esakal | शिवसागराच्या काठावर कोयना
sakal

बोलून बातमी शोधा

Koyana Forest

शिवसागराच्या काठावर कोयना

sakal_logo
By
अनुज खरे informanuj@gmail.com

छत्रपती शिवाजीमहाराज आणि अफजलखान यांच्या लढाईसाठी इतिहासात प्रसिद्ध असणाऱ्या जावळीच्या खोऱ्यातील एका जंगलानं माझ्या मनावर गेली अनेक वर्षं गारुड केलंय. ते जंगल म्हणजे कोयना वन्यजीव अभयारण्य. कोयना धरणाच्या पाणलोटपरिसरात असलेलं हे जंगल धरणाचा शिवसागर जलाशय आणि कोकणात उतरणारा सह्याद्रीचा कडा यांत अडकलेलं जंगल आहे. या जंगलात विविध प्रकारचे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर बघायला मिळतात. सातारा जिल्ह्यातल्या या जंगलाचा समावेश पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलांत होतो. सन १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळालेल्या या जंगलाला आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाला मिळून २०१० मध्ये व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला. जंगलाच्या एकूण भौगोलिक स्थितीमुळे या जंगलात जाण्याचा मार्ग सोपा नाही.

सन १९९८ पासून मी कोयना-जंगलात जातोय. पूर्वी इथं जाण्यासाठी केवळ वनविभागाचीच नव्हे तर, पाटबंधारे विभागाचीही परवानगी घ्यावी लागायची. कोयना जंगलाची खासियत मला विचाराल तर अत्यंत रमणीय भूप्रदेश. ‘कोयना’चा कोणताही डोंगर चढून गेल्यावर जे सुंदर दृश्य दिसतं ते अवर्णनीयच. इतर जंगलांसारख्या इथं जिप्सी सफारी नाहीत. सह्याद्रीच्या अवघड भूप्रदेशामुळे इथं रस्ते तयार करणंही तसं अवघडच आहे. कोयनानगरला जायचं आणि तिथून बोटीनं जंगलात मुक्कामाच्या ठिकाणी जायचं असा आमचा शिरस्ता ठरलेला असायचा. अवसारी नावाच्या गावात त्या वेळी आम्ही मुक्काम करायचो. जंगलात जाण्यासाठी साधन एकच, ते म्हणजे बोट. वनविभागाची ‘वनकन्या’ नावाची बोट होती. कोळेकर आणि झेंडेकर यांच्याही दोन खासगी बोटी होत्या. या बोटी साध्या असत. स्पीड बोट वगैरे सुविधा त्या काळात वनविभागाकडे नव्हत्या. आताही केवळ गस्तीसाठी स्पीड बोटचा वापर केला जातो.

कोयना जंगलाची आणखी एक खासियत म्हणजे असंख्य खोरी. जलाशयाच्या काठावर शिरशिंगे, अवसारी, मालदेव, करंजवडे, मालदेव, पाली, झुंगटी इत्यादी महत्त्वाची खोरी तर होतीच; पण त्याशिवाय या खोऱ्यांना लागून अनेक उपखोरीही होती. निबिड, घनदाट अरण्य मात्र सगळ्याच ठिकाणी असायचं. त्यामुळे आम्ही गमतीत या जंगलाला ‘इंडियाज् ॲन्सर टू ॲमेझॉन’ असं म्हणायचो.

अवसारी गावात वनविभागाच्या दोन खोल्या होत्या. ‘निसर्गप्रशिक्षण शिबिरा’साठी मात्र कॅम्पसाईट उभारण्यापासून तयारी करावी लागे. पुढं वनविभागानं तंबूंची सुविधा केली; पण शिबिराच्या वेळी हे तंबू बांधलेल्या चौथऱ्यावर उभारावे लागत. हे तंबूही चांगलेच मोठे होते. एका तंबूत २० लोक सहज सामावले जायचे. वनविभागाची जेवणाची सोयही चांगली होती; पण बऱ्याचदा आम्ही पूर्वीच्या इतर शिबिरांप्रमाणे खानसामाही बरोबर घेऊन जायचो.

जंगलात कोणत्याही ठिकाणी फिरण्यासाठी जायचं म्हणजे बोटीतून कमीत कमी अर्ध्या तासाचा प्रवास असायचा. खोऱ्याच्या किनाऱ्याला बोट लावून ठेवायची आणि तिथून मग पायी भ्रमंतीला सुरुवात करायची. चालत ट्रेल करून संध्याकाळी पुन्हा खाली उतरून बोट लावलेल्या ठिकाणी यायचं आणि बोटीनं पुन्हा निवासाच्या ठिकाणी यायचं हे ठरलेलं असायचं.

न्याहारीचं आणि दुपारचं जेवण आम्ही बांधून नेत असू. अंधार पडायच्या आत मात्र बोटीत बसावं लागे. कारण, मग अंधार झाल्यावर दिशा पटकन् समजायच्या नाहीत.

जैवविविधतेच्या बाबतीत कोयना अभयारण्य खूपच समृद्ध आहे. असंख्य प्रकारचे मोठे देशी वृक्ष, झुडपं, वेली, याशिवाय पक्षी, सस्तन प्राणी यांची मुबलक संख्या ‘कोयना’त आहे. उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचं तर वैपुल्यच. अस्वलांची संख्या कोयनेत चांगल्या प्रमाणावर आहे. बिबटे, रानकुत्रे, सांबर, भेकर, पिसोरी, गवे, इत्यादी सस्तन प्राण्यांबरोबरच वाघाचीही इथं नोंद आहे. भौगोलिक प्रदेशाच्या ठेवणीमुळे आणि सलग मोठ्या गवताळ प्रदेशांच्या अभावामुळे चितळ हा प्राणी मात्र इथं नाही. लाएनाज म्हणजे राक्षसी वेलीच्या अजस्र वेली, एंटाडाच्या, ओंबळीच्या मोठ्या वेली यांमुळे जंगलाचा मोठा भाग व्यापलेला आहे. त्यामुळे जंगलाला एक वेगळंच घनगंभीर स्वरूप प्राप्त झालं आहे.

व्याघ्रप्रकल्पाच्या दर्जा मिळाल्यावर वनविभागानं इथं गवताळ प्रदेशांच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे शाकाहारी प्राण्यांची संख्या चांगल्या प्रमाणावर दिसायला लागली आहे. ‘दमट विषववृत्त सदाहरित जंगल’ या प्रकारामुळे एकंदरीत इथं प्राणी नजरेस पडणं कठीण असतं. जंगलातला काही भाग तर इतका घनदाट आहे की सूर्यप्रकाशही मोठ्या मुश्किलीनं जमिनीपर्यंत पोहोचतो. एकूणच या जंगलात फिरायचं म्हणजे आमच्यासाठी पर्वणी असायची. व्याघ्रप्रकल्प झाल्यामुळे आता चालत फिरण्यावर निर्बंध आले आहेत; पण जंगलाचा काही भाग आजही फिरण्यासाठी वनविभागानं खुला ठेवला आहे. सह्याद्रीच्या रांगा आणि जलाशयाचा भाग यांच्या नैसर्गिक तटबंदीमुळे या जंगलाचं सौंदर्य अजूनही टिकून राहिलं आहे. यात वनविभागाच्या प्रयत्नांचाही उल्लेख करावा लागेल. वासोटा, नागेश्वर, चकदेव, पर्बत, आडोस-माडोस, मालदेव, डिचोली इत्यादी ठिकाणी फिरण्याची मजा काही निराळीच.

वासोटा किल्ल्यासारखे अवघड प्रदेश...कोयना, सोळशी, कांदाटी या नद्या आणि असंख्य ओढे...महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच बाबूचा कडा...पाली, झुंगटी यांसारखी घनदाट जंगलं असलेली खोरी...अनवट वाटा...एका बाजूला सह्याद्रीचा नैसर्गिक कडा आणि दुसऱ्या बाजूला शिवसागराचा विस्तीर्ण जलाशय...जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणारा प्रचंड पाऊस...मन मोहून टाकणारं जंगलाचं सौंदर्य...दरी भरून-भारून टाकणाऱ्या बिबट्यांच्या किंवा वाघांच्या डरकाळ्या आणि जंगलात ठायी ठायी दिसणारी विविधता यांमुळे कोयना जंगलाला माझ्या मनात वेगळंच स्थान आहे.

मी आजवर ‘कोयना’या वाऱ्या अनेकदा केल्या आणि निसर्गानं मांडलेल्या खेळात मनसोक्त रमलो. माझ्या आजवरच्या प्रत्येक भेटीत हा खेळिया मला निराळा खेळ दाखवत आला. त्याच्या साक्षीनं मी निसर्गवाचनाच्या माझ्या आवडीचा धडा गिरवला आणि माझी वेगळी वाट निवडली. ‘कोयना’च्या या जंगलानं माझं आणि निसर्गाचं नातं अधिक घट्ट केलं.

कसे जाल? : पुणे/मुंबई-उंब्रज-कोयनानगर-कोयना

भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते जून

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : सांबर, भेकर, चौशिंगा, रानडुक्कर, साळिंदर, खवले मांजर, शेकरू, वानर, गवा, रानकुत्रा, बिबट्या, वाघ इत्यादी.

पक्षी : रानभाई, भांगपाडी मैना, लालबुड्या बुलबुल, नारदबुलबुल, कोतवाल, भृंगराज, पांढऱ्या पोटाचा कोतवाल, करियल, रानकस्तुर, मुंग्याखाऊ सुतार, रानकोंबडा, तुरेवाला सर्पगरुड, शिक्रा, कृष्णगरुड, मोर, मलबार धनेश, नीलिमा, नाचरा, वेडा राघू, शिंजीर, रातवा, बुरखा हळद्या, हुमा घुबड, तपकिरी वनपिंगळा इत्यादी.

सरपटणारे प्राणी : घोरपड , रॉक गेको, सापसुरळी, नाग, मणियार, फुरसं, घोणस, रुका, हरणटोळ, चापडा, कवड्या, पाणधीवर इत्यादी.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

loading image