esakal | ‘बाजारव्यवस्थे’चं‌ वस्त्रहरण
sakal

बोलून बातमी शोधा

aashram

आश्रमाचे बारकावे टिपणारा कॅमेरा आणि एकूणच सीरिजचे संकलनही कमाल आहे. त्यामुळे कथा कंटाळवाणी वाटत नाही. पण, खूप बारकावे दाखविण्याच्या नादात सीरिजचा वेग मात्र मंद झाला आहे.

‘बाजारव्यवस्थे’चं‌ वस्त्रहरण

sakal_logo
By
संतोष शाळिग्राम

हतबल किंवा परिस्थितीशी झगडून अपयशी पदरी पडणाऱ्या माणसाला एक उमेद‌ देव या‌ कल्पनेकडून मिळते. एखाद्या मूर्तीवर विश्वास ठेवून तिला कवटाळले, की त्याच्यात ऊर्जेचा संचार होतो आणि माणूस पुन्हा उभा राहतो. मात्र, देवाचे हे सगुण रूप आश्रमात कोंडले, की देव-धर्म आणि भावनांचा‌ बाजार सुरू होतो. अत्याचार, नीतिभ्रष्ट आचार, शोषण या गोष्टी मग त्यासोबतच येतात. या ‘आश्रम’ नावाच्या बाजारव्यवस्थेचं भीषण, क्रूर व पीपासू रूप ‘आश्रम’ या वेब सीरिजचे दोन्ही सीझन दाखवतात. प्रकाश झा यांनी खूप बारकावे टिपत‌ या ‘बाजारा’चे वस्रहरण केले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्याची कथा काशीपूरवाले बाबा निराला (बॉबी देओल) यांच्या‌ आश्रमातून सुरू होते. पहिल्या सीझनमध्ये आपल्याला बाबाची ओळख होते. गरीब, दीनदुबळ्या लोकांच्या असाह्यतेचा फायदा घेत, त्यांच्या जिवावरच उभारलेला आश्रम दिसतो. कथेची नायिका पम्मी (अदिती पोहनकर) आहे. कुस्तीपटू होण्याची तिची इच्छा असते. उच्च जातीचा अडसर तिला ओलांडता येत नाही. मग बाबा निराला तिला स्वप्न दाखवतो. कुटुबांतून विरोध होतो. पण, भाऊ पाठीशी उभा राहतो. पम्मी‌ बाबाच्या आश्रमात दाखल होते. तिच्यासाठी बाबा आता देव बनतो. एकीकडे भक्तांना मदत, शिक्षण संस्था, दवाखाना आणि दुसरीकडे महिलांवर अत्याचार, कुकर्म असे प्रवाह आश्रमातून अखंडपणे वाहत राहतात. पम्मीचा भाऊ नंतर आश्रमात‌ येतो. सामूहिक विवाहात बबिताबरोबर (त्रिधा चौधरी) त्याचे लग्न लावून दिले जाते. त्याला भुलवून नपुंसक केले जाते आणि त्याची बायको बाबाच्या भोगासाठी तयार केली जाते. अशा अनेक महिलांवर बाबाने अत्याचार केलेला असतो. आश्रमात भक्तांचा पूर असतो. त्यामुळे राजकारणही बाबाच्या पायावर माथा टेकत असते. मग पैसा, संपत्ती, दहशत, अत्याचार आणि खून हे कुकर्मकांड दाखवत सीरिज पुढे सरकते. दुसऱ्या सीझनमध्ये बाबाचे‌ कारनामे पोलिसांपर्यंत पोचलेले असतात. बाबाने आपल्या बाजूने कौल द्यावा म्हणून पैशाचा वापर, त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी राजसत्तेचा वापर होतो. पोलिस यंत्रणेने गुप्तपणे आश्रमात शिरकाव केलेला असतो. तेथील अमली पदार्थ तस्करी, महिलांवरील अत्याचार यांची फाइल तयार होते. पण, बाबा वजनदार असल्याने फाइल धूळ खाते. यादरम्यान बाबाच्या नजरेत पम्मी भरते. तिच्यावर अत्याचार होतो आणि पुढे सुरू होते सूडकथा.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सूडकथेची नायिका पम्मीच आहे. ती आश्रमातून सटकते. मग पाठलाग, अपहरण आणि पम्मीचा भाऊ सत्ती (तुषार पांडे) याचा खून; इथे हा दुसरा सीझन संपतो. ही सीरिज मांडताना दिग्दर्शक प्रकाश झा आणि त्यांच्या‌ टीमने खूप मेहनत घेतलेली दिसते. बाबा निरालाचा पेहराव, त्याचे शयनगृह, तिथपर्यंत पोचण्याचे मार्ग, आश्रमाची ‘आचारसंहिता’, प्रोटोकॉल, त्या व्यवस्थेतील अधिकार पदांची उतरंड, त्यांचे पेहराव, बाबाची भलावण भाकणारी ‘जपनाम जपनाम’, ‘बाबाजी जाने मन की बात’ यांसारखी घोषवाक्ये, आरत्या यावर खूप काम केले आहे. आश्रमाचे बारकावे टिपणारा कॅमेरा आणि एकूणच सीरिजचे संकलनही कमाल आहे. त्यामुळे कथा कंटाळवाणी वाटत नाही. पण, खूप बारकावे दाखविण्याच्या नादात सीरिजचा वेग मात्र मंद झाला आहे. अभिनयाच्या पातळीवर ही कथामालिका समाधान देते. बाबा निरालाच्या भूमिकेत बॉबी देओलने खरेच जीव ओतला आहे. अनेक वर्षे सिनेमापासून बाजूला गेलेल्या या कलाकाराच्या चांगल्या अभिनयाची चुणूक सीरिजमध्ये दिसते. अदिती पोहनकर  गुणी अभिनेत्री आहे. परिमिंदरचे (पम्मी) पात्र साकारताना तिचे समरसून जाणे भावत‌ राहते. त्रिधा चौधरी (बबिता), आश्रमाचा क्रूरकर्मा मॅनेजर भूपा स्वामी वठविताना चंदन रॉय सन्याल यानेही कमाल केली आहे. उजागरसिंग या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील दर्शनकुमारही लक्षात राहतो. धर्माची बदनामी करणारी मालिका म्हणून यावर टीका झाली असली, तर आश्रमातील वास्तव आणि शोषण काय असते, हे जाणून घ्यायचे असेल, तर एकदा ही सीरिज नक्की पाहा.

loading image
go to top