दृष्टीकोन बदला... जग बदलेल

आर्या तेंडुलकर, मानसोपचारतज्ज्ञ
Sunday, 19 July 2020

तुम्ही तुमच्या मनात कोणत्या प्रकारच्या विचारांची पेरणी करत आहात आणि त्याला कशाप्रकारे खत पाणी देत आहात यावर तुमचे वर्तमान काळातले आणि भविष्यातले मानसिक आणि शारीरिक आरोग्य अवलंबून असते. अतिचिंता, नकारात्मक विचार असे सतत होत राहिले तर उदासीनता, भीती, न्यूनगंड तयार होणे, आत्मविश्वास ढासळणे, आत्महत्येचे विचार मनात येणे अशा प्रकारच्या अनेक समस्या उद्भवायला फार वेळ लागत नाही.

तुम्ही तुमच्या मनात कोणत्या प्रकारच्या विचारांची पेरणी करत आहात आणि त्याला कशाप्रकारे खत पाणी देत आहात यावर तुमचे वर्तमान काळातले आणि भविष्यातले मानसिक आणि शारीरिक आरोग्य अवलंबून असते. अतिचिंता, नकारात्मक विचार असे सतत होत राहिले तर उदासीनता, भीती, न्यूनगंड तयार होणे, आत्मविश्वास ढासळणे, आत्महत्येचे विचार मनात येणे अशा प्रकारच्या अनेक समस्या उद्भवायला फार वेळ लागत नाही. पण वेळीच त्यावर योग्य उपचार केले नाहीत, तर मात्र यातून बाहेर पडायला अजूनच जास्त वेळ लागू शकतो. ज्याचा दीर्घकाळापर्यंत आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या या अनिश्चिततेच्या काळात आणि नंतरही या स्पर्धेच्या जगात टिकून राहायचे असेल तर शक्य तितका सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा. आपल्या मानसिक सुदृढतेसाठी हा काळ आपल्याला सुदैवाने आयताच लाभला आहे. त्याचा सदुपयोग करून घेऊ. आपण स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणू.

नकारात्मक बातम्या जास्त वेळ बघणे, नकारात्मक चर्चांमध्ये सहभाग नोंदवणे अशा काही कारणांमुळे नकारात्मकता येऊ शकते. याउलट हे टाळून घरातल्या घरात आपण आनंद कसा शोधू शकतो याचा विचार करावा. सकारात्मकता टिकवण्यासाठी खालील गोष्टी करा :

१. एकमेकांची कमजोरी नव्हे ताकद आणि आधार बना.
२. सकारात्मकता किंवा मनोधैर्य वाढवणाऱ्या लोकांशी बोला किंवा तशी पुस्तके/लेख वाचा.
3. नव-नवीन गोष्टी शिकणे व 
करून बघणे.
4. आपल्या मनातील नकारात्मक विचार, ताण कमी करायला आपले छंद आपली मदत करतात. त्यामुळे आवर्जून छंद जोपासा.
5. वर्क फ्रॉम होम असल्यास दिनक्रम बिघडू देऊ नका.
6. योग्य आहार, नियमित व्यायाम, रात्रीची सलग व भरपूर झोप, पुस्तके वाचणे, सिनेमे बघणे, आपल्या प्रिय मित्र-मैत्रिणीशी किंवा जवळच्या व्यक्तींशी प्रत्यक्ष भेटणे शक्य नसल्यामुळे फोनवरून तरी नक्की संपर्कात राहा.

ठरवलेल्या गोष्टी वेळच्या वेळी पूर्ण करणे, यासाठी स्वतःशी केलेली विश्वासार्हता महत्त्वाची असते. भावनांबद्दलची जागृकता खूप महत्त्वाची आहे. भावनांमधील तर्कसंगतता आणि अतार्किकता यातला फरक ओळखता आला पाहिजे. तो ओळखता आला की प्रतिसाद आणि प्रतिक्रिया यातला फरक आपल्याला हळूहळू समजेल. मनात नकारात्मक विचार येत असतील तर ते साहजिक आहे. नकारात्मक विचारांचेही दोन भाग पडतात.

१. आरोग्याला पोषक असलेले म्हणजेच घातक नसलेले नकारात्मक विचार (Healthy Negative Thoughts)
२. आरोग्याला घातक असलेले नकारात्मक विचार (Unhealthy Negative Thoughts)
याचे उदाहरण द्यायचे झाले तर - काळजी हा आरोग्याला पोषक असा नकारात्मक विचार आहे, त्या उलट भीती हा आरोग्याला घातक असा नकारात्मक विचार आहे.

मला काहीही होऊ नये म्हणून घेतलेली काळजी ही मला सुरक्षित राहायला मदत करेल. त्या उलट मला काही होईलच ही भीती सतत मनात बाळगली तर त्याचा माझ्या मानसिक आणि कालांतराने शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम दिसायला सुरुवात होईल. आनंदी आणि दीर्घ आयुष्य जगायचे असेल तर सुखाने न शेफारणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच दुःखाने न ढासळणेही महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवूया आणि आनंदी राहूया! 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article aarya tendulkar on Change the perspective the world will change