esakal | भविष्यकाळाची बीजं भूतकाळात...
sakal

बोलून बातमी शोधा

pune

भविष्यकाळाची बीजं भूतकाळात...

sakal_logo
By
अरुण तिवारी

देशाच्या फाळणीचं दुःख आपण कधीच विसरू शकत नाही. ते दोन देशांचं नाही तर मनांचंही विभाजन होतं. आपल्या पंतप्रधानांनी फाळणीचा हाच दिवस राष्ट्रीय शोकांतिका दिन म्हणून पाळण्याचं जाहीर केलंय. फाळणीमुळं अनेकांना विस्थापित व्हावं लागलं, अनेकांचे प्राण गेले. त्यांचं दुःख शब्दांत व्यक्त करता येणं शक्य नाही. यातूनच नव्या पाकिस्तानची निर्मिती झाली म्हणूनच फाळणीला कुणीच विसरू शकत नाही. आज अनेकांना हा फाळणीचा इतिहास माहित नसला तरीसुद्धा ते याच संघर्षातून तयार झालेल्या एका महावृक्षाचा भाग आहेत ही बाब त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे.

आपण या फाळणीच्या दुःखाला उजाळा देत असतानाच दुसऱ्याच दिवशी काबूलवर तालिबान्यांचा झेंडा फडकला. हा मोठा योगायोग म्हणावा लागेल. तब्बल वीस वर्षांच्या संघर्षानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानची भूमी सोडली. अर्थात हे घडणारच होतं. यामध्ये काही गोष्टींचं आजही आकलन होऊ शकत नाही. अफगाणिस्तानच्या लष्करानं तालिबानसमोर अचानक शरणागती कशी काय पत्करली असेल? राजनैतिक कर्मचारी आणि अमेरिकी लष्कराचे अधिकारी यांची सुखरुप सुटका व्हावी असं कोणतं जुगाड त्या देशाचे अधिकारी आणि तालिबानच्या म्होरक्यात झालं असेल. आताही अमेरिकेच्या सोयीचीच माणसं अफगाणिस्तानात आहेत. शेवटी जग हे आपल्या स्वार्थाभोवतीच फिरत असतं. हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. आता फक्त केवळ स्वार्थाचेच एक तत्त्वज्ञान शिल्लक राहिलंय. आपण स्वार्थाच्या बाबतीत उगीचच कीटक आणि मुग्यांना दोष देत असतो.

भारत आणि अफगाणिस्तानमध्ये प्राचीन काळापासून एक सांस्कृतिक ऋणानुबंध आहे. संदर्भच शोधायचा झाल्यास तो महाभारत काळापर्यंत जातो. कौरवांची माता गांधारी आणि तिचा भाऊ शकुनी हे यांचं हे राज्य. आर्य चाणक्य यांनी याच ठिकाणी उच्च शिक्षण घेतलं. खुद्द रवींद्रनाथ टागोर यांनीही आपल्या साहित्यात या गांधार देशाचा उल्लेख केलेला दिसतो. या भूमीला जेवढा मोठा ऐतिहासिक वारसा आहे तितकीच ती हिंसाचार आणि अराजकतेसाठी देखील कुप्रसिद्ध आहे.

याच भूमीतील अहमदशहा अब्दालीनं भारतावर १७६१ मध्ये आक्रमण केलं होतं. मराठे आणि अब्दाली यांच्यात झालेला तो ऐतिहासिक संघर्ष कुणीच विसरू शकत नाही. पानिपतचं तिसरं युद्ध मराठे हारले. त्यावेळी दोआबच्या प्रांतात दडून बसलेले अफगाणी अब्दालीच्या बाजूला गेल्याने त्याची ताकद वाढली होती. शेवटी निकराचा लढा देऊन देखील मराठ्यांच्या पदरी पराभवच आला. ब्रिटिशांच्या राजवटीत अफगाणिस्तान हे दोन मोठ्या साम्राज्यांतील महत्वाचा भूभाग होता. ती दोन साम्राज्य म्हणजे रशिया आणि भारतीय उपखंड होती. खरं तर ब्रिटिशांनाही कधीच अफगाणिस्तानवर एकहाती वर्चस्व गाजवता आलं नाही.

भारतीय उपखंडाबाबत देखील काहीसे असंच म्हणता येईल. आखाती देशांतील तेल विहिरींतील आपले हितसंबंध सुरक्षित राहावेत म्हणून त्यांनी पाकिस्तानची निर्मिती केली. भारत-चीन सीमावर्ती भागांतील नैसर्गिक स्रोतांवरही त्यांचा डोळा होता. कालचक्र जसं फिरत गेलं तसं ब्रिटिशांचं महत्त्व देखील कमी होत गेलं. पुढं पूर्व पाकिस्तान स्वतंत्र बांगलादेश झाला पण अफगाणिस्तान मात्र अपयशी राष्ट्र ठरलं. युद्धपिपासू लोकांनी नेहमीच त्यावर वर्चस्व गाजवलं. आता ही भूमी तालिबानच्या कब्जात गेली आहे. या राष्ट्राचे सर्वेसर्वा कट्टरपंथीय बनले आहेत. ही खरोखरच दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. सध्याच्या आधुनिक काळातील ही सर्वांत मोठी शोकांतिका आहे. अफगाणिस्तानातील लोकांसाठी भारतात खूप साऱ्या संधी आहेत. शिक्षण आणि आरोग्य याबाबत हा देश त्यांच्यासाठी मोठ्या संधी निर्माण करू शकतो.

भारतीय क्रिकेटवर प्रेम करणारे हजारो चाहते आपल्याला तिथे पहायला मिळतील. भारताने अफगाणिस्तानातील अनेक प्रकल्पांत मोठी गुंतवणूक केली आहे. त्या देशाची संसद आपणच उभारतो आहोत. कंदहारमधील १९९९ मधलं अपहरणनाट्य आजही आपण विसरलेलो नाहीत. तेथील काही भारतद्वेष्ट्या मंडळींनी याचं आपल्या सोयीनं भांडवल केलं. तालिबाननं देखील अपहरणकर्त्यांना उघड पाठिंबा दिला होता. १८२० मध्ये ब्रिटिशांनी रशियाची भारतीय भूमीच्या दिशेने येणारी सगळी दार बंद केली होती. मध्य आशिया जिंकायला निघालेला रशिया भारतामध्ये येऊ नये म्हणून इंग्रजांनी ती चाल खेळली होती. त्यावेळी रशिया भारतात आला असता तर ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीच मावळला असता. रशियाला रोखण्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी ग्रेट गेमचे फासे टाकले. मोठ्या चतुराईने अफगाणिस्तानात व्यापार केंद्र उभं केलं. यामुळं रशियाला पर्शियाच्या आखातात येणं शक्य झालं नाही.

भारतीय सागरात घुसखोरी करण्याचा त्यांचा डाव देखील उधळला गेला. अफगाणिस्तान आणि रशियात अंतिम सीमारेषा आखली जात नाही तोपर्यंत हा ग्रेट गेम सुरूच होता. पुढं १८९५ मध्ये त्याला पूर्णविराम मिळाला. रशियानं ऐंशीच्या दशकात अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर या सीमेचं पुन्हा एकदा उल्लंघन झालं. इथं अमेरिकेनं रशियाला रोखण्यासाठी स्थानिक दहशतवादी संघटनांना हाताशी धरून पुन्हा छुपं युद्ध सुरू केलं. सोविएत रशियाच्या १९९१ ला चिरफाळ्या उडाल्यानंतर दहशतवादी संघटनांनी मध्यपूर्वेत अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अमेरिकेत ९/११ रोजी झालेला हल्ला ही याचीच परिणीती होती. या सगळ्या घडामोडींमध्ये अमेरिकेचं मोठं नुकसान झालं. खरं तर याच हल्ल्यानं अमेरिकेच्या लष्कराला अफगाणिस्तानमध्ये आणलं.

आता याच लष्करानं तेथील जनतेसाठी काहीच भरीव काम न करता अक्षरशः पळ काढला आहे. ही नव्या ग्रेट गेमची सुरूवात मानायची का? या सगळ्या गोंधळात भारताची अवस्था अवघडल्यासारखी झाली आहे. सध्या अफगाणिस्तानात जे काही सुरू आहे आपण त्याकडं दुर्लक्ष देखील करू शकत नाही. तेथील दहशतवादी संघटनांचा धोकादेखील आपण पूर्णपणे नाकारू शकत नाहीत. कारण ताज्या विजयामुळे त्या अधिकच उन्मादी बनल्या आहेत. तसं पाहता भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीसंबंधाला मोठा इतिहास आहे पण अमेरिकेनेच यात खोडा घातल्यानं आज ती मदत देखील आपल्याला घेणं शक्य नाही. याबाबत बांगलादेश पण आपल्याला मदतीला येऊ शकत नाही. आपण आज घेतलेले निर्णय हे आपलं भविष्य ठरवतील. चांगल्या भविष्यासाठी भूतकाळाचा अभ्यास देखील चांगला असावा लागतो.

(सदराचे लेखक ज्येष्ठ वैज्ञानिक व विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत. )

(अनुवाद : गोपाळ कुलकर्णी)

loading image
go to top