पन्ना... 'भगीरथप्रयत्नां';ची कहाणी

पन्ना... 'भगीरथप्रयत्नां';ची कहाणी

बुंदेलखंडातल्या पन्ना जिल्ह्यात ‘पन्ना व्याघ्रप्रकल्प’ हे अप्रतिम जंगल आहे. या जंगलाच्या संवर्धनासाठी सन १९८१ मध्ये ‘पन्ना राष्ट्रीय उद्याना’ची स्थापना करण्यात आली. पुढं सन १९९४ मध्ये जंगलाला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला; पण चोरट्या शिकारी आणि विविध कारणांमुळे सन २००९ पर्यंत इथल्या सर्व वाघांचा निःपात झाला आणि ‘व्याघ्रप्रकल्प असूनही जंगलात एकही वाघ नाही,’ अशी स्थिती निर्माण झाली!

‘जंगल वाचवायचं असेल तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्यक आहे,’ असं मत काही विवेकी, विचारी, अभ्यासकांनी मांडलं. मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. सन २००९ मध्यए बांधवगड आणि कान्हा या दोन व्याघ्रप्रकल्पांतून दोन वाघिणी पन्ना व्याघ्रप्रकल्पात आणण्यात आल्या. बांधवगडमधून आणलेल्या वाघिणीला नाव देण्यात आलं ‘T-१’ आणि कान्हातून आणलेल्या वाघिणीला ‘T-२.’ मात्र, याचदरम्यान पन्नात वावरणारा शेवटचा नरवाघही नाहीसा झाल्यानं या वाघिणी साथीदाराशिवाय इथं टिकतील का अशी शंका अभ्यासकांनी व्यक्त केली. आणि मग सन २००९ मद्ये ‘पेंच व्याघ्रप्रकल्पा’तून ‘T-३’ नावाचा नरवाघ इथं आणण्यात आला. पन्नाचं गतवैभव पुन्हा उभं करण्याच्या याकामी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. त्यांचं नाव आर. श्रीनिवास मूर्ती. मूर्ती यांनी त्यासाठी ‘भगीरथप्रयत्न’ केले.

या नवीन वाघांवर लक्ष ठेवण्यासाठी त्या वाघांच्या गळ्यात ‘रेडियो कॉलर’ नावाचं उपकरण बांधण्यात आलं. यातून निघणारे सिग्नल्स एका अँटिनाद्वारे मिळवले जातात. या कामावर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी आर. श्रीनिवास मूर्तींनी काही कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आणि अखेर एक खडतर ‘तपश्चर्या’ सुरू झाली.

T-१ आणि T-२ यांनी पन्नाच्या भूमीचा त्यामानानं लवकर स्वीकार केला. इथं त्या मुक्तपणे वावरू लागल्या. प्रत्येक वाघाची स्वतःची हद्द ठरलेली असते. T-१ आणि T-२ यांनीही आपापल्या हद्दी निश्चित केल्या; पण T-३ नरवाघानं पन्नाचं जंगल मात्र पटकन स्वीकारलं नाही. T-३ नं एक दिवस पन्ना व्याघ्रप्रकल्पाचा प्रदेश सोडला आणि ‘पेंच’च्या दिशेनं तब्बल ४४२ किलोमीटरचा प्रवास केला. पन्नापासून त्याचं अंतर जसं वाढत गेलं तसं त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. त्याला शेवटी जेव्हा पुन्हा बेशुद्ध करून पन्ना व्याघ्रप्रकल्पात आणण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा त्याच्या तैनातीला तब्बल ७० कर्मचारी, चार हत्ती आणि  स्वतः मूर्ती असा फौजफाटा होता. 

आता मात्र पुन्हा ही परिस्थिती निर्माण होऊ नये आणि पुन्हा तो ‘पन्ना’चं जंगल सोडून जाऊ नये म्हणून T-३ ला या दोन्ही वाघिणींकडे आकृष्ट करण्यासाठी मूर्ती यांनी नामी शक्कल शोधून काढली. त्यांनी T-३ ला सोडायच्या वेळी वाघिणींचं मूत्र आणि पाणी यांच्या मिश्रणाचा ठिकठिकाणी शिडकावा केला. हा बाण बरोबर बसला. T-३ दोन्ही वाघिणींच्या शोधार्थ निघाला. अखेर दोन्ही वाघिणींनी त्याला जोडीदार म्हणून स्वीकारलं आणि सरतेशेवटी मूर्ती आणि त्यांच्या टीमच्या अथक् प्रयत्नांना यश आलं.

ता. १६ एप्रिल २०१० या दिवशी T-१ या वाघिणीनं चार पिल्लांना जन्म दिला. अशा प्रकारच्या वाघांच्या या पुनर्परिचयाच्या यशस्वितेचं पन्ना हे जगातलं पहिलं उदाहरण आहे. यापाठोपाठ T-२ नं ऑक्टोबर २०१० मध्ये चार पिल्लांना जन्म दिला. त्यानंतर आणखी चार वाघांना इतर व्याघ्रप्रकल्पांतून पन्ना इथं आणण्यात आलं. हळूहळू वाघांची सख्या वाढत जाऊन आज सुमारे ४० वाघ पन्नामध्ये आहेत.

इथल्या वाघांच्या बच्च्यांची नाव ठेवण्याची पद्धत मोठी अनोखी आहे. उदाहरण म्हणून आपण T-१ ला झालेल्या बछड्यांना ठेवलेली नावं पाहू या. या चार पिल्लांना नावं दिली होती - P१११, P११२, P११३ आणि P११४. यातलं ‘P’ म्हणजे पन्ना. १११ मधला पहिला ‘१’ म्हणजे आईचं ‘T१’ हे नाव दर्शवतो. दुसरा ‘१’ म्हणजे, पहिल्या वेळेच्या बछड्याचा निदर्शक आणि तिसरा ‘१’ हा चारमधल्या बछड्याचं नाव दर्शवतो. आत्ता T-१ नं पाचव्यांदा बच्चांना जन्म दिला आहे. त्यामुळे त्यांची नावं ठेवण्यात आली आहेत P१५१ आणि P१५२, तसंच T-२ च्या बच्च्यांना नावं दिली आहेत P२११, P२१२ अशी.

माझ्या मते वाघांना ‘सोनम’, ‘माया’, ‘गब्बर’, ‘जय’ अशी नावं देणं हे त्या वाघांभोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण करतं. हे असं करणं एकूणच वाघांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून तारकही आहे आणि तितकंच मारकही. जंगलातल्या प्रत्येक वाघाला सारखंच; पण अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या वेगळ्या नावांनी हे वाघ प्रसिद्ध झाले की त्या भागातलं पर्यटन त्या वाघांभोवती केंद्रित होतं आणि मग काही अत्युत्साही पर्यटकांमुळे या सगळ्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. मला वाटतं, पन्ना व्याघ्रप्रकल्पाच्या प्रशासनानं ही आगळीवेगळी पद्धत रूढ केली आणि इथं गाईड म्हणून काम करणाऱ्या लोकांनी प्रत्येक वाघाची ओळख याच नावानं लोकांना करून दिली. प्रशासन आणि गाईड या दोघांनीही हा एक आदर्शच इतर व्याघ्रप्रकल्पांसमोर ठेवला आहे.      

‘कर्णावती’ ही नदी म्हणजे इथं वास्तव्याला असणाऱ्या अनेक जीवांची जीवनवाहिनी. अत्यंत शुद्ध असणारा तिचा प्रवाह ‘पन्ना’च्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. पन्ना राष्ट्रीय उद्यान, गंगाऊ अभयारण्य आणि केन-घडियाल अभयारण्य यांच्या एकत्रीकरणातून ‘पन्ना’ व्याघ्रप्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘पन्ना’चा भूभाग अनेक छोट्या-मोठ्या नद्या, असंख्य छोटे जलप्रवाह, गवताळ भाग, डोंगररांगा आणि नैसर्गिकरीत्या बनलेल्या अवाढव्य घळी यांनी तयार झालेला आहे. इथल्या जैवविविधतेत भर टाकणाऱ्या सात प्रकारच्या गिधाडांच्या वास्तव्याचं ठिकाण असलेली ‘धुंधवा सेहा’ ही घळ म्हणजे इथल्या जंगलाच्या उत्पत्तीच्या वेळी झालेल्या हालचालींचा उत्कृष्ट नमुना होय. 

या लेखाच्या निमित्तानं मी आज गतकाळाचं सिंहावलोकन केलं. ‘० ते सुमारे ४५ वाघ’ असा यशस्वी टप्पा गाठणारा प्रवास अनेक लोकांच्या प्रयत्नांच्या परिसीमेचं फलित आहे. या व्याघ्रप्रकल्पाच्या या ‘टिकवल्या’ गेलेल्या वैभवाला आणखी एक धोका काळ बनून उभा आहे व तो म्हणजे केन-बेतवा नदीजोड प्रकल्प. केन म्हणजेच कर्णावती. कर्णावती आणि बेतवा या दोन नद्यांना जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे संपूर्ण मडला गाव आणि जंगलाचा खूप मोठा भूभाग पाण्याखाली जाणार आहे. हा धोका परतवून लावण्यासाठी मूर्ती यांच्यासारखा एखादा ‘भगीरथ’ पुन्हा एकदा उभा राहील आणि जंगलाचं हे सौंदर्य अबाधित ठेवण्याचं; किंबहुना ते वाढवण्याचं ‘शिवधनुष्य’ तो लीलया पेलेल याची मला खात्री आहे!

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कसे जाल 
पुणे-मुंबई-जबलपूर-पन्ना/पुणे-मुंबई-सतना-पन्ना.  
भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते मे.
काय पाहू शकाल  
सस्तन प्राणी : बिबट्या, कोल्हा, खोकड, तरस, अस्वल, चिंकारा, चौशिंगा, नीलगाय चितळ, सांबर, भेकर, वाघ आदी.
पक्षी : तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळघार, कापशी घार, मत्स्यघुबड, कंठेरी शिंगळा घुबड, गव्हाणी घुबड, ठिपकेदार पिंगळा, मत्स्यगरुड, कोतवाल, कुरटुक, गिधाडं आदी.
सरपटणारे प्राणी : मगर, कासव, अजगर, धामण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, नाग, फुरसे, मण्यार, घोणस आदी.
भेट देण्यायोग्य जवळची ठिकाणं : पांडव फॉल, रणेह फॉल, केन घडियाल अभयारण्य, खजुराहो मंदिरं.  


(शब्दांकन : ओंकार बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com