उद्योगाची ताकद ओळखा

स्टार्टअप विश्वासाठी पंधरा दिवसापूर्वीचा काळ प्रचंड घडामोडींचा ठरला. रिझर्व्ह बॅंकेनं ‘पेटीएम’चं आर्थिक व्यवहाराचं ‘वॉलेट’ बंद करण्याची कारवाई केली आणि या कंपनीचे समभाग पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले.
industry strength
industry strengthsakal
Updated on

- अपूर्वा जोशी apurvapj@gmail.com, मयूर जोशी joshimayur@gmail.com

स्टार्टअप विश्वासाठी पंधरा दिवसापूर्वीचा काळ प्रचंड घडामोडींचा ठरला. रिझर्व्ह बॅंकेनं ‘पेटीएम’चं आर्थिक व्यवहाराचं ‘वॉलेट’ बंद करण्याची कारवाई केली आणि या कंपनीचे समभाग पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. हे काय कमी होतं की काय, शिक्षणक्षेत्रातल्या स्टार्टअपचा मानबिंदू मानल्या गेलेल्या ‘बायजूज’च्या प्रवर्तकांना कंपनीतून हाकलण्याची मागणी जोर धरू लागली.

एकेकाळी बायजूजची व्यापारव्यवस्था शिक्षण क्षेत्रातला चर्चेचा विषय होता पण गेल्या काही दिवसांत या व्यवस्थेची दाणादाण उडाली आहे, त्यांच्या एका उपकंपनीनं अमेरिकेत दिवाळखोरी जाहीर केली, त्यांच्यावर अनेक ठिकाणी केसेस लावल्या गेल्या, पैशाचा ओघ इतका संकुचित झालाय, की कर्मचाऱ्यांची देणी देखील या कंपनीला देता आली नाहीत.

या दोन्ही घटना भिन्न क्षेत्रातल्या असल्या, तरी यात एक महत्त्वाचा समान धागा आहे, या दोन्ही कंपन्या भारतीय क्रिकेटच्या प्रायोजक होत्या हा नसून या दोन्ही कंपन्या स्टार्टअप क्षेत्रात घडणाऱ्या वित्तपत्रकाच्या हेराफेरीचं मूर्तिमंत उदाहरण आहेत, हा आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करायला या स्टार्टअप कोणत्या थराला जाऊन वित्तपत्रकं बदलतात हेच या दोन्ही घटनांनी अधोरेखित होतं. खोटी खाती उघडणं हा जगभरातील स्टार्टअप्सचा हातखंडाच असतो.

अमेरिकेतील फ्रॅंक नावाच्या एका स्टार्टअपच्या प्रवर्तकानं विदा (डेटा) शास्त्रज्ञाची मदत घेऊन बेचाळीस लाख विद्यार्थ्यांची खाती स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर उघडून घेतली, हा आकडा दाखवून त्यांनी संपूर्ण कंपनी जेपी मॉर्गन कंपनीला साडेसतरा कोटी डॉलर्सना २०२१ मध्ये विकून टाकली. अशा प्रकारे काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या गो-मेकॅनिक या कंपनीनं त्यांच्या प्लॅटफॉर्मवर खोट्या गॅरेजची खाती उघडून घेतली.

स्टार्टअप क्षेत्रात थापा मारणं आणि आकडे फुगवणं हे काही नवीन नव्हतं, पेटीएम पण ही परंपरा पुढं चालवत होते पण पेटीएमनं आरबीआयकडून बँकिंग परवाना घेतला आणि तिथंच माशी शिंकली. आरबीआयची वक्रदृष्टी या खात्यांवर पडली आणि मग नियामक कडाडले. रिझर्व्ह बॅंकेनं केलेल्या लेखापरीक्षणात असं आढळून आलं, की पेटीएम पेमेंट बॅंक या पेटीएमच्या उपकंपनीत मोठ्या प्रमाणावर अशी खाती उघडली गेली, जी कोणाची आहेत हे सांगणंच अवघड आहे.

सर्वसामान्य ग्राहकांस काहीही आर्थिक व्यवहार करावयाचे असतील, किंवा खातं अथवा आर्थिक व्यवहाराचं वॉलेट (डिजिटल पाकिट) उघडावयाचं असेल तर आधार, पॅनकार्ड, पत्ता वगैरे तपशील देणं आणि त्याची पडताळणी होणं आवश्यक असतं. पेटीएमनं हे सर्व धाब्यावर बसवलं.

ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडं पसरतं आहे म्हटल्यावर पेटीएमनं मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करून त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न केला खरा पण स्टार्टअप विश्वाचा मेरुमणी समजल्या जाणाऱ्या पेटीएमच्या प्रतिष्ठेला भगदाड पडलंच. आरबीआयच्या लेखापरीक्षणात असं दिसून आलं, की एकाच पॅन नंबरवर हजारो खाती ओपन केली आहेत.

ही खाती नक्की कोणी उघडली, ही उघडताना नक्की कोणाचे आदेश आले, या खात्यातून काय व्यवहार झाले, क्रिप्टो करन्सीचे व्यवहार करायला किंवा चीनमध्ये पैसे पाठवायला यातील काही खात्यांचा वापर झाला का, इत्यादी गोष्टी अजून गुलदस्त्यातच आहेत आणि त्या बाहेर येण्याची शक्यता तशी धूसरच आहे. कदाचित आरबीआयनं देखील त्यात संदिग्धता ठेवली आहे कारण या गोष्टी बाहेर आल्या, तर उगाच परिस्थिती अजून विकोपाला जाऊ शकेल.

सद्यःस्थितीत पेटीएमच्या सर्व गैरप्रकारांना जियो फायनान्सचा उदय होत असल्यानं हे घडलं असावं असा मुलामा चढवला जाऊ शकतो, कदाचित तो पेटीएमच्या गुंतवणूकदारांच्या हिताचा असू देखील शकतो. याउलट बायजूज या कंपनीतील गुंतवणूकदारांचं पार आर्थिक नुकसान होत आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करायचं म्हणून या कंपनीनं अकाउंटिंगचं सगळेच नियम धाब्यावर बसवले. विक्री वाढवण्यासाठी बायजूजनं अनेक क्लृप्त्या लढवल्या. त्यातली एक ज्याबद्दल बोभाटा झाला, ती म्हणजे भविष्यातल्या विक्रीचे आकडे त्यांनी सध्याच्या वर्षात दाखवायला सुरुवात केली.

ऑनलाइन शिकवणी वर्गासाठी समजा एखाद्या पालकानं २ वर्ष कालावधीचा कार्यक्रम खरेदी केला, तर त्याचं शुल्क दोन वर्षांत सम-सामान प्रमाणात वाटलं जायला हवं होतं पण तसं न करता बायजूजनं ते सर्व शुल्क ज्या वर्षात मिळालं त्या वर्षाचं उत्पन्न म्हणून दाखवायला सुरुवात केली. विक्री वाढावी म्हणून पालकांना कर्ज द्यायला सुरुवात केली.

आता वाढलेली विक्री कमी होऊ नये म्हणून शुल्क परत न करणं, पालकांना भूलथापा मारून नको ते कोर्सेस करायला लावणं असे सर्व गैरप्रकार या कंपनीनं केले, वित्तपत्रकांमध्ये हे सगळे गैरप्रकार बसवणं जेव्हा हाताबाहेर गेलं तेव्हा मात्र या कंपनीनं सपशेल हार पत्करली. डेलोइट या त्यांच्या लेखापरीक्षकांनी वित्तपत्रक वेळेत सादर करता आली नाहीत म्हणून राजीनामा दिला.

स्वतंत्रपणे बायजूजचे तीन बोर्ड सदस्य - गुंतवणूकदारांचं प्रतिनिधित्व करणारे पीक एक्सव्ही पार्टनर्स, प्रोसस, चान झुकरबर्ग इनिशिएटिव्ह - यांनी कोणतंही कारण न देता पायउतार झाले. या सगळ्या गोष्टी लिहिण्याचं प्रयोजन एकच आहे, की गेल्या काही दिवसांतील बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या हातात पैसा खुळखुळतोय.

अधिक परतावा देणारी क्षेत्रं गुंतवणूकदारांना खुणावत आहेत. अनेकांचे हात स्टार्टअपवर जोखीम घ्यायला शिवशिवत आहेत पण स्टार्टअप हे क्षेत्र नियामकांच्या थेट कक्षेत येत नाही, पेटीएमनं बँकिंग परवाना घेतला नसता, तर त्यांचा खेळ विनासायास चालू राहिला असता. कंपन्यांचे प्रवर्तक योग्य वेळी आपापली गुंतवणूक नफ्यासह काढून घेत असतात.

पेटीएम असेल किंवा बायजूज, कंपन्यांची अवस्था काहीही असो प्रवर्तकांची पाचही बोटं तुपातच आहेत.

त्यांना या गाजराच्या पुंगीमध्ये किती अडकून पडावं याचं भान असतं. पण सामान्य गुंतवणूकदार मोठमोठ्या आकड्यांना भुलतात. त्यामुळंच या प्रवासात तुम्हालाच तुमची काळजी घ्यायची आहे, अनेक क्षेत्र तुम्हाला भुलवतील, खुणावतील पण ‘उद्योगी’ आणि उद्यमशील यातला फरक समजावून घेतल्याशिवाय या गुंतवणुकीपासून दूर राहिलेलंच बरं.

(लेखिका या सर्टिफाइड अँटीमनी लँडरिंगविषयक तज्ज्ञ आणि सर्टिफाइड बॅंक फॉरेन्सिक अकाउन्टंन्ट आहेत, तर लेखक हे चार्टर्ड अकाउन्टंट आणि सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटिंग तज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com