आतिथ्यशील दिवेआगर (वीकएंड पर्यटन)

अरविंद तेलकर
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

दिवेआगरचाच भाग असलेल्या बोर्ली पंचतन गावातल्या द्रौपदी धर्मा पाटील यांनी नोव्हेंबर १९९७ मध्ये आपल्या पोफळीच्या बागेतलं एक मोठं आंब्याचं झाड तोडलं आणि त्या जागी सुपारीचं झाड लावलं. त्या झाडाला आळं करण्यासाठी त्यांनी खणायला सुरवात केली. खोदताना अचानक कुदळ एका धातूवर आदळली. त्यानंतर काळजीपूर्वक खणताना एक तांब्याची पेटी निघाली....

हिरव्याकंच माड आणि पोफळीच्या बनांतून फिरायचंय? लांबलचक समुद्रकिनाऱ्याची मजा लुटायचीय? सुग्रास शाकाहार किंवा खवय्यांसाठी खास मत्स्याहार करायचाय? मग दिवेआगरला पर्याय नाही. श्रीवर्धन हे पुण्याच्या पेशव्यांचं मूळ गाव. याच तालुका ठिकाणापासून उत्तरेला दिवेआगर वसलंय. स्वच्छ आणि सुंदर अथांग सागर, किनाऱ्यावर सुरू आणि केवड्याची बनं आहेत. या बनातूनच किनाऱ्यावर प्रवेश करता येतो. दिवेआगर गाव अत्यंत टुमदार आणि गावकरी आतिथ्यशील आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे एक निद्रिस्त आणि अपरिचित गाव होतं. मात्र, गेल्या शतकाच्या अखेरीस एक चमत्कार झाला आणि हे गाव अल्पावधीत नावारूपाला आलं. त्याचं कारण होतं, ‘सुवर्ण गणेश !’

दिवेआगरचाच भाग असलेल्या बोर्ली पंचतन गावातल्या द्रौपदी धर्मा पाटील यांनी नोव्हेंबर १९९७ मध्ये आपल्या पोफळीच्या बागेतलं एक मोठं आंब्याचं झाड तोडलं आणि त्या जागी सुपारीचं झाड लावलं. त्या झाडाला आळं करण्यासाठी त्यांनी खणायला सुरवात केली. खोदताना अचानक कुदळ एका धातूवर आदळली. त्यानंतर काळजीपूर्वक खणताना एक तांब्याची पेटी निघाली. तिला कुलूपही होतं. हे वृत्त गावात पसरायला वेळ लागला नाही. गावचे सरपंच आणि प्रतिष्ठित मंडळी जमा झाली. त्यांच्यासमक्ष पेटीचं कुलूप फोडण्यात आलं आणि त्यातून निघाला गणेशाचा शुद्ध सोन्याचा मुखवटा! या मुखवट्याचं वजन होतं १ किलो ३०० ग्रॅम आणि सोबत होते २८० ग्रॅम वजनाचे सुवर्णालंकार! कायद्यानुसार जमिनीच्या तीन फुटांपर्यंत सापडलेलं गुप्तधन जमीनमालकाच्या मालकीचं असतं. मुखवट्याची मालकी द्रौपदी पाटील यांच्याकडंच राहिली; पण गावकऱ्यांनी एकत्र येऊन गणेशाचं सुंदर मंदिर बांधलं आणि तिथं या मुखवट्याची प्रतिष्ठापना केली. ही बातमी राज्यभर पसरली आणि पर्यटकांचा ओघ गावाकडं वाहू लागला. तोपर्यंत वर्दळीपासून अलिप्त असलेलं गाव आता जगाच्या नकाशावर आलं होतं. पर्यटकांची सोय म्हणून स्थानिकांनी ‘होम स्टे’ सुरू केले आणि काही जणांनी पथिकाश्रमही सुरू केले. दुर्दैवानं २४  मार्च २०१२ रोजी या मुखवट्याची चोरी झाली. 

दिवेआगरचा इतिहास खूप प्राचीन आहे. शिलाहार राजांची ८०० ते १२६५ या काळात या प्रदेशावर सत्ता होती. या परिसरात ५०० वर्षांहून आधीच्या वसाहती सापडल्या आहेत. अरब, पोर्तुगीज आणि मोगलांनी या गावावर सतत हल्ले केले. त्यात तीन ते चार वेळा गावाचा विध्वंस झाला होता. गावात रूपनारायण नावाचं विष्णूचं मंदिर आहे. भगवान विष्णूची मूर्ती अखंड पाषाणातून घडवलेली आहे. 

मूर्तीच्या दोन्ही बाजूंना दशावतार कोरलेले आहेत. त्याशिवाय शंकराचं उत्तरेश्‍वर नावाचं एक मंदिर आहे. दिवेआगरचा समुद्रकिनारा सुरक्षित मानला जातो. परंतु, पर्यटकांनी खोलवर पाण्यात जाऊ नये, अशा पाट्या सर्वत्र लावण्यात आल्या आहेत. ठराविक काळात इथं डॉल्फिनही दिसतात. दिवेआगारहून १६ किलोमीटरवर श्रीवर्धन आणि ३२ किलोमीटरवर हरिहरेश्‍वर आहे. शिवाय १६ किलोमीटरवर दिघी नावाचं गाव आहे. इथून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी लाँच मिळतात.

  • कसे जाल?

पुण्याहून ताम्हिणी घाट - माणगावमार्गे १६० किलोमीटर, मुंबईहून १९० आणि अलिबागहून ७५ किलोमीटरवर आहे. गावात भोजन आणि निवासाची उत्तम सोय आहे. ऑनलाइन बुकिंग करूनही जाता येतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aricle on Diveagars beauty and Tourism in Raigad district