esakal | अब्दुल कलाम म्हणजे अखंड प्रेरणास्त्रोत!
sakal

बोलून बातमी शोधा

APJ Abdul Kalam

'झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नाही.. स्वप्न ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला झोपूच देत नाही..' असं आपले माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम सांगायचे..! त्यांचे निधन हो ऊन आज चार वर्षे झाली; पण त्यांचे विचार आजही सर्वांना मार्गदर्शक आहेत. त्यानिमित्त 'सकाळ अर्काईव्ह'मधून खास लेख!

अब्दुल कलाम म्हणजे अखंड प्रेरणास्त्रोत!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

'झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नाही.. स्वप्न ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला झोपूच देत नाही..' असं आपले माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम सांगायचे..! त्यांचे निधन हो ऊन आज चार वर्षे झाली; पण त्यांचे विचार आजही सर्वांना मार्गदर्शक आहेत. त्यानिमित्त 'सकाळ अर्काईव्ह'मधून खास लेख!

जीवन जगण्यासाठी काहीतरी ध्येय पाहिजे. ध्येयाने प्रेरित होऊन अविरत प्रयत्न केले, तर यश आपल्यापासून दूर नाही. अशा विचारांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मुलांची मने प्रज्वलित करीत.

संकटे माणसाला आत्मपरीक्षणाची संधी देतात. संकटे आली, दुःखे भोगावी लागली, तरी माणसाने धीर सोडू नये. हे बाळकडू डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना पाजण्यात आले होते. या विचाराने प्रेरित असलेले डॉ. कलाम संशोधक वृत्ती, प्रचंड जिद्द आणि अविरत प्रयत्नांच्या बळावर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोचू शकले. खरे तर जगाला त्यांची ओळख "मिसाईल मॅन' म्हणूनच आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश अनेक बाबतीत परावलंबी होता. देशाला एक प्रगत राष्ट्र म्हणून पुढे यायचे असेल, तर अन्नधान्याबरोबर संरक्षण क्षेत्रातही स्वयंपूर्ण असले पाहिजे, असा ध्यास देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा होता. यातूनच त्यांनी देशात संशोधन आणि विकासाचा पाया घातला. हरितक्रांतीने अन्नधान्यात स्वयंपूर्णता लाभली, तर "पृथ्वी'पासून ते "अग्नी'पर्यंतच्या क्षेपणास्त्र विकासाने देशाच्या सामर्थ्याची जाणीव जगाला झाली. याचे सर्व श्रेय डॉ. कलाम यांना जाते. विशेष म्हणजे कुण्या परक्‍याच्या मदतीशिवाय स्वदेशी तंत्रज्ञानावर त्यांचा विश्‍वास होता. "अग्नी'च्या परीक्षणानंतर अनेक देशांकडून क्षुब्ध प्रतिक्रियाही आल्या. काही देशांनी तर बिनबुडाचे आरोपही केले. खरे तर अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने घेतलेल्या गरूडझेपेमुळे ते धास्तावल्याचीच पावती होती. डॉ. कलाम यांच्या मार्गदर्शनाखालील पोखरण येथील अणुचाचणी तर यावरचा कळस होता. 

इस्रो, डीआरडीओ, अणुउर्जा विभाग आदी संस्थांमध्ये आपल्या कामाची छाप तर त्यांनी पाडलीच; मात्र खऱ्या कसोटीचा काळ होता तो देशाचे अकरावे राष्ट्रपती म्हणून त्यांच्या नियुक्तीनंतरचा. या वेळी एक संशोधक राष्ट्रपतिपद कसा सांभाळू शकेल? अशी शंका अनेक धुरिणांनी व्यक्तही केली होती. मात्र, आपला पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि यशस्वीपणे पार पाडला. विशेष म्हणजे या पदाची प्रतिष्ठा सांभाळत सर्वसामान्यांशी आपली नाळ तर त्यांनी तुटू दिली नाही, उलट "जनतेचे राष्ट्रपती' म्हणून लौकिक मिळविला. भारताला महाशक्ती बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते आणि हे साध्य करण्यासाठीचे दिशादर्शन त्यांच्या "इंडिया 2020' या पुस्तकात आहे. राज्यकर्त्यांसह अनेक क्षेत्रांतील अभ्यासक याचा संदर्भग्रंथ म्हणून उपयोग करतात. याशिवाय "विंग्ज ऑफ फायर', "इग्नायटेट माइंड्‌स', "टर्निंग पॉइंट्‌स' आदी विविध पुस्तकांमधून त्यांनी आपले प्रेरणादायी विचार मांडले आहेत. त्याचा लाभ जगभरातील असंख्य वाचक घेतात. 

राष्ट्रपती पदानंतर त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसाराकरिता स्वतःला वाहून घेतले होते. देशाचे भवितव्य तरुणांच्या, लहान मुलांच्या हातात आहे, म्हणून ते जेथे जात तेथे मुलांशी थेट संवाद साधत असत. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला आहे. स्वप्नपूर्तीसाठी आधी स्वप्ने पाहावी लागतात. जे तुम्हाला झोपू देत नाही, ती खरी स्वप्ने आहेत. जीवन जगण्यासाठी काहीतरी ध्येय पाहिजे. ध्येयाने प्रेरित होऊन अविरत प्रयत्न केले, तर यश आपल्यापासून दूर नाही. अशा विचारांनी ते मुलांची मने प्रज्वलित करीत. "सकाळ'ने 2003 मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात डॉ. कलाम यांनी मुलांशी मनमुराद अनौपचारिक गप्पा मारल्या होत्या. त्या वेळी शिक्षण, आरोग्य सेवा, शेती, अन्नप्रक्रिया उद्योग, माहिती, दूरसंचार तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि संरक्षणदृष्ट्या तंत्रज्ञानातील स्वयंपूर्णता या बाबींवर भर दिला तरच आपण प्रगत होणार, असे त्यांनी सांगितले होते. वयाच्या 84 व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्यात होता. अखेरच्या श्‍वासापर्यंत ते विज्ञान तंत्रज्ञान प्रसाराचे काम करीत राहिले. 27 जुलै 2015 ला शिलॉंग येथील "आयआयएम'मध्ये व्याख्यान सुरू असतानाच ते व्यासपीठावर कोसळून त्यांची प्राणज्योत मालवली. खरे तर सर्वांसाठी ते अखंड प्रेरणास्त्रोत होते, म्हणून त्यांच्या जाण्याने देशाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

('सकाळ अर्काईव्ह'मधून)

loading image