुन्या प्राचीन मंदिरांच्या साक्षीने या जंगलाचा ओसाड डोंगर ते अभयारण्य हा देदीप्यमान प्रवास लिहिला गेला. अदमासे ५१ मंदिरांचा समूह असणाऱ्या या मंदिरांतील प्रमुख मंदिर असणाऱ्या सागरेश्वर मंदिरावरून या अभयारण्याला सागरेश्वर हे नाव मिळालं. सागरेश्वर देवळापासून जवळच असणारा एक लहान घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होतं. धों.म. मोहित्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या झपाटलेपणाची प्रचिती इथे फिरताना आपल्याला पावला पावलावर येते. हेच झपाटलंपण आता आपल्या अंगात भिनवल्याशिवाय हा निसर्ग वाचवता येणार नाही. अतिवृष्टी, महापूर, वादळं यातून निसर्ग आपल्याला संकेत देतोय. ते ओळखून निसर्गाप्रती आदर ठेवून वागलो तर आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. अन्यथा नंदनवनाचं मरुस्थळ व्हायला वेळ लागायचा नाही.

कसे जाल?

पुणे/मुंबई-सातारा-सांगली-सागरेश्वर

भेट देण्यास उत्तम हंगाम -

ऑगस्ट ते फेब्रुवारी

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी – मुंगुस, जवादी मांजर, उदमांजर, खवल्या मांजर, साळींदर, ससा, वानर, कोल्हा, खोकड, रानडुक्कर, चितळ, सांबर, भेकर, तरस, बिबट्या, इ.

पक्षी – टकाचोर, हळद्या, नाचण, चट्टेरी वन घुबड , पिंगळा , दयाळ, सोनपाठी सुतार, रानलावा, खडकलावा, राखी तित्तर, भटतित्तर, चंडोल, सुगरण, डोंबारी, कोतवाल, माळटिटवी, नकल्या खाटीक, तुईया, पावश्या, चातक, टिबुकली, छोटा पाणकावळा, भारद्वाज, रानरातवा, नीलपंख, सातभाई, रानभाई, वटवट्या, सुभग, स्वर्गीय नर्तक, इ.

वृक्ष – अर्जुन, बहावा, बाभूळ, बेल, बोर, चंदन, चिंच, धामण, जांभूळ, करवंद, खैर, मोवई, नीम, पळस, पांगारा, सुबाभूळ, शिसव, करंज, चार, धावडा, पिंपळ, वड, उंबर, आपटा, अंजन, भेरा, गराडी, सीताफळ, इ.

(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत)

(शब्दांकन : ओंकार पांडुरंग बापट)

loading image
go to top