पाहताक्षणी प्रेमात पडावं असा 'प्रयागराजी पेरू'

पी. बी. सिंह
Saturday, 27 July 2019

बिहार, झारखंड, मध्य प्रदेश या राज्यांबरोबरच कोलकता, दिल्लीसह देशातील प्रमुख शहरे आणि राज्यांत हे पेरू जातात. नेपाळलाही ते पाठविले जात असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

आपल्या लालसर रंगामुळे पाहताक्षणीच आकर्षित करणासाठी अलाहाबादी (आता प्रयागराजी) पेरू प्रसिद्ध आहेत. स्वाद आणि रंगामुळे त्यांना केवळ देशातच नव्हे; तर परदेशांतही मागणी आहे. अलहाबादच्या कृषी वैज्ञानिकांनी पेरूची नव्या जाती तयार केल्या, त्यात सेविया पेरू विशेष प्रसिद्ध आहेत. हे पेरू म्हणजे अलहाबादची ओळख असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

अलाहाबाद जिल्ह्याचे विभाजन झाल्यावर येथील पेरूच्या बागा आता शेजारच्या कौशंबी जिल्ह्यात गेल्या आहेत. कौशंबी जिल्ह्यात गंगा नदीच्या तराई विभागातील सुमारे 300 हेक्‍टर जमिनीवर पेरूच्या बागा बहरल्या आहेत. पेरू उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने या जिल्ह्यातील चायल आणि मूरतगंज या गावांना फलोत्पादन विभाग म्हणून घोषित केले आहे. सेविया पेरूने अलहाबादचे नाव देश-परदेशांत नेले खरे; पण शेतकऱ्यांचा मुख्य आधार असलेले हे फळ सध्या संकटाचा सामना करत आहे.

पेरूच्या नावातील बदल हे त्यातील एक आहे. सेविया पेरूचे नाव प्रयागराज पेरू (प्रयागराजी अमरूद) असे बदलून काय होणार, असा प्रश्‍न अलाहाबादमधील पेरू उत्सवाच्या संयोजिका पल्लवी चंदेल यांचा प्रश्‍न आहे. पेरूच्या 'सेबी' आणि 'पठ्ठा' या जाती वेगळ्या असून, त्याही स्वाद आणि रंगासाठी प्रसिद्ध आहेत, असे त्या सांगतात. सेविया पेरूंचा हंगाम सुरू होतो हिवाळ्यात. अलाहाबाद रेल्वे स्थानकात विक्रीला येणाऱ्या या पेरूंवर प्रवाशांच्या अक्षरशः उड्या पडतात. स्वतःबरोबरच मित्र, नातलगांसाठीही या पेरूंची आवर्जून खरेदी होते. त्यांना दरही चांगला मिळतो.

बिहार, झारखंड, मध्य प्रदेश या राज्यांबरोबरच कोलकता, दिल्लीसह देशातील प्रमुख शहरे आणि राज्यांत हे पेरू जातात. नेपाळलाही ते पाठविले जात असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी दोन हजार टन पेरूंची निर्यात केली जाते. चवीबरोबरच पेरू औषधी असल्याने पोटाच्या विकारांवरही तो उपयुक्त ठरतो. मात्र, स्थानिक शेतकरी 'उकठा' या नावाने ओळखत असलेल्या या रोगाचा पेरूला फटका बसतो. 50 ते 60 रुपये किलो असा चांगला दर मिळत असल्याने या भागातील शेतकरी आता आवर्जून पेरूच्या उत्पादनाकडे वळाल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Prayagraji Guava written by P B Singh