Friendship Day Special : निखळ मैत्रीचा 'राज'योग

उमेश घोंगडे
रविवार, 4 ऑगस्ट 2019

संकटात साथ देतो तोच खरा मित्र असतो, अशी व्याख्या अनेकदा सांगितली जाते. राजकीय नेत्यांच्या कारकिर्दीत असे मित्र लाभणे हे दुर्मिळ असते. अनेकजण वाऱ्याच्या दिशेने चालू लागतात. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना असे अनेक अनुभव आले. पण खरा मित्रही यानिमित्ताने ओळखून आला.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रत्येक दौऱ्यात त्यांच्यासोबत एक व्यक्ती दिसते. खरेतर आजकालच्या पक्षांतराच्या जमान्यात एखाद्या नेत्यासोबत तिच व्यक्ती पुन्हा दिसेल की नाही, याची शंकाच असते. त्यातही त्या नेत्याच्या राजकीय कारकिर्दीला ओहोटी असेल तर आजुबाजूची गर्दी कधी पांगते, हे कळतही नाही. पण राज यांच्यासोबत बाळा नांदगावकर हे सावलीसारखे दिसतात.

राज आणि नांदगावकर यांच्या वयात दहा वर्षांचे अंतर. पण हे अंतर या मैत्रीच्या आड आले नाही. नांदगावकर यांची राजकीय कारकीर्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक, ठाकरे कुटुंबीय यांच्यामुळे घडली, पण या कारकिर्दीला आधार देण्यात राज यांनी सुरवातीपासून साथ दिली. ही साथ 25 वर्षांनंतर आज कायम आहे. दोघांचाही वाढदिवस हा जून महिन्यातील. राज यांचा 14 जूनला, तर नांदगावकर यांचा 21 जूनला.

राजसाहेबांशी असलेल्या मैत्रीबाबत सांगतात नांदगावकर म्हणतात, 'मी माझगाव मतदारसंघातून 1995 मध्ये छगन भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढविली. त्यांनी शिवसेना सोडली होती. त्यांच्याविरोधात कोणाला उतरावयाचे, यावर विचार सुरू असताना राजसाहेबांनी माझे नाव सुचविले. मी ती निवडणूक जिंकली. त्यानंतर आम्हा दोघांत मैत्रीचे बंध बनले आणि टिकलेदेखील. ते आमचे नेते आहेत. आमचे ते राजसाहेब आहेत. पण त्यांनी मला मित्र मानले. हे माझे भाग्य आहे.'

मराठी माणसासाठी, संस्कृतीसाठी राज यांनी स्वतःचा मनसे पक्ष स्थापन केला. मराठी माणसाच्या हितासाठी राज यांनी स्वतःला अर्पण करून घेतले आहे. मी राजसाहेबांसाठी अर्पण झालो आहे, अशी भावना नांदगावकर व्यक्त करतात.

राज यांच्या प्रत्येक दौऱ्यात नांदगावकर सोबत असतात. काही अडचण असली तरच ते सोबत नसतात. मात्र दौऱ्यावरून आल्यानंतर राज हे आवर्जून त्यांच्याशी चर्चा करतात. प्रत्येक निर्णयावर चर्चा करताना विश्वासात घेतात. नांदगावकर म्हणातात, ''त्यांचे प्रत्येक म्हणणे मला पटते किंवा माझाही प्रत्येक मुद्दा त्यांना योग्य वाटतो, असे नाही. आमच्यात जोरदार चर्चाही होते. ते क्वचित चिडतातही. पण त्यांना योग्य वाटले तर ते मान्यही करतात.  राज हे कठोर असल्याचे अनेकांचे मत आहे. पण त्यांच्याजवळ गेल्यानंतर कळते की राज हे किती जीव लावतात ते. कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या सुखदुःखात ते सहभागी होतात. त्यांच्या अडचणीला धावून जातात.''

राज यांचा मित्रांचा मोठा गोतावळा आहे. तो विविध क्षेत्रांतील आहे. त्यांचे वाचनही अफाट आहे. त्यांनाआवडलेले पुस्तक वाचण्याचा आग्रह मग ते आमच्याकडे धरतात. त्या पुस्तकावर आमच्याशी चर्चा करतात. प्रत्येकाने वाचले पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष असतो, असे नांदगावकर सांगतात. 'माझे उद्धव ठाकरे यांच्याशीही चांगले संबंध आहेत. शिवसेनेविषयी मी नेहमीच कृतज्ञ राहिलो आहे. या दोघा बंधूंनी एकत्र यावे म्हणून मी मनापासून प्रयत्न केले. पण उद्धव यांच्याशी संबंध आहेत म्हणून राज यांनी माझ्यावर कधी आक्षेप घेतला नाही,' हे नांदगावकर यांनी आवर्जून सांगितले.

मनसे स्थापन करताना जे नेते राज यांच्यासोबत होते त्यापैकी फारच कमी आता त्यांच्यासोबत आहेत. हे असे का घडते याबाबत नांदगावकर म्हणाले, ''चढउतार हे आयुष्यात असतात. जे नेते विविध कारणांमुळे पक्ष सोडून गेले त्यांच्याविषयी मला काही बोलायचे नाही. पण आपल्याला ज्यांनी उभे केले त्यांच्याविषयी जाणीव ठेवायचे नसेल तर काय उपयोग? यश असा अथवा नसो, मी त्यांच्यासोबत माझी पुढची वाटचाल कायम ठेवणार आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Raj Thackeray and Bala Nandgaokars Friendship written by Umesh Ghongade