श्रीमद्‌भगवद्‌गीता आणि युवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhagavad gita and youth

श्रीमद्‌भगवद्‌गीता आणि युवक

श्रीमद्‌भगवद्‌गीता असा ग्रंथ आहे, ज्यावर अनेकांनी शतकानुशतके अभ्यास आणि चिंतन करून अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. जगभरात हा एकच धर्मग्रंथ असावा, की ज्या विषयी खूप लिहिलं आणि बोललं गेलंय. इतका प्राचीन ग्रंथ असूनही सध्याच्या आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही हा ग्रंथ आपल्याला मार्गदर्शक ठरतो. तो आध्यात्मिक ग्रंथ म्हणून ओळखला जातो, त्यापेक्षाही जास्त तो व्यावहारिक ग्रंथ आहे.

- डॉ. अपर्णा लळिंगकर

श्रीमद्‌भगवद्‌गीतेत असं विशेष काय आहे?

त्यात श्रीकृष्ण आहे. आपण सगळे निमित्तमात्र आहोत. या ग्रंथात अठरा अध्याय असून, त्यांत सर्व वेद आणि उपनिषदे यांतील ज्ञानाचं सार सांगितलेलं आहे. वेद आणि उपनिषदांतील ज्ञान म्हणजे असं समजायचं

कारण नाही, की हे ज्ञान आपल्या आकलनापलीकडचं आहे. हा ग्रंथ केवळ पाठांतरासाठी, आयुष्याच्या उतारवयात वाचण्यासाठी, अभ्यासण्यासाठी नसून, हायस्कूल आणि महाविद्यालयात जाणाऱ्या युवकांनी त्याचा व्यावहारिकदृष्ट्या अभ्यास करून त्यातील गोष्टी प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी आहे.

युवकांना संदेश

यातील प्रत्येक श्लोक आणि अध्याय अभ्यासताना आपण स्वत:ला अर्जुन आहोत, असं समजावं. आपलं जीवन एक मोठा संघर्ष आहे. हा संघर्ष म्हणजे महाभारताचे युद्ध असं गृहित धरलं तर या संघर्षाच्या काळात आपणही अर्जुनासारखे गोंधळलेल्या अवस्थेत असतो. महाभारताच्या युद्धात अर्जुनाला ज्या अडचणी आल्या, त्याला जी भीती वाटली, त्याच्या मनात ज्या शंका उपस्थित झाल्या तशाच शंका, अडचणी, भीती आपल्या आयुष्यातही असतातच. या सगळ्याचं निरसन श्रीकृष्णांनी श्रीमद्‍भगवद्‍गीतेत केले आहे.

श्रीकृष्ण हा केवळ अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतोय असं समजू नये, तर श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या माध्यमातून तो आपल्या जीवनरथाचंही सारथ्य करत आहे. आपण श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसार पुढं गेलो तर आपल्या आयुष्यातील अडचणी आपण अतिशय सहजगत्या सोडवू शकू. विश्वातील सर्व चिंता, धर्मसंकटे, अडचणी, कोणत्याही प्रकारची कोंडी अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला श्रीमद्‌भगवद्‌गीतेमध्ये मिळतात.

व्यावहारिक मार्गदर्शन

श्रीमद्‌भगवद्‌गीतेकडं ‘एक आध्यात्मिक ग्रंथ’ इतकंच न पाहता युवकांना व्यावहारिक मार्गदर्शन करणारा अत्यंत उपयुक्त ग्रंथ म्हणून पाहिले पाहिजे. गीताजयंतीच्या अनुषंगाने थोडी तोंडओळख करून देणार आहे. मी नवीन काहीच सांगत नसून, आहे तेच फक्त व्यावहारिक जगात आपण कसं वापरू शकतो याची झलक दाखवण्याचा प्रयत्न करते आहे.

आंधळ्या प्रेमाचे परिणाम काय असू शकतात, SWOT analysis कसं करू शकतो? प्रत्यक्ष आयुष्यात आपण आपलं मनोबल कसं वाढवावं, कशाप्रकारे आयुष्यात येणाऱ्या अडचणींकडं पाहावं, त्या कशा हाताळाव्यात याचं प्रयोगाधारित ज्ञान, कुटुंबाचं आपल्या आयुष्यातील महत्त्वाचं स्थान यासगळ्याविषयी चर्चा श्रीमद्‌भगवद्‌गीतेत आहे.

आजकाल युवकांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींतून निर्माण होणारी नैराश्याची भावना, त्यातून वाढत जाणारी व्यसनाधीनता या मोठ्या सामाजिक प्रश्नावर श्रीमद्‌भगवद्‌गीतेत समर्पक उत्तरं आहेत. आज लहान वयात आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाल्यानं युवकांच्या हातात अमाप पैसा येतो. त्याचा आपण सुयोग्य वापर कसा करावा याचं मार्गदर्शन श्रीकृष्णांनी केलेलं आहे. आपण आयुष्यात ज्या गोष्टी करतो त्या बुद्धीच्या जोरावर करतो आणि इंद्रियांच्या नियंत्रणात बुद्धीला स्थैर्य प्राप्त होतं. अस्थिर बुद्धीमुळं काहीच साध्य होत नाही.

म्हणजेच आपण काय करतो आहोत, काय खातो आहोत, आपली दिनचर्या कशी आहे यावर आपल्याला यश मिळेल की नाही हे अवलंबून असतं. आपण नियमित व्यायामानं आपलं शरीर तंदुरुस्त राखलं, शरीराला पोषक असाच आहार घेतला, सकाळी लवकर उठलो, वेळच्यावेळी सगळं आवरलं तर वेळेचं व्यवस्थित नियोजन करून आपल्याला ज्या क्षेत्रात यश प्राप्त करायचं आहे त्यासाठी जे आवश्यक ते प्रयत्न पूर्ण शक्तीनिशी करू शकतो.

कर्माची फलनिश्चिती

श्रीमद्‌भगवद्‌गीतेत कर्मयोग म्हणजे काय हे सांगताना कर्म, अकर्म (न केलेले कर्म) आणि विकर्म (विशेष कर्म) यातील फरक सांगितला आहे. आपल्या आयुष्यात अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत, की आपल्याला दु:ख होतं. श्रीकृष्ण हेच सांगतात, की तुम्ही फक्त पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करा (कर्म) तुम्हाला यश नक्की मिळेल. यश मिळालं नाही तर दु:खी न होता आपण केलेल्या प्रयत्नांचे विश्लेषण करून त्यातील चुका दुरुस्त करून पुन्हा प्रयत्न करा. परंतु दु:खी होऊन प्रयत्न सोडू नका. याचाच अर्थ आपण केलेल्या कर्माच्या फळाशी आपल्या मनाचं स्वास्थ्य जोडू नका. आपलं मन स्थिर ठेवून आपलं काम करत राहा.

आपल्याला मिळालेलं यश हे आपलं एकट्याचं नसून, ते मिळविण्यात इतरही अनेकांचा हातभार लागलेला आहे असा भाव मनात ठेवला तर ते अकर्म (म्हणजेच आपण न केलेले कर्म) यात गणले जाऊन आपल्या मनात अहंभावाची निर्मिती होणार नाही. अहंभाव आला, की माणूस ध्येयापासून दूर जातो. म्हणून हे आयुष्यात महत्त्वाचं आहे. आपण व्यावहारिक जगात काम करत असताना आपलं मन स्थिर कसं ठेवावं याविषयी मार्गदर्शन श्रीमद्‌भगवद्‌गीतेत केलेलं आहे.

हिंदीमध्ये एक म्हण आहे ‘नेकी कर दरिया में डाल’, त्याचप्रमाणं आपण जे काही काम करत असू त्याचं श्रेय कायम परमेश्वराला दिलं आणि त्या परमेश्वरानंच हे माझ्याकडून करून घेतलं आहे असा भाव मनात ठेवला, तर यश पचवणंही सोपं जातं आणि यश नाही मिळालं तरी दु:ख वाटत नाही. उलट, आपण अजून जास्त प्रयत्न करण्यास उद्युक्त होतो.

आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास म्हणजेच सारखी चिडचिड-रागराग करणं किंवा अत्यानंदानं हर्षित होणं या गोष्टी टाळल्यास, म्हणजेच अतिला टाळल्यास, आपलं मन संतुलित राहतं नाही तर ‘अति तिथे माती’ हा अनुभव येतो. या अशा टोकाच्या भावनांचं प्रकटीकरण आपल्या आरोग्यास हानिकारक असतं. यासाठी योग-प्राणायाम करावे, असं सांगितलेलं आहे. यातून आपण लहान वयात जडणारे रक्तदाबाचे विकार, हृदयविकार, मधुमेह टाळू शकतो. खरंतर व्यावहारिक अंगानं भगवतगीता समजून घेण्यात आपलाच फायदा आहे.

(लेखिका इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये पीएच.डी. असून, संशोधक-लेखिका आहेत.)