तानसा - माहुलीच्या डोंगर-दऱ्यांत

अथांग पसरलेला जलसागर, पाण्यात डोकावणारे उंचच उंच सह्यकडे, डोंगर दऱ्यांमध्ये वाढलेलं घनदाट जंगल, आणि या सगळ्यात ठायी ठायी दिसून येणारी जैवविविधता ही महाराष्ट्रातल्या एका सुंदर अभयारण्याची वैशिष्ट्ये.
Leopard
Leopardsakal

आपल्या अतुल्य भारतात सगळ्याच राज्यांनी आपलं वेगळेपण नानाविध गोष्टींमधून जपलं आहे. या वेगळेपणाला पाहण्यासाठी अनेक पर्यटक देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर जगाच्या पाठीवरूनही भारतात येतात आणि इथल्या अप्रतिम सौंदर्याचा आनंद लुटतात. आपलं महाराष्ट्र राज्यही अशा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. इथली मंदिरं, समुद्रकिनारे, गड-किल्ले, धबधबे, लेणी, इतर पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या लोकांना भुरळ पाडतात. याचबरोबर महाराष्ट्राने आणखी एक वैभव टिकवून ठेवलंय, जपलंय. ते म्हणजे वनवैभव. महाराष्ट्रात असलेली अफाट निसर्गसंपदा आपल्याला वेड लावते. येथे असलेले व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्य ही जैवविविधतेची भांडारच आहेत.

महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात जा तिथला निसर्ग आपल्याला निखळ आनंद देतो. त्यामुळे मला जसं सह्याद्रीतल्या जंगलांमध्ये भटकायला आवडतं तसं विदर्भातली माळरानं तुडवायला मला तितकीच आवडतात. तसच कोणत्याही ऋतूत महाराष्ट्रातली जंगलं बघणं हा निराळा अनुभव असतो. तुफान कोसळणारा पाऊस आणि त्यात चिंब भिजलेलं सह्याद्रीतलं जंगल पाहताना जितकी मजा मला येते तितकाच आनंद कातडी भाजून टाकणाऱ्या टळटळीत उन्हात विदर्भातल्या जंगलात फिरताना होतो.

अथांग पसरलेला जलसागर, पाण्यात डोकावणारे उंचच उंच सह्यकडे, डोंगर दऱ्यांमध्ये वाढलेलं घनदाट जंगल, आणि या सगळ्यात ठायी ठायी दिसून येणारी जैवविविधता ही महाराष्ट्रातल्या एका सुंदर अभयारण्याची वैशिष्ट्ये. गजबजलेल्या मुंबई शहरापासून अगदी जवळच्या अंतरावर असणारं हे अभयारण्य आपल्या सुंदर निसर्गासाठी तर प्रसिद्ध आहेच पण याचबरोबर अभयारण्यात असलेल्या किल्ल्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा अभयारण्याच्या इतिहासातील अस्तित्वावरही मोहोर उमटवतो. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेलं हे तानसा अभयारण्य. इथे आल्यावर मुंबई, ठाणे अशा गजबजलेल्या शहरांना मोकळा, स्वच्छ श्वास तर पुरवतच पण त्याचसोबत येथे बांधलेलं धरण मुंबईकरांची पाण्याची मुख्य गरज पूर्ण करतं. १६ सप्टेंबर १९८५ ला या जंगलाला अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली.

सुमारे ३०२.८१० चौरस किलोमीटर एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात पसरलेलं हे जंगल मुंबई, ठाणे सारख्या शहरांचे फुप्फुस. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या मायानगरीत काम करणारे अनेक निसर्गप्रेमी अडकलेला मोकळा श्वास घेण्यासाठी या अभयारण्यात येतात. तानसा नदीवर बांधण्यात आलेलं धरण आणि त्याचा तानसा जलाशय आपल्या डोळ्यांचं पारणं फेडतो.

अभयारण्यात पाण्याचे दोन मोठे जलाशय आहेत. एक म्हणजे तानसा नदीवर १८६२ साली बांधलेल्या धरणामुळे असलेला तानसा जलाशय आणि वैतरणा नदीवर १९५४ साली बांधलेल्या धरणामुळे तयार झालेला मोडकसागर जलाशय. या तानसा धरणावरूनच अभयारण्याला तानसा अभयारण्य हे नाव पडले.

अभयारण्याचा ६२ टक्के भाग हा शहापूर तालुक्यात आहे, २७ टक्के भाग हा वाडा तालुक्यात तर उर्वरित ११ टक्के भाग हा मोखाडा तालुक्यात आहे. निसर्गप्रेमींशिवाय हे जंगल गिर्यारोहकांनाही साद घालतं. याचं कारण म्हणजे अभयारण्यात असणारा सुप्रसिद्ध माहुली किल्ला. अभयारण्याचा बहुतांश भाग हा दुर्गम पर्वतांचा आहे. त्यात असलेला माहुली गड म्हणजे अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार. शिवाजी महाराजांच्या काळात माहुली गडाला महत्त्व होते. अगदी या किल्ल्यावर शहाजी राजे काही काळ थांबल्याचीही नोंद आहे. येथे महादेवाचे प्राचीन मंदिरही आहे. त्याच्या मागे उंचावर पसरलेला सूर्यमाळचा भूप्रदेश पर्यटकांना आकर्षित करतो. सूर्यमाळ हे मोखाडा तालुक्यात असलेले व खोडाळा या गावाजवळ असलेला गाव थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे ब्रिटिश काळात असलेला एक डाकबंगलाही आहे. थंड हवेचे ठिकाण असले तरीही इथल्या रानवाटांना केवळ निसर्गवेडे आणि गिर्यारोहक साद घालतात. रानोमाळ भटकंतीचे वेड असणारे लोकंच इथे येत असल्याकारणामुळे या थंड हवेच्या ठिकाणाने आपली शांतता जपून ठेवली आहे. सूर्यमाळाचा पसरलेला भूप्रदेश आणि तानसा धरणाचा विस्तीर्ण जलाशय असं मनोहारी दृश्य आपल्याला माहुली गडावरून पाहायला मिळतं.

अनेक प्रजातींच्या औषधी वनस्पती हे तानसा अभयारण्याचं आणखी एक वैशिष्ट्य. विविध कृषी विद्यापीठांचे विद्यार्थी या औषधी वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी तानसा अभयारण्याला आवर्जून भेट देतात. याशिवाय इतर अनेक प्रजातींचे वृक्षही आपल्याला तानसा अभयारण्यात पाहायला मिळतात. पक्ष्यांच्या दृष्टीनेही तानसा अभयारण्याला विशेष महत्त्व आहे. नानाविध प्रजातींचे पक्षी आपल्याला अभयारण्यात पाहायला मिळतात. वनपिंगळा हा येथे असणारा एक अतिशय दुर्मिळ रहिवासी. फॉरेस्ट आउलेट असं इंग्रजी नाव असलेलं हे घुबड पूर्वी केवळ सातपुड्याच्या पर्वतरांगात सापडते असा समज होता. इतर घुबडांप्रमाणे या घुबडाचा शोध रात्री घेण्यात आला. त्यामुळे या घुबडाचे तानसा अभयारण्यातील अस्तित्त्व आढळून आले नव्हते. पण नोव्हेंबर २०१४ मध्ये या घुबडाच्या तानसा अभयारण्यातील आढळावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

गडद करडा-तपकिरी रंग असलेला हा पक्षी साधारणतः साळुंकीएवढा आहे. याच्या कपाळावर आणि पाठीवर अगदीच अस्पष्ट ठिपके असतात. पंख आणि शेपटीवर रुंद तपकिरी-काळपट आणि पांढरे पट्टे असतात. छातीचा रंग गडद तपकिरी असून छातीच्या वरील भागावर पांढरे पट्टे असतात. पोटाकडील भाग पांढरा स्वच्छ असतो. उंदीर, कीटक, पाली, सरडे हे मुख्य खाद्य असणारा हा पक्षी कधी कधी छोट्या पक्ष्यांचीही शिकार करतो. इतर प्रजातींची घुबडे रात्री सक्रिय असतात. त्यामुळे घुबडांना रात्रिंचर संबोधले जाते. पण वनपिंगळा हा याला अपवाद आहे. तो दिवसा सक्रिय असतो. वाघासारखा शिकारी येथे सापडत नसला तरी इथल्या अन्नसाखळीत सर्वोच्च स्थानी असणारा बिबट्या हा मार्जारकुळातला शिकारी प्राणी मात्र येथे चांगल्या संख्येने आहे. इतर प्रजातींचे सस्तन प्राणीही आपल्याला तानसामध्ये पाहायला मिळतात.

मुंबईसारख्या मोठ्या शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही तानसा अभयारण्याला शहरीकरणाचा स्पर्शही झालेला नाही. आणि हेच तानसा अभयारण्याचं वैशिष्ट्य आहे. इथे जंगल मोठ्या प्रमाणावर टिकून आहे त्याचं हेच सर्वांत मोठं कारण आहे. इथल्या माळरानातून, दुर्गम रानवाटांतून, गड-किल्ल्यांतून, झाडा-झुडुपातून, पक्ष्यांच्या सुंदर शिळेतून, बिबट्याच्या डोंगरदऱ्या भारून टाकणाऱ्या डरकाळीतून निसर्ग आपल्याला साद घालतो. जो अवलिया निसर्गवेडा या सादेला प्रतिसाद देतो त्याचं आयुष्य समृद्ध होतं. निसर्ग आपल्याला कायमच भरभरून देतो. निसर्गाच्या या दातृत्वासमोर ओंजळ पसरून उभं राहणं आणि तो जे देईल ते घेणं हे आपलं कर्तव्य. निसर्गाचं हे दान आपल्याला देणारं तानसा निसर्गप्रेमींना कायम खुणावत राहील यात शंका नाही.

कसे जाल?

पुणे/मुंबई-शहापूर-तानसा

भेट देण्यास उत्तम हंगाम

ऑक्टोबर ते मार्च

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : मुंगूस, जवादी मांजर, उदमांजर, खवल्या मांजर, साळींदर, ससा, वानर, कोल्हा, खोकड, रानडुक्कर, भेकर, तरस, बिबट्या

पक्षी : टकाचोर, हळद्या, नाचण, मॉटल्ड वूड आउल, पिंगळा , वनपिंगळा, दयाळ, सोनपाठी सुतार, सुगरण, डोंबारी, कोतवाल, नकल्या खाटीक, तुईया, पावश्या, चातक, टिबुकली, छोटा पाणकावळा, भारद्वाज, रातवा, फ्रँकलीनचा रातवा, नीलपंख, सातभाई, रानभाई, वटवट्या, सुभग, स्वर्गीय नर्तक, तुरेवाला सर्पगरुड, नाचण, व्याध गरुड, खंड्या, वंचक, गायबगळा, इ.

वृक्ष : अर्जुन, बहावा, बाभूळ, बेल, बोर, चंदन, चिंच, धामण, जांभूळ, करवंद, खैर, मोवई, नीम, पळस, पांगारा, सुबाभूळ, शिसव, करंज, चार, धावडा, पिंपळ, वड, उंबर, आपटा, अंजन, भेरा, गराडी, इ.

(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत)

(शब्दांकन : ओंकार बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com