दिग्गज अभिनेत्री लालन सारंग...

दिग्गज अभिनेत्री लालन सारंग...

एकोणीशे बाहत्तर सालचा जानेवारी महिना, मुंबईच्या तेजपाल सभागृहातून मी, सारंग सत्यदेव दुबेंच्या ‘स्टील फ्रेम’ नाटकाचा प्रयोग संपवून गाडीने घरी परतत होतो. सोबत विजय तेंडुलकर, दुसऱ्यांदा त्या नाटकाचा प्रयोग पाहायला आलेले. आमची गाडी ताडदेव मागे टाकून हाजी अलीच्या दिशेने वळली आणि तेंडुलकर बोलते झाले, ‘‘लालन, तूच चंपाचं काम कर.’’ त्यांचं हे वाक्य माझ्या जीवनाच्या पुढील वाटचालीला वळण देणारं ठरेल, असं तेव्हा माझ्या ध्यानीमनीही नव्हतं.

तेव्हा खरं तर मी कुणीच नव्हते. ‘स्टील फ्रेम’ या हिंदी नाटकाच्या भूमिकेशिवाय तोपर्यंतच्या माझ्या नाटकांचा खास उल्लेख करावा, असं काही घडलंच नव्हतं. ‘चंपा’ माझ्याकडे चालत आल्यानंतर ती समजून घेऊन नाटककार तेंडुलकर आणि दिग्दर्शक सारंग यांच्या अपेक्षेला उतरणं एवढंच मनात होतं. स्वत:चं सोफिस्टिकेटेड व्यक्तिमत्त्व पूर्ण बदलून एक गावरान, रांगडी, बिनधास्त चंपा उभी करताना खूप विचार करावा लागला. ‘मी : चंपा’ हे गणित डोक्यात बसतच नव्हतं. एक मोठं आव्हान मी स्वीकारलं होतं आणि स्वत:बद्दल कुठलाच गैरसमज नव्हता.

चंपाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं? तिची गावंढळ भाषा, आठवारी साडी, केळं काढून सहावारी नेसणं, तिची केशरचना, कपाळावर मोठ्ठं लाल कुंकू, चेहऱ्यावर गोंदण, डोक्यावरून घेतलेला पदर वारंवार डोक्यावरून घसरल्यावर वारंवार डाव्या हाताने सावरून पुन्हा डोक्यावर घेणं, तिचं स्वत:च्या डौलात रंगमंचावर येणं, तिचं सखारामच्या घरात निरिच्छपणाने प्रवेश करणं हे सगळं दाखवत, दुसऱ्या अंकात सखारामच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी सखाराम, तिची ट्रंक हातात घेऊन उत्सुकपणे तिला ‘या’ म्हणतो आणि ‘ती’ रंगमंचावर प्रवेश करते आणि प्रेक्षकांतून दाद येते- ‘हा ऽऽऽऽऽ’

बस्स! मी जिंकले होते. आता मी या रंगमंचावर दिमाखाने वावरणार होते, प्रेक्षकांना जिंकणार होते. खरंच मी प्रेक्षकांना जिंकलं होतं!

चंपानं मला माझं व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवलं होतं. रंगमंचावर प्रवेश केल्यावर मी बदलून जाते. मी ‘चंपा’च असते. लालन सारंगचं अस्तित्व ती पुसून टाकते. माझं हे बदलतं रूप मी नंतरच्या माझ्या सगळ्या भूमिकांत दाखवून दिलं. सारंगने स्वत: नवरा म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून माझं खास कौतुक कधीच केलं नाही, पण एकदा तो बोलून गेला की, लालन ज्या भूमिकेत असते तशीच ती दिसते. त्याच्या त्या एका वाक्यात तो सगळं काही बोलून गेला होता..

‘सखाराम’ सुरू झालं आणि १३ प्रयोगांतच नाटक अश्लील आहे अशी बोंब उठली आणि ३३ कटसकट नाटक सेन्सॉर झालं व त्यानंतर त्यावर बंदी आली. आम्ही सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात गेलो. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखाने प्रयोग सुरू झाले. पुन्हा तीन महिन्यांतच पुण्यातल्या ‘लिंग निर्मूलन समितीनं’ तेंडुलकरांच्या नाटकांवर बंदी म्हणून ‘घाशीराम कोतवाल’ व ‘सखाराम बाइंडर’ ही नाटकं होऊ द्यायची नाही असा फतवा काढला. ‘घाशीराम’ प्रायोगिक असल्यामुळे त्या वेळी बंद होतं व बंद ठेवलं गेलं. व्यावसायिक ‘सखाराम’ मात्र जोरात चालू होतं. त्यावर गंडांतर आलं. पुन्हा एकदा लढा देऊन त्यातूनही आम्ही बाहेर पडलो. पण खूप मनस्ताप भोगावा लागला. या सगळ्यातून जाताना मी, लालन सारंग, कळत-नकळत धीट होत गेलो.

‘सखाराम बाइंडर’नं मला काय दिलं? या प्रश्नावर त्याने मला काय नाही दिलं? असंच वाटतं. माझ्यातल्या कलावंताचा मला शोध लागला. रंगभूमी हेच माझं क्षेत्र आहे हे जाणवून दिलं. मला या लढय़ात माणसं ओळखण्याची ताकद दिली. झालेल्या त्रासाबरोबर प्रसिद्धीपण दिली. मी व्यासपीठावरून माझं म्हणणं 
अस्खलितपणे मांडू शकते, याचं भान दिलं. सारंग गेल्यानंतरसुद्धा मी सर्व संघर्षांना सामोरं जात आहे, जिद्दीनं जगते आहे, जगणार आहे..

एका ‘सखाराम’, ‘चंपा’, ‘तेंडुलकर’ आणि ‘सारंग’नं मला एक जगण्याची पोतडीच दिली. मग मात्र आमच्या स्वत:च्या संस्थेतर्फे अनेक नाटके करते झालो. उत्तमोत्तम भूमिका माझ्या वाटय़ाला आल्या आणि मी तृप्त होतं गेले.

नंतरच्या काळात श्री. ना. पेंडसेंचं ‘रथचक्र’ हे नाटक आमच्या पदरात पडलं. त्यांच्या नाटकातली ‘ती’ साकारणं हे फार मोठं दिव्य होतं. कोकणातल्या एका ब्राह्मण घराण्यातल्या सगळीकडून अव्हेरल्या गेलेल्या मातेची कहाणी होती ती. नवऱ्यानं लग्न करून पदरात दोन मुलं टाकून घरातून पळून जाऊन संन्यास घेतलेला. त्यामुळे तो दोष तिच्यावर टाकणारे तिचे दीर-जावा. मोठय़ा मुलाला घरगडय़ासारखं वापरलं जाणं आणि धाकटा मुलगा अभ्यासात हुशार, पण कष्ट करणाऱ्या आईपेक्षा पळून जाऊन संन्यास घेतलेल्या बापाबद्दल ओढ. मोठय़ा मुलानं काही तरी पोटापाण्याचं काम करावं आणि धाकटय़ानं शिक्षण पूर्ण करून खूप मोठं अधिकारपद प्राप्त करावं म्हणून अहोरात्र झपाटलेली ‘ती’ त्यासाठी सगळ्यांचा विरोध पत्करून तालुक्यात जाऊन काबाडकष्ट करणाऱ्या तिच्या पदरात शेवटी काय पडतं? मोठा परत गावाकडे जाऊन शेणगोठाच करतो व एका लंगडय़ा मुलीशी लग्न करून संसार थाटतो. धाकटा मुलगा मुंबईला पळून जाऊन शिक्षण पूर्ण करतो, पण पुन्हा आईलाच दोष देतो. निराश झालेल्या ‘ती’पुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही.

तिचं हे सगळ सोसणं, भोगणं वाचतानासुद्धा अंगावर काटा येत होता आणि तशी ‘ती’ रंगमंचावर जिवंत उभी करायची होती. सगळ्या शक्तीसकट मी रंगमंचावर ‘ती’ सादर करत होते. प्रयोग हाऊसफुल्ल चालले होते. मी धन्य धन्य होत होते, पण कुठं तरी ‘ती’चं भोगणं मला त्रास देऊ लागलं होतं. नाटकभर त्या पोरांची काळजी करताना मला माझी आई डोळ्यासमोर दिसायची. दुसऱ्या अंकात एका प्रसंगात, तालुक्याला आलेली ‘ती’ गावाकडून आलेल्या मास्तर काकांना कळवळून सांगते, ‘काका, गावाकडून सहा महिने झाले, पण तांदूळ आले नाहीत. पोरांना आठ्ठीळ्यांची पेज (फणसातले गरे) करून वाढते.’ हे रंगमंचावर बोलत असताना आईची आठवण येऊन डोळ्यात पाणी उभं राहायचं. आम्हा सात भावंडांसाठी तिने केलेले अपार कष्ट आठवायचे. घरात शिजवायला तांदूळ-डाळ नसली तरी शेजाऱ्यांकडून मागून आणून ती आम्हाला खाऊ घालायची. तिच्याकडे बघून मी मॅट्रिक झाल्यावर नोकरी करून माझं शिक्षण पुरं केलं, तिला तिच्या संसारात हातभार लावावा म्हणून. आज ती या जगात नाही. पण अजूनही चुटपुट लागून राहते की, तिच्यासाठी माझ्याकडून आणखी खूप व्हायला हवं होतं..

एका प्रसंगात आपलं सगळं भान विसरून ती पोटतिडकीनं मुलांना बोलते. तिच्या नवऱ्याचा व घरच्या लोकांचा उद्धार करते. नंतर भानावर आल्यावर आपण असं बोलायला नको होतं, असं तिला वाटतं, पण तोपर्यंत धाकटा मुलगा घराबाहेर निघून जातो. पण मोठय़ाला, ‘पुंडय़ाला’ थांबवून ती कनवटीचा एक आणा त्याच्या हातावर ठेवते आणि केविलवाणी होऊन म्हणते, ‘विडय़ा ओढ, पण कमी ओढ हं!’

हे वाक्य उच्चारत असताना पटकन त्याच वयातला माझा एकुलता एक मुलगा ‘राकेश’ माझ्यासमोर उभा राहायचा आणि जणू काही त्यालाच उद्देशून मी बोलत आहे असा भास व्हायचा. राकेश त्याच वयोगटातला. माझ्या आईकडे त्याला सोपवून आम्ही नाटके करत होतो. आमच्या व्यवसायाचा हा भाग असला तरीही वयात आलेल्या मुलाची काळजी वाटायची. एका बाजूला रंगमंचावर भूमिकेचा भाग म्हणून त्या पोरांची काळजी वाहण्याचा, त्यांच्यासाठी धडपडण्याचा अभिनय करायचा, तर दुसरीकडे राकेशची काळजी वाटत राहायची. आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे, याची खंतही वाटत राहायची. त्यामुळे पुंडय़ाच्या हातावर एक आणा ठेवून, ‘विडय़ा ओढ, पण कमी ओढ हं!’ असं असहायपणे म्हणताना जणू काही राकेशच्या हातावर मी आणा ठेवते आहे, असा भास व्हायचा. असे अनेक छोटे-मोठे प्रसंग त्रास देऊ लागले होते आणि त्याचा पहिला परिणाम बडोद्याच्या प्रयोगात झाला.

बडोद्याचा प्रयोग, नाटकाच्या दुसऱ्या अंकात गुंडय़ा तालुक्यातून मुंबईला पळून जातो, हे कळल्यावर ‘ती’ आक्रोश करत गावातल्या मास्तर काकांना सांगते. ‘गुंडय़ा घरातून निघून गेला. कुठे गेला असेल हो? त्यानं जीव तर दिला नसेल ना?..’ इथं दुसऱ्या अंकाचा पडदा पडला तरी मी आक्रोश करतच राहिले. ‘मला कोणी तरी वाचवा, मला हे सगळं सहन होत नाही,’ असं काहीबाही बरळत राहिले. बडोद्याचे डॉ. नेने (दादूमिया) यांनी माझी मनोवस्था पाहून आवश्यक ते इंजेक्शन दिलं. तिसरा अंक अर्धा तास थांबवून नंतर मी तो कसाबसा केला. नंतर मुंबईच्या प्रयोगादरम्यान असाच त्रास होऊन जीव कासावीस झाला. शेवटी काही दिवस प्रयोग बंद ठेवून मन:स्थिती ठीक झाल्यावरच पुन्हा प्रयोग सुरू झाले.

कलावंताने ‘स्विच ऑफ, स्विच ऑन’ पद्धतीने काम करायचं असतं हे मान्य असलं तरी प्रत्येक वेळी तसंच होतं असं नाही. ती भूमिका तुम्हाला कळत-नकळत घडवत असते, तुमच्यावर परिणाम करत असते. ती भूमिका तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावू लागते, तुमच्याजवळ येऊ पाहते. अनेक भूमिकांचे माझ्यावर असेच चांगले-वाईट ओरखडे आहेत. त्यातूनच तर लालन सारंग घडत आली.

विजय तेंडुलकरांचं ‘कमला’ नाटक १९८१ साली रंगमंचावर आलं. त्याच वर्षी एक्सप्रेस समूहामध्ये काम करणाऱ्या अश्विन सरीन नावाच्या वार्ताहराने बस्तर जिल्ह्य़ात चालणारा स्त्री-विक्रीचा बाजार शोधून, भारतात असा बाजार चालतो म्हणून पुराव्यादाखल स्वत:च एका स्त्रीला विकत घेऊन, दिल्लीत पत्रकार परिषदेत उभं केलं होतं. अर्थात विकण्याबरोबर, विकत घेणं हासुद्धा गुन्हा असल्यामुळे पोलिसांनी तत्परतेने अश्विन सरीनला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बातमी ताजी असतानाच तेंडुलकरांनी त्यावर नाटक लिहिलं आणि आम्ही उत्साहात १४ दिवसांत ते रंगमंचावर सादर केलं.

या नाटकाचं कथानक थोडक्यात असं होतं. मराठा घराण्यातील एक मुलगी एका मराठा कुटुंबातल्या व्यवसायाने पत्रकार असलेल्या तरुणाशी, जयसिंग जाधव, लग्न करते. पत्रकार दिल्लीत राहणारा. अनेक वेगवेगळ्या बेकायदेशीर प्रकरणांचा शोध घेऊन ती बेधडक व बिनधास्तपणे जगापुढे आणणारा. प्रस्थापितांचे बुरखे फाडणारा असा पत्रकार. या नाटकातील ‘कमला’ ही फक्त विषयासाठी निमित्त मात्र. तिचं येणं पत्रकारपत्नी सरिताच्या आतापर्यंतच्या अस्तित्वाला धक्का पोहोचवणारं. तिच्यासमोर अनेक प्रश्नांची मालिका उभं करणारं, या प्रश्नांमुळे सरिता स्वत:चा व त्या घरातील तिच्या अस्तित्वाचा शोध घेत राहते आणि तिला जी अनुभूती होते, शोध लागतो तो शोध म्हणजे हे नाटक.

सुरुवातीला मी सरिताचं काम काहीसं अलिप्त राहूनच केलं. आजवर रंगभूमीवर अनेक नायिका साकार केल्या, त्यातलीच ही एक सरिता, ही भावना. याहून गांभीर्याने त्या भूमिकेकडे मी पाहिलंच नाही, पण जसेजसे प्रयोग करीत गेले तसतसं प्रयोगागणिक मला सरिताचं अंतरंग जाणवू लागलं. कमलाला घरात आणेपर्यंत ही सरिता एक चारचौघींसारखंच नवऱ्याचा संसार नीटनेटकेपणाने सांभाळणारी आणि त्यातच तिच्या आयुष्याचं इतिकर्तव्य मानणारी घरेलू बायको असते. नाटकाच्या प्रारंभीच्या प्रवेशात ती काकासाहेबांकडे आपल्या घराविषयी, आपल्या नवऱ्याविषयी कौतुकवजा तक्रारी करते. येणारे फोन तत्परतेने घेते. त्यांच्या नोंदी ठेवते. नवरा दौऱ्यावरून येणार हे कळताच लगबगीने मोलकरणीला त्याच्या आवडीचा स्वयंपाक करायला सांगते. अशी ही सरिता आपल्या संसारात रमलेली, नवऱ्याच्या सुखदु:खात अडकलेली, त्याच्याशी आदरयुक्त भावनेने गुंतलेली. तिला जणू स्वत:विषयी जाणच नाही. नवऱ्याचं मत ते तिचं मत. नवऱ्यासाठी झटणं, राबणं हे तिचं कर्तव्य. अशा या सरिताला आमूलाग्र बदलून टाकणारा एक प्रसंग..

जयसिंग जाधव त्या दिवशी कमलाला पत्रकार परिषदेत सादर करणार असतो. दिल्लीसारख्या ठिकाणी प्रेसरूममध्ये सर्व रिपोर्टर्ससमोर आपल्या ठिगळं लावलेल्या मळकट साडीत कमलानं जाऊ नये म्हणून तिला कपडे देऊ का? असं सरिता जयसिंगला विचारते. त्यावर ‘आर यू अ फूल?’ असे उद्गार त्याच्या तोंडून निघतात. तिचा चेहरा पडतो. ती दुखावली आहे हे लक्षात येताच तो तिला त्याच अवस्थेत पत्रकार परिषदेत ‘प्रेझेंट’ करणं कसं आवश्यक आहे हे सांगून कपडे बदलू न देता, अंघोळही करू न देता तयार ठेवण्याबद्दल बजावतो. इथेच सरिताच्या मनात बंडखोरीची पहिली ठिणगी पडते. कमलाला स्त्रियांच्या बाजारातून विकत घेऊन स्वत:च्या पत्रकारितेच्या स्वार्थासाठी प्रेस कॉन्फरन्समध्ये सादर करणारा तिचा नवरा वेगळ्या अर्थाने पण ‘स्त्री’चा बाजारच मांडतो आहे, हे तिच्या लक्षात येतं. तिने विचारलेल्या प्रश्नावर, बायको नावाच्या प्राण्याला अक्कल नसते. घर चालवणं इतकंच तिचं काम; तिनं डोकं चालवायचं नाही, अशा दृष्टिकोनातून त्यानं दिलेली उत्तरं ऐकून ती नकळत स्वत:चा शोध घेऊ लागते आणि यातच प्रेस कॉन्फरन्सनंतरच्या त्या रात्रीचा प्रसंग घडतो..

जयसिंग खूप प्यायलेल्या अवस्थेत असतो. त्या रात्री सरिता त्याला हवी असते. तो तसे सुचवतो. ती नकार देते. आजवर नकार ऐकण्याची त्याला सवय नसते. तो तणतणत वर बेडरूममध्ये जातो. सरिता अर्धवट काळोखातच दिवाणखान्यात एका कोपऱ्यात बसून राहते. तेवढय़ात कमला येते. तिला वर बेडरूममध्ये जायचं आहे, पण सरिता तिला हटकते. दोघी बोलत बसतात. त्यातले काही संवाद-

कमला : एक पूछे बीबीजी, गुस्से तो नहीं होऐंगी?
सरिता : नहीं, पूछो.
कमला : तुम्हे कित्तेमें खरीदा?
सरिता : क्या?
कमला : मैने पूछा तुम्हे कित्तेमें खरीदा?
सरिता : मुझे? देखो..
(बेत बदलून तिच्या शेजारी बसून) सातसौ मे.

सरिता वरकरणी कमलाच्या भोळ्याभाबडय़ा प्रश्नांनी स्वत:ची करमणूक करून घेते आहे, असं वाटलं तरी ती स्वत:सुद्धा कमलासारखीच या घरात गुलाम असल्याची भावना तिच्या मनात खोलवर रुजून राहते.

पुढे काकासाहेबांबरोबर बोलताना ती आपण या घरात गुलाम असल्याची भावना व्यक्त करते. तेव्हा काकासाहेब विचारतात,

काकासाहेब : असं आजच का आलं हे तुझ्या मनात?

सरिता : यापूर्वी का आलं नाही म्हणता? मी झोपलेली होते. मी जागी असून गुंगीत होते. कमलानं मला जागं केलं. खडबडून जागं केलं. कमलानं मला सगळं दाखवून दिलं. तिच्यामुळे मला स्वच्छ दिसलं की, ज्याला मी जोडीदार मानला तो गुलामांचा मालक आहे. मी बायको नाही, त्याची एक गुलाम आहे. या घरात मला कसलाही हक्क नाही. कारण मी गुलाम आहे. गुलामाला हक्क नसतात, होय ना काकासाहेब?

काकासाहेबांसमोर सरिता आपलं मन मोकळं करते, पण प्रत्यक्षात तशी वागते का? प्रत्यक्षात पारंपरिक कौटुंबिक संस्कारात वाढलेल्या सर्वसामान्य भारतीय स्त्रीसारखीच ती वागते.

नवऱ्याची नोकरी गेली आहे. या क्षणी तो असाहाय्य आहे. त्याला सहानुभूतीची, मायेची गरज आहे हे लक्षात घेऊन काही क्षणांपूर्वीच व्यक्त केलेल्या आपल्या बंडखोर विचारांना ती मुरड घालते. आपल्या चिडलेल्या नवऱ्याला आवरण्याचा प्रयत्न करते. दारू पिऊन बेहोष होऊन पडल्यावर त्याचे बूटही काढते. तरीही मनात फुटलेला बंडखोरीचा अंकुर ताजा राहतो. कधी तरी तो बहरेल- त्याला फळं येतील ही आशा व्यक्त करीत सरिता जयसिंग जाधवच्या पायाशी बसून राहते. तेंडुलकर तिचं कंसात वर्णन करतात- ‘नजर दूरवर भविष्यात स्थिरावलेली, मुद्रेवर निर्धार.’

‘कमला’ नाटकाचे जसजसे प्रयोग होत तसतशी सरिताची, नव्हे एकंदर भारतीय स्त्रीची व्यथा मला जाणवू लागली, टोचू लागली. आजचा काळ हा स्त्री-स्वातंत्र्याचा आहे, असं समजणाऱ्या माझ्यासारख्या अनेक स्त्रिया यातूनच नाही का जात?

आजपर्यंत मला वाटायचं की, आपण स्वतंत्र आहोत. पुरुषांच्या बरोबरीने आपण शिक्षण घेऊ शकतो. नोकरी करू शकतो. एकाच व्यासपीठावरून भाषण करू शकतो. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण बाहेर जाऊ-येऊ शकतो. मित्र-मैत्रिणींबरोबर िहडू-फिरू शकतो. आपण स्वतंत्र आहोत, परिपूर्ण आहोत. पण विचार केला तर माझ्यासारखी स्त्री स्वतंत्र आहे का? नवरा आपल्याला स्वत:च्या बरोबरीने वागवतो असे मानणारी स्त्री खरोखरच त्याच्या बरोबरीने वागत असते का?

ज्या प्रश्नांकडे आजवर मी कानाडोळा केला. तो प्रश्न मी सरिताची भूमिका करू लागल्यानंतर अक्षरश: माझा पाठलाग करू लागले. नकळत मी माझ्या घरातलं माझं स्थान शोधू लागले आणि मला जाणवलं की, तेंडुलकरांनी ‘कमला’मध्ये मांडलेल्या सुखवस्तू मध्यमवर्गातील स्त्रीचे अनेक प्रश्न हे माझेही वैयक्तिक प्रश्न होऊन राहिले आहेत. जे आजवर माझ्या सहज अंगवळणी पडले होते; सबब मला कधी जाणवले नव्हते.

‘कमला’ नाटकात सरिताच्या तोंडची बंडखोरीची भाषा ऐकून काकासाहेब तिला विचारतात, ‘आज दहा र्वष तुझा संसार चाललाय. मग आजच का आलं हे तुझ्या मनात?’

सरिता म्हणते, ‘यापूर्वी का आलं नाही म्हणता? मी झोपलेली होते. मी जागी असून गुंगीत होते. कमलानं मला जागं केलं. खडबडून जागं केलं..’

याच चालीवर मला, लालन सारंगला, म्हणावंसं वाटतं, ‘सरितानं मला जागं केलं, खडबडून जागं केलं..! ‘मला आश्चर्य वाटतं ते याचं की, मी स्वत:ला अत्यंत संवेदनशील मानते, तरीही आजवर मला तेंडुलकरांनी मांडलेल्या स्त्रीची व्यथा जाणवली कशी नाही?

आजवर आपली समाजरचना, आपल्या मनावर वर्षांनुवर्षं झालेले पारंपरिक संस्कार यात स्त्रीचं स्थान काय? तिच्या स्वातंत्र्याची मर्यादा किती? बरोबरीने शिक्षण घेणं, नोकरी करणं, अनेक कार्यात खांद्याला खांदा लावून वावरणं म्हणजे स्वतंत्र होणं आहे का? आणि असं जर असेल तर नोकरी करून किंवा बाहेर त्याच्याइतकंच राबून घरात पाऊल ठेवताच तो, ‘दमलो बुवा!’ म्हणत सोफ्यावर आरामात रेलतो आणि तितक्याच दमलेल्या असताना आपण त्याच्यासाठी चहा करायला स्वयंपाकघरात धावतो. घाईगडबडीत स्वयंपाकाचीही तयारी करतो. त्याला भूक लागली असेल म्हणून जेवण बनवतो. तो चहानंतर सकाळी घाईघाईत नजर टाकून ठेवलेली वर्तमानपत्रं आता आरामात चाळीत असतो. आपण टेबल मांडून त्याला जेवायला बोलावतो. आग्रह करून दोन घास अधिक खायला लावतो. तो खुशीत जेवला, त्याने समाधानाची ढेकर दिली की त्यात आपण समाधान मानतो. तो जेवला की, एका बाजूला स्वयंपाकघर आवरणं, एका बाजूला बिछाना घालून झोपायची तयारी करणं ही आपली सर्कस चालूच असते. तो मात्र बिछाने घालून झाला की त्यावर आडवा होऊन घोरण्यास मोकळा.

आपण हे विनातक्रार का करतो? आपल्यावर कुणी जबरदस्ती करतं का? विचार केला तर जबरदस्ती नसते. पारंपरिक संस्कारांतून आपल्या नकळत या गोष्टी आपल्या रक्तात भिनलेल्या असतात. नकळत त्यानेसुद्धा त्या गृहीत धरलेल्या असतात. हे सगळं करणं हे माझं कर्तव्यच आहे, असं मी मानत असते, तसंच तोही ते गृहीत धरून असतो. मुद्दाम कुणीच काही करत नाही. खरं तर बायकोसुद्धा आपल्यासारखीच दमून आली आहे, 

तीही कमवून संसाराला हातभार लावत आहे, मग समान हक्क मान्य करून त्याने एक दिवस स्वयंपाक केला तर किंवा घरातल्या कामांतला अर्धा हिस्सा उचलला तर काय हरकत आहे? एखाद्या घरात चुकून असं घडलंच तर, ‘बिच्चारा नवरा! बाहेरून दमून येतो आणि बायकोही घरात त्याला राबवून घेते!’ असं म्हणायला आपणच पुढे सरसावत असतो.

माझ्याही घरात याहून वेगळं काही घडत नाही. फक्त इतर घरांपेक्षा थोडंसं नेपथ्य वेगळं असतं इतकंच. ‘रथचक्र’ नाटकातील साडेतीन तास थकवणारी ‘ती’ची भू्मिका करून मी घरात येते. आणि ‘मौनीबाबा’चं पंधरा मिनिटांचं काम संपवून कमलाकर सारंग घरात प्रवेश करतो. दारात चप्पल काढली, मेकअप बॉक्स आत ठेवला की मी लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागत असे व ‘दमलो बुवा’ असं म्हणत कमलाकर सारंग लोडाला टेकून बसायचा. जेवण टेबलावर मांडलं की आरामात जेवायचा. हातावर पाणी पडलं की लगेच बिछान्यावर आडवं पडून विश्रांती घेत पेपर वाचायचा. आपली बायको आपल्यासारखीच किंवा आपल्याहून जास्त काम करून, थकून घरात आली आहे याचं भान त्याला नसायचं. मग टेबल, स्वयंपाकघर आवरणं हे सगळं मलाच करावं लागायचं. लालनला पाठीचं दुखणं आहे, तीही थकली आहे हे त्याच्या लक्षातच येत नसे. जाणीव करून दिली, मदत कर, असं सांगितल्यावर तो जरूर मदत करायचा; पण आपलं हे जोडीदार म्हणून कर्तव्यच आहे हे त्याच्या लक्षात येत नसे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे माझ्याही लक्षात येत नव्हतं. पण त्यानंतर मात्र मी थोडंसं का होईना, पण घरातल्या कामाला त्यानंही हातभार लावावा यावर आग्रही असे. पण असं वारंवार सांगून काम करून घेतलं की माझे संस्कार मलाच त्रास देऊ लागायचे. आपण नवऱ्याला छळत तर नाही ना? असं वाटून माझ्याच मनाला त्रास व्हायचा. संस्कारातून सुटणं खरोखरीच कठीण काम आहे. घरात फार फरक करू शकले नाही; पण याची जाणीव झाली हे नसे थोडके.

मी तर नाटकांचे प्रयोगावर प्रयोग करत होते. मनामध्ये विचारांचा कल्लोळ चालूच असायचा. पण एकच प्रयोग बघणाऱ्या स्त्री-प्रेक्षकांच्या मनातही ती जाणीव जागृत होऊ लागली. प्रयोग संपल्यावर तर त्या भेटून सांगायच्या. कित्येक पुरुष प्रेक्षक नंतर भेटले तर म्हणायचे, ‘अहो! बायकोला तुमचं नाटक दाखवलं खरं, पण आता काही तिच्या मनाविरुद्ध झाले की म्हणते, मी काय तुमची कमला आहे?’

त्याचं एक आणखी चांगलं उदाहरण म्हणजे गुजरातमधल्या सोनगडच्या प्रयोगाचं. ओपन एअर थिएटरमध्ये नाटक सुरू झालं आणि काही वेळानं माझं लक्ष समोर बसलेल्या एका स्त्री प्रेक्षकावर गेलं. खरं तर मला अंधारातल्या प्रेक्षकांकडे कधीच बघता यायचं नाही, पण या वेळी त्या बाईच्या हालचाली थोडय़ा त्रास देत होत्या. तिच्या मांडीवर एक लहान मूल होतं. एक तर ते रडत तरी असायचं, नाही तर काही तरी अं, ऊ वगैरे करायचं. ती बिचारी त्या पोराला गप्प करत, थोपटत तन्मयतेनं नाटक बघत होती, म्हणून माझ्या ती लक्षात राहिली.

नाटक संपलं. पडदा पडला आणि प्रेक्षकांच्या डाव्या बाजूने काही प्रेक्षक, कार्यकर्ते रंगमंचावर आले. ‘व्वा! छानच झालं नाटक!’ असे उद्गार ऐकू येऊ लागले. त्याच वेळी ती बाईही आपल्या पेंगुळलेल्या मुलाला घेऊन आत आली आणि आमच्यासमोर तिथंच बिल्ला लावून मिरवणाऱ्या सेक्रेटरी म्हणजे तिच्या नवऱ्याकडे आपल्या हातातलं मूल ठेवत म्हणाली, ‘घ्या, थोडा वेळ सांभाळा.’ म्हणजे त्या प्रयोगात तिला जाणवलं असावं की, ‘मूल दोघांचं, पण सर्व वेळ त्याचा त्रास सहन करत मी नाटक बघितलं आणि हा मात्र बिल्ला लावून मिरवत होता.’ त्यानंतर तिची ती जाणीव फार वेळ राहिली की नाही माहीत नाही, पण क्षणभर का होईना तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली हेही नसे थोडके.

या आणि अशा अनेक लहान लहान वाटणाऱ्या गोष्टींतूनच मला वाटतं, आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून द्यायला हवी, आणि म्हणूनच माझ्या मते केवळ नोकरी करून, पुरुषांच्या बरोबरीनं वागून, त्यांच्याइतकंच बाहेर कमवून कधीही समान हक्कं मिळणार नाही. त्यापलीकडे जाऊन तिनं आधी आपलं मन स्वतंत्र केलं पाहिजे. पारंपरिकतेचं जोखड झुगारून दिलं पाहिजे. जोपर्यंत तिचं मनच अशा वर्गवारीला बळी पडत राहील तोपर्यंत स्त्री कधीच मुक्त होऊ शकणार नाही.

भारतीय स्त्रीला हे असं मुक्त होणं जमणार नाही. तिनं फक्त भविष्याकडे नजर लावून बसायचं, हेच तर आहे ‘कमला’चं सार! कॉलेज जीवनात अचानक रंगमंचावर प्रवेश करती झाले. पुढची वाटचाल माहीत नव्हती, पण वाटेवर हे वळण मिळालं आणि पुरती बदलून गेले.

आज या लेखाच्या निमित्ताने मी रंगभूमीची त्या त्या नाटककारांची, दिग्दर्शकांची, माझ्या सगळ्या भूमिकांची अत्यंत ऋणी आहे. तुम्हीच आजच्या ‘लालन सारंग’ला घडवलंत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com