मनाचं वेळीच ऐका (डॉ. हमीद दाभोलकर)

Hamid-Dabholkar
Hamid-Dabholkar

ताण-तणाव ही आजच्या वेगवान आणि बहुव्यवधानात्मक काळात न टाळता येणारी बाब होऊन बसली आहे. ताण-तणावांचं रूपांतर मानसिक रुग्णतेत व्हायला वेळ लागत नाही. भारतातल्या दर सात व्यक्तींमागं एका व्यक्तीला कुठल्या तरी मानसिक आजारानं ग्रासलेलं असल्याचं एका पाहणीतून नुकतंच पुढं आलं असून, हे प्रमाण गेल्या तीन दशकांत जवळजवळ दुपटीनं वाढलं आहे. ‘लान्सेट’ या जगप्रसिद्ध शोधनियतकालिकात याविषयीचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. अर्थात, या ताण-तणावांमधून बाहेर पडण्याचे प्रभावी उपायही आपण स्वतःच्या पातळीवरसुद्धा करू शकतो. आपलं मन त्याच्या आरोग्याविषयी आपल्याला वेळोवेळी काहीतरी सांगत असतं. मनाचं हे सांगणं आपण वेळीच ऐकायला शिकलं पाहिजे.

मानसिक आरोग्याच्या विषयात रस असलेल्या व्यक्तीला महत्त्वाच्या वाटतील अशा दोन घटना या सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात घडल्या. त्यातली पहिली घटना म्हणजे, सन १९९० ते २०१७ या कालावधीत भारतातल्या मानसिक आरोग्याची समस्या कशा प्रकारे बदलते आहे याविषयी ‘लान्सेट’ या जगप्रसिद्ध शोधनियतकालिकात अत्यंत महत्त्वाचा असा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. 

या शोधनिबंधानुसार, भारतातल्या दर सात व्यक्तींपैकी एका व्यक्तीला कुठल्या तरी मानसिक आजारानं सतावलेलं आहे. एवढंच नव्हे तर, गेल्या तीन दशकांत हे प्रमाण जवळजवळ दुपटीनं वाढलेलं आहे. 

याचा अर्थ असा की आपल्या देशात साधारणतः १८ ते २० कोटी लोकांना कुठल्यातरी मानसिक आरोग्याच्या आजाराविषयी उपचारांची गरज आहे. आपल्या देशात एकूण सात ते आठ मनोविकारतज्ज्ञ आहेत. या पार्श्वभूमीवर वरील परिस्थितीचा विचार केला तर मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात आपल्या देशात आणीबाणीच आहे असं म्हणावं लागेल! याच पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या बातमीकडे आपण वळू या.

या बातमीनुसार वाराणसी इथल्या बनारस विश्वविद्यालयानं मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपचार म्हणून ‘भूतविद्या’ नावाचा सहा महिन्यांचा कोर्स सुरू केला आहे! बनारस विश्वविद्यालयाच्या डीनच्या माहितीनुसार, भूत आणि अतींद्रिय शक्तींचा अभ्यास करून मानसिक आणि मनोकायिक आजारांवर उपचार करण्याचं प्रशिक्षण बीएएमएस किंवा एमबीबीएस झालेल्या डॉक्टरला या कोर्सद्वारे दिलं जाणार आहे!
मानसिक आरोग्याच्या प्रश्नाचं स्वरूप किती बहुपदरी आहे आणि त्यासंदर्भातली आव्हानं किती गंभीर आहेत याचा अंदाज वरील दोन बाबी वाचून आपल्याला येऊ शकेल. यानिमित्तानं मानसिक आरोग्याविषयी कोणकोणते विविध प्रश्न आहेत, ते कशामुळे निर्माण होतात आणि ते सोडवताना काय अडचणी येतात आणि आपण काय केलं पाहिजे हे समजून घ्यायचा प्रयत्न करू या. 

‘मना’विषयीचं अज्ञान
‘मानसिक आरोग्य’ याविषयी आपल्याकडच्या लोकांच्या अडचणींची सुरवात ‘मन’ या गोष्टीच्या अज्ञानातून सुरू होते. 

तुमचे ‘हात’ कुठं आहेत ते दाखवा? तुमचे ‘पाय’ कठं आहेत ते दाखवा? हे आपल्याला बालवाडीमध्ये शिकवलं जातं; पण ‘मन कुठं आहे?’ या प्रश्नाचं योग्य उत्तर अगदी आयआयटी किंवा एमएस्सीच्या मुला-मुलींनाही देता येत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे.

याचं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे, आपलं मन म्हणजे काय? ते कुठं असतं? ते कसं काम करतं? याविषयी काहीही माहिती आपल्या शालेय अभ्यासक्रमात शिकवली जात नाही. त्यामुळे मग ‘मन कुठं असतं?’ या प्रश्नांचं उत्तरही अगदी सुशिक्षित लोकदेखील ‘हृदयात असतं’, ‘सगळ्या शरीरात कुठंही असतं’, ‘मन हे प्रत्यक्षात कुठंच नसतं’ असं ज्याला जे सुचेल ते देतात! 

मानवाचा मेंदू ही एक रचना आहे आणि मन हे त्या माध्यमातून होणारं कार्य आहे इतकी साधी वैज्ञानिक गोष्ट जर आपल्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली तर त्याद्वारेही खूप मोठं प्रबोधन होऊ शकेल. ज्या मनाचं आरोग्य जपायचं आहे त्याचा आपल्या शरीरातला अवयव कोणता, एवढं तरी आपल्या सगळ्यांना माहीत असायलाच पाहिजे! आपल्या मेंदूत अब्जावधी चेतापेशी असतात. या चेतापेशींच्या माध्यमातून विविध प्रकारचे संदेशवहन मेंदूत होत असतं. आपण ज्यांना ‘विचार’ आणि ‘भावना’ म्हणतो तेच हे ‘संदेश’! काही वेळा या संदेशजालात ‘शॉर्टसर्किट’ होतं आणि आपलं भावनिक संतुलन बिघडतं, हे इतकं साधं-सोपं गणित आहे; पण आपल्या समाजात शतकानुशतकं मानवी मनासंबंधीच्या व्यवहारांविषयी गूढतेचं वलय राहिलं आहे. मनाचं आरोग्य जपायचं असेल तर हा गूढतेचा पडदा आपण हटवायला पाहिजे. 

‘अस्वस्थ’ता ओळखता येते
मानसिक आरोग्याविषयी समजून घेताना आपल्याला नैसर्गिक भावना, भावनिक ताण-तणाव/टेन्शन आणि मानसिक आजार अशा तीन टप्प्‍यांत गोष्टी समजून घ्यायला हव्यात. दु:ख, आनंद, राग, द्वेष अशा भावना आपल्या सर्वांनाच आयुष्यातल्या विविध प्रसंगांत अनुभवाला येत असतात. या भावना ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कुठल्याही कारणानं वरीलपैकी भावना ही अत्यंत तीव्रतेनं आपल्याला जाणवू लागली तर आणि त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात अडचण निर्माण होऊ लागली तर त्या नैसर्गिक भावनेचं रूपांतर भावनिक ताण-तणावांमध्ये होऊ लागतं.

उदाहरणार्थ  : परीक्षेत नापास होण्याच्या घटनेमुळे ‘नाराज होणं’ ही नैसर्गिक भावना आहे; पण एखादी व्यक्ती परीक्षेत नापास झाल्यानं सारखीच नाराज राहू लागली तर, पुढच्या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करणं टाळू लागली तर त्या नैसर्गिक भावनेचं रूपांतर ‘टेन्शन’मध्ये होऊ लागलं आहे असं समजावं. जर हे भावनिक ताण-तणाव दीर्घ काळ आपल्या मनावर परिणाम करू लागले तर त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये किंवा चिंतेच्या मानसिक आजारांमध्ये होतं. यात आजारी व्यक्तीच्या झोप, जेवण अशा दैनंदिन गोष्टींच्यावर परिणाम होतो.सातत्याने चिडचिड होत राहते. स्वतःविषयी, तसंच भविष्याविषयी नकारात्मक विचार मनात येऊ लागतात. आत्मविश्वास कमी होतो. काही वेळा तर ‘जीवन जगणं नको’ असं वाटायला लागतं. सतत भीती वाटणं, अस्वस्थ राहणं, मन एकाग्र न होणं अशा स्वरूपाचीही लक्षणं दिसू लागतात. मानसिक आरोग्याच्या लक्षणांचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे, बहुतांश मानसिक आजारांमध्ये त्या व्यक्तीला ‘आपलं मन ‘त्रस्त’ आहे’ हे कळू शकतं, तसंच ‘आपल्या जवळच्या व्यक्तीचं मन ‘अस्वस्थ’ आहे’ हेही आपण निरीक्षणातून ओळखू शकतो. त्यासाठी स्वत:कडे किवा आपल्या जवळच्या व्यक्तीकडे थोडं तटस्थ पद्धतीनं पाहणं आवश्यक असतं. पृथ्वीतलावर केवळ मनुष्याला हे कौशल्य मिळालेलं आहे. असं कौशल्य जर नैसर्गिकरीत्या आपल्याकडे नसेल तर ते शिकून घेता येऊ शकते. मानसिक आरोग्य जपण्याच्या दृष्टीनं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 

‘मान्य करणं’ ही पहिली पायरी
मानसिक आजाराविषयी असलेल्या गैरसमजांमुळे भले भले लोक ‘आपल्याला मानसिक त्रास आहे’ हे मान्य करत नाहीत. पूर्वी जसं कुष्ठरोग किंवा क्षयरोग यांच्याकडे एखादा कलंक असल्याच्या नजरेनं पाहिलं जायचं, तसाच काहीसा दृष्टिकोन मानसिक आजाराबाबतही आहे. ‘आपलं मन आजारी पडलं आहे,’ हे स्वीकारायला अनेक लोकांना खूप कमीपणा वाटतो, त्यामुळे अनेकदा वेळीच उपचार न घेतल्यानं आजार बळावतो. जसं शरीर आजारी पडतं तसंच मनदेखील आजारी पडू शकतं, त्यात कोणताही कमीपणा नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे.

आपल्याला यामधली कोणतीही लक्षणं स्वत:मध्ये अथवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीत दिसून आल्यास कोणताही संकोच न बाळगता आपण तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये दीपिका पदुकोन, विराट कोहली अशा ‘यूथ आयकॉन्स’नी त्यांना आलेल्या डिप्रेशनविषयी जाहीरपणे सांगितलेलं आहे. दीपिकानं तर मानसिक आरोग्याविषयीच्या जनजागृतीचंही काम तिच्या संस्थेद्वारे सुरू केलं आहे. हळूहळू का होईना, मानसिक आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे ही स्वागतार्ह बाब आहे.

स्किझोफ्रेनियासारखे काही ‘तीव्र मानसिक आजार’ असतात, ज्यात ‘आपण आजारी पडलो आहे’ हे त्या व्यक्तीच्या लक्षात येणं अनेक वेळा अवघड असतं. या आजारात संबंधित व्यक्तीला ‘भास’ आणि ‘भ्रम’ होत असतात. वास्तवाचं भान जातं. कुणी तरी आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देत आहे असे ‘विचारभ्रम’ मनात तयार होतात.

आजूबाजूला कुणीही बोलत नसलं तरीही बोलल्याचे आवाज ऐकू येतात. असा त्रास होत असलेल्या व्यक्तीला ‘काही ‘बाहेरची बाधा’ झाली आहे,’ असं समजून भगताकडे अथवा मांत्रिकाकडे घेऊन जाण्याचे प्रकार अजूनदेखील आपल्या समाजात घडताना दिसतात. स्किझोफ्रेनियासारख्या आजाराचं वेळेत निदान झालं तर आणि योग्य उपचार मिळाले तर त्यापैकी अनेक लोक हे आजाराशी मैत्री करून अर्थपूर्ण आयुष्य जगू शकतात. अशा प्रकारे तीव्र मानसिक आजार असलेल्या रुग्णमित्रांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी पुण्यात ‘मानसरंग’ नावाचं व्यासपीठ ‘परिवर्तन’ ही संस्था चालवते. नाट्यकर्मी अतुल पेठे यांच्या पुढाकारातून हे आम्ही सुरू केलं आहे कलेच्या माध्यमातून पुनर्वसनाकडे जाणारी प्रक्रिया याद्वारे केली जाते. रुग्णमित्र आणि पालक यांच्या सहभागातून ही प्रक्रिया चालवली जाते. अनेक रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यातून बाहेर पडून सन्मानाचं जगणं जगत आहेत. 

भावनिक स्वमदत
आपल्या दैनंदिन आयुष्यातले ताणतणाव हाताळण्यासाठी मनोविकारतज्ज्ञांकडे किंवा समुपदेशकांकडे जाण्याआधीदेखील अनेक गोष्टी करता येणं शक्य असतं. ‘भावनिक स्वमदत’ म्हणजेच स्वत:च स्वत:च्या भावनांची काळजी घ्यायला शिकणं ही त्यादृष्टीनं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. व्यक्तीव्यक्तीनुसार प्रत्येकाची भावनिक स्वमदत करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. एखादी बुद्धिवादी व्यक्ती घडलेला प्रसंग, त्यामागच्या आपल्या मनात प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून निर्माण होणाऱ्या भावना, त्यामागचा विचार असे सगळे सोपस्कार करून विवेकनिष्ठ विचारपद्धतीनं स्वमदत करत असू शकेल. दुसरी कुणी व्यक्ती नातेसंबंधांद्वारे आधार मिळवून भावनिक तोल राखत असू शकेल. ‘देवाची संकल्पना’ आणि ‘धर्मातली कर्मकांडे’ या बाबीदेखील स्वतःच्या अस्वस्थ मनाला आधार देण्यासाठी काही जणांना  अनेक वेळा उपयोगी पडत असतात. विविध खेळ खेळणं, संगीत, गिर्यारोहण अशा अनेक छंदांचाही याकामी उपयोग होऊ शकतो. भावनिक स्वमदत करण्याच्या काही त्रासदायक पद्धतीही असतात. उदाहरणार्थ : ताण वाढला की व्यसन करणं किंवा सोशल मीडियावर विनाकारणच खूप वेळ घालवणं इत्यादी. आपल्या स्वत:च्या भावनिक स्वमदत करण्याच्या पद्धतींविषयी अधिक सजग होणं आणि त्रासदायक पद्धतींऐवजी अधिक आरोग्यपूर्ण स्वमदत पद्धती वापरायला शिकणं हे मानसिक आरोग्य राखण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्याच्या तज्ज्ञांकडे जाण्याआधी करता येण्यासारखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘भावनिक प्रथमोपचार’ ही होय.

जसं भाजलं किंवा कापलं तर डॉक्टरकडे जाण्याआधी आपण घरच्या घरी शारीरिक प्रथमोपचार करतो, त्याचप्रमाणे एखाद्या भावनिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीला आपण नातेसंबंधांच्या माध्यमातून शास्त्रीय मदत करू शकतो. याला ‘भावनिक प्रथमोपचार’ असं म्हणतात. जागतिक आरोग्य संघटना ही मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातल्या ‘इमर्जन्सी’ला एक महत्त्वाचं उत्तर म्हणून ‘भावनिक प्रथमोपचार’ या प्रकाराविषयी खूप मोठ्या प्रमाणात सध्या जनजागृती करत आहे. भावनिक प्रथमोपचार कसे द्यायचे हे कुणीही व्यक्ती काही तासांच्या प्रशिक्षणाद्वारे शिकू शकते. 

‘अंधश्रद्धा निर्मूल समिती, महाराष्ट्र’तर्फे ‘मानसमैत्री’ या उपक्रमात असं प्रशिक्षण दिलं जातं. समोरच्याचं मन:पूर्वक ऐकून घेणं, अस्वस्थ व्यक्तीला आधार देणं, योग्य ठिकाणी तज्ज्ञाचा सल्ला घेण्यास उद्युक्त करणे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनही मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातले गंभीर प्रसंग टाळचा येऊ शकतात. भारतात दर वर्षी साधारणतः दोन लाख लोक आत्महत्या करतात. त्यापैकी जवळजवळ एक लाख या १५ ते ३५ वयोगटांतल्या तरुण-तरुणी असतात. हे लक्षात घेतलं तर योग्य वेळी मानसिक आरोग्याबाबत मदत मिळणं किती आवश्यक आहे हे कळून येईल. 

सरकारचीही जबाबदारी!
व्यक्ती आणि कुटुंब म्हणून आपण जसे याबाबतीत काही गोष्टी करू शकतो, तसंच राज्य सरकारनंही या गोष्टींकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात शासकीय मानसिक आरोग्यसेवांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक जिल्ह्यांत शासकीय रुग्णालयांमध्ये मनोविकारतज्ज्ञ ही जागा रिक्त आहे. आपल्याकडे मानसिक आरोग्याची ही परिस्थिती असताना न्यूझीलंडसारखे काही देश त्यांच्या नागरिकांच्या मानसिक आरोग्याविषयी कमालीचे जागरूक आणि कृतिशील झाले आहेत. जेसिंथा आर्डन या तिथल्या तरुण पंतप्रधानांनी मानसिक आरोग्याविषयी स्वतंत्र मंत्रालय आणि बजेट यांसारखे यशस्वी प्रयोग केले आहेत. दिल्लीत आम आदमी पार्टीच्या सरकारनंही एक उपक्रम राबवला आहे. तो म्हणजे, ‘मन आनंदी कसं ठेवावं’ याविषयी शालेय वयापासूनच प्रत्येक सरकारी शाळेत ‘हॅपिनेस करिक्युलम’ सुरू करण्यात आलं आहे . महाराष्ट्रातलं नवीन सरकार याविषयी संवेदनशीलता दाखवून काही महत्त्वाची पावलं उचलेल अशी आशा करू या. ‘विकास’ हा परवलीचा शब्द झालेल्या आजच्या भारतात मानसिक आरोग्यावरची एक डॉलरची गुंतवणूक चार डॉलरपर्यंतचा परतावा नजीकच्या भविष्यात देऊ शकते हा वर्ल्ड बॅंकेचा अभ्यास आपण समाज म्हणून लक्षात घेणं आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य प्रकारची मदत मिळाली तर बहुतेक मानसिक आजार व्यवस्थितरीत्या बरे होतात आणि ती व्यक्ती उत्तम आयुष्य जगू शकते हे दाखवणारे अनेक दिशादर्शक प्रकल्प भारतातही उपलब्ध आहेत.

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात रस असलेले नागरिक, मानसिक अस्वास्थ्याशी झुंजणारे रुग्णमित्र व त्यांचे नातेवाईक, सरकार आणि समाज असं सगळ्यांनी मिळून ठरवलं तर ‘सर्वांसाठी मानसिक आरोग्य’ हे अजिबात अशक्य नाही. त्यासाठी आपण सगळ्यांनी सातत्यानं, संधी मिळेल तिथं ‘मन की बात’ मात्र न चुकता, न थकता करणं 
आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com