'भाषेलाही अभिमानबिंदू असणे गरजेचे; कारण ती आहे लोकशक्तीचा श्वास'    

प्रा. मिलिंद जोशी
गुरुवार, 6 जून 2019

मराठी शाळांची झालेली दुरवस्था, प्रतिष्ठेच्या खोट्या संकल्पनांपायी इंग्रजी माध्यमांचे वाढलेले प्रस्थ, भाषेचा आणि पोटाचा तुटलेला संबंध, कुटुंबातून हरवत चाललेली वाड्मयसंस्कृती, अपराधगंड, न्यूनगंड आणि भयगंडाने पछाडलेला मराठी समाज आणि त्याची मानसिकता हीच मराठी भाषेसमोरची मोठी आव्हाने आहेत. त्या आव्हानांचा सामना करताना 'अभिजात दर्जा' सारखा अभिमान बिंदू मराठी समाजमनावरील निराशेचे मळभ दूर करून भाषिक चैतन्य निर्माण करेल अशी आशा ठेवायला काय हरकत आहे.    

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी साहित्य संस्था त्यांच्यापरीने पूर्ण प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेने यासाठी लोक चळवळ उभी करीत पंतप्रधान कार्यालयाला १ लाख पत्र पाठवली. राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. नेत्यांच्या भेटी घेतल्या. राजधानी दिल्लीत जाऊनही आवाज उठवला. मराठी ही 'अभिजात' भाषा आहेच. तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न कशाला करायचे ? असे म्हणणाऱ्यांचा एक वर्ग आहे. त्यांना आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे, असे वाटत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. अभिमान काटेरी नसावा हे मान्य असले तरी अभिमानच नसावा हे ही योग्य नाही. भाषेलाही अभिमानबिंदू असणे गरजेचे आहे. कारण भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसते. ती लोकशक्तीचा श्वास असते. 

सरकारची भाषा, साहित्य आणि संस्कृती विषयीची अनास्था आणि प्रतिसादशून्यता चिंताजनक आहे. मराठी लोकांच्या बळावर राजकारण करायचे पण मराठी भाषेसाठी काहीच करायचे नाही ही मानसिकता जास्त भयावह आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकाही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात भाषा, साहित्य आणि संस्कृती यांना स्थान नव्हते. याचे समाजालाही काही वाटले नाही हे जास्त क्लेशकारक आहे. 

शासन ही लोकशाहीत लोकांनीच निर्माण केलेली  मोठी शक्ती असल्यामुळे त्यांच्याकडून भाषेसंदर्भात अपेक्षा ठेवणे यात गैर काहीच नाही. दै. केसरीतल्या भाषेसंदर्भातल्या आपल्या अग्रलेखात लोकमान्य लिहितात, "नाडीवरून ज्या प्रमाणे शरीरातील रोगाची अथवा स्वास्थ्याची परीक्षा होते तद्ववतच भाषेवरून राष्ट्राची बरी-वाईट स्थिती तज्ञ लोक तेव्हाच ताडतात. छत्रपती श्रीशिवाजी महाराज जन्मण्यापूर्वी पोवाडे का झाले नाहीत याचे कारण आता सांगण्याची जरुरी नाही. शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय." लोकमान्यांच्या सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, शासनाकडे इच्छाशक्ती असेल तर खूप काही घडू शकते. भाषेच्या संदर्भात समाजाचीही भूमिका महत्वाची आहे. साहित्य संस्था, ग्रंथालये, भाषातज्ञ्, प्राध्यापक, शिक्षणतज्ञ् यांच्यात सुसंवाद निर्माण झाला तर योग्य त्या दिशेने प्रयत्न करता येऊ शकतात. 

मुळात आपल्यातली 'मराठीपणाची' ज्योत तेवत ठेवणे महत्वाचे आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनात उमटतात. नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकटतात. केवळ दिखावूपणासाठी मराठीचे प्रेम नको, आंतरिक जाणिवातून ते प्रकट होत राहिले तर भाषा आणि संस्कृती कधीच मरत नाही. 

मराठी शाळांची झालेली दुरवस्था, प्रतिष्ठेच्या खोट्या संकल्पनांपायी इंग्रजी माध्यमांचे वाढलेले प्रस्थ, भाषेचा आणि पोटाचा तुटलेला संबंध, कुटुंबातून हरवत चाललेली वाड्मयसंस्कृती, अपराधगंड, न्यूनगंड आणि भयगंडाने पछाडलेला मराठी समाज आणि त्याची मानसिकता हीच मराठी भाषेसमोरची मोठी आव्हाने आहेत. त्या आव्हानांचा सामना करताना 'अभिजात दर्जा' सारखा अभिमान बिंदू मराठी समाजमनावरील निराशेचे मळभ दूर करून भाषिक चैतन्य निर्माण करेल अशी आशा ठेवायला काय हरकत आहे. 

(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Demand of give the classical status to marathi language