कोरोनानंतरचा पहिला धोका

कोरोनानंतरचा पहिला धोका

बर्ड फ्ल्यू काय आहे ? बर्ड फ्ल्यू या रोगाला ‘एव्हिएन इन्फ्लूएंझा'' असंही म्हणतात. हा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. याचा प्रसार मुख्यतः पक्षांच्या माध्यमातून होतो. याच्या वेगवेगळ्या विषाणूंमुळं पक्ष्यांमध्ये संसर्ग होतो. ‘एच ५ए ३'', ‘एच ५एन ८’, ‘एच ५ एन१’ अशा प्रकारच्या एकाच कुटुंबातील विषाणूंच्या प्रादूर्भावातून बर्ड फ्ल्यूची लागण पक्षांमध्ये होते. प्रामुख्याने हा आजार स्थलांतरित पक्षांच्या माध्यमातून पसरतो. म्हणजे, हिवाळ्यात स्थलांतरित करणाऱ्या पक्षांचा यात समावेश असतो. सैबेरियासारख्या अतिशीत प्रदेशातून हे पक्षी विषुवृत्ताच्या दिशेनं स्थलांतर सुरू करतात. त्या वेळी अशा पक्षांमध्ये या विषाणूंचा प्रादुर्भाव होतो. या पक्षांचे थवेच्या थवे स्थलांतर करत असतात. त्यापैकी काही पक्षी हे विषाणूंचे वाहक असतात. 

कसा प्रसार होतो? 
स्थलांतरित पक्षांना हा रोग झाला की, त्यांच्यापासून इतर पक्षांना संसर्ग सुरू होतो. हा संसर्ग रोग झालेल्या पक्षाच्या विष्टेतून इतर पक्षांना याचा संसर्ग होतो. हे इतर पक्षी स्थानिक असतात. मानवाच्या अवती-भोवती असलेल्या कावळे, बगळे अशा पक्षांमध्ये याचा प्रसार होतो. या पक्षांमधून हा रोग कोंबड्या, बदके यांच्यापर्यंत त्याचा संसर्ग होत असल्याचे आतापर्यंतच्या बर्ड फ्ल्यूच्या वेगवेगळ्या उद्रेकातून स्पष्टपणे दिसून आले आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून आठ ते दहा राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रसार झाला आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आता झाला आहे. 

दुष्परिणाम काय होतात? 
या रोगाचा एखाद्या कुक्कुट पालन केंद्रात प्रवेश झाला तर, त्यातील बहुतांश सर्व पक्षी याचे शिकार होतात. यातून माणसापर्यंत या रोगाचा प्रसार होण्याचा धोका असतो. मात्र, ही शक्‍यता खूप कमी असली तरीही हे होऊ शकते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे हे होऊ नये, त्यासाठी योग्य खबरदारी प्रकर्षाने घेण्याची गरज आहे. 

पक्षांपासून थेट माणसांपर्यंत या रोगाच्या विषाणूंचा संसर्ग होण्याची घटना अत्यंत दुर्मिळ आहे. ती क्वचितच होते. पण, जेव्हा कोंबड्या किंवा इतर पक्षांच्या सानिध्यात डुकरांसारखे प्राणी येतात, तेव्हा डुकरांना या रोगाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्याला शास्त्रीय परिभाषेत ‘अँम्लिफायर'' म्हणतात. म्हणजे, पक्षातून प्राण्यांमध्ये विषाणूंचे संक्रमण अधिक वेगाने होते. त्यामुळे दुसऱ्या प्रकारचा संसर्ग हा अधिक त्रासदायक ठरतो. त्यामुळे कुक्कुट पालन केंद्राच्या परिसरात असलेले वराह पालक, हे धोकादायक ठरण्याची शक्‍यता अधिक असते. 

बर्ड फ्ल्यूचा विषाणू हा कोंबड्यांचे किंवा पक्षांचे रक्त, त्यांची विष्ठा किंवा त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या स्त्रावाच्या माध्यमातून माणसांपर्यंत पोचण्याची शक्‍यता असते. म्हणून कोंबड्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकानं आता काळजी घेणे आवश्‍यक आहे. विशेषतः चिकन, कोंबड्या कापणाऱ्या व्यक्तीचा संपर्क हा त्या पक्षाच्या रक्ताशी येतो. त्यांनी ही काळजी घेण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठी हातमोजे घालणे महत्वाचं आहे. 

चिकन, अंड्यातून प्रसार होतो का 
कोंबडी किंवा चिकन ७० ते ९० अंश सेल्सिअस तापमानात २५ ते ३० मिनीटांपर्यंत शिजवले तसेच, अंडी उकडली तर निश्‍चितपणे या विषाणूंचा नाश होतो. त्यामुळे चिकन किंवा अंडी योग्य पद्धतीने उकळून घेतल्यास माणसाला या विषाणूंच्या संसर्गाचा कोणताही धोका राहात नाही. 

स्थलांतरित पक्ष्यांचे सर्वेक्षण 
हिवाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित पक्षी येतात. विशेषतः पाण्याचा मुबलक साठा असलेल्या भागात या पक्षांचे थवे उतरतात. तेथे त्यांना खाण्यासाठी अन्न, पिण्यासाठी पाणी आणि पोषक वातावरण मिळत असल्याने वर्षान्‌ वर्षे हे पक्षी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी हिवाळ्यात दिसतात. त्यामुळे पशुवैद्यकीय खात्यामार्फत अशा ठिकाणांवर नियमित सर्वेक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

काय केले पाहिजे? 
 राज्याच्या प्रत्येक तालुका पातळीवर पशुवैद्यक अधिकारी आणि आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा परिसराचा आढावा घ्यावा. त्यात आपल्या परिसरात कुठे अचानक पक्षी मरून पडत आहेत का, कोणत्या पोल्ट्रीमधील पक्ष्यांचा मोठ्या संख्येनं मृत्यू झाला आहे का, याची माहिती आठवड्याच्या आढाव्यात घेतली पाहिजे. त्यावर सातत्याने देखरेख करणे महत्त्वाचे आहे. 
पोल्ट्रीच्या आतमध्ये जाण्यावर त्यांच्या मालकांनी नियंत्रण आणले पाहिजे. कोणीही पोल्ट्रीत जाणार नाही, याची काळजी त्यांनी घेण्याची आवश्‍यकता आहे. 
पोल्ट्रीमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला निर्जंतुक करून आतमध्ये गेले पाहिजे. 
बाहेरच्या चप्पल, बूट घालून पोल्ट्रीमध्ये कोणीही जाणार नाही, याकडे लक्ष देणे आता गरजेचे आहे. 
ही आणि अशा प्रकारच्या प्रत्येक बारीक गोष्टीची काळजी घेण्याची वेळ आता आपल्यावर या बर्ड फ्ल्यूच्या साथीमुळे परत आली आहे. कारण, या साथीच्या उद्रेकात माणसाच्या आजारापेक्षा जास्त आर्थिक नुकसान पोल्ट्री व्यवसायाचे होते. तो धोका जास्त गंभीर आहे. ते होऊ नये म्हणून पोल्ट्रीने सजग राहिला पाहिजे. त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. लोकांनीही काळजीपूर्वक कुक्कुट पालन करणाऱ्या संस्थेच्या चिकन, अंड्याबद्दल विनाकारण मनात शंका आणण्याची गरज नाही. 

या रोगाची लक्षणे 
बर्ड फ्ल्यू माणसाला झाला तर, त्याची लक्षणे स्वाइन फ्ल्यू आणि कोरोनाच्या लक्षणांप्रमाणेच आहेत. खूप ताप येणे, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे. 

बर्ड फ्ल्यू हा गंभीर रोग आहे. मात्र, भारतामध्ये हा रोग एकाही माणसाला माणसापासून झालेला आढळलेला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यूंची नोंद नाही. पण, इंडोनेशियामध्ये याचा उद्रेक झाला होता. त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण जवळपास ३० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत होते. या आजाराचा मृत्यूदर प्रचंड आहे. हेच याचे सर्वांत मोठे गांभीर्य आहे. हा आजार झाल्यानंतर रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यामुळे या आजाराची काळजी घेतली पाहिजे. 

कोरोनाच्या अनेक पटींनी हा घातक आहे. पण, त्यातील एक जमेची बाजू म्हणजे या रोगावर प्रभावी ठरलेली औषधे आपल्या देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बर्ड फ्ल्यू आणि कोरोनातील हाच फरक आहे. 

लोकांनो, ही काळजी घ्या 
पक्षांच्या मृत्यू झालेल्या स्थळापासून अंतरावर रहा 
मृत्यू झालेल्या पक्षांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे 
अवती-भोवती पक्षांचा मृत्यू होत असले तर सरकारी यंत्रणेला कळविणे 
कोंबडी कापताना ग्लोअज आणि मास्क वापरा

(शब्दांकन : योगिराज प्रभुणे) 

(लेखक हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे निवृत्त महासंचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com