विनोदसम्राट - आचार्य अत्रे!

विनोदसम्राट - आचार्य अत्रे!

झाले बहु होतील बहु पण आचार्य अत्रे सम आचार्य अत्रेच. विनोद विद्यापीठाचे आद्यशंकराचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि गडकऱ्यांचे शिष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी विनोदाची परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण हे आचार्य अत्रे यांचे परात्पर गुरुनाम गुरु होते.

श्रीपाद कृष्णांनी खऱ्या अर्थाने मराठी विनोदाचा पाया घातला. त्यांच्या शिष्याने चौधरा उभा केला. चिं.वि. जोशी, दत्तु बांदेकर, गंगाधर गाडगीळ, रमेश मंत्री, सुभाष भेंडे, जयंत दळवी यांनी विनोद मंदिराचा गाभारा उभारला. पुल देशपांडे यांनी विनोद मंदिराचा कळस उभारला आणि आचार्य अत्रे विनोद मंदिराच्या कळसावरील फडकती पताका होय. 

श्रीपाद कोल्हटकरांनी व्यक्ती, समाज, परंपरा, धार्मिक अंधश्रद्धा यांचा सखोल अभ्यास केला आणि अंधश्रद्धा आणि अनुचित चाली, रुढी विरुद्ध बंड पुकारले. चोरांचे संमेलन, कुलूप, झोप, नवस, सायास यावर भरपूर विनोद केले. रिकाम पंचची कामगिरी साहित्य बत्तीशी नावाचा विनोदावरचा मोठा ग्रंथ लिहिला. कोर्टातील साक्षीदार हा कोल्टकरांचा हातखंडा विषय. 
वकील काय हो तुम्हाला चार बायका आहेत की काय? 

साक्षीदार - सगळ्यांना चार बायका असतात का? 
वकील - पहिली बायको मेली वाटते? 
साक्षीदार - मरु नये तर तिने काय करावे? 

वकील - तिच्या पासून तुम्हाला एक मुलगा झाला होता ना? 
साक्षीदार - माझ्या पासून होऊ नये तर काय? हे संबंध उत्तर त्यांच्या तोंडून निघण्यापूर्वीच कोर्टात एवढा हशा उसळतो त्यांत वकील कोठल्या कोठे वाहून जातो. असे कोल्हटकरी विनोद होत. त्यांचे शिष्य गडकरी खरा कवि व खोटा कवि यात अंतर विचारल्यावर खरा कवि स्वर्गात विहरत असतो आणि खोट्या कविला स्वर्ग दोन बोटे उरतो. 

या दोन्ही गुरुशिष्याच्या विनोदाची जातकुळी, क्‍लिष्टता, कृत्रिमतेची होती. पण आचार्य यांचा विनोद सहज, सोपा, उस्फूर्त, मुक्त, प्रसन्न असा होता. मुक्तहास्य, प्रसन्नहास्य, उत्सुर्त हास्य ही आचार्य अत्रे यांच्या विनोदाची व्यवच्छेदक लक्षणे होत. एखाद्या सभागृहात दोन अडीच हजार लोकांना हसविणे तितकेसे अवघड नाही. पण खाली जमीन आणि वर आकाश यामधील अशिक्षित, असंस्कृत, अडाणी लोकांना ज्यांना खायची भ्रांत आहे, तिखट व मीठ मिसळून तेलाऐवजी त्यात पाणी घालून खाणाऱ्या अडाणी जणांना हसविणे अतिशय कठीण होय. 

पण पंचवीस हजाराच्या सभा, लाख लाख दीड दीड लाखांच्या सभांना हसत ठेवणे हा आचार्य अत्रे यांचा हातखंडा विषय होता. वीस वीस मिनीटे हशा आणि वीस वीस मिनीटे टाळ्या ही आचार्य अत्रे यांचे वैशिष्ट्य होते आणि टाळ्या हे आचार्य अत्रे यांचे अभेद्य समीकरण होते. आचार्य अत्रे यांना गर्दीचे व गर्दीला आचार्य अत्रे यांचे वेड होते से प्रा. ना.सी. फडके म्हणत असत.

कष्टसाध्य हास्य निर्माण करणारे महाराष्ट्रात खूप आहेत. पण उस्फुर्त हास्य, मुक्त हास्य, प्रसन्न हास्य, खळखळून हास्य आणि खदखदून हास्य निर्माण करणारा आचार्य अत्रे यांच्याशिवय दुसरा विनोदी लेखक दाखविता येणार नाही. अशी प्रचंड हास्याची मेजवानी आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राला दिली. साऱ्या महाराष्ट्राला हसायला शिकविले असे म्हटल्यास या विधानाला अतिशयोक्तीचा वास येऊ नये इतके विनोदाशी एकरुप अत्रे झाले होते. विनोद हा आचार्य अत्रे यांचा स्थायीभाव आहे किंवा होता म्हणा. 

विनोदाचे असंख्य प्रकार, अभिजात विनोद, प्रसंगनिष्ट विनोद, शब्दनिष्ट विनोद, कल्पनानिष्ट विनोद, विरोधाभासातून निर्माण होणारा विनोद, कलाटणी किंवा कडेलोटी विनोद अतिशयोक्तीतून विनोद, विसंगतीतून विनोद या सर्व विनोदी प्रकाराचा मुक्त उधळण करणारा विनोद सम्राट आचार्य अत्रेच होत. हजरजबाबी तात्काळ विनोद हे ही आचार्य अत्रे यांचे महत्वाचे वैशिष्य होते. 

हजरजबाबी तात्काळ विनोद :

पुण्याच्या ऍम्पी थिएटर फर्ग्युसन कॉलेजमध्ये कळ्यांचे निश्‍वास या मालतीताई बेडेकरांच्या पुस्तकावर विविध वृत्ताने खटला भरला होता. त्या पार्श्‍वभूमीवर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या ऍम्पीथिएटरमध्ये विद्यार्थ्यांसमोर आचार्य अत्रे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

आचार्य अत्रे व्याख्यानास सुरवात केली आणि सभ्य गृहस्थ हो! असे म्हटल्यावर तिसऱ्या मजल्यावरील एका विद्यार्थ्यांने ओऽऽओ अशी जोरदार प्रतिसाद दिला. त्यावर आचार्य अत्रे म्हणाले, तुम्हाला नाही मी सभागृहस्थांना उद्देशून म्हटले होते. अशी हजरजबाबी, तात्काळ, सत्वर विनोदाची अनेक उदाहरणे खूप देता येतील. 

वक्‍त्याला घाबरवण्यासाठी श्रोते देखील काही कमी बेरकी नसतात. एका सभेत एका श्रोत्याने काय हो, गाढवाच्या पाठीवर किती असतात? असे आचार्य अत्रे यांना विचारताच, "या व्यासपीठावर मोजून सांगतो' म्हटल्यावर श्रोता पळून गेला. 

प्रसंगनिष्ट विनोद :

एकदा आचार्य अत्रे फर्ग्युसन कॉलेज संपल्यावर सायकलवरुन घरी येण्यास निघाले. सायकल जेमतेम. ब्रेकर नाही, सीट कडक. आचार्य अत्रे सायकलवर बसून काव्य करण्याच्या तंद्रीत फर्ग्युसनच्या उतारावरुन लकडी पुलावरुन निघाले. लकडी पुलाजवळ स्मशानभूमी आहे.

रामा बोलो, भयराम राम बोलो, भाय राम असे ओरडत एक स्मशानयात्रा चालली होती. आचार्य अत्रे त्यांच्या नादात होते. त्यांचा धक्का खांदकऱ्यांना लागला व ताटीवरील प्रेत खाली पडले. त्यावर "अहो, काही समजते की नाही? वेळ काय, प्रसंग काय? असे म्हऊन खांदेकरी आचार्यावर ओरडू लागले. त्यावर आचार्य ज्याला लागले तो काही बोलत नाह आणि तुम्ही काय ओरडताय' असे म्हटल्यावर गंभीर प्रसंगात देखील खांदेकरी हसू लागले. 

धिप्पाड शरीरयष्टीचे अत्रे एकदा पुण्याच्या पर्वतीवर पायऱ्या चढून चालले होते. थोड्याच वेळात त्यांना दम लागला आणि ते धापा टाकू लागले. हे पाहून एका पंचाहत्तर वर्षाच्या धडधाकट म्हाताऱ्याने त्यांना डिचवले, अहो, काय हे अत्रे? चार पायऱ्या चढून उतरतोय अजुनही दोन वेळा चढून दाखवीन. काय द्याल मला? त्या म्हाताऱ्याचा आगावुपणा झटकन उतरवीत अत्रे उत्तरले, ""हेईन ना खांदा!'' त्यावर आजुबाजूचे हसू लागले. 
अतिशयोक्तीतून निर्माण होणारा विनोद? 

आचार्य अत्रे रशियावरुन नुकतेच आले होते. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली आचार्य अत्रे यांचे "मी रशियात काय पाहिले?' यावर पुण्याच्या लक्ष्मी क्रिडा मंदिरात (आताचे डीएसके चिंतामणी. पूर्वीची नातू बाग) सभेचे आयोजन बॅ. विठ्ठलरावांनी त्यांच्या अध्यक्षतेखालीच केले होते.

स्वागत, प्रास्तविक करताना बॅ. विठ्ठलराव म्हणाले खरे तर गाडगीळ मंडळी महाराष्ट्रात सर्वत्र पसरलीयत. अर्थशास्त्रात धनंजयराव गाडगीळ, वाडःमयशास्त्रात गंगाधर गाडगीळ, राज्यशास्त्रात काकासाहेब गाडगीळ, पत्रशास्त्रात पांडोबा गाडगीळ, एकदा आचार्य अत्रे यांनी पांड्या, पांड्या बॅरीस्टर का झाला नाहीस? म्हणून पांडोबांना विचारले. मग बॅरीस्टर होऊन कायदेशास्त्रात पारंगत झालो.

आचार्य अत्रे यांचा आम्हा गाडगीळ घराण्यावर फार राग आहे. ते उत्तम नाटककार, आद्यविडंबनकार आहेत. पण ते फार अतिशयोक्ती करतात. आणि त्यांना पळता येत नाही. आचार्य अत्रे मुख्य भाषण द्यायला उठले आणि आजचे अध्यक्ष बॅ. विठ्ठलराव गाडगीळ काकासाहेबांचे चिरंजीव जरा थांबून काय हो अतिशयोक्ती नाही ना? सर्वत्र हशा पिकला. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ म्हणाले मला पळता येत नाही. पण पळणाऱ्यांची मी पळता भुई पुरी करतो.

नंतर प्रश्‍नोत्तराचा तास सुरु झाला. एकाने विचारले, "काय हो अत्रे साहेब? रशियात वेश्‍याव्यवसाय आहे काय?' आचार्य अत्रे उद्गारले रशिया कम्युनिष्ट राष्ट्र आहे. त्यामुळे तेथे बेकारी, बेघर, भिकारी नाही. सर्वांना पोटभर अन्न मिळते. मग कोण वेश्‍या व्यवसाय करील. आता इंग्डलमधील वेश्‍या व्यवसायाबद्दल विचाराल तर बॅ. विठ्ठलराव नुकतेच इंग्लडवरुन आलेत ते त्या ठिकाणच्या वेश्‍याव्यवसायाबद्दल सांगतिलं. त्यावर हशाचा बॉम्ब फुटला. अतिशयोक्तीचे बरेच सांगता येतील. पण इतर विनोदाची खुमारी लक्षात येणार नाही आणि आचार्य अत्रे विनोद सम्राट होते हे कसे उमगेल? 

अभिजात विनोद : 

शब्दनिष्ट विनोद आणि अभिजीत विनोद 
सका पाटील संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक त्या सदोबा पाटलाची चेष्टा करण्याची एकही संधी आचार्य अत्रे सोडत नसतं. ते नामदार होते. त्यांचा उल्लेख नेहमी नामदार सदोबा कान्होबा पाटील असा लांबलचक करण्याऐवजी नामदार स.का. पाटील असा करीत. आचार्य अत्रे नासका पाटील असा नेहमी उल्लेख करीत. 
सदोबा पाटलांनी मुंबई मराठी जनतेला मिळणार नाही अशी गर्जना केली होती. त्यामुळे आचार्य अत्रे यांचा सदोबावर राग होता. ते नेहमी गुजराती, भांडवलदार, सटोडिये, काळाबाजारवाल्यांच्या कोंडाळ्यात सदोबा नेहमी असत. 

आता आचार्य अत्रे यांच्या शब्दात आणि आवाजात दोन चांगल्या गोष्टीत एखादी वाईट गोष्ट होणारच याचे उदाहरण देताना आचार्य अत्रे म्हणत, "13 ऑगस्ट ला माझा जन्म झाला. म्हणजे 13 ऑगस्टला विनोद जन्माला आला. 15 ऑगस्टला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्टला भारत जन्माला आला. या दोन चांगल्या गोष्टी झाल्या. पण 14 ऑगस्टला सदोबा पाटील जन्माला आले. दोन चांगल्या गोष्टीमध्ये एखादी वाईट गोष्ट होणारच.'' 

एकदा वरळीच्या नाक्‍यावर ेक गाढव मरुन पडले. लोकांनी तक्रारी केल्या. नगरसेवक गाठले. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी लोक आचार्य अत्रे यांच्या मराठा कार्यालयात आचार्य अत्रे यांच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडू लागले. गाढव मरुन पडले आहे. दुर्गंधी सुटलीय. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तुम्हीच काहीतरी करा. म्हणून लोक विनवू लागले. आचार्य अत्रे यांनी म्युनिसिपल कमिशनर शैलेंद्र सुखटणकरांना फोन लावला, "मी अत्रे बोलतोय'. "बोला'. अहो, वरळी नाक्‍यावर गाढव मरुन तीन चार दिवस झालेत. दुर्गंधी सुटलीय. घाणीचे साम्राज्य पसरलंय. अहो, अत्रे साहेब समाजातील सर्व घाण तुम्ही काढता. मग तुम्ची काढा की घाण?' 

आचार्य अत्रे उत्तरले, "अहो महाशय आम्ही काढली असती घाण. पण आपल्या हिंदू धर्मात मेलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातलगाला प्रथम सांगायचे असते. म्हणून तुम्हाला प्रथम सांगतो.' बरोबर अर्ध्या तासात गाढव उचलले गेले व दुर्गंधीमुक्त परिसर झाला. 

विसंगतीतून निर्माण झालेला विनोद :

माणूस चालतो. जमीनीशी तो चांगला काटकोन करुन चालत असतो. त्याला आपण हसत नाही. पण केळ्याच्या सालीवरुन घसरुन पडल्यावर त्याचा 120 अंशाचा कोन झाल्यावर आपण हसतो.

चालणे सुसंगती, पडणे विसंगती . शाब्दिक कोटी - मामा वरेरकर यांच्यावर आचार्य अत्रे यांचा मोठा राग. भास हा मोठा संस्कृत नाटककार होता. मामा वरेरकरांना आपण "भास' असल्याचा नेहमी भास होत असतो. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नांवर त्रिंबकराव नरवणे राजीनामा काही देईनात. "तेव्हा हा त्रिंबुनाना नरवणे आहे का नर उणे' असे म्हटल्यावर नरवण्यांनी झटकन राजीनामा दिला. 

कलाटणी - कडेलोटातील विनोद :

हा विनोद कोणालाच माहिती नाही. हा माझ्या उपस्थितीत विदर्भाच्या दौऱ्याचे वेळी घडला आहे. विदर्भ कॉंग्रेसचा बालेकिल्ला. आचार्य अत्रे यांनी नागपुरात मराठा आवृत्ती सुरु केली. आचार्य अत्रे यांनी दोनदा नागपुरात प्राणांतिक मार खाल्ला. पण नागपूरवरील आचार्य अत्रे यांचे प्रेम काही कमी झाले नाही. ते सारखे नागपूरला स्वखर्चाने भेट देत. नव्हे सारा महाराष्ट्रभर ते फिरत. चांद्यापासून बांद्यापर्यंत ही त्यांचीच वाक्‍य रचना आता सर्रास वापरली जाते. 

महाराष्ट्राचा आचार्य अत्रे सांस्कृतिक राजदूत होता. नागपुरकरांची मनोभूमिका बदलण्यासाठी व त्यांचे मधील महाराष्ट्रासंबंधी वैरभाव दूर करण्यासाठी मराठा आवृत्ती नागपूरमध्ये आचार्य अत्रे यांनी सुरु केली. 

विदर्भ कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. एकदा एका सभेत तीनशे चारशे पांढऱ्या टोप्या घातलेले खादीधारी बगळे आचार्यांच्या सभेला आले. त्यांनी प्रश्‍नांची चिठोरे आचार्यांना देऊन या प्रश्‍नांची उत्तरे दिल्याशिवाय आम्ही तुमची सभा होऊ देणार नाही. आचार्य अत्रे म्हणाले, "बरे आणा तुमचे प्रश्‍न. 

प्रश्‍न पुढीलप्रमाणे :

1. तुम्ही दारु पिता की नाही? 
2. तुमचे वनमालेशी प्रेमसंबंध होते की नाही? 
3. तुम्ही असे का केले? 
आचार्य अत्रे शांतपणे म्हणाले, तुमच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिल्याशिवाय मीच सभा सुरु करणार नाही. 

1. तुमचा पहिला प्रश्‍न मी दारु पितो की नाही? 
""होय, मी दारु पितो!'' 
2. तुमचा वनमालेशी माझे प्रेम संबंध होते की नाही? 
"होय, माझे मनमालेशी प्रेमसंबंध होते.'' 
लोकांना वाटले आचार्य अत्रे संपले. ते मान्य करतात! आचार्य अत्रे संपले! आता काही आश्‍चर्य नाही. सभा निःशब्द. सर्वांच्या नजरा आचार्य अत्रेवर खिळलेल्या.

आचार्य अत्रे थांबून सर्वत्र एक दृष्टिक्षेप टाकून जरा पॉज घेऊन एकदम उत्तरले, ""होय, पण त्यावेळी मी कॉंग्रेसमध्ये होतो.'' त्याबरोबर सभेमध्ये हशा पिकला आणि माकड आणि टोपीवाला याच्या गोष्टीत टोपीवाल्याने रागाने आपली टोपी आपटल्यावर सर्व माकडे आपापल्या डोक्‍यावरच्या टोप्या जमीनीवर आपटू लागले तसे कॉंग्रेसची टोपीधारकाकडे आपापल्या टोप्या जमीनीवर आपटून सभेतून पळाले आणि आचार्य अत्रे यांनी चांगली तीन तास सभा घेतली आणि ती सभा जिंकली. आता शेवटचा आचार्य अत्रेंचा टोला काय असतो ते सांगतो. हशाचा दणका काय असतो ते बघा. 

एक गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन आचार्य अत्रे यांचेकडे आले व म्हणाले, ""अत्रे साहेब माझ्या मुलाला तुम्ही हसवा.'' 
मी विनोदी लेखक आहे. मी लोकांना हसवितो. पण हसविण्याचा माझा धंदा थोडाच आहे? असे हसवा म्हटल्याने काय कोणी हसते. त्या गृहस्थाने हट्टच धरला की माझ्या मुलाला तुम्ही हसवाचं.

आचार्य अत्रे म्हणाले आता मझी कसोटीच आहे. मला आव्हान आहे आणि आव्हानाला प्रतिआव्हान देणे माझी खाशियत आहे. मी आव्हान स्विकारले. मुलाचा बाप म्हणाला अत्रेसाहेब तुम्ही माझ्या मुलाला हसवा तोपर्यंत मी मंडईतून भाजी घेऊन येतो. अन्‌ ते गृहस्थ चालू लागले. आता आली का पंचाईत. आलिया भोगाशी असावे सादर त्याप्रमाणे मी सज्ज झालो. त्याला गोष्ट सांगू लागलो.

1. एकदा राजाभाऊ आपल्या रमाबाईंना घेऊन नर्गिस-राजकपूरच्या सिनेमाला गेले. पडद्यावर राज-नर्गिसचा रोमांस चालला होता. त्यावर रमाबाई राजाभाऊंना कोपराने ढोसून बघा, बघा तो कसा रोमान्स करतोय ते, नाहीतर तुम्ही. त्यावर राजाभाऊ म्हणाले, त्याला त्यासाठी हजारो रुपये मिळतात, मला काय? 
तरी मुलगा हसेना.

2. आचार्य अत्रे म्हणाले या पोराला रोमान्स काय ते कसे कळणार? आपलेच चुकले. 
मग आचार्य अत्रे यांनी महेश आणि त्याची बायको मयुरीला घेऊन आपल्या छोट्याशा मुन्नाला घेऊन समुद्रावर फिरायला गेले. मुन्नाचे वडील महेश पाण्यात गेले. मयुरी वाळूत मुन्नाबरोबर खेळू लागली. पण बाबा समुद्रात गेलेले बघून मुन्ना आईला म्हणाला, ""आई, मी पण पाण्यात खेळू का?'' आई म्हणाली, तू नको जाऊस. तू बुडशील. पण बाबा कुठे बुडलेत. अरे ते बुडले तरी त्यांचा विमा आहे. तरी देखील ते पोर हसले नाही. आचार्य अत्रे म्हणाले काय मी गाढव हो या छोट्या मुलाला विमा, पैसा काय कळणार? 

3. त्याला त्याच्या जीवनातील एक गोष्ट सांगूयात. 
एकदा वाईच्या घाटावर आपल्या शाळेतील गुरुजी कृष्णानदी स्नान करुन आपले धोतर धुत होते. (त्यावेळी आपले धोतर आपणच धुण्याची सवय होती) धोतर धुता धुता गुरुजींचा पाय घसरला आणि गुरुजी नदीत गटांगळ्या खाऊ लागले.

घोडके नावाचा याच शाळेतील एक मुलगा पुलाच्या कठड्यावरुन हे सर्व पाहत होता. गुरुजींना पोहता येत नाही. ते पाण्यात गटांगळ्या खातायेत हे घोडकेने पाहिले व त्याने कृष्णेत उडी मारुन मास्तरांच्या शेंडीला धरुन नदीकाठावर आणले. नाकातोंडात पाणी गेलेले मास्तर घोडकेकडे बघून आपले प्राण वाचविलेत म्हणून मास्तर म्हणाले, "बा, घोडके तू मला बुडता बुडता वाचविलेस. त्याबद्दल तुला काय देऊ?' 

आताचा घोडके असता तर मला गुरुजी गणितात, इंग्रजीत पास करा असा वर मागितला असता. पण घोडके म्हणाला, ""मास्तर मी तुम्हाला वाचविले असे उद्या शाळेत सांगू नका. नाहीतर सुट्टी बुडाल्यामुळे मलाच मुले बदडतील, मारतील.'' 

तरीही पोरगं हसलं नाही. आचार्य अत्रे म्हणाले हरलो बाबा. आपण आपली सपशेल हार होय असे आपण त्या पोराच्या बापाला सांगून त्याची माफी मागायची. आणि झाले आपली जिरली म्हणून गप्प बसायचे. त्यावर त्या मुलाचा बाप पिशवीत मेथीची भाजी दोन चार काड्या बाहेर आलेल्या, कोथिंबीर, बटाटे घेऊन आला आणि ओरडला काय, अत्रे साहेब हसला का आमचा बाळू? 

अत्रे उत्तरले, ""नाही बाबा, मी हरलो.'' 

त्यावर तो बाप म्हणाला हा माझा बाळू कसा हसेल? तो ठार मुका आणि बहिरा आहे. असा हसाचा स्फोट फोडणारे आचार्य अत्रे एकमेव अद्वितीय होते. नेमकेपणे आणि नेटकपणे प्रश्‍न समजावून सांगण्यात आणि गोष्टीतील, प्रश्‍नातील सत्य सांगण्यात आचार्य अत्रे यांचा हात कोणीही धरणार नाही. 

शेवटी एकच विनोद सांगतो. बेळगाव महाराष्ट्राचे की कर्नाटकचे असा प्रश्‍न आहे. निजलिंगप्पा म्हणाले, बेळगाव असेल महाराष्ट्राचे. पण वाढविले आम्ही कर्नाटकांनी. त्यावर आचार्य अत्रे म्हणाले, पूर्वी गावागावत भिंतीवर डोंगरे बालामृताच्या पाट्या संबंध भिंतीवर रंगवीत असतं. आया आपल्या बाळाला डोंगरे बालामृत पाजीत. तरी डोंगरे म्हणत नसत आम्ही बाळाला वाढविले. त्याचे बाळसे आम्हीच धरले. त्या माऊलीनेच त्याला वाढविले व बाळसे धरले. 

साऱ्या महाराष्ट्राला हसायला ज्या आचार्य अत्रे यांनी शिकवले, त्या आचार्य अत्रे यांच्यावर अश्‍ललतेचा आरोप केला जातो. आता होणाऱ्या विनोदाला आपण काय म्हणाल? मग कुठे गेले बुद्धिवंत, संस्कृती रक्षक, का मुग गिळून बसलेत? आचार्य अत्रे यांनी लोकांच्या म्हणजे संस्कृती संरक्षणाच्या दृष्टीने अश्‍लिल विनोद केले.

पण ज्या बुद्धीप्रधान माध्यमातून विनोद केले ते माध्यम कधीही अश्‍लिल नव्हते. परिणाम शेवट अश्‍लिल नव्हते. साध्य अश्‍लिल असेल. पण साधन अश्‍लिल नव्हते. नेटकेपणाने प्रश्‍न समजावण्यासाठी त्यांनी काही तशी उदाहरणे दिली. म्हणून आचार्य अत्रे अश्‍लिल कसे?

मूल जन्माला आले की ते रडते आणि आपण हसतो. आचार्य अत्रे जन्माला आले ते रडले आपण हसलो. त्यात आचार्य अत्रे हसले, आपल्याला हसविले. सतत सहविले. हसता हसता त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपण मात्र रडत होतो. रडत राहणार. होय रडतच राहणार. 

- ऍड. बाबुराव कानडे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com